तिची सल भाग ५

मुली सासरी नांदायला जरी गेल्या तरी मन मात्र माहेरीच असतं
गेल्या भागात आपण पाहिले की, सुमित्राचा नवरा केशव तिला सांगतो की, तिचे बाबा देवाघरी गेले आहेत. ते ऐकून तिला धक्का बसतो. जेव्हा ती केशवसोबत माहेरी जायला निघते तेव्हा तिची सासू कांता केशवला म्हणते तिथून लवकर निघायचे बघ. आता पाहू पुढे.

सुमित्राचे रडणं काही थांबत नाही. जसजसे गाव जवळ येते तसे तिचे हात पाय थरथरायला लागतात. अंगातून जणू प्राण निघून गेल्यागत झाले होते. गावात शिरल्यावर तिला तिची शाळा दिसली. बाबा रोज सायकलवर शाळेत सोडायला यायचे. ती वर्गात जाईपर्यंत बाबा तिला तिथेच पाहत उभे राहायचे. सुमित्रा देखील बाबांना मागे फिरून बघायची,मात्र आता तिचे बाबा तिला कधीच बघणार नव्हते.

तिला हे सारं आठवून अजूनच वाईट वाटत होते. किती आठवणी होत्या बाबांच्या. आता घरी गेलं की, सुमी म्हणून हाक मारणारे बाबा निपचित पडले असतील ह्या विचाराने तिचा कंठ दाटून आला होता.

कसं बघणार होती ती बाबांना? कोणत्या तोंडाने बघणार होती?

केशवला तिची अवस्था पाहून फार वाईट वाटत होते. सांत्वन तरी कसं करणार?

सुमित्राच्या दारासमोर गाडी थांबली तशी आईचा जोरजोरात रडण्याचा आवाज कानी पडला. पायातून त्राण निघून जावे असे झाले.
ती रडतच घरात गेली.

आईने सुमीला पाहिले, तशी ती बाबांच्या मृतदेहाकडे बघून जोरजोरात म्हणू लागली,
"बघा ओ तुमची सुमी आली भेटायला. आता तरी उघडा डोळे. प्राण सोडताना पण सुमी सुमी करत प्राण सोडला, बघा तुमची लाडाची लेक आली."

सुमी बाबांच्या मृतदेहाला कवटाळली.
"बाबा, मी आले बघा ना एकदाच मला. तुम्हाला भेटायचे होते मला. बाबा, एकदा सुमी करून हाक मारा बाबा. तुमची सुमी तुमच्या जवळच बसली आहे. एकदा बाबा , फक्त एकदा आवाज ऐकायचा आहे."

सुमित्राची आई तिला बोलत होती.

सुमी, उठव तुझ्या बाबांना. तुला भेटायचं होतं त्यांना. तुला भेटल्याशिवाय नाही जाणार म्हणाले होते. तुझ्यावर खूप जीव होता. तुला न भेटता कसे जाऊ शकतात तुझे बाबा?"

तिथे सर्वांच्या डोळ्यात पाणी होते.
केशवसुद्धा रडतच होता.

सुमित्रा केशवकडे बघत म्हणाली.
"एकदा भेट घडवून आणली असती तर काय झाले असते? बघा माझे बाबा माझी वाट पाहून शेवटी गेले."
केशवने मान खाली घातली.

सुमित्राची आत्या देखील होती.
ती देखील रडत होती.

"लक्ष्मणा, कसा रे गेला सोडून. सुमीला भेटायचे होते तुला. डोळे भरून पाहायचे होते म्हणाला होता मग का गेला असा? कोणाला मी राखी बांधू? कोणाला मी ओवाळू? का गेलास तुझ्या बहिणीला सोडून. का गेलास सोडून. देवा! काय केलं तू ? माझ्या भावाला का घेऊन गेला? काय पाप केलं होतं? सांग ना?"

सुमीची बहीण आणि भाऊ देखील आईला कवटाळून रडत होते. वडील म्हणजे छप्पर, आज ते छप्पर उडून गेलं होतं. घर पोरकं झालं होतं. सुमीच्या वडिलांचे पार्थिव बघायला सारं गाव गोळा झालं होतं.

मदतीला नेहमी तत्पर असायचे. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते असायचे. गावच्या बायकांच्याच काय, तर माणसांच्या डोळ्यात देखील अश्रू होते. शोकाकुल वातावरण झाले होते.

सुमित्राचे बाबा म्हणायचे, "सुमी, एखाद्याच्या सुखात जाता आलं नाही तरी चालेल; पण दुःखात मात्र आधी जावं. आपलं नातलग जरी नसले तरी माणुसकीच्या नात्याने आधार द्यावा."

सुमी एकटक तिच्या बाबांचा चेहरा न्याहाळत होती. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. डोळे सुजले होते. अजूनही विश्वास होत नव्हता की, असे झाले आहे.

आईने बांगड्या फोडल्या. कुंकू पुसलं. तिचे मंगळसूत्र गळ्यातून काढण्यात आलं तेव्हा तर सुमित्राच्या पोटात खड्डा पडला. कशी दिसत होती आई. आईचा भकास चेहरा पाहवत नव्हता.

