Login

तिची पाऊलवाट भाग ३०

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 30
©स्वप्ना..
सासऱ्यांनंतर घरात दुसरा हुकूम सासूबाईंचा चालत होता,..मग स्वतःच्या काही गोष्टी आमलात आणाव्या हे स्वप्नच झालं,..साधं बैठकीतल्या गाद्यांवर कोणत्या चादरी घालायच्या, सकाळी,संध्याकाळी जेवायचा बेत काय करायचा हे सगळं विचारूनच करायचं,स्वतःच मत मांडायचं नाही,..मुळात तेंव्हा स्त्रीला काही मत आहे हीच मान्यता नव्हती,..तिला गृहीत धरलं जायचं,..तिने तिची हुशारी दाखवायची नाहीच मग मन अतृप्त राहिलं म्हणून कदाचित आजोबा आणि आजी गेल्यावर मी अशी दुष्ट वागले असेल मला माझं स्वतःच अस्तित्व घरात गाजवायचं होतं,.. एवढी वर्ष सगळं त्यांना विचारूनच करावं लागायचं मग मनाला हर्षवायूच झाला ते दोघ गेले आता आपणच ह्या घराच्या मालकीण,..पण आता अध्यात्माकडे वळल्यावर कळतं ना,..काय मोह नुसते,..खरंतर कुणाच्याच सोबत काही नेता येत नाही मेल्यावर पण बायकांना मोह सुटत नाही,..सुना आल्यातरी वाटी,चमच्यातलं लक्ष काही कमी होत नाही मग चालु राहतात कुरघोडी आणि हरवायला लागतात साधे जगण्यातले आंनद,..मला हे उशिरा लक्षात आलं पण बरं झालं ते समजलं म्हणून अनु तुझ्याशी मी तेंव्हा तशी वागले ह्याची माफी मागते आणि आता खास तुझ्या आईची मागणार,..खरंतर बाईने बाईला समजून घ्यायला हवं पण नव्हती तेंव्हा चांगली बुद्धी,.."
अनु म्हणाली,"मामी नका फार विचार करू,.."मंगल म्हणाली,"एक मिनीट तू ह्यांना मामी कशी म्हणतेस ग ह्या तुझ्या काकु ना,..?"अनु हसत म्हणाली,"अग काकाला आई भाऊ मानायची मग मी त्यांना मामा आणि हिला मामीच म्हणत आले,..यावर मामी म्हणाल्या ,"हो जे काही दोन चार वर्ष काढले तेंव्हा ह्यांची सख्खी बहीण जरी अमेरिकेत होती तरी ह्या बहिणीने हात कधी मोकळा ठेवला नाही,..छान राखी शोधून आणायच्या ह्या पोरी,..सोनी म्हणाली,"तुला तो राखीवाला आठवतो,..तो आपल्याला म्हणायचा तुम्हाला भाऊ नाही ना आपल्याला राखी बांधा तुम्ही दुकानातली जी राखी आवडेल ती सांगा ती काढून देतो,ती बांधा,..आणि कोणी त्रास दिला तुम्हाला तर बिनधास्त सांगा या भावाला,.."अनु म्हणाली,"हो आणि आपल्याला दहावीत शाळेतला तो मुलगा त्रास देत होता,..सारखा घरापर्यंत मागेमागे येत होता,त्याला तर आपण एकदा कसं ह्या राखीवाल्याच्या ताब्यात दिलं आणि त्याने पण त्या पोराला काय झोडपलं होतं,.. त्याच्याच दुकानातल्या राख्या बांधल्या होत्या त्याच्या हातावर,.."
मंगल म्हणाली,"मुळात वेड वय सगळ्या गमती घडवत राहातं..एका ठराविक वयानंतर त्या वाईट नजरा लगेच ओळखू येतात,..खरंतर स्त्रीला अश्या नजरा ओळखण्याच दैवी कसबच असतं म्हणा,.."
मंगलच्या या वाक्यावर मनीला जवळ घेत सोनी म्हणाली,"पण माझं दुर्दैव ग माझ्या लेकराला ते कसब नाही,.. म्हणून मी एवढी घाबरते समाजाला,..मागच्या महिन्यात आई मंदिरात गेली आणि पाय घसरून पडली तिला आणायला मी पळतच गेले जाताना टपरीवर असलेल्या वयस्कर माणसाला म्हंटल माझी लेक घरात आहे लक्ष ठेवा,..हे सगळं बोलताना सोनी अक्षरशः रडत आणि मनीला थोपटत बोलत होती,..त्या मेल्याने कुठे कुठे स्पर्श करून घेतला की माझ्या लेकराला,..मी आल्यावर चटकन निघून गेला,..पण मनीचा चेहरा खुप आंनदी झालेला होता,..जणू असा स्पर्श तिच्या देहाला हवाच होता,..नंतर तर काही दिवस ती त्या माणसाची खिडकीत बसून वाट बघायला लागली,..तो देखिल तिला चॉकलेटचं अमिश देऊन जवळ बोलवू लागला,..मी मात्र एकदिवस त्याला खुपच बोलले,..एक गिऱ्हाईक चहाला नसलं तरी चालेल पण माझी लेक अशी म्हणून तिच्या देहाशी हा खेळ मी कसा चालू देईल,..तिला नजर कळत नसली तरी मला कळते ना,..म्हणत सोनीने धाय मोकलून रडून घेतलं,.."
