©स्वप्ना...
सोहळ्याच्या शेवटच्या टप्प्याकडे सगळे वळले निरोप घेण्याची वेळ आली,..उमाने हातात माईक घेतला,..सगळ्यांना आल्याबद्दल आभार मानले,..अनुच्या आईने माईक घेऊन माझा दिवस छान केलात,अशीच प्रेरणा देत जा म्हणत परत एकदा सगळ्यांना धन्यवाद दिले,.
मंगल म्हणाली," अनु आता मलाही निघायला हवं,..मामी आणि सोनी मात्र राहणार होत्या,..आई म्हणाली,"अग मंगल तू ही राहा ना आल्यासारखी लगेच नाही जाऊ देणार मी तुम्हाला,.."
ह्या सगळ्यांच्या बोलण्यात अनु म्हणाली,"आई माहेरपणाला आम्ही नंतर येऊ आता आपल्यालाच सगळयांना थोड्या वेळात निघायचं आहे,..सगळ्यांना आश्चर्य वाटलं आता दुपारचा एक वाजला आहे आता कुठे जायचे आहे,..?
डॉ ,जोशी म्हणाले,"आणखी एका सुंदर सोहळ्याला जिथे एका स्त्रीच्या प्रवासाचा सन्मान होणार आहे,..अनुला मिळालेला अवॉर्ड तिला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने घ्यायचा आहे,..त्या सोहळ्याच ठिकाण दोन तासांवर आहे आपण रात्री परत येऊ शकतो,..तिच मन आता कोणी मोडू नका,..चला दोन गाड्या आहेत गाडीत बसा,.. आजी म्हणाली ,"मी पण येणार माझ्या नातीच कौतुक बघायला,.."सगळे हसून म्हणाले,"चला लवकर निघायला हवं."आजी म्हणाली ,"माझी गाडी आहे त्यात मी आणि उमाची आजी आणि उमा येऊ,.."
मंगल,आई ,मामी एका गाडीत येणार अस ठरलं,..सोनी नको म्हणाली, मनी इथे रमली आहे आता प्रवासात त्रास देईल,.. त्या नव्या मैत्रिणीने तिला घरी येण्याचा आग्रह केला,..ती त्यांच्या सोबत गेली."
ठरल्याप्रमाणे सगळे गाडीत बसले,.. दोन्ही गाड्या पुढे जाताच अनु आणि डॉ.जोशी निघाले,..शेवटी ते अपंग जोडपं गेटपाशी उभं होत सगळ्यांना निरोप देत,..डॉकटरांनी वाकून हात मिळवला त्याला आणि म्हणाले,"खरंच प्रेरणा देणार जोडपं आहात तुम्ही."दोघांच्या चेहऱ्यावर खुप आंनद होता.
गाडीत बसल्यावर अनुने डॉ.जोशींच्या हातावर हात ठेवत म्हणाली,"थँक्स डिअर,..मला खरंच वाटत नाही ए की तू आला आहेस आणि आता पुढेही तू असणार आहेस मी तो अवॉर्ड घेताना."
जोशी म्हणाले,"अनु तुझा फोन झाल्यावर मी खुप विचार केला,..तू नेहमीच मला साथ देतेस,...तुझा हा क्षण खरंतर किती महत्वाचा आणि त्या बक्षिसाची रक्कम तू त्या मुलीसाठी खर्च करायला निघाली,..ते लोक येऊनही गेले माझ्याकडे,.. तुझ्याविषयी भरभरून बोलत होते,..तू म्हंटलेले गाणं त्या चिमणिनी मला सांगितलं.
"आता लय नाही लय नाही मागणं,.."
उगाच मन विचार करायला लागलं आपल्या बायकोच्या आवडीचं हे गाणं ती जगते पण ना,..तू खरंच कधी काही मागितलं नाही मग आठवलं मागे गप्पात म्हणाली होतीस,"आईच्या सत्तराव्या वाढदिवसाला आपण दोघ मिळून औक्षण करू,..
