Login

तिची काय चूक - भाग १

प्रत्येक वेळी फक्त तिचीच चूक असेल हे गृहीत धरून चालणार नाही. ती सुद्धा बरोबर असू शकते.
तिची काय चूक - भाग १


"अग काय हा अवतार? आरशात तोंड पाहिलंस का? लाज काढलीस माझी आज. ते ही माझ्या ऑफिसमधल्या मित्रांसमोर."
राघव मधुवर खूप चिडून बोलत होता. त्याला आज तिचा जरा जास्तच राग आलेला. मधु मात्र खाली मान घालून त्याचे सगळे शांतपणे ऐकून घेत होती.

"बस.. तुला हेच येतं. मी काही बोलत असलो की गप्प उभ रहायचं. खाली मान घालून घुम्यासारखं ऐकून घ्यायचं. अग किमान ड्रेस तरी चांगला घालायचास. त्या पोराला पण तसचं घरातल्या कपड्यांवर ठेवलं. मी आधीच फोन करून ह्यासाठी सांगितले होते, की किमान तू जरा आवरून बसशील! पण नाही.. तुला अशीच गबाळ्यासारखी राहायची सवय ना!"
राघव आता अगदी तोंडाला येईल ते बोलत सुटला. मधुला खरतर खूप वाईट वाटतं होते. रडूही येत होते त्याच्या अशा बोलण्याचे, पण ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता.


"तसे नाही हो.. पण मी तर घरातले सगळे व्यवस्थित आवरले होते. तुमचा फोन येताच कामाला लागले. काहीतरी चांगल बनव म्हणून सांगितले तुम्ही, तेव्हा लगेच खाली जाऊन ब्रेड आणला. तुम्हाला माझ्या हातचे ब्रेड पकोडे आवडतात ना! मग तेच बनवायचे ठरवले होते. आणि खरं सांगायचं झालं तर चिकू मला अजिबात काही काम करू देत नव्हता. झोपेतून उठल्यामुळे तो सारखा रडत होता; मग उरलेलं बाकीचं काम आवरायचं राहून गेलं."
मधु खूप हळू आवाजात बोलत होती. तिला खूप जास्त वाईट वाटतं होते. ती स्वतः ची बाजू सांभाळून घेत बोलण्याचा प्रयत्न करत होती.

"बस, चिकूच नाव घेतलं की झालं सगळं. सगळं खापर त्याच्यावर टाकून तू मोकळी! अग त्या इवल्याशा बाळाला काय कळतं? पण तुला तर अक्कल आहे ना! स्वतः तशीच आणि त्या पोराला पण तसचं ठेवते. अग ब्रेड पकोडे मला आवडतात, पण सगळ्यांनाच आवडतील असे नाही ना! ब्रेड आणलाच होता तर त्याचे सँडविच बनवायचे होते ना! ते पकोडे किती तेलकट झाले होते."
राघव अजूनही तिला बोलत होता. त्याला वाटतं होते आपली बायको इतरांसमोर चांगली दिसावी आणि म्हणूनच तो तिला नेहमी बडबड करायचा, पण मधू मनाला खूप लावून घेत होती. तिच्या बाजूने विचार केला तर साहजिक आहे कोणत्याही बायकोला नवरा इतकं बोलत असल्यावर राग तर येणारच ना!


ऑफिसमधून निघतांना त्याने मधुला फोन करून आधीच कळवले होते, की त्याच्यासोबत आज ऑफिसमधले काही मित्र येणार आहेत घर बघायला. वास्तुशांतीच्या वेळी त्यांना यायला जमले नाही; म्हणून ते आज येणारं होते. त्यांना काहीतरी चांगले खायला बनव. त्याने आधी फोन करून यासाठी सांगितले होते, की घरात पसारा आवरून होईल आणि मधुला सुद्धा तयारी करायला वेळ मिळेल.

तिलाही कळतं होते ते सगळे आणि म्हणूनच ती जमेल तितके भरभर आवरण्याच्या नादात स्वतः मात्र तशीच राहिली. त्यात चिकू काहीच करू देत नव्हता; त्यामुळे तिची धांदल उडत होती. दोन्ही बाजूने ती अडकून पडल्या सारखी झाली होती. एकही गोष्ट तिला चांगली जमली नव्हती; त्यामुळे तिलाही वाईट वाटतं होते.


आपल्याकडूनच नेहमी चुका होतात असे तिला खूपदा वाटायचे. 'राघव खूप चांगला आहे, पण आपणच त्याच्यासाठी योग्य नाही. त्याला चांगले टापटीप राहिलेले आवडते आणि आपल्याला मात्र तसे काही जमतच नाही.'
असे म्हणून मधु स्वतः लाच दोष द्यायची आणि शांत व्हायची.