खरंतर सोनीच दुःख सांत्वनापलीकडचं होतं त्यामुळे खुप वेळ कोणीच काही बोलल नाही पण नंतर अनु म्हणाली,"सोनी तू हिला मतिमंदांच्या शाळेत घाल,..असं घरात कोंडून ठेवू नकोस,तिला थोडं तरी जग बघू दे,अनुभवातून ती खुप काही शिकेल,..तू तिला इतकं झाकून ठेवशील तितकं जग तिला त्रास देईल,..मी कळवते तुला तिच्या शाळा,.."
सोनी म्हणाली,"खरंच मलाही आता वाटतं ह्या कोशातून बाहेर पडावं,.. काहितरी स्वतःच छान सुरू करावं,.. हे गाव,ती टपरी मलासुद्धा जगण्याचा कंटाळा येतो ग,.."
अनु म्हणाली,"मी नक्कीच मदत करेल,..तू फक्त तुझ्या मनाची तयारी कर,..सोनी अग हिरकणी गड उतरून आली होती आपल्या बाळासाठी,..तुला सरळ रस्त्यावर चालायचं आहे तुझ्या बाळासाठी,..झुगारून दे हे सुरक्षित जगणं,..तुला वाटतं शहरात लोक भेटतील,गर्दीत कोणी तुझ्या लेकीला स्पर्श करेल,..पण ही गर्दी,गोंगाट याची सवय होऊ दे तिलाही,..तू स्वतःला घडव आधी ती घडेल त्यांच्या शाळेत गेल्यावर,.."
सोनी म्हणाली,"नक्की आता नाही मागे सरकणार मी मलाही आता बदलायची आहे माझी माझ्या लेकराची जगण्याची दिशा,.."
अनुला एकदम गाडीला करकचून ब्रेक लावावा लागला,..समोर एक म्हातारी आजी मोळी घेऊन जात होती,..गाडी थांबतच मान वळवून समोरची आजी हसली आणि म्हणाली,"माफ कर माय लगबग होती माझ्या पाठीशी,.."
अनु म्हणाली,"आजी जिवापेक्षा जास्त घाई,.."आजीने गाडीत बघितलं मनीकडे बोट दाखवत म्हणाली,"अशीच नात हाय माय माझी,..आई निघून गेली मासाचा गोळा मी सांभाळणार नाही म्हणत मग लेकाला साथ नको द्यायला तो म्हणतो," त्या जीवाचा काय गुन्हा,.."मग मी तिला जपते,..आता शहाणी झाली मागच्या महिन्यापासून तवापासून अजून घोर लागतो जीवाला,..म्हणून लगबगीने निघाले,..तुला माझा त्रास झाला,माफ कर मला,..अनु म्हणाली,"हे घ्या आजी नातीला द्या,..अनुने खाऊचा एक बॉक्स समोरच ठेवला होता तो आजीला दिला,..अनुने पटकन आजीचा मोबाईल मध्ये फोटो घेतला,..म्हणाली,"अश्या पाऊलवाटा चालणाऱ्या कितीतरी जणी आहेत ज्या मला कॅनव्हसवर रेखाटायच्या आहेत,..आजी एवढी मोठी मोळी घेऊन निघून गेली,..
मंगल म्हणाली,"सोनी कदाचित मुद्दाम देवाने ह्या आजीची भेट घडवली,..अग आपल्यापेक्षा वयस्कर माणसं हिम्मत करून जपतात आपल्या मुलीला तू तर सहज सांभाळू शकतेस,..तू तशी अजून तरुण आहेस,हुशार आहेस,..तू आता फक्त सकारात्मक विचार कर,..अनु म्हणते तसं तिला शाळेत टाक आणि तू शहरात वावर बघ तुझ्यातला आत्मविश्वास कसा वाढतो ते,.."
इतकावेळ गप्प बसलेल्या मामी म्हणाल्या,"मलाही पटतंय तुमचं म्हणणं आता तिला शहरात गेलंच पाहिजे,..आणि घडणाऱ्या घटना घडतच असतात आपल्याला उगाच वाटतं आपण केल्या पण तो घडवत असतो,..चांगलं वाईट सगळं तो ठरवून घडवतो,..तुम्ही म्हणता तस पुढं काही चांगलं घडणार असेल म्हणून,..आजची ही भेट मला वाटतं परमेश्वराने मुद्दाम घडवली,..ह्यातून नक्कीच चांगलं होईल,.."
अनु म्हणाली,"मामी अहो एकमेकांना ऊर्जा देणाऱ्या आपण स्त्रिया खरंच उर्जेचा वाहता अखंड झरा असतो,..एकमेकींकडे बघून सकारात्मक जगायला शिकायचं,..जगताना अडचणी प्रत्येकाला फक्त त्याच स्वरूप वेगवेगळ,..आपली मावशीआजी,माझी आजी,आई,तुम्ही ही मंगल,मी ,सोनी ही मनी प्रत्येक जण लढत असतो आपल्या परीने,..एक लक्षात ठेवायचं जिद्द हरायला नको,..ती कायम असावी मनात,मला चांगलं आयुष्य जगायचं आहे,.."
आपली उद्याची आईच्या वाढदिवसाची थीमच आहे,..तिच्या पाऊलखुणा,..
मंगल म्हणाली,"अनु डे तू खरं वाढदिवसाचा काय काय सरप्राईज बेत आहे ते सांगितलंच नाही तिथे नेमकी काय तयारी आहे,..आता आपण नेमकं कुठे जाऊन राहणार आहोत?,..आईला काहीच माहिती नाही का तू येणार आहेस ते,..?
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all