तिची सल भाग ६

झालास का बायकोचा गुलाम? देवा! मी काय करू? माझं पोरगं कधी उलटं बोलत नव्हतं आणि आता...
गेल्या भागात आपण पाहिले की, सुमित्रा केशवसोबत तिच्या माहेरी जाते. बाबा देवाघरी गेले होते. अनेक आठवणीने मन गलबलून येतं. आता पाहू पुढे.

सुमित्राला आईची अवस्था बघवेना. कसं व्ह्यायचे भावाचे आणि बहिणीचे. शिक्षण चालू होते. आईसुद्धा दुसऱ्याच्या शेतात राबायला जायची. बाबा खंबीर आधार होते. विचार करून तिला फार वाईट वाटत होतं. बाबा गेले ह्यावर अजूनही विश्वास होत नव्हता.

सारं काही एका क्षणात कसं बदललं? मन उदास झाले होते.

आईने तर अन्न पाणी सोडले होते.
बाबांच्या जाण्याचे दुःख तर होते; पण आईची अवस्था बघवत नव्हती.

"आई, पाणी तरी पिऊन घे." पाण्याचा ग्लास पुढे करत सुमित्रा म्हणाली.

आई डोळे मिटून होती. सुमित्राने आईच्या खांद्यावर हात ठेवला. आईने डोळे उघडले.

सुमित्राने पाण्याचा ग्लास पुढे केला. आई नको म्हणाली.

"आई, तू जर असं केलं तर सुमेधा आणि सुशीलकडे कोण बघणार? तूच आहे आता त्यांच्यासाठी."

आईने सुमेधा आणि सुशीलकडे पाहिले. फार आशेने ते दोघे आईला पाहत होते.

बायको म्हणून ती कमजोर झाली होती. नवरा गमावल्याचे दुःख तर होते; पण आता नवऱ्याची जबाबदारी देखील तिच्या खांद्यावर आली होती.

सुमित्राची आत्या देखील आली, ती देखील सांत्वन करू लागली.

"सुनंदा, असं हात पाय गाळून कसं चालणार? आपला लक्ष्मण गेला आहे ; पण आई म्हणून तुझं कर्तव्य आहे मुलांना बघणं. कालपासून पाणी देखील प्यायली नाही. असं नको करू. तुला काही झालं तर ह्या पोरांकडे कोण बघणार?" तिच्या पाठीवर हात फिरवत आत्या म्हणाली.

कालपासून रडणाऱ्या सुनंदाने डोळे पुसले.
"ताई, तुम्ही बरोबर बोलत आहात. मला काही झालं तर माझ्या मुलांचे काय?"

सुमित्राच्या हातातील पाण्याचा ग्लास घेतला.
ती पाणी प्यायली.

"सुमित्रा, चल खायला बनवूया. दोन घास खाऊन घेऊया."

आईला असं पाहून सुमित्राच्या जीवात जीव आला. आत्यालाही बरं वाटलं.

वाईट एका गोष्टीचे वाटत होते, जबाबदारी दुःखातून सावरायला देखील वेळ देत नाही.

कालपासून रडणारी, विव्हळणारी सुनंदा अगदी काही न झाल्याच्या अविर्भावात वावरत होती.

बायको खचू शकते; पण एक आई कधीच खचून जाऊ शकत नाही हे सुनंदाकडे पाहून वाटत होते.

केशवने सुमित्राला आवाज दिला.

"सुमित्रा, आपल्याला थोड्यावेळाने निघावं लागेल."

हे ऐकताच सुमित्राला वाईट वाटलं, तिचा चेहरा उतरला.

सुनंदाने ते ऐकले.

"सुमित्रा जा तू. तुलाही तुझा संसार बघायचा आहे. तुझं लग्न झालं आहे, आता तुझं सासर हेच तुझं घर."

सुमित्राचे अजिबात मन करत नव्हतं. थोडा वेळ आई, बहीण, भाऊ ह्याच्यासोबत घालवायचा होता. आता तिचा नाईलाज झाला.

माहेरवरून पाय निघता निघत नव्हता. मन भरून आले.

गेल्यावेळी आली होती तेव्हा निघतांना बाबांच्या डोळ्यात पाणी आले होते, ते आठवलं.

बाबांच्या फोटोला नमस्कार केला. ह्रदय गलबलून आलं.

आईला, बहिणीला, भावाला धरून जोरजोरात रडली.

सुनंदा म्हणाली, "सुमित्रा, संसाराकडे लक्ष दे. स्वतःची काळजी घे." हे बोलत असतांना आईला देखील गहिवरून आलं होतं.

सुमेधा आणि सुशील देखील तिला बिलगून खूप रडले.

"सुशील,सुमेधा अभ्यासाकडे लक्ष द्या. आईची काळजी घ्या."

सुमेधा म्हणाली, "ताई, आता तू कधी येणार?" ह्या प्रश्नावर सुमित्रा निरुत्तर झाली.

तिने केशवकडे पाहिले.

सुमेधाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, "मी लवकरच भेटायला येईन."

पाय निघता निघत नव्हता.
सुमित्राने भरलेल्या डोळ्याने निरोप दिला.

आई, बहीण- भाऊ ती नजरेस दिसेनाशी होईपर्यंत तिला पाहत होते. सुमित्रा देखील त्यांना पाहत होती. गाडीत पुन्हा ती हुंदके देत रडू लागली.

थोडं पुढे गेल्यावर केशव सुमित्राला म्हणाला,
"सुमित्रा, मला माफ कर. मी तुला माहेरी आणलं असतं, तर तुझी बाबांशी भेट झाली असती."

सुमित्रा काहीच बोलली नाही.
तिला केशवचा खूप राग आला होता.

केशवने माफी मागून काय बाबा परत येणार नव्हते.

सुमित्रा सासरी आली.
कांताने तिला बघून न बघितल्यासारखे केले. काहीच विचारपूस नाही.

सुमित्रा रूमवर गेली. खूप रडायला येत होतं.
थोड्यावेळाने कांता आली.

"इथे आता रडगाणं करत बसू नको. चल जेवण बनवून घे. सगळे उपाशी आहेत." फणकाऱ्याने म्हणाली.

सुमित्राचे मन म्हणत होते, 'कसली बाई आहे ही? माझे वडील गेले तरी विचारपूस नाही. कसल्या काळजाची बनली आहे. जराही दया येत नाही का? दुसऱ्याचे दुःख बघून माणसाचे मन भरून येते आणि इथे तर..'

सुमित्राने डोळे पुसले. जेवण बनवायला निघून गेली.

सुमित्रा जेवण बनवते आहे पाहून कांताला बरं वाटलं; कारण ती माहेरी गेली तेव्हा कांतालाच जेवण बनवावं लागत होतं. कांताला घरातली कामं करायचा कंटाळा यायचा.

सुमित्रा आल्यापासून तर एकाही कामाला हात लावला नव्हता. सुमित्रा माहेरी जाणार म्हंटलं की, सगळी कामं करावी लागणार हे ती जाणून होती, म्हणून ती सुमित्राला माहेरी जाऊ देत नव्हती. आताही वडील वारले तरीदेखील केशवला जाताना म्हणाली होती लवकर ये. तिला तिच्या सुखदुःखाची काहीच पडली नव्हती. स्वतःला फक्त आराम पाहिजे होता. सुमित्राला तर घरकाम करायलाच आणलं होतं. सून कमी आणि मोलकरीण केली होती.

सुमित्रा निमूटपणे ते सारं करत होती. स्वतःचा संसार आहे हे करावंच लागणार ह्या विचाराने ती करत होती.

तिला फार त्रास होत होता. ज्या पद्धतीने वागणूक दिली जात होती, त्याचा त्रास होत होता. खूपच तुच्छ लेखलं जात होतं.

जेवण बनवतांना तिचा चेहरा उतरला होता.
कांता आली आणि रागात म्हणाली, "हे असं भरल्या घरात तोंड पाडून काय बसली आहेस? ते तुझ्या माहेरी करत बस. इथे माझ्या घरात तोंड पाडायची गरज नाही."

सुमित्राचे डोळे भरून आले. 'ही खरंच कसली बाई आहे ? काहीच भावना नाहीत का?'

तिने डोळे पुसले.

कांताने केशवला आवाज दिला आणि म्हणाली, "तुझ्या बायकोला सांग. हे असं इथं रडत बसायचे नाही. भरल्या घरात हे असं राहते आहे."

केशवने सुमित्राकडे पाहिले.
तिचे डोळे भरले होते.

घाबरतच म्हणाला, "आई, तिचे वडील वारले आहेत, म्हणून.."

तो पुढे काही बोलणार तोच कांताने कालवा सुरू केला.

"आता बायकोची बाजू घ्यायला लागला. झालास का तीच गुलाम? पोरगा कधी उलटं बोलायचा नाही. ह्या बाईने काय जादू केली काय माहित. देवा! काय करू मी आता? "

रडारड सुरू केली. नाटकेच करत होती. इतकं काहीच बोलला नाही तो आणि तरीही तिने तमाशा केला.

केशव आईचा अवतार पाहून गप्पच बसला.

कांता रडारड करून निघून गेली.
काही बोलायची सोय नव्हती.

पोरगी सुखाने नांदेल ह्या विचाराने आई बाबांनी लग्न लावलं आणि सासरी हे असं सगळं होत होतं.

कांताचं वागणं बदलेल? की केशव काही पाऊल उचलेल?

क्रमशः

कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करण्यास परवानगी नाही. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.