Login

तिची काय चूक? (भाग:-२)

एका अकस्मात घटनेतून सावरणाऱ्या क्षिप्रा आणि तिला साथ देणाऱ्या मनोहर यांची कथा

#जलद लेखन स्पर्धा- ऑक्टोबर:-२०२५

शीर्षक:- तिची काय चूक

विषय -अकस्मात

भाग:-२

"तिला म्हणालो होतो मी, नसत्या फांद्यात पडू नकोस. समाजसेवा करण्याची लय हौस होती ना तिला? अजून कर म्हणावं तिला समाजसेवा ! आली ना अंगलट, ती ही साधीसुधी नाही, तर स्वतः बरोबर आपली पण इज्जत, प्रतिष्ठा घालवली." माधवराव तिरमिरीत तुच्छ नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाले.

"अहो, पण‌ ती जाणार कुठे ? ती.." पद्मा अजून पुढे काही बोलणार तोच माधवराव हाताचा पंजा दाखवत पुन्हा गरजले,"अजून एक मुलगी आहे आपल्याला, हसू विसरू नकोस. तिचं भल करायचे असेल तर तिला इथून बाहेर जावं लागेल. जा सांग तिला, निघ म्हणावं येथून. आणि हो, तुला तिचा पुळका येत असेल ना, तू ही तिच्या सोबत चालती हो. पण नंतर मी तुझ्यासाठी मेलो असे समज."

त्याच्या या बोलण्याने पद्मा तोंडावर पदर लावून हुंदके देऊ लागली.

त्याचे हे कडू बोल क्षिप्राच्या कानात गरम शिसे ओतल्यासारखे वाटतं होते. शरीर आधीच त्या घटनेने घायाळ झाले होते आणि आता जन्मदात्याच्या बोलण्याने तिचे मन घायाळ झाले होते.

ती चुपचाप कशीबशी उठली आणि जड अंतःकरणाने हळूवार पावले टाकत बाहेर आली. पावले तर फार जड झाली होती. तरीही तिने घराबाहेर पाऊल टाकले. ती अजून दोन पावले जाणार तोच गेटमधून एक वयाची पन्नाशी ओलांडलेली व्यक्ती त्यांच्या कुटुंबियांना घेऊन आत आली. तिची अवस्था पाहून त्यांना कळून चुकले की तिच्या सोबत नक्कीच काहीतरी वाईट झाले असेल. त्यांनी तिला समजून घेत तिला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी नेले. ती तिच व्यक्ती होती, मनोहर ज्यांना क्षिप्राने मदत केली होती.

दोन दिवसांपूर्वी:-

क्षिप्रा पद्मासोबत तिचे दागिने घेण्यासाठी सोनाराच्या दुकानात जात होती. तेव्हा मनोहर त्यांच्या मुलीसोबत खरेदी करून दुकानातून बाहेर पडले होते. एका अज्ञात इसम त्यांना मारहाण करून त्यांची दागिन्यांची बॅग घेण्यासाठी झटपट करू लागला. ते क्षिप्राने पाहिले. पद्माने तिला अडवले पण ती तिचे न ऐकताच जात जातच तिने आधी पोलिसांना फोन केला आणि पटकन पुढे येऊन त्या इसमाशी दोन हात करू लागली.

त्याने चाकू काढून तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. पण क्षिप्राने तो हाणून पाडला. मनोहर मध्ये आले तर तो त्यांच्यावर हल्ला करणार तोच क्षिप्राने वार स्वतःवर झेलला. तिच्या हाताला छोटासा कट लागला. तो अजून वार करणार त्या आधीच पोलीस आले आणि त्यांनी त्या इसमाला ताब्यात घेतले. पण तो इसम आग ओकणाऱ्या डोळ्यांनी तिला पाहत होता, जणू तो डोळ्यांनी धमकी देत तिला म्हणत होता की तुला याची किंमत चुकवावी लागेल. तेव्हा तिने तेवढे मनावर घेतले नाही. पोलीस त्याला घेऊन गेले.

मनोहरने क्षिप्राचे मनापासून आभार मानत म्हणाले,"खूप मोठे ऋणी आहोत बेटा तुझे.  तू नसतीस तर काय झाले असते काय माहिती? तुझे उपकार कसे फेडू?"

"काका, मी माझं कर्तव्य केलं. उपकार नाही केले. द्यायचेच असेल तर आशीर्वाद द्या, दोन दिवसांनी माझा साखरपुड्याचा साधा घरगुती कार्यक्रम आहे. तुम्ही आला तर मला आनंदच होईल." क्षिप्रा त्यांना हसत म्हणाली.

मनोहर यांनी हसत तिला होकार दिला. तिने तिचा पत्ता आणि मोबाईल नंबर त्यांना दिला.

साखरपुड्या दिवशी क्षिप्रा काही कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा तोच इसम ज्याने मनोहरसोबत दागिण्यासाठी झटापट केली होती त्याने तिला गाठले. तिला चार चाकी गाडीत जबरदस्ती बसवले.

बंद गाडीत त्याने तिच्यावर खूप अत्याचार केला. तिने प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्या पुरूषी ताकतीपुढे तिची ताकत कमी पडली. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिचे फाटलेले आणि अस्ताव्यस्त कपडे, विस्कटलेले केस, अंगावरील ओरखडे यावरून तिच्या सोबत काय झालं असेल याची तिच्या घरांच्या कळून चुकले. त्या आधीच तिथे शरदराव त्यांच्या कुटुंबासोबत तिथे उपस्थित होते.

क्रमशः