तिची सल भाग ४

"माझी वाट पाहणारे बाबाच राहिले नाही, तर मी माहेरी जाऊन काय करू? केशवला पश्चाताप झाला होता. सत्य हेच होतं सुमित्राने तिच्या बाबांना गमावलं होतं. देवा का निष्ठुर झाला तू? कोणाला म्हणू मी बाबा?
पूर्वार्ध गेल्या भागात आपण पाहिले की, सुमित्राच्या स्वप्नात बाबा येतात. एकदा भेटायला ये असं म्हणतात. त्याचबरोबर तिला अनेक जुन्या गोष्टी आठवतात. सकाळी तिचा नवरा केशव तिला उठवतो. त्याचा चेहरा देखील पडलेला असतो.

सुमित्रा उठते. केशवकडे पाहून तिला न जाणे का भीती वाटते. आईच्या भीतीने तो तिला उठवून लगेच निघून जायचा. आज मात्र तो तिथेच उभा होता.

"काही बोलायचे आहे का तुम्हाला?" सुमित्रा त्याच्या डोळ्यात पाहत विचारते.

केशव केवळ हो म्हणतो.
तिचे ह्रदय जोरजोरात धडधडत असतं. केशव असा चेहरा पाडून कधीच नसतो. का असा शांत उभा आहे.
ती बराच वेळ वाट पाहते, तो काही बोलेन.

धीर एकवटून तो बोलतो, "सुमित्रा, आपल्याला तुझ्या गावी जावं लागेल."

हे ऐकताच सुमित्रा खुश होते.
"खरंच, आई तयार झाल्या का?"

बाबांची भेट होईल ह्या विचाराने ती लेक रडूच लागली; पण अचानक मनात विचार आला
'असं स्वतःहून कसं बरं तयार झाल्या सासूबाई? इतके दिवस मी बोलते आहे तरी काहीच बोलले नाही. माझे बाबा तर बरे असतील ना?'
तिच्या काळजात धस्स झालं.

ती काळजीपोटी केशवला म्हणाली, "माझे बाबा बरे तर आहेत ना?"

"सुमित्रा, तुझे बाबा देवाघरी गेले आहेत."
असं म्हणत त्याने मान खाली घातली.

हे ऐकताच सुमित्रा मटकन खाली बसली.
काही वेळापूर्वी जिला बाबांच्या भेटीची ओढ लागली होती, आता मात्र तिचे हात पाय गळून गेले होते. ती जोरजोरात रडू लागली.

"बाबा, मी तुम्हाला भेटायला येणार होते. असं कसं गेलात तुम्ही?" सुमित्रा कोपऱ्यात बसून रडत होती. तिच्यावर जीवपाड प्रेम करणारे बाबा सोडून गेले होते.

केशव तिच्या पाठीवरून हात फिरवत होता.
सुमित्रा म्हणाली, "आता काय दिवाळीत जाऊन फायदा? गेले माझे बाबा. मी आता कशासाठी जाऊ? "

तो निरुत्तर होता. तिची माहेरी जायची इतकी इच्छा असुन देखील तिला जाता आलं नाही. ना केशव एकदाही आईशी या संदर्भात बोलला.
का गप्प बसला तो?
का आईशी बोलला नाही तो? हा प्रश्न सुमित्राचे अश्रू त्याला विचारत होते.

रडतच सुमित्रा बोलत होती "माझ्या बाबांना मला एकदा बघायचे होते. माझ्या स्वप्नातही ते आले होते. त्यांची इच्छा होती मला बघायची. मी नाही गेले. मला नाही पाठवलं. गेले माझे बाबा. आता कशासाठी जाऊ मी तिथे? माझी वाट पाहणारे बाबाच नाही राहिले. सगळं संपलं. देवा! काय केलंस तू ? का क्रूर झाला तू? का माझ्या बाबांना घेऊन गेला? आता कोणाला मी म्हणू बाबा? बाबांचं प्रेम कोण देणार मला? का इतक्या लवकर आमचं छप्पर हिरावून घेतलंस? का देवा निष्ठुरपणे वागलास?
बाबा, तुमची सुमी पोरकी झाली. तुम्ही दूर होता पण तुमचा आधार होता. तुमचा आशीर्वाद सदैव सोबतीला होता. कसं जगायचं तुमच्याशिवाय?
सुमी म्हणून कोण मला हाक देणार? सांगा ना बाबा?"

केशवच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. सुमित्राची होणारी तडफड बघून त्यालाही खूप त्रास होत होता.

त्याचेही मन तेच म्हणत होतं. फक्त एकदाच जर सुमित्रा आणि वडिलांची भेट घडवून आणली असती तर बरं झालं असतं. गुन्हेगार होता तो एका लेकीचा आणि वडिलांचा. तो जर आईशी बोलून सुमित्राला घेऊन गेला असता तर काय झालं असतं? पण नाही. त्याने तसं केलं नाही. आईची इतकी भीती की, त्याने विषय देखील काढला नाही उलट सुमित्रालाच म्हणाला दिवाळीत जाणारच आहेस.

सुमित्रा गपगुमान ऐकून घ्यायची, सारं सहन करायची. तिला गृहीत धरूनच तर तो चालत होता. तो तिचा गुन्हेगार होता.

"सुमित्रा, आपल्याला जावं लागेल."
सुमित्राचे डोळे रडून सुजले होते. काहीही भान नव्हते.

केशव तिला हलवत म्हणाला, "सुमित्रा, आपल्याला आताच निघायचे आहे."

सुमित्राने त्याच्याकडे नजर वर करून पाहिली.
"मी काल म्हणत होते बाबा माझ्या स्वप्नात आले होते. त्यांना मला भेटायचे होते. एकदाच भेटायचे होते. आता मी जाऊन काय करणार. नाही, माझ्यात ते धाडस नाही. त्या अवस्थेत मी त्यांना पाहू शकत नाही."

"सुमित्रा, असं नको करू. एकदा मातीआड गेलेलं माणूस पुन्हा नाही दिसत." केशव.

सुमित्रा पुन्हा जोरजोरात रडू लागली.

सुमित्राचे बाबा गेले ही खबर घरात सर्वांना समजली होती. तिचा नवरा सोडून कोणीही तिच्या सांत्वनाला आलं नाही. सासुसुद्धा जणूकाही झालंच नाही ह्या अविर्भवात वावरत होती. ती तर एक स्त्री होती, कमीत कमी अश्या वेळेस तरी ती आली असती, नाही ती आली नाही.

कसंबसं सुमित्राने कपडे बॅगमध्ये भरले. तोंडावर पाणी मारले आणि केशवसोबत निघाली.

तोच कांताने केशवला आवाज दिला,
"केशवा, तिथून लवकर निघायचे बघ."

सुमित्राला वाटत होतं की, कांता सांत्वन करेल. मायेने जवळ करेल; पण तसलं काहीच घडलं नाही. दगडाला तरी पाझर फुटेल;पण कांता तिचं काळीज कसलं बनलं होतं माहीत नाही. किती निष्ठुर होती. सुमित्राच्या बाबतीत तर खूप कठोर वागत होती.

सुमित्राला केशववर खूप राग येत होता. त्याच्याशी एकही शब्द बोलली नाही.
गाव जसजसे जवळ येत होते तसतसे सुमित्राच्या हातापायातून जणू जीव निघून गेल्यागत झाले होते. ती रडतच होती.

क्रमशः

कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.

🎭 Series Post

View all