सुमीला एक गोष्ट आठवली.
सुमीच्या आईने मंगळसूत्र बाबांच्या नकळत गहाण ठेवलं होतं. तेव्हा ते फार चिडले होते. जसं त्यांना कळलं तसं त्यांनी कोणाकडून तरी पैसे उधार घेऊन मंगळसूत्र सोडवले होते आणि आईला म्हणाले होते , "तू पुन्हा मंगळसूत्र गळ्यातून काढणार नाही वचन दे."

आईने वचन दिले होते. सारं काही जसच्या तसं आज आठवत होतं. कोणीतरी ह्रदयावर धारधार शस्त्राने वार करत आहे असेच झाले होते.

सारं संपलं होतं, शिल्लक राहिल्या त्या आठवणी आणि त्या आठवणी देखील सतत डोळ्यात पाणी आणत होत्या.

जाता जाता तिने बाबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि माफी मागितली.

"बाबा, तुमची सुमी तुम्हाला भेटायला येऊ शकली नाही. माफ करा मला."

अश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला.

सुमित्राच्या मांडीवर डोकं ठेवून बहीण भाऊ दोघेही रडत होते. सुमित्रा त्या दोघांच्या डोक्यावर हात फिरवून सांत्वन करत होती.

बाबांचा फोटो पाहून पोटात गोळा येत होता. बाबांना शेवटचं भेटता आलं नाही हा विचार अजूनच तिला अस्वस्थ करत होता.


आईची अवस्था पण बघेवना. जोडीदार गेल्यावर तिची अवस्थाही फार वाईट झाली होती. किती जीव होता बाबांचा आईवरही.

नेहमी तिला बोलायचे.
"सुनंदा,मी आहे तोपर्यंत कसलीच कमी होऊ देणार नाही."

फारच त्रास होत होता.
तिला बाबांची शेवटची भेट आठवली.
लग्नानंतर पहिल्या सणानिमित्त आली होती.
बाबा फार खुश झाले होते.

"सुनंदा, आज सुमीच्या आवडीचे जेवण बनव."
बाबा तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.

"बाबा, आईला त्रास नको. काहीही खाईन." सुमित्रा.

"असं कसं? माझी लेक पहिल्यांदा माहेरी आली आहे. सुनंदा, सगळं सुमीच्या आवडीचे बनवायचे."

सुमी बाबांचा चेहरा न्याहाळत होती. बाबा खूप खुश झाले होते.

सगळे जेवायला बसले. सुमीला ठसका लागला. बाबांचा जीव तळमळला.

स्वतःच्या हाताने पाणी पाजले. तिच्या पाठीवरून हात फिरवू लागले.

बाबांसाठी सुमी होतीच जीव की प्राण.

तिची लहान बहीण बाबांना चिडवत म्हणाली,"ताई इतका आमचा नाही लाड करत."

सुमित्रा हसू लागली.

बाबा, "आई बाबाला सगळी पोरं सारखी. सुमीचे लग्न झाले आहे. संसारात पडली आहे. दोन दिवसाचे माहेर, तितकाच काय तो तिला निवांतपणा. माझी सुमी आता दोन दिवसासाठी आली आहे. बोलावणं आलं की, जाईल सासरी. तिथेही लाड होतच असतील म्हणा; पण माहेरी नको का तिला सुख."

हे बोलत असतांना बाबांचे डोळे भरून आले.

सुमित्रा, "बाबा, काय हे ? लगेच डोळ्यात पाणी."

बाबा डोळे पुसत म्हणाले, "सुमी, तुला नाही कळायचे. सतत अवतीभोवती असणारी लेक सासरी जाते तेव्हा घरात पोकळी होते. सुमी, तुझी सवय झाली होती. लग्न झालं आणि तू गेली. जगाची रितच ती; पण तुझी खूप आठवण येते. तुझी प्रत्येक गोष्ट आठवते.
तुझी आठवण आली तरी तुला भेटायला सारखं येऊ शकत नाही. लेकीच्या सासरी आम्ही कसं येणार? तुलाही इथे बोलावू शकत नाही, तुझा संसार महत्वाचा. हेच ते काय क्षण."

सुनंदा म्हणाली, "सुमी तू गेल्यापासून रोज तुझे फोटो बघत बसतात. सुमी असती तर आता पाय चेपून दिले असते, सुमी असती तर चहा बनवून दिला असता. सकाळ, दुपार, संध्याकाळ तुझ्याच नावाचा जप. माझी सुमी, माझी सुमी. आम्हाला तर विसरूनच गेले आहेत बघ."

हे सारं ऐकून सुमित्राला भरून आलं होतं.

सुमित्राला ते सारं आठवून खूप त्रास होत होता.
हेच कारण असतं मुली सासरी नांदायला गेल्या तरी, जीव मात्र माहेरीच असतो. माहेरी माया लावणारे आई, बाबा, बहीण, भाऊ असतात. माहेरची ऊब ही वेगळीच असते.
बरोबर ना?
क्रमशः

फारच भावनिक केलं ह्या भागाने. लिहिताना डोळे भरून आले. कथा काल्पनिक आहे;पण आपल्या भावना ह्या काल्पनिक नसतात ना? पुढे काय होईल सुमित्राच्या जीवनात? वाचत राहा तिची सल.

कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करण्यास परवानगी नाही. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.




🎭 Series Post

View all