©स्वप्ना..
अनु विचारात होती तेवढ्यात सासुबाई म्हणाल्या,"चला ग आपली गप्पांची आणि गाण्याची मैफिल गच्चीवर भरवू,..आणि काजव्याच्या झाडावर आपलेही आठवणींचे काजवे उजळून घेऊ,..त्यांचा उत्साह बघून अनुला झोप आलेली असून देखील ती उत्साहात गच्चीकडे वळली.चौघींची मैफिल गच्चीवर बसली,..मंगलने नाजूकपणे तंबोऱ्याच्या तारा छेडल्या लावला,आणि रेवालाच मैफिलीची सुरुवात करायला सांगितली,..अनु म्हणाली,"रेवा शास्त्रीय गाते,.."त्यावर रेवा म्हणाली,"मामीसारखा दिगग्ज गुरू मिळाल्यावर गाणं शिकायलाच हवं ना. सासुबाई म्हणाल्या ,"आईचा गाता गळा आलाय हिच्या गळ्यात हिचा आवाज ऐकला की मला लेकीची आठवण येतेच."मंगलला लक्षात आलं ह्या परत नक्की रडतील तिने लगेच रेवाला सुचना दिली,.."चल रेवा सुरू कर गणेशाची ती भूप रागाची चीज,.."रेवा जरा सावरून बसली,..मंगलने फक्त तंबोराच घेतला होता सोबत,रात्री शांत आणि बरं वाटते ग खरंच आता रात्रीच्या शांत वातावरणात तंबोरा किती गोड वाटत होता कानाला,..रेवाने सुरुवात केली.
"करी नमन तुज आज गणेशा,
विघ्न हरा भव तारक इशा,..
सकलारंभी प्रथिती तुजसी
सकल कला माझी परिपूर्ती
ज्ञानमार्ग दावी अभिलाषा.."
खरंच रेवाच्या गळ्यात गोडवा होता,..उच्चारांची फेक छान स्पष्ट होती,..हिची आई तर कसली जबरदस्त गायिका होती,..अनुला आठवलं तिकीट लावून कार्यक्रम बघितला होता आपण चार एक वर्षांपूर्वी पण नंतर ती अशी अचानक कशी गेली ते कळलंच नाही,..खरंतर आता विचारावं अस अनुला खुप वाटलं पण नंतर वाटलं नको सासुबाई परत रडतील त्यापेक्षा उद्या प्रवासात बोलू मंगलशी ह्या विचाराने अनु आता गप्प बसली,.. तिच्या गाण्यानंतर सासुबाई म्हणाल्या,"ए तुमच्या दोघींची मैफिल रंगण्या आधी मी देखील म्हणेल एखादं सुगम गायन चालेल ना,..मंगल म्हणाली,"अहो,आई असं परवानगी घेत काय विचारताय,..ही काही व्यवसायिक मैफिल थोडीच सुरू आहे,..हे तर एकमेकींसोबत वेळ देणं आणि त्या काजव्यांसारखं लखलखण सुरू आहे,..तुम्हीच म्हणाल्या ना त्या काजव्यांसारख्या चमकणाऱ्या आठवणी सांगू मैफिलीमध्ये,..मग आई तुम्ही सांगा ना,..अण्णा एवढे दिगग्ज गायक मग तुम्ही गाणं का नाही शिकलं कधी,..?"
सासुबाई जणू काही कोणी असं विचारावं आणि त्यांनी आठवणीत हरवून उजळून जावं त्या समोरच्या झाडाला जसं आता काजव्यांनी लक्ख केलं होतं अगदी तसंच वाटलं त्यांना,..त्या लगेच शून्यात हरवत म्हणाल्या,"त्याकाळी बालविवाह प्रथा होती,.. खरंतर इतिहास बघितला तर स्त्रियांना खुप काही सोसावं लागलं,..तेव्हाच्या अनिष्ट रूढी ह्या अक्षरशः जीवंतपणी मरण देणाऱ्या होत्या,..मी अजून शहाणी झाले नव्हते,..तर मला ह्यांच ठिकाण चालून आलं,.. खरतर आमच्यात अंतर पंधरा वर्षाच होतं. मी दहा वर्षाची तर हे पंचवीस वर्षांचे होते,पहिली बायको देखील वारली होती ह्यांची,..मला खरंतर एवढया मोठ्या माणसाशी लग्नच करायचं नव्हतं,पण माहेरी खुप गरिबी होती अगदी अठरा विश्व दारिद्र्य होतं,..आम्ही पाच बहिणी होतो,..खाण्याचे हाल होते,..जेवणाच्या एकावेळची भ्रांत होती,..बऱ्याचवेळा पोळी पाण्यासोबत खावी लागायची,..कधी कधी तर नुसतं पाणी पिऊन झोपावं लागायचं,..अश्या परिस्थिती हे ठिकाण म्हणजे संधी होती आमच्या घराला काही सुधारण्याची कारण ह्यांनी अस मान्य केलं होतं की पोरगी दिलीत तर दोन वर्षे धान्य पुरवू,..खरंतर हे श्रीमंत होते,..त्यामुळे ह्यांना हुंडा ही अपेक्षा नव्हती शिवाय बीजवर लवकर ठिकाण मिळेना आमचं घर बरोबर गाठलं त्यांनी,..मग काय माझं मेलीच कोण ऐकणार,..दोन दिवस रडले पण आई आजीने समजावलं,..तू लग्न केलंस तर तुझी भावंड दोन वर्षे तरी पोटभर जेवू शकतील ग,..उगाच हट्ट नको करू असं म्हणत केलंच मला नवरी,..दिलं बांधून ह्यांच्या गाठीला,..दोन दिवस रडून रडून डोळे सुजले,..घरात अजीसासूबाई होत्या त्यांनी जवळ घेत समजावलं,..बायकांचं हेच जगणं असतं,.. एखाद रोपटं कसं एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत लावतात,..तसच तुला त्या घरातून या घरात आणलं आहे आता तुला इथे रुजावच लागेल ग,..फार काही कळायचं नाही त्यांच बोलणं,..पण,नेहमी म्हणायच्या बाईची जात काही सोपी नाही ग बाई,..राबावं लागत,खस्ता खाव्या लागतात,झिजावं लागतं,.. तरीही हाती फार काही लागत असं नाही पण तरीही तिचं बिचारीच समाधान असतं,.. माझा संसार माझा संसार,..त्या बडबड करत राहायच्या मग सासुबाई येऊन डोक्यावर हात फिरवत म्हणायच्या,..शिकताल सुनबाई तुम्ही देखील हे सगळं आणि ह्यातूनच हिमतीने उभ्या राहाताल,..हे सगळं आठवणीतलं बोलता बोलता मंगलच्या सासूबाईंना दम लागला,..अनुने पटकन पाणी दिलं,.. सासुबाई म्हणाल्या मंगल तो वर एक गाणं म्हणा अजून खुप काजवे आठवणीतले उजळायचे आहेत मला,..मंगल गोड हसली आणि तिने बडा ख्याल घेतला,..
"कौन गत भई,...म्होरी रे पियाना पुछे,..एक हुना बात,.. एक बन ढुंढी,...सकल बन ढुंढी,... डार डार कर क....र अ अ पात कौन गत भई.."
रात्र गडद होत होती आणि त्यात हा सुरांचा खजाना,..अनुला अगदी शांत आणि तृप्त वाटत होतं,..एखादं पैंटिंग पूर्ण झाल्यासारखं..मंगल म्हणाली,"आई बोला तुम्ही,..तुमचे काजवे स्त्री ताकदीचे पैलू उलगडून दाखवत आहेत,..खरंच किती कठीण काळ होता,..रेवा म्हणाली,"आजी खरंच किती कमाल होती ग तुमची दहाव्या वर्षी नवऱ्याच्या घरी जायचं बापरे,..मी तर लग्नच नाही करणार इथेच राहणार तुझ्या कुशीत." असं म्हणत रेवाने आजीच्या मांडीवर डोकं ठेवलं,..आजी रेवाच्या केसात हात फिरवत बोलू लागली,.."मी पण तर माझ्या आजीला अशीच म्हणायचे,पण आजीनेच समजावलं आणि मी पण लहान असले तरी सगळ्यांना जेवायला मिळेल ह्या विचाराने ह्या लग्नाला तयार झाले,..खरंच सासरे माझे खाण्यापिण्याचे खुप लाड होते,.. कशाची कमी नव्हती,दूध,तूप घरी गोधन होतं त्यामुळे भरपूर दूध असायचं,..तेंव्हा वाटायच बऱ्याचदा आई आम्हा भावंडांना दुधात पाणी घालून द्यायची,..इथे सासुबाई ग्लासभर दूध हातात द्यायच्या तेंव्हा माहेरची खुप आठवण यायची,..आजच्या सारखे फोन नव्हते तेंव्हा, वाहन नव्हते त्यामुळे सारखं सारख माहेरी जायला मिळायचं नाही,.. आठवण आली तर कोपऱ्यात जाऊन मुसुमुसु रडून घ्यायचं,..खायचे प्यायचे लाड असले तरी कामही करावं लागायचं,..खटल्याच्या घरात भरपूर काम असायची,..येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा राबता असायचा,..काम करताना मला तर रडूच यायचं,..तेंव्हा सासुबाई जवळ घेऊन समजवायच्या,"अग वेडाबाई असं रडायचं नाही बायकांच्या जातीला हे काही नवीन नाही,..आयुष्य जात तिचं चुलीजवळ,..बघ शेवटी सगळं पोटासाठी असतं आणि घरातल्याचं पोट सांभाळायचं काम बाईकडे असतं म्हणून तर तिला अन्नपूर्णा म्हणतात,..मग त्या अन्नपूर्णनेने सगळयांना मायेने,प्रेमाने खाऊ घालावं,..त्या मला प्रत्येक पदार्थ बनवताना समजावून सांगायच्या,..नाही समजलं तर चार चारदा सांगायच्या पण कधीही चिडचिड करायच्या नाही,..खुप ताण देत नव्हत्या पण हसतखेळत स्वयंपाक शिकवण सुरू होतं,.. माहेरी आईकडे स्वयंपाक शिकायला तेवढा अन्नधान्य साठाच नव्हता कधी इथे मात्र सगळ मुबलक होतं,.. तिखट,मसाले,धान्य, भाज्या सगळ्या गोष्टींची रेलचेल होती,..त्याकाळी बायका खुप कष्ट करायच्या,..सकाळी सकाळी जात्यावर पीठ दळणं,.. सडा सारवण , रांगोळी,..गोठ्यातली काम सगळी लगबग असायची उठल्या पासून झोपेपर्यंत,..पण कधी आळस नसायचा,..सकाळी जात्यावरच्या ओव्या तर फार सुंदर असायच्या त्यात माहेरच्या आठवणींच्या ओव्या असल्या की मला तर रडायलाच यायचं.
घरातल्या अजेसासूबाई म्हणायच्या त्या दोन ओव्या तर मला आजही आठवतात..
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा