तिची सल भाग १

तुझी बायको जाते कामाला आणि घरात नाही म्हणता सगळं करावंच लागतं
"ह्या माणसाला माझा त्रास दिसला नाही आणि आता चार दिवस झाले नाही सून आली की, बरोबर तिच्या बाजूने बोलायला लागला." सुमित्राची आज धुसफूस चालली होती.

"किती त्रासात दिवस काढले. दिवसभर राबराब राबायचे तरी एका शब्दाने कधी म्हणाले नाही आराम कर. मी काय मशीन होते का? का नुसतं घरातली कामं करायला आणलं होतं?
आता बरा पुळका येतो आहे."

सुमित्रा आज मनातली भडास मुलासमोर सुबोधसमोर बोलून दाखवत होती.

मुलगा देखील ती काय बोलते आहे हे मन लावून ऐकत होता.

त्यालाही पटत होतं आईचे म्हणणं.
आजीच्या हाताखाली झालेली फरफट त्याने पाहिली होती. सतत पाहुणे असायचे.

मान वर करायला फुरसत नव्हती. आज सुमित्राला राग सुनेची बाजू घेत होते म्हणुन नव्हता आला तर राग हा होता जो विचार सुनेसाठी केला तो माझ्यासाठी का नाही?

सुबोध "आई, तुझं म्हणणं बरोबर आहे. पटतंय मला ; पण आता मागचं उकरून काढण्यात काही अर्थ आहे का? आता आपण काही बदलू शकतो का?"

सुमित्रा "सुबोध, माझ्या मनाला काय वेदना होतात माझी मला माहित. मला गृहीत धरल्या सारखे केले. सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे वय होते का? तरी मी सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. कशासाठी ? संसार करायचा होता. हा संसार माझा एकटीचा होता का? लग्न निभवायची जबाबदारी माझीच होती का?"

"आई, तुला माहीत आहे ना आजी,आजोबा कसे होते. त्यांच्यासमोर बोलायची हिंमत कोणामध्येच नव्हती. बाबांचा नाईलाज होता."

हे वाक्य सुमित्राचा नवरा केशव ह्याने ऐकले.

तो तिथेच उभा राहून सारं ऐकू लागला.
सुमित्रा आणि सुबोध आतल्या खोलीत होते.

त्या दोघांना कल्पना देखील नव्हती की, बाहेर केशव उभा आहे.

सुमित्रा "त्यांची हिंमत नव्हती; पण गळा माझा कापला गेला. घरातली मोठी सून म्ह्णून सर्व जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर. तुझा चुलता लगेच वेगळा झाला. ते त्यांचे आयुष्य मजेत जगले, माझी तर घुसमट कायम होत राहिली.

दोन दिवस कधी माहेरी गेली नाही की, माझ्या माहेरच्या माणसांच्या सुखदुःखात जाता आले नाही. सासू सासरे आजारी असतात. त्यांचा दवाखाना, पथ्यपाणी सारं काही मी सांभाळले. नाष्टा, जेवण काहीही असो सगळं वेळेवर. आजारी पडले तरी काम सुटलं नाही.
तुझ्या बाबांना कधीच दिसलं नाही का माझा होणारा त्रास?
एका यंत्राप्रमाणे राबत राहीले. आता अंगात त्राण नाही.
पाठदुखी, गुढघेदुखी लागली पाठी. डायबीटिस, बीपी गोळ्या सुरू झाल्या.
मला त्रास होतो आहे.
पाठचं सारं आठवलं ना तर आताही जीव तुटतो माझा. तुझी बायको कावेरी जाते कामाला.
किती जरी म्हंटलं ना तरी घरात मलाच लक्ष द्यावे लागते. काल म्हणत होते कावेरी काम करून दमते.
घरी येऊन पुन्हा काम करायला होत नाही तिला. जास्तीची कामं रात्री नको काढु.
सुबोध काय कामं करते ती?
जेवण मी बनवते. रात्रीची भांडीच घासते. तितकही करू नये का? का ते देखील मीच करावं? माझा जीव आहे की नाही?"

