Login

तिची पाऊलवाट भाग ३७

तिची पाऊलवाट


#तिचीपाऊलवाट भाग 37
©स्वप्ना...
आजीने माईक हातात दिल्यानंतर उमाने आजीच्या खांद्यावर हाताने थोपटल,..आणि माईक मधून आणखी एका महिलेचं नाव घेतलं,..ती महिला सरपटत आल्यासारखीच आली हॉलच्या मधोमध,..तिला पाय होते पण त्यात जीव नव्हता,..पण मोठ्या सराईतपणे ती स्टेजजवळच्या खुर्चीवर बसली,..उमाने तिच्या हातात माईक दिला,..तिनं सगळ्यांना खुप छान हास्य दिलं,..आणि ती आत्मविश्वासाने बोलायला लागली,.. मला असं बघून तुम्हाला अनेक प्रश्न उभे राहिले असतील ना पण मी अशीच आहे लहानपणापासून,..मग संघर्षाचं जगणं आलंच माझ्या नशिबी,..माहेरी सगळयांना वाटायचं हि अशीच आता आयुष्यभर सांभाळावी लागेल,..प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त राग,चीड असायची माझ्यासाठी,..त्या सगळ्या नजरा तश्याच सहन करत मी धडपडायचे,.जगायचे कारण जगण्याची आस सुटत नव्हती,..देवावर माझा खुप विश्वास होता,..त्याने जन्माला घातलं म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं घडणार होतं आपल्याकडून हा विश्वास असायचा,.. मंदिरात जाऊन देवाची सेवा करायला आवडायचं मला अशीच एकदिवस मंदिरात गेले,..त्यादिवशी आईने घरी खुप मारलं होत मला,..खायला काळ आणि भुईला भार असं म्हणाली होती,..मी खरंतर घरातली सगळी कामं करत होते फक्त पैसा मला कमवता येत नव्हता,..वयही वाढलं होतं आईला वाटायचं लग्न होणार नाही,..असंच आयुष्यभर पोसा हिला,..ती रागराग करायची ,सतत मला अशी नकारात्मक बोलायची,..हे सगळंच त्यादिवशी रडून रडून बोलले देवाजवळ,..थोडयावेळात तिथे माझ्यासारखाच एक मुलगा आला,..खरडत खरडत,.. देवाला काय सुचवायचं होतं त्यातुन आमची फक्त नजरा नजर झाली,..एकमेकांची दुःख आम्हीच समजू शकत होतो हे समजलं आणि देवाने आयुष्य बदलून टाकलं त्याने मला मागणी घातली आणि आमचा संसार सुरू झाला,.. आमचं घरच मुळात ताईंनी उभं केलेलं आहे,माझा नवरा तेंव्हा ताईंकडे काम करायचा,.. ताईंनी बरीचशी पैश्याची कामं त्याच्यावर सोपवलेली होती,..बँकांचे कामं तो चोखपणे करायचा,..लग्नानंतर ताई स्वतः आमच्या घरी आल्या,..मी दिलेलं लोणचं त्यांना खुप आवडलं आणि त्यांनी माझा तो गुण उचलला,.. माझ्या जगण्याला वेगळं वळण मिळलं,..नकारात्मकता कुठल्या कुठे पळाली,..मी सतत कामात दंग असायचे,..संस्था तेंव्हा लहान होती पण ताई तेंव्हा स्वतः मला मदत करत होत्या,..आणि आता तर संस्था एवढी मोठी झाली की मी खास लोणचं विभाग प्रमुख आहे,..लोणच्याचे कितीतरी प्रकार आम्ही बनवतो,..माझ्या हाताखाली ताईंनी दहाजणी तयार करून दिल्या आहेत त्यातल्या आम्ही जवळपास सहाजणी अपंग आहोत,..आमच्या अपंगत्वाला आत्मविश्वासाची किनार जोडण्याचं काम ताईंनी केली म्हणून आमचं आयुष्य आज उजळून निघालंय,..आम्ही ताईंच्या ऋणात आहोत आणि आजच्या या सुंदर दिवशी देवाकडे हेच मागणं मागणार की ताईला निरोगी दिर्घायुष्य दे,..ताई आम्हाला आमच्या आयुष्यात नेहमी हवी आहे,..मी आणि हे ताईंना फुलांनी शुभेच्छा देऊ इच्छितो म्हणत ती पटकन खुर्चीवरून खाली सरपटली तिकडून नवरा देखील आला हातात सुंदर फुलांचा गुच्छ घेऊन,..आई पटकन खुर्चीवरन उठली आणि खाली वाकली दोघे मिळून रडत होते,..फुल देऊन त्यांनी आईचे पाय धरले,..आईने दोघांच्या डोक्यावर हात फिरवला,..हॉल अगदी निशब्द झाला होता,..आई खरंच खुप मोठी झाली होती,..तिने लोकांचे दुःख समजून त्यावर काम करायला सुरुवात केली होती,..उमाने परत माईक हतात घेतला,..तिने स्वतःचे डोळे पुसले,सगळा हॉलच त्या दोघांना पाहून भावूक झाला होता,..आईनी मात्र त्यांची किव केली नव्हती तर त्यांना जगणं शिकवलं होतं ते ही सन्मानाच..
उमा म्हणाली,"मी आलेल्या नातेवाईकांना विनंती करेल त्यांना काही छान अनुभव सांगायचे असतील तर,..इथे स्वागत आहे,.."
