तिची सल भाग ७

एक दिवस ती नवऱ्याशी भांडली आणि कहरच केला.
गेल्या भागात आपण पाहिले की, सुमित्रा माहेरातून सासरी आल्यावर सासू तिला म्हणते, भरल्या घरात असं तोंड पाडून बसायचे नाही. केशव कांताला सांगतो, तिचे वडील वारले आहेत म्हणून ती तशी आहे. ह्यावर कांता कालवा करते. आता पाहू पुढे.

केशवला कांतासमोर काहीही बोलायची भीतीच वाटत होती. कांता मुळात एक अशी स्त्री होती, जिला फक्त आणि फक्त स्वतःची पडली होती. केशवच्या बालमनावर कांताच्या वागण्याचा फार वाईट परिणाम झाला होता.

एक असाच प्रसंग त्याला आठवला.
तो शाळेतून घरी आला होता. खोलीत अभ्यास करत होता. त्याला त्याच्या आई,बाबाचा आवाज येऊ लागला.
कांता नवऱ्याशी भांडत होती. सासू आजारी होती आणि तिला गावी सोडून ये म्हणून केशवच्या वडिलांच्या पाठी लागली होती.

आजी तोंड बारीक करून बसली होती. तिला तर काही बोलवत नव्हतं. महिना झाला ती आजारी होती. तिला धड चालायला येत नव्हते. कांता मुळातच आळशी होती. सासूचे आजारपण तिला काढायचे नव्हते. तिला वैताग आला होता. केशवचे वडील स्वतःच्या आईची काळजी घेत नव्हते अश्यातला भाग नव्हता. तिचा दवापाणी बघणं. अगदी तिला अंघोळ घालणं सारं बघत होते. कांताचा जळफळाट होत होता. कशाला करायची सेवा? थेरडी आज ना उद्या खपेलच. तिची मानसिकता फार विकृत होती. एक दिवस तिने न राहून भांडण काढलेच.

अखेरीस केशवचे वडील म्हणाले, "माझ्या आईला ह्या अवस्थेत असं मी सोडू शकत नाही."

काही केल्या नवरा ऐकत नाही ह्याचा तिला राग आला. तिच्या डोक्यात फार भयंकर गोष्ट आली.

ती झटक्यात स्वयंपकघरात गेली आणि अंगावर रॉकेल ओतलं. माचीस हातात घेतली. ती स्वतःचा पेट घेणार तोच
केशवचे वडील धावत गेले. तिच्या हातातून माचीस घेतली आणि दूर फेकली.

कांता स्वतःच्या तोंडात सटासटा मारत होती. गाल लाल केले होते.

हा सारा प्रकार केशव आतून पाहत होता.
तो हे सारं पाहून घाबरला. भीती बसली ती कायमची.

वडील डोक्याला हात लावून बसले.
काय बोलावे ह्या बाईसमोर सुचेना.

दुसऱ्या दिवशी सासू केशवच्या वडीलाला म्हणाली, "बाळा, माझ्यामुळे तुला नको त्रास. मी माझ्या भावाकडे जाते."

"आई, तू कुठेच जाणार नाही. कालच्या प्रकारामुळे तू हे सगळं बोलते आहे; पण काहीही झालं तरी तुला मी कुठेच जाऊ देणार नाही."


ती त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली,"माझ्यामुळे तू तुझा संसार उद्धवस्त करू नको."

तो आईला बिलगून खूप रडत होता.

दुसऱ्या दिवशी सगळे झोपेत असतांना केशवची आजी उठली.

अंगात त्राण नसतांना देखील ती भिंतीला धरून चालू लागली.

एक पिशवी घेतली. दोन साड्या भरल्या