"तुला हा पुरस्कार जाहीर झाल्यावर म्हणालीस,"तू असावा तिथे माझा फोटो काढायला,.."म्हंटल खरंच आपल्या बायकोच अगदी,.. लय नाही लय नाही मागणं आहे मग काय केलं सगळं मॅनेज आणि आलो वेळेत,..अनु तू त्या पुरस्काराची रक्कम त्या चिमणीला लावणार आहेस म्हंटल्यावर तर मन खुप आंनदी झालं..खरंच नशीबवान आहे मी तू माझ्या आयुष्यात आहेस माझ्या आयुष्याचा कॅनव्हस रंगवणारी,..."
जोशींच बोलणं ऐकून अनु म्हणाली,"वा आज डॉ. साहेब गप्पा मारण्याची बरीच तयारी करून आलेत,..ए पण तू त्या आजी आजोबांना सांगितलं नाहीस ना आपलं नातं आणि चिमणीच्या आजारासाठी मी पैसे लावणार आहे असं,.. आणि काय रे चिऊ बरी होईल ना लवकर,.."
जोशीने अनुचा हात थोपटला,"काळजी करू नकोस ती बरी होईल,आता पैसा उभा राहिला की ट्रीटमेंट वेगाने करता येते ग,.."अनु म्हणाली,"जोशी मी आता खुप पैंटिंग करून विकत जाईल आणि तो पैसा आपण गरजू कॅन्सर पेशंटसाठी वापरत जाऊ अशी ट्रस्ट बनवू चालेल का?"डॉकटरने अगदी डोळे भरून अनुकडे बघितलं,..डोळे मिचकावत म्हंटला लव्ह यु डिअर."
लवकरच गाड्या सोहळ्याच्या जागी पोहचल्या,..आलिशान हॉटेलमध्ये हा सोहळा होता,..मोठ्या मोठ्या पैंटिंग हॉलमध्ये लावलेल्या होत्या,..अनुची पैंटिंग मात्र झाकलेली होती कारण ती होती विजेती पैंटिंग,..थोड्याच वेळात सोहळा दिमाखात सुरू झाला,..अनुच नाव उच्चरल्या गेलं आणि तिला विजेत्या सीटवर बसवण्यात आलं,.. आजी,आई आलेल्या सगळ्याचजणी डोळे भरून तिचं कौतुक पाहात होत्या,..तिला काही प्रश्न विचारले जात होते,..जोशी ह्या सोहळ्याचे फोटो वेगवेगळ्या कोनातून घेत होते आणि मुलांना पाठवत होते,.. दोन्ही मुलांचे मॅसेज आले होते,..आई तू ग्रेट आहेस.. हे मॅसेज वाचून डॉ.जोशींना अगदी भरून आलं होतं,..खरंच ग्रेटच आहे ही,..हिच्या आयुष्याची पाऊलवाट काही सोपी नव्हती,..तरी चालली न थकता आज इथपर्यंत आली,.. अशीच यशाची शिखर आता ती सर करत राहील,..स्त्री एक जबरदस्त ताकत, शक्ती आहे हे काही खोटं नाही असं मनाशीच म्हणत डॉ. जोशी हसले.
तो क्षण आला ज्याची सगळयांना उतकंठा लागली होती,ती पैंटिंग जिने इथल्या सगळ्या पैंटिंगला मागे टाकल होतं,.. खुप दिगग्ज चित्रकार या स्पर्धेत सहभागी होते,..सगळ्यांच्याच नजरा स्टेजवर झाकलेल्या त्या पैंटिंगवर होत्या,..संयोजकांने अनुला विंनती केली की तिने आपले पैंटिंग सगळ्यांना दाखवावे,..अनु उठली ती स्टेजच्या भिंतीजवळ गेली,..एक पडदा त्यावर होता तिने तो सरकवला,...टाळ्यांचा कडकडाट झाला,..पैंटिंग खरंच खूप सुंदर होते,..पैंटिंगच नाव \"तिची पाऊलवाटच\" होत.