मामी पुढे आल्या,..नमस्कार सगळ्यांना म्हणत मामी पुढे बोलू लागल्या," कधी कधी आपण माणसं ओळखायला चूक करतो त्यातलीच मी,...माझ्याकडे ही राहायला आली अनुची आई याच नावाने बोलावते मी तिला,..खुप तरुण वय होतं आमचं बऱ्यापैकी आम्ही सोबतच्याच वयाच्या असु,.. नवरा गेल्याच्या दुःखातून स्वतःच तारुण्य हरवलेली ही स्त्री,..आमच्याकडे राहायला आली तेंव्हा घरकामाला एक नोकर बरी हाच विचार आमच्या डोक्यात होता,..कस असत ना गरजवंताला अक्कल नसते तस झालं होतं हीच बिचारी खुप राबली आमच्या घरात स्वतःसाठी आणि लेकीसाठी,.. सतत दुय्यम गोष्टी वापरल्या कधी तकार नाही केली,.कोणाला उलटून नाही बोलली,..तशी माझी सखी देखील झाली होती,..मस्त पटायच आमचं पण सासुबाई गेल्या आणि माझ्यातला अहंकार जास्तच उफाळला,..मला वाटू लागलं मीच ह्या सगळ्या गोष्टींची मालकीण,..नाही ते आरोप केले पण एका दृष्टीनं बर झालं तिच्यातला स्वाभिमान जागा झाला..आज तिला इथे ह्या जागेवर बघून मन भरून येतं,.. काही काळ आमची सोबत होती तेंव्हाच तिच स्वयंपाकाचं कसब,..तिचं वेळेच नियोजन,..तिचा स्वयंपाक घरातला टापटीपपणा खरंच या यशामध्ये हे सगळं तेंव्हापासून होत फक्त कोणाला ओळखता आलं नाही,..पण बऱ्याचदा यशासाठी वेळही यावी लागते,.. संघर्षाचा अनुभव खुप काही शिकवून जातो आयुष्यात...आज ती इतकी यशस्वी आहे तिच्या सोबत आपण आयुष्यातले सुख दुःख वाटून घेतले याचा अभिमानही आहे आणि आपण हिच्याशी वाईट वागलो ह्याची खंतही आहे आज त्यासाठी मी तिची सर्वांमसमोर माफी मागते,.. तिच्या या वाक्यावर आई खुर्चीतून उठून तिच्या जवळ आली आणि तिला जवळ घेत म्हणाली,"तुझी मी ऋणी आहे मला तू स्वतःला शोधू दिलंस,.. तू तेव्हा तशी वागली नसतीस तर कदाचित मी आजही चार भिंतीतच असते,..तुझे आभार आणि तुझ्या अश्या वागण्याचा माझ्या मनात कुठलाही राग नाही उलट तुमच्या घराने आश्रय दिला होता आम्हा मायलेकींना त्याचे ऋण आहेत ते तसेच राहू दे तू आज माझ्यासाठी आलीस ह्यातच सगळं आलं,..मामी आईच्या गळ्यातच पडली,..आईलाही अश्रु अनावर झाले,..आजी बसल्याबसल्या पदराने डोळे पुसत होती,..
उमाने दोघींना जागेवर बसवलं आणि परत उमा बोलू लागली,..स्त्रीला समाज नाजूक,अबला,परावलंबी,भित्री समजतो पण खरंच तिच्यासारखी ताकद कोणात नसते,.. ते आपल्या ताईने सिद्ध केलं,..ताईने आपल्यातही आत्मविश्वास जगवला आणि आपण अगदी यशाच्या आकाशात मस्त भरारी घेऊ लागलो,..अशीच यशाच्या शिखरावर त्यांची लेक पोहचली आहे,..आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते ती प्रसिद्ध चित्रकार आहे आणि आताच मला डॉ. जोशींनी सांगितलं आहे की तिला जागतिक दर्जाच्या चित्रकाराचा पुरस्कार मिळाला आहे,..तो घेण्यासाठी ती इथून पुढे प्रवासाला जाणार आहे,.. तिला आपल्या खूप शुभेच्छा आहेतच पण नक्कीच आपण उत्सुक आहोत तिच्या ह्या आईसोबतच्या प्रवासाविषयी ऐकायला,..पण त्यापूर्वी त्यांचे जावाई जे प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ आहेत त्यांना दोन शब्द आज बोलावे ही मी विनंती करते,..
डॉ.जोशी उभे राहिले,..आईकडे बघितलं आणि म्हणाले,"आई म्हणजे माझ्या सासुबाई निरागस,निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आणि प्रचंड कष्टाळू,..मी बघत आलोय ह्यांची परिस्थिती पण त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता कधीही ढळलेली नाही,..एक स्त्री जेंव्हा ठरवते तेंव्हा निश्चितच यशाच्या शिखराकडे चालायला लागलेली असते,..फक्त तिची वाट खडतर असते पण जेंव्हा ध्येय तिच ठरलेलं असेल तर यी नक्कीच त्या शिखरावर पोहचते ह्याच प्रत्यक्ष अनुभवलेलं उदाहरण माझ्या सासुबाई आहेत,..आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अश्या आईची लेक माझी बायको आहे,..ती आईचेच गुण घेऊन आहे म्हणून आज तीही खडतर पाऊलवाट चालून यशाच्या ह्या शिखरावर पोहचली आहे,..तिचं पैंटिंग पण ह्याच आशयाचे आहे "तिची पाऊलवाट".
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

🎭 Series Post

View all