सुबोध "तसं तू बाबांना म्हणाली का?."

सुमित्रा "तसं मी म्हणू का? सगळं मीच समजावुन सांगू का? लहान आहेत का?"

सुबोध "आई, तुझं म्हणणं काय आहे? काय करावं बाबांनी?"

सुमित्रा "आता बघ काहीही म्हणणं नाही. कष्ट करून झिजले. माझं दुःख , त्रास नेहमीच दुर्लक्ष केला. मला गृहीत धरलं. आता त्रास सहन करायची ताकद खरंच संपली; पण जेव्हा ते असं कावेरीच्या बाजूने बोलतात तेव्हा मला चीड येते. तुला वाटेल मी कावेरीवर चिडते आहे,तसं अजिबात समजू नको. मला राग तुझ्या बाबांच्या दुहेरी वागण्याचा आहे. त्रास होतो मला. पाठचं सगळं आठवतं."

तोच केशव आता आला, तो म्हणाला, "काय गप्पा चालल्या आहेत माया लेकांच्या?"

सुबोध "काही नाही बाबा असंच बोलत होतो."

सुमित्रा म्हणाली, "चहा ठेवू का?"

केशवला खरंतर हे सगळं ऐकून चहा पिण्याची इच्छा गेली होती.

"नको, मी मित्राकडे चहा घेतला आहे."

सुमित्रा किचनमध्ये निघून गेली.

तिने सुबोध आणि स्वतःसाठी चहा ठेवला.
आज न जाणे का तो एक किस्सा आठवला.

सुमित्राने सर्वांसाठी चहा ठेवला.
सर्वांना चहा दिला. सासूने एक घोट घेतला तर चहामध्ये साखर जास्त झाली होती. लगेच तो चहा तिने सुमित्राच्या अंगावर भिरकावला.
सुमित्राला चटका लागला.

हा काय प्रकार घडतो आहे हे तिला कळलंच नाही.

सगळे तिथेच बसले होते. अगदी केशव पण एका शब्दाने काही बोलला नाही.

सुमित्रा रडू लागली.

तिची काय चूक होती?

मुद्दाम केलंच नव्हतं. ती फार आशेने केशवकडे पाहत होती.
तो काहीतरी बोलेन. तो मान खाली घालुन गप्प बसला होता. त्यादिवशी तिला कळून चुकलं होतं की, तिच्या वाट्याला काय भोग येणार आहेत.

कसं विसरणार होती ती?
हे विसरण्या सारखे आहे?

तोच तिचं लक्ष चहाकडे गेले.
चहा आटला होता. तिने पटकन गॅस बंद केला.
जास्तीचे दूध घालून तो उकळवला. सुबोधला चहा दिला. स्वतःही घेतला.

काही केल्या ती गोष्ट डोक्यातून जाता जाईना.
ती खूप शांत झाली होती.
सुबोध समोर बोलून तिने मनातलं बाहेर काढलं असलं तरी देखील न जाणे का इतक्या वर्षाची खपली आज निघाली होती. भळभळून वाहत होती.


केशव रुममध्ये जाऊन बसला.

त्याला ती सारी वाक्य आठवत होती जे सुमित्रा सुबोधशी बोलत होती.

डोळ्यावरील चष्मा काढला.
दीर्घ श्वास घेतला. त्यालाही कुठेतरी आपण चुकलो ही जाणीव झाली होती. पाठचे सारे दिवस आज आठवू लागले.

"अहो मी माहेरी जाऊ का? सहा महिनी झाले गेले नाही. बाबांची तब्येतही बरी नाही. खूप आठवण येते आहे आई बाबांची."

सुमित्रा फार आशेने केशवच्या उत्तराची वाट पाहत होती.
क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.





🎭 Series Post

View all