©स्वप्ना..
अनुला आठवलं मामीने जेव्हा मावशीआजी गेली आणि ही आमच्याशी वाईट वागली तेंव्हा आजी म्हणाली होती,"तोंड नाही बघणार या बाईच मी,.."पण,त्यांनतरही बऱ्याचदा भेटी झाल्या तेंव्हा आजी फार काही बोलायची नाही पण आज अगदी अंजारून गोंजारून बोलत होती,..खरच वयानुसार माणस अशी हळवी होत असतील का,..अनुला उगाच वाटून गेलं,..तेवढ्यात हॉलच्या दरवाज्यात गोगटे मावशी उभी राहिली,..गोगटे मावशी अगदी होती तशीच दिसत होती,..गोरीपान आणि गडद लाल रंगाचा साडी आणि त्याला सोनेरीकाठ असलेली ही मावशी आधीपासून अशीच छान राहाते,.. खरंतर मधल्या काळात जेंव्हा ही खचली होती तेंव्हा फक्त मनावर परिणाम झाला होता बाकी रूप कुठेही शिणल नव्हतं,..छान राहणं तेंव्हाही तिला जमायचं,..आई तिला या विषयावर बोलली देखिल होती तर मावशी म्हणाली होती,"माझी आई अशीच होती,..दिवसभर किती थकली तरी वडील येण्याच्या आत,संध्याकाळी हात पाय धुवून छान साडी बदलून बसायची,..अगदी ज्या दिवशी तिने सकाळी वडिलांच्या हातचा मारही खाल्ला असला तरी,..त्याकाळी नवरे मारायचे बरं बायकांना,..आईला मी विचारलं होतं एवढं छान का राहतेस,..आई म्हणाली होती,"खरंतर सुंदर हे विशेषण स्त्री साठीच बनवलं आहे देवाने,..मग त्या विशेषणाला जपावं,..रंग रूप आपल्या हाती नसलं तरी ,..ते जसं आहे तस त्याला टवटवीत ठेवावं,..आपल्याला बघून कोणाला मरगळ यायला नको आणि आहे ते साड्या,दागिने बाईने लेऊन घ्यावं,..उद्या मेल्यावर काय करायच्या त्या जपून ठेवलेल्या साड्या,..जीवंत आहोत तर छान राहून घ्यावं ग,..बायकांना जपून ठेवायची फार सवय असते,.माझ्या शेजारची बाई इतकी साड्या जपायची घरात सारख्या घाण विटक्या साड्या घालायची आणि एकदिवस मेली अचानक,..नवऱ्याने सगळ्या साड्या प्रेतावर बांधल्या आणि रडत म्हणाला आता तरी घाल खुप हौशीने घेतल्या हिने छान राहावं म्हणून पण हिने त्या जपूनच ठेवल्या जीव जपला नाही आणि साड्या जपल्या आई मात्र अशी राहायची मला आवडायचं आणि आईच म्हणणं मलाही पटलं होत मग मी पण छानच राहायला लागले,..खरंच म्हणूनच ती आताही छान फ्रेश दिसत होती आईपेक्षा पाच एक वर्षाने लहान असेल पण आता अगदी पन्नाशीतली दिसते,.. हे सगळं अनु आठवत होती विचार करत होती आणि मावशीने तिला हाक मारलीच,.."ए अने तिकडे काय उभी आहेस इकडे ये,.."अनु लगबग तिच्याकडे गेली,..गळ्यात पडली,..मावशीच्या डोळ्यात पाणी आलं, मावशी जवळ घेत म्हणाली,"किती दिवसांनी भेटत आहेस ग,..किती प्रसिध्दी मिळवलीस,..माझ्या बहिणीच्या घरी चांगली सुन म्हणून नावही कमावलंस,..काय म्हणतो आमचा डॉ .जोशी? अनु म्हणाली,"मजेत आहे तो आणि तू मात्र येऊ नको आमच्या घरी,.."
मावशी म्हणाली,"अग कुठे सुटका नाही माझी माझे नातवंड यातच असते मी आज मात्र इकडे येण्याचं आधीच सांगून ठेवलं होतं,..तेंव्हा कुठे सुटका झाली आहे माझी ती पण रात्री परत येण्याच्या बोलीवर,..नात झोपत नाही माझ्याशिवाय,..ती बोलत होती तेवढ्यात आजीने हाक मारली,"ओ गोगटे बाई जरा इकडे दर्शन द्या किती वर्षे झाली भेट नाही,.."
गोगटे मावशी अनुला सोडून लगेच आजीकडे वळाली, आजीच्या पाया पडली,..आणि दोघी गप्पात गुंग झाल्या त्यांना बघून अनुला वाटलं आजीचं आणि मावशीच आपल्या लग्नात मिनीट पटत नव्हतं आणि आज अगदी सहजतेने बोलत आहेत खरंच बायका अश्या पण असतात,..पण खरंतर तुम्ही बायका कश्या असता हे मात्र सांगणं कठीण आहे हे डॉ.जोशीच वाक्य आठवून तिला हसू आलं आणि मनात नवऱ्याची तीव्र आठवणही झाली,..आपण किती आग्रह केला होता त्याला आईला आंनद होईल जावई आल्याचा पण काम हेच दैवत आहे मग काय,.. आणि खर आहे म्हणा पेशंट तो नसला की हॉस्पिटल डोक्यावर घेतात,..त्याचाच हातगुण येतो म्हणतात,.... अनु हे सगळं मनात विचार करत होती आणि तेवढ्यात उमाने अनुच्या कानात सांगितलं,..ताई घरून निघाल्या आहेत त्यांना फक्त संस्थेतल्या एका मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळे संस्थेत जाण्याआधी इथे या असं फोनवर आता सांगितलं आहे,..आता येतीलच त्या दहा मिनिटात,..
अनुने तिला छान हास्य दिलं आणि म्हणाली,"उमा तुझ्यामुळे मी हे एवढं छान करू शकत आहे आणि आईला आंनद देऊ शकत आहे,.."
उमा म्हणाली,"ताई तुमच्या आईपेक्षा त्यांनी आम्हाला ताई म्हणून खुप जीव लावला आहे आमचं कर्तव्य आहे आम्ही हे करावं,..चला आपल्या जागा घेऊ या तुमच्यासाठी स्टेजजवळ तो पडदा आहे त्यामागे तुम्ही असणार,..तुम्ही तिथे जा बाकी मी बघते,.."
उमाच्या बोलण्यावर अनु पडद्याआड गेली,..संस्थेच्या पाचजणींचा ग्रुप औक्षणासाठी दारात थांबला,..दारापासून फुलांनी रेखाटलेल्या पाऊलवाटेभोवती पाकळ्या टाकायला सगळ्या तरुण पोरी उभ्या राहिल्या,..तिकडे माईक जवळ मंगल उभीच होती,..सगळे अगदी तयारीत होते,..अनुची आई हॉलबाहेर आली,.. उमा लगबगीने त्यांना घ्यायला खाली गेली,..त्यांना संस्थेच्या सगळ्याजणी ताई म्हणत होत्या,..उमा म्हणाली,"चला ताई,..ताई म्हणाल्या,"उमा अग छानच दिसत आहेस आज अगदी काही खास आहे का,..?आणि हा वाढदिवस कोणाच्या बाळाचा हे मला लक्षात नाही आलं ग,..?"उमा म्हणाली,"ताई आत चला ना लक्षात येइल तुमच्या,.."
दोघी हॉलच्या चार पायऱ्या चढून वर आल्या,..हॉलमध्ये त्या पाचजणी औक्षणाला उभ्या होत्या त्यात थरथरत आजी घुसली,..गोगटेमावशीला घेऊन,..त्यांना बघून आई एकदम आश्चर्यचकित झाली,..तुम्ही दोघी कश्या एकत्र?आजीने काही न बोलता औक्षण सुरू केलं,..तिच्या पाठोपाठ गोगटे मावशीने केलं ..मामी आणि सोनी त्या पाचजणीत शिरल्या मनीला ते सगळं बघून मजा वाटत होती,..तिच्या डोळयांना किती दिवसांनी अशी गर्दी दिसत असेल ,..दोनचार पाकळ्या तर ती सारखी आईवर टाकत होती,..आईने तिला जवळ घेतलं,..पण ह्या सगळयांना एकत्र बघून आईला कळेचना अरे तुम्ही सगळ्या इथे कश्या काय??तेवढयात मंगलने स्वागत गीत सुरू केलं,.. आईला कोणीच उत्तर देईना,.. आईला मंगलचा आवाज ओळखीचा वाटला आईने कोपऱ्यात बघितलं,..मंगल गाणं म्हणत हात हलवत होती,..आईने हसून हातानेच काय असं केलं??आता मात्र आईची नजर अनुला शोधायला लागली,..आईने आधी आजीला नमस्कार केला,..आजीचे डोळे भरून आले,..आजीने आईला मिठी मारली,..कशी आहेस ग,..?आईला देखील आजीला बघून आंनदअश्रू आले,..गोगटे मावशीने तर आईला करकचून मिठी मारली,.."माझं लाजळूच झाड ग ते किती हुशार झालं म्हणत,.."
आई मावशीला म्हणाली,"अग काय हे ?"सगळ्या एका जागी,..तेवढ्यात सोनी, मनी मामी गळ्यात पडल्या,..पण आईच्या प्रश्नाला कोणी उत्तर देत नव्हतं,..आईने उमाला विचारलं उमा अग तुला हे सगळ माहीत होतं बेटा,..?त्यावर ती देखील काहीच बोलली नाही,..ह्या सगळ्यात मंगलचा सूर आईला आंनदी करत होता स्वागत गीतही तसंच होत म्हणा,..
"स्वागत सुमने उधळू चला
स्वागत सुमने उधळू चला
लहर लहर वायूंची नादे
मोद भरे या धुंद दिशा ही,.."
आई त्या फुलांच्या पाऊलवाटेवरून चालायला लागली,..मुली तिच्या अंगावर पाकळ्या टाकू लागल्या,..असल्या कौतुकाने ती संकोचली,..आलेल्या सगळ्यांना हात जोडून अभिवादन करायला लागली,..स्टेजकडे तिला बसायला सांगितलं तर आधी मंगलकडे वळाली,.. मंगल आईच्या गळ्यात पडली,..मंगलला रडू देखील आलं,..तिने पण आईला खुप जवळून अनुभवलं होत ना,..आईने तिचे डोळे पुसले,..अग काय ग पोरींनो माझा एवढा थाट कशाला..?
क्रमशः
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा