तिची सल भाग २

मी माझ्या मुलाचे दुसरं लग्न करेन. आमची श्रीमंती बघून मुलींच्या रांगा लागतील. जा तू तुझ्या माहेरी.

तिची सल भाग २

गेल्या भागात आपण पाहिले की,सुमित्रा सुबोधला लग्नानंतर आधी जो त्रास झाला होता ते सांगत होती. सुबोध देखील आई काय म्हणते आहे हे ऐकत होता. त्यानेही आईची फरफट पाहिली होती. हे सारं केशव म्हणजे सुमित्राचा नवरा ऐकतो आता पाहू पुढे.

केशवला देखील आधीचा किस्सा आठवला.
"अहो मी माहेरी जाऊ का? सहा महिने झाले गेले नाही. बाबांची तब्येतही बरी नाही. खूप आठवण येते आहे आई बाबांची."

सुमित्रा फार आशेने केशवच्या उत्तराची वाट पाहत होती.

केशवला पूर्ण कल्पना होती की, त्याची आई कांता तिला माहेरी जायचं म्हंटलं की तांडव करेन. त्याला स्वतःलाच आईशी बोलायची भीती वाटत होती.

तिने माहेरी जाणे टाळावे म्ह्णून तो म्हणाला, "होतील ते ठीक. असंही तू दिवाळीत जाणारच आहेस माहेरी तर आता कशाला?"

हे ऐकून तिला फार वाईट वाटलं.

तिला वाटलं होतं केशव त्याच्या आईशी बोलेन; पण त्याला इतकं काहीच वाटलं नाही.

आई, बाबा, एक लहान बहीण, एक भाऊ असं कुटुंब होतं. बाबांच्या काळजीने तिचं मन लागत नव्हतं. किती दिवस झाले त्यांना पाहिले नव्हते. माहेर म्हणजे स्त्रीच्या मनाचा हळवा कोपरा. सुमित्राचे काही केल्या मन लागेना.

माहेरच्या ओढीने हळवी झाली होती.
केशव तिची तगमग पाहत होता; पण आईच्या समोर बोलायचा धीर काही होईना. सुमित्राला आशा होती केशव त्याच्या आईशी बोलेल;पण तो काहीच बोलला नाही उलट तू जाणारच आहेस दिवाळीला म्हणत तिचे तोंड बंद केले.

दिवाळी अजून दोन महिन्यावर होती. बापासाठी इथे लेकीचे मन झुरत होते. फक्त त्यांना एकदा डोळे भरून पाहायचे होते. त्यांना जास्त त्रास नाही ना ह्याची खात्री करायची होती. तिचं जेवण देखील कमी झालं होतं, काही केल्या मन लागेना. तिला स्वतःच्या नशिबाचा राग येऊ लागला.

अश्या घरात पडले जिथे माहेरच्या सुखदुःखात जायची मुभा नव्हती. केशव ज्याच्याशी लग्न केलं तो देखील सहकार्य करत नव्हता. 'जर बायको म्हणून मी सारी कर्तव्य पार पाडते तर नवरा म्हणून केशव कर्तव्य पार पाडू शकत नाही का? कमीत कमी जिथे बोलायचे आहे तिथे तरी बोलावं' नाही तो बोलणारच नाही तिला शंभर टक्के खात्री होती. मन उदास झालं होतं.

सुमित्रा शांत राहू लागली. असेही त्या घरात आवाज घुमायचा तो कांताचा.

तिने रात्री सर्वांना जेवण वाढले. ती बाबांच्या विचारात होती. केशवच्या ताटातली चपाती संपली. त्याच्या ताटातलीच चपाती संपली आहे तरी पण सुमित्राचं लक्ष नाही हे पाहून कांता तिच्यावर भडकली आणि म्हणाली सुमित्रा नवऱ्याच्या ताटात चपाती संपली आहे याचे भान आहे का? त्याला काय लागतं, काय नाही याची विचारपूस करायची जबाबदारी तुझी आहे."

आवाज ऐकून सुमित्रा भानावर आली आणि म्हणाली "काही बोललात का तुम्ही?"

कांताचा राग अनावर झाला, ती केशवला म्हणाली "पाहिलं कसली मुलगी तुझ्या नशिबाला आली आहे. एक काम धड नसतं, काही बोललं तर तिच्या विचारात रमलेली असते. कसं होणार तुझं काय माहित? ह्या पोरीला आईबापाने वळणच लावलं नाही, अजिबात संस्कार नाही. कसल्या घरातून आली आहे काय माहित? नशीबच फुटकं असली विचित्र बाई माझ्या पोराच्या पदरी पडली आहे."

आधीच बाबांची तब्येत बरी नसल्यामुळे ती उदास झाली होती. कांताने आई-बाबांचे संस्कार काढले होते. तिला काही बोललं तरी तिला चालायचं, आई-बाबांना जेव्हा सासू बोलायची तेव्हा तिला वाईट वाटायचे. सुमित्रा रडू लागली. ती हुंदका आवरत म्हणाली, "सासुबाई, माझ्या आई-बाबांना काही बोलायचं नाही." कांताला प्रचंड राग आला.

"केशव, ही तोंड देखील चालवायला लागली आहे. थांब हिची सगळी मस्ती मी उतरवते. आज पासून दोन दिवस तू जेवायचं नाही. सगळं फुकट खायला मिळते, तर आमच्याच जीवावर उड्या मारते आणि आम्हालाच बोलायला लागली आहेस. तुला शिक्षा दिल्याशिवाय तू सुधारणार नाही."

तिचा सासरा देखील तिथेच बसला होता श्यामराव; पण त्याला माहीत होतं कांता समोर काही बोललं तर ती आकाश पाताळ एक करेन. तोही दिला जरा घाबरूनच होता. कांता अशी बाई होती तिच्यासमोर कोणी काही बोललेलं तिला आवडायचं नाही. ती म्हणेल तीच पूर्व दिशा आणि सुमित्रा सून म्हणून तर तिच्यावर जास्त अधिकार दाखवत होती. तिला तर मोलकरीणच करून ठेवले होते. सुमित्रा गरीब घरातली असल्यामुळे वाट्टेल तसं तिच्याशी वागत होती. कांताला पूर्ण खबर होती काहीही केलं तरीही ती कुठेही जाणार नाही. सुमित्रा तिथेच राहणार त्यामुळे कांताचा अन्याय दिवसेंदिवस वाढत चालला होता.


केशव जुने दिवस आठवत तर होता; पण तो प्रसंग आठवला तरी त्याच्या अंगावर काटा आला आणि स्वतःचा खूप रागही आला. मी का बोलू शकलो नाही? मी धीर एकवटून बोलायला पाहिजे होते. आईची इतकी दहशत की, मी तेव्हा देखील गप्प बसलो. त्याच्या डोळ्यात पाणी आले.

त्या दिवशी सुमित्रा रडतच झोपून गेली. केशवला वाईट वाटत होतं; पण तो अश्या वेळेस देखील शांतच बसला होता.

दुसऱ्या दिवशी सुमित्रा उशिरापर्यंत झोपूनच होती. पोटात अन्न नव्हते, त्यामुळे तिला कमजोरी आली होती.

अजूनही झोपली आहे हे पाहून कांताने ग्लासात पाणी घेतले आणि तिच्या तोंडावर जोरात फेकले.

"महाराणी, झोप झाली असेल तर उठ." कांता दात ओठ खात म्हणाली.

सुमित्रा उठून बसली. तिला कणकणी आली होती. उठायची ताकद नव्हती.

सुमित्रा अजूनही बसूनच आहे हे पाहून कांताला राग आला.

"सुमित्रा, घरातली कामं करायला काय तुझा बाप येणार आहे का?"

बसून राहिली तर आई वडिलांचा अजून उद्धार करेल ह्याची कल्पना तिला आली. उठवत नव्हतं तरी कशीबशी भिंतीला पकडून उठली.

कांताला माहीत होतं ती जेवली नाही , तिच्या अंगात त्राण नाही तरी देखील तिला तिच्यावर दया येत नव्हती. कसला सूड घेत होती देव जाणे? स्त्रीच स्त्रीची वैरी असते हे काही खोटं नाही.

झाडलोट केल्यावर तीने चहा ठेवला.
सर्वांना चहा दिल्यावर ती स्वयंपाकघरात चोरून चहा पिऊ लागली. तोच कांता आली आणि तिच्या हातातून चहाची वाटी घेतली आणि खाली फेकली.

"मला ताप आला आहे." सुमित्रा.

"तुला शिक्षा भोगायची आहे. सासुसमोर बोलायचा गुन्हा केला आहेस. दोन दिवस काहीच खायचे प्यायचे नाही. मी परवानगी देत नाही तोपर्यंत तू काही खाणार नाही, तसं केलंस तर तू तुझ्या माहेरी कायम जा. मी माझ्या मुलाचे लग्न दुसरीकडे लावून देईन. अजूनही पोरींच्या रांगा लागतील आमची श्रीमंती बघून."

'फुटकं नशीब अशी भिकारडी मुलगी आमच्या दारात पडली.' जाता जाता कांता पुन्हा पुटपुटली.

कांताचा प्रत्येक शब्द सुमित्राच्या काळजाला चिरत होता.
आई बाबाकडे गरिबी होती; पण कमीत कमी सुखी तर होते. उठता बसता असा त्रास तर नव्हता.

'आई - बाबा तुमची खूप आठवण येते. बाबा तुमच्या सुमीला तुम्हाला भेटायला यायचं आहे. डोळे भरून एकदा पाहायचे आहे. खूप आठवण येते आहे. तुमची सुमी फार लाचार झाली आहे.'

सुमित्रा रडू लागली.

दिवसभर कशीबशी कामं केली. रात्री अंग दुखत होतं. ती वेदनेने विव्हळत होती.
केशव तर केव्हाच झोपी गेला होता.
तिला रात्री तीन वाजता डोळा लागला. तिच्या स्वप्नात बाबा आले
क्रमशः
वाचकहो ही कथामालिका आहे. कथेचा भाग रोज पोस्ट करण्यात येईल.
कथा लेखन- अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.




🎭 Series Post

View all