#तिचीपाऊलवाट भाग 26
©स्वप्ना...
आजीला डॉकटर जोशीवर लगेच विश्वास बसला,..आजी म्हणाली,"मी तर हिची आजी आहे मला तर बोलवायचं,विचारायचं."डॉकटर म्हणाले,"तुम्ही मुलगा पाहिलाय का आजी,..?"आजी म्हणाली,"अरे आताशी तर कळलं मला हीच पत्र आलं म्हणून मग तडक आले,..मुलगा कुठून बघणार,.."आणि तो बिचारा काळागोरा कसा असो,.. ह्यांनी मला सांगितलं नाही ना,.."खरंतर मंगल आजीला कळवण शक्य नव्हतं गावी निरोप देणं फार अवघड,मग झाला उशीर,..बायकांना अस डावललेलं मुळीच चालत नाही,..पूर्वी पासून बघ तू त्या मानाने पुरुष ह्या गोष्टी सहज घेतात पण स्त्री जन्मभर लक्षात ठेवते म्हणून तर आजही आजी एवढी नव्वदीला टेकली तरी गावाकडे एकटी राहाते,.. "
मंगल म्हणाली,"आजी अजून एकटी राहाते,..?लक्ष कोण देतं,.. आजोबा तर वारले ना,..?"हो ग आजोबा वारले तेव्हाच आग्रह केला इकडे ये आली नाही आणि माझ्या लग्नाचं तिने कारणच बनवलं,..म्हणजे अबोला नाही धरला पण आईला म्हणते," तू तुझी राहा मी माझी राहाते,.."
आम्हाला सगळ्यांना जीव लावते,..नातजावाई तर एकदम लाडका आहे,..पतवंड सुद्धा खुप लाडके आहे,..पण एकटीच राहायचा हट्ट करते,कोणाचेच ऐकत नाही,..आईला म्हणते तू तुझी समाजसेवा कर मला माझी ईश्वर सेवा करू दे दोघींच्या मध्ये अडचण नको,..खरंतर त्या लग्नापासून ती चिडलीच होती,..पण त्यादिवशी डॉ.जोशींनी खुप मजा घेतली म्हणाले.."आजी जावाई मी बघितला आहे काही चांगली निवड नाही तुमच्या नातीची,..त्यावर आजी त्याला म्हणाली,"पण त्याची निवड चांगली आहे ना,..त्याने माझी नात निवडली यावरून त्याची हुशारी कळली मला,.."डॉ.जोशी आजीची उत्तरं ऐकून खुश झाले आणि लगेच मूळ रुपात आले,..आजीला चटकन नमस्कार केला,.."आजी आशीर्वाद द्या तुमच्या नातीला निवडणारा मीच तो हुशार नातजावाई,.."त्याने अस म्हणताच आजीने मला डोळ्यांनी खुणावले,.."मस्त आहे नवरा,.."मी लाजले,..माझ्यावर तिने राग धरला नाही पण आईवर कायम धरून ठेवला,.. अजूनही धरून आहे,..आता आईच्या वाढदिवसाला तिला खास गाडी पाठवली आहे,..ती येणारच आहे,..तिथे बघ तिची मजा,..स्त्री कितीही वयस्कर झाली तरी काही अपमानाचे सल विसरत नाही,.ते घेऊनच वावरते,.."
मंगलने गाडी मध्येच थांबवली,..समोर एक बाई एक लेकरू पाठीला आणि एक लेकरू हाताशी धरून डोक्यावर ओझं घेत चालली होती,..मंगल आणि अनुने एकमेकींकडे बघितलं आणि दोघींना जे म्हणायचं ते कळलं,..अनुने त्या बाईला विचारलं,..ताई उंबरगाव किती लांब,..?ती बाई म्हणाली,"ताई आठ दहा असल आता,..त्यावर अनु म्हणाली,"तुम्ही कुठशी चालल्या,..ती बाई म्हणाली,"त्याच्या तीन किलोमीटर अलीकड पांढरी गाव लागतं त्यागावी चालले,.."
अनु गाडीतून उतरत मागचं दार उघडत म्हणाली,"बसा मग गाडीत सोडतो तुम्हाला,.."बाई जरा बुजली म्हणाली,"पैसे नाही ताई माझ्याकड तुम्हाला द्यायला,.."अनुने चक्क तिच्या खांद्यावर थोपटलं,.. बस अशी खुण केली,..ती बाई पाठीवरच्या लेकराला कडेवर टाकत पटकन गाडीत बसली,.. बोटाकडच लेकरू सीटवर हात फिरवायला लागलं,..त्याच्या डोळ्यातली चमक बघत अनु म्हणाली,"मंगल त्याचे डोळे बघ नवी वस्तू बघून कसे चमकत आहेत,.. तुला आठवत का आपण एकदा सायकली खेळून येत होतो,..सायकल भाड्याच्या दुकानात देऊन टाकली आणि आपण निघालो,..आपल्या गल्लीतल्या पाटलाकडं दोन दिवसांपासून एक लाल गाडी उभी होती,..त्यावर धूळ जमली होती,..तुला आणि मला त्या चकचकित गाडीला हात लावावा वाटला आपण काही फार लहान नव्हतो,..पण स्पर्शाची उत्सुकता,..आता ह्याच्या डोळ्यात जशी आहे तशीच होती,.."मंगल हसत म्हणाली,"हो ती उत्सुकता किती महाग पडली होती आपल्याला,..आपण त्या धुळीवर सा, रे,ग,म लिहून ठेवत होतो आणि पाटलाची म्हातारी आली बाहेर,..काय तोंडाचा पट्टा सुटला तिचा,..शिव्यांची लाखोली वाहिली तिने आपल्याला,..तेंव्हा कदाचित आपल्याला वाटलं नसेल आपण अश्या स्वतःच्या गाड्या घेऊ,..हो ना अनु,.."
अनु म्हणाली,"परिस्थिती बदलते फक्त हिम्मत धरायला पाहिजे ते जमलं आपल्याला,..आणि नशीबानेही एक टक्का साथ दिली पाहिजे,..कधी कधी मेहनतीच्या त्या नव्व्यानो टक्क्याला नशिबाचा एक टक्का भारी पडतो,.."हे सगळं गाडीतली बाई ऐकत होती,..ती म्हणाली,"ताई तुमच वाक्य पटलं,.. कधी कधी नशीब साथ देत नाही मग तुम्ही किती कष्ट करा आणि कधी कधी नशीब साथ देतं पण तुमची कष्ट करण्याची तयारी नसते मग काय,..भोगा आलेलं जगणं."
ती स्त्री काही बोलू इच्छिते हे ह्या दोघींच्या लक्षात आलं,..सध्या आपले विषय बाजूला ठेवत अनु तिच्याकडे वळत म्हणाली,"असं का म्हणता तुम्ही,तुमच्या सोबत असं घडलंय का,..?ती बाई म्हणाली,"ताई माझ्या नवऱ्याला शेती आहे,मी मदत करायला तयार होते तर नाही ऐकत थोडी थोडी करून विकली आणि दारू पितो,.. मी दुसऱ्याच्या शेतात जाऊन कामं करते,.. गावात मिळालं तर तिथं नाहीतर कोणत्याही गावात जाऊन काम करते,..मला लेकरं आहेत ,.. मी तर त्यांना उपाशी नाही ठेवू शकत ना,..
एवढ बोलून ती बाई रडायला लागली,..कदाचित फार दिवसात तिला कोणी विचारलं नसावं तिच दुःख,..तिने रडून घेतलं,..रडता रडताच ती बोलू लागली,.."लग्न काय फक्त बाईच्या शरीराशी होत का ताई,..तिच्या शरीराशी खेळून झालेले लेकरं,ते होताना जो त्रास होतो तो आणि शिवाय नवऱ्याने हात वर केल्यावर त्या बाईला जे खम्बिर होऊन उभं राहावं लागतं ते,..ह्याची दाद कोणाकडे मागायची ताई,..नवरा असून नसल्यासारखा असला तर कोणाला सांगता,दात पण आपले अन ओठ पण आपले,..बाई असती म्हणून जग चाललंय,...काही माणसं असतात पण चांगले,.. पण ज्यांचे नवरे कुठलीच जबाबदारी घ्यायला तयार नाही तिथं स्त्रीची कुचम्बना होते मॅडम,.."
अनु म्हणाली,"ताई तुम्ही म्हणता ते बरोबर पण एक लक्षात ठेवायचं हिम्मत हरायची नाही कारण बाईची ताकद ही वेलीसारखी चिवट असते,..वेल कशी तोडू म्हंटल तर लवकर तुटत नाही कारण चिवटपणा असतो तिच्यात,..तश्याच आपण बायका,..पाळी आल्यापासून सहनशीलता शिकत असतो,निसर्ग ती आपल्याला शिकवत असतो,..म्हणून तर आई होण्याचा मान बाईलाच..तो विधाता देखील ओळखून आहे,..हिच्यासारखी ताकद नाही पुरुषात,..म्हणून ह्या जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत,.."
त्या बाईच गाव आलं आणि तिने गाडी थांबवायला लावली,..उतरल्यावर अनुने डिक्कीत असलेला खाऊचा बॉक्स त्या मुलाच्या हातात दिला,.. त्या बाईने आग्रह केला,.."चला चहाला इथे जवळच आहे घर,.."अनु म्हणाली,"बाई नक्की आलो असतो पण अजून पुढचे टप्पे गाठायचे आहेत,..स्वतःची काळजी घ्या,..अश्याच हिमती आणि सक्षम राहा,.."ती बाई गोड हसली म्हणाली,"ताई आता दोन किलोमीटरवर एक उजव्या हाताच वळण घ्या म्हणजे तुमच गाव लागल."
गाडी दिसेनाशी होइपर्यंत ती तिथेच उभी होती,.. एकमेकींना त्यांनी नकळत प्रेरणाच दिल्या ह्या छोट्याश्या भेटीत.
अनु आणि मंगल दोघी एकमेकींकडे बघून हसल्या,..आपल्या कथेत ही जाहिरातच झाली नाही का मंगल म्हणाली,..त्यावर अनु म्हणाली,"हो ना,पण बरं झालं बिचारी किती चालते लेकरं घेऊन,..किती ताण घेऊन सहजतेने जगतात लोकं,.. अस वाटतं ना."
मंगल म्हणाली,"खरंच स्त्री कणखर, प्रेमळ सगळंच एकावेळी असू शकते ही गम्मतच आहे ना,आता ती बाई लेकरांसाठी किती प्रेमळ वागत होती आणि आलेल्या परिस्थितीला किती कणखर पणे तोंड देत होती,..अश्या कितीतरी स्त्रिया कष्टात जगतात ग,..खरंच काहीतरी केलं पाहिजे ह्या स्त्रियांसाठी."
क्रमशः
©स्वप्ना मुळे (मायी)औरंगाबाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा