तिची सल भाग ३

बाबांचा आवाज कातर झाला, "सुमी, फक्त एकदा डोळे भरून तुला पाहायचे आहे." तिच्या नवऱ्याने तिला उठवले. तो उदास दिसत होता
तिची सल भाग ३
गेल्या भागात आपण पाहिले की, सुमित्राच्या वडिलांची तब्येत खराब होती. तिने नवऱ्याला माहेरी जायची इच्छा व्यक्त केली. नवऱ्याला कल्पना होती, त्याची आई कांता तिला जाऊ देणार नाही, म्हणून त्याने बाबा बरे होतील, असेही दिवाळीत जाणारच आहेस तेंव्हा भेट होईलच असं म्हणून तिची समजूत काढली. ती नाराज झाली. सुमित्राच्या स्वप्नात तिचे बाबा येतात. आता पाहू पुढे.

किरकोळ शरीरयष्टी असलेले. चेहऱ्यावर समाधान. वयोमानानुसार जरासे थकलेले शरीर. अगदी तसेच जसे नेहमी असायचे. त्यांची बसण्याची जागा ठरलेली होती. दारासमोर एका खाटेवर बसलेले असायचे. आजही ते तिथेच बसले होते. तिच्या कानावर सुमी म्हणून बाबांची हाक आली की, लगेच ती बाबांकडे जाई. बाबांना काय हवं काय नको ती आवर्जून पाहत असे. बाबांची लाडकी सुमी कधी बाबांचे पाय चेपून द्यायची तर कधी बाबाचं डोकं.. किती बरं वाटायचं बाबांना! त्यांचा प्रसन्न चेहरा पाहून तिलाही बरं वाटायचं. बाबा दिवसभर शेतात काम करून थकलेले असतात हे तिला माहित असायचं. बाबांच्या कष्टाची जाण तिला चांगल्या पद्धतीने होती त्यामुळे बाबांची सेवा करायला तिला आवडायचं. बाबांवर तिचा खूप जीव होता आणि बाबांचाही तिच्यावर तितकाच जीव होता. बाबा अंगणात बसून पेपर वाचायचे. त्यांचे काही मित्र आले की, गप्पा मारायचे. सुमी चहा खूप छान बनवायची. बाबा आवर्जून त्यांच्या मित्रांसाठी चहा बनवायला लावायचे. सारं काम सुमी मन लावून करायची आणि बाबांसाठी तर डोळ्यात तेल घालून करायची. बाबांचे मित्र आले की, त्यांच्यासाठी चहा आणून द्यायचा हे तिला माहित असायचं. त्यामुळे तिला कधीच चहा कर असं सांगावं लागत नव्हतं. तिच्या बाबांचे मित्र देखील सुमित्राचे फार कौतुक करायचे. "फारच गुणी मुलगी आहे हो तुझी." असे जेव्हा मित्र बोलायचे तेव्हा त्यांच्या अंगावर मुठभर मास चढायचं. होतीच गुणाची पोरगी.. बाबांचा जीव की प्राण होती. गरिबी असली तरी मोठ्या मायेने, प्रेमाने त्यांनी तिला वाढवलं होतं. मोठ्यांचा मानपान करणं , अदबीने वागणं. सगळं ती शिकली होती.

गावात तर सगळे तिचे कौतुक करायचे. आज स्वप्नात सारं काही दिसत होतं. आजही बाबा सुमीला आवाज देत होते, "सुमी बेटा" तिलाही नेहमीप्रमाणे लगबगीने बाबांच्या दिशेने जायची ओढ लागली होती. बाबा म्हणत होते," सुमी, तुला डोळे भरून पाहायचे आहे." अचानक त्यांचा आवाज कातर झाला. "सुमी, एकदा येशील भेटायला? बाबाला तुला डोळे भरून पाहायचं आहे. एकदाच फक्त एकदा इथे ये." सुमी देखील बाबा बाबा करून त्यांना हाका मारत होती, "बाबा, मी लवकरच येईन तुम्हाला भेटायला."


झोपेतच ती बोलत होती. केशवने तिला उठवलं.

" ठीक आहेस ना सुमित्रा?" काय झालं?"

सुमित्राने आजूबाजूला पाहिलं, आपण माहेरी नाही आपण तर सासरी आहोत. ती केशवला म्हणाली, "माझ्या स्वप्नात बाबा आले होते. ते मला भेटायला बोलवत आहेत."


केशवने ऐकलं आणि काहीच बोलला नाही. तो इतकच म्हणाला "लवकर उठ नाहीतर आई पुन्हा ओरडेल."


सुमित्रा उठून बसली. 'आज बाबा मला बोलवत आहेत. बाबांची तब्येत खरंच खराब आहे का? सगळं ठीक तर असेल ना?'

बेचैन झाली होती, त्या बैचेन मनाला समजून घेणारं तिथे तिला कोणीच दिसत नव्हतं , अगदी ज्याच्यासोबत लग्न केलं तो केशव देखील तसाच. तिने उठून सर्व कामं केली; पण आज कशातच मन लागेना. आज मन फारच उदास होतं. भीती वाटत होती. माहित नाही का? पण काही केल्या बाबांचा चेहरा डोळ्यासमोर सतत येत होता. रडावसं वाटत होतं. आज अनेक आठवणी दाटून आल्या. दुपारी काम झाल्यावर ती खोलीत गेली. अशीच विचारांच्या तंद्रीत हरवली, लग्न झालं तेव्हा बाबा किती रडले होते; पण तरीही म्हणाले होते, "सासू, सासरे, नवरा हीच तुझी जवळची माणसं. त्यांना तुला जपायचं आहे. त्यांना आपलंसं करायचं आहे. सुखी रहा पोरी..” आज जसाच्या तसा त्यांचा चेहरा आठवत होता. आई देखील डोळ्याला पदर लावून रडत होती. लग्नानंतर इतकं सारं भोगावे लागेल हे तिला वाटलं नव्हतं. मुळातच भावनिक, सोशिक सुमित्रा अशा घरात पडली होती, जिथे तिचे अस्तित्व जणू नाकारलं होतं. वाट्टेल तशी वागणूक, वाट्टेल तसं बोलायचं.

तिचं मन नेहमी म्हणायचं, 'बाबा, तुम्ही तर म्हणाला होता तुझ्या सासरची सारी माणसं तुझी आहेत, सर्वांना आपलंसं करायचं. मी तर सर्वांना आपलं करण्याचा प्रयत्न केला; पण कोणीच माझं झालं नाही. तुमच्या सुमीला फार वाईट वागणूक दिली. तुम्हाला भेटायची इच्छा असून देखील मी येऊ शकत नाही. का बाबा? का इतक्या लवकर माझं लग्न केलंत? मी तुमच्याकडेच खुश होते. इथे तर फक्त टोमणे खावे लागतात, वाटेल तसे बोललं जातं. तुम्ही दिलेल्या संस्कारावर बोट ठेवलं जातं. मला माहितीये बाबा तुम्ही जे संस्कार दिले आहेत ते खूप चांगले आहेत. तुमची सुमी कधीच वाईट वागणार नाही; पण बाबा सर्वांचा आदर करते, सर्वांना जीव लावण्याचा प्रयत्न करते ;पण तरीही मला अशी वागणूक का? बंधनात का? मी इतकी लाचार का ?

केशवच स्थळ जेव्हा रामू काकांनी आणलं तेव्हा, तुम्ही किती खुश झाला होता. आनंदाने उड्या मारल्या होत्या. पोरीने नशीब काढलं असं आईला म्हणाला होता, आपल्यासारख्या गरीब घरातल्या मुलीला स्वीकारणारे मनाने देखील श्रीमंत असतील, असा तुमचा गैरसमज झाला होता. पैशावाल्याच्या घरात आपली पोरगी जाईल आणि राणी सारखी राहील असं तुम्हाला वाटलं होतं. माझं लग्न करण्यासाठी शेती देखील गहाण ठेवलीत. पोटाला चिमटा काढून एक एक रुपये जमवताना पाहिलं होतं. तुम्हाला कष्ट करताना पाहिलं. पैशानेच जर माणूस सुखी राहत असता बाबा, तर जगातली श्रीमंत माणसं कधीच दुःखी झाली नसती. मुलगी राणी सारखी राहीन या भावनेने तुम्ही माझं लग्न केशव सोबत लावलं; पण इथे तर मला नोकरापेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. तुम्हाला जर कळलं तुमची सुमी इतक्या त्रासात आहे तर ते तुम्ही सहन करू शकणार नाही. बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. ह्या दिवाळी सणाला जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी डोळे भरून पाहीन.'

तिचे डोळे भरून आले होते


तितक्यात कांता आली आणि खेकसतच तिला म्हणाली "महाराणी, बसली काय आहेस गं. पाहुणे येणार आहेत, चल पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर आणि जरा हात पटापट चालव."
असं म्हणून ती निघून गेली. सुमित्राच्या डोळ्यातील पाणी तिला दिसलं नव्हतं का ? का दिसून देखील न दिसल्याचं नाटक केलं होतं?

माहेरात मायेने जवळ घेणारे आई - बाबा होते, सतत अवती भोवती लहान बहीण सुमेधा आणि भाऊ सुशील होता. गरीबी होती ;पण माहेरी सुखात तरी होती. इथे तर फक्त आगीचे चटके बसावं असंच वातावरण होतं. मानसिक आणि शारीरिकरित्या फार खचून गेली होती. कोणी समजून घेणारं, ऐकून घेणारं कोणीच नव्हतं. बोलायची मुभा नव्हती. चार लोकांशी बोललेलं सासूला आवडायचं नाही. अगदी शेजारच्या बायकांशी बोललं तरी ती भांडण करायची. तिला खूप राग यायचा जेव्हा सुमित्रा कोणाशी बोलायची. सुमित्राच लग्न नव्हतं झालं तर ती कैद झाली होती.

अगदी केशव सुद्धा जर तिच्याशी बोलला तरी कांता लक्ष ठेवायची.

"बायकोशी हळू आवाजात बोलायचं नाही,तसं केलं तर ती डोक्यावर बसेल. तिला धाकातच ठेवायचं आहे." हा कानमंत्र तिने दिला होता.


तो देखील आईला घाबरूनच होता. सारं काही अगदी न समजण्यापलीकडे होतं. मात्र सासरा सासूच्या फार ऐकण्यात होता. सुमित्रासाठी वेगळे नियम आणि कांतासाठी वेगळे नियम. सुमित्राला किती जरी चीड आली, काहीही झालं तरी ती सहन करत होती. माहेरी जाऊन काय करणार ? लग्न झालेली लेक पुन्हा माहेरी गेली तर लोकं नावं ठेवणार आणि लोकांनी जर नावं ठेवली तर आई-बाबांचं जगणं आपल्यामुळे मुश्किल होणार, ह्या विचारानेच तिला घाम सुटायचा. तिने मान्य केलं होतं की, आपल्याला हे सगळं सहन करायचं आहे, त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय देखील नाही.


संध्याकाळी तिने सर्व स्वयंपाक केला. दहा-बारा जण येणार होते त्यांच्यासाठी तिने पुरणपोळ्या केल्या. बाबांना पुरणपोळ्या किती आवडतात, कधी पुरणपोळी केली तर किती चवीने खायचे. सारं आठवून तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. लेकीचे मन सासरी जरी असलं, तरी माहेरची ओढ काही केल्या संपत नाही. रात्री सुमित्रा खिन्न मनाने झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी केशवने तिला उठवलं.
"सुमित्रा, उठ लवकर."

केशवचा चेहरा पडला होता. काळजीत होता काय झालं असावं?
क्रमश:
कथा लेखन- अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.

🎭 Series Post

View all