आजी डोळे किलकील करून ते बघण्याचा प्रयत्न करत होती,..आईला पैंटिंग खुप आवडलं,उमा आणि तिची आजी आनंदाने टाळ्या वाजवत होत्या,..मंगलचे डोळे पैंटिंग आणि आपली मैत्रीण असे दोघाना बघून भरून येत होते.डॉ.जोशी तर फोटो काढण्यात दंग होते,..एकातएक स्त्रीच्या प्रतिमा आणि पाउलवाटेवरची पावलं असं सुंदर रेखाटन होतं,..रंग, रेषा यामध्ये गती होती जगण्याची,स्त्रीची लवचिकता,लकब आणि तरीही तिच्या अंगी असलेला चिवटपणा रेखाटण्याचा उत्तम प्रयत्न झाला होता,..सगळ्यांनाच पैंटिंग आवडलं,..पुरस्कार देण्याची वेळ आली तेंव्हा अनुने आयोजकांना विंनती केली मी एकटी अवॉर्ड घेणार नाही त्या पुरस्काराच्या खऱ्या मानकरी माझ्या सोबत आहेत त्या सगळयांना मला इथे बोलवायचं आहे आम्ही सगळ्याजणी तो पुरस्कार घेऊ,..
आयोजकांनी मागणी मान्य केली,अनुने आजीला आणि बाकी सगळ्यांना वर बोलवलं,..फटाके,फुलं सनई ह्या सगळ्या मंगल सोहळ्यात पुरस्कार मिळाला,..आई ,आजी सारखे डोळे पुसत होत्या,मंगल अनुच्या गळ्यातच पडली,..डॉ.जोशींनी डोळ्यानेच प्रेम दाखवलं,..आजीने तिच्या पद्धतीने दृष्ट काढली,..आईने मायेने जवळ घेतलं,..उमाच्या आजीने डोक्यावरून हात फिरवला त्याक्षणी अनुला देवघरातला विठ्ठल आठवला,..उमाने हातात हात मिळवला.
पुरस्कार घेऊन गाड्या निघाल्या सगळेजण थकले होते,..रात्री पटापट सगळे निद्रा देवीच्या अधीन झाले,..
सकाळी अग्निहोत्राच्या आहुतील अनु उठली,आजीने तयारी केलीच होती,अनुने हसत आजीच्या हाताला हात लावला,..आताही त्या गौरीच्या वासाने अनुला प्रसन्न वाटलं,..मनात सुर्यदेवाचे आभार तिने मानले,..सगळ्या जगाला ऊर्जा देणारा तू माझ्या भोवती मला ऊर्जा देणाऱ्या ह्या स्त्रीया दिल्यास तुझे आभार.
अनु आणि मंगल निघाल्या आईने दोघींची ओटी भरली,..आजीने आता आईकडेच राहण्याचा निर्णय घेतला,..डॉ.जोशी पहाटेच इमर्जन्सी असल्याने निघून गेले होते.
मामी,सोनी आणि मनी आता संस्थेतच सहभागी होणार होत्या,..मनीच्या डोळ्यात वेगळीच चमक अनुला दिसली पुढच्या पैंटिंगला नवीन विषय देणारी ती चमक होती.
संस्थेच्या अनेकजणी निरोप द्यायला आल्या होत्या,.. अनु सगळयांना भेटून गाडीत बसली,.. मंगलने गाडी चालवायला घेतली,..सगळ्यांना टाटा करून गाडी परतीच्या प्रवासाला निघाली,..सूर्य आताही गाडीसोबत पळत होताच,..मंगल म्हणाली,"मग चित्रकार मॅडम त्यादिवशी कथा अपूर्ण राहिली,..तुमच्या लग्नाची."
अनु हसत म्हणाली,"अजून ऐकायचीच आहे का तुला,..मग काय लग्न थाटात झालं की साधं या पेक्षा आम्ही सप्तपदी चाललो आणि तू बघितलं ना अजूनही आम्ही ती सप्तपदीची वचनं जगण्याचा प्रयत्न करतोय,.."
दोघी हसल्या लालगाडी आता यशाच्या पाऊलवाटेवरून सुसाट निघाली होती.
समाप्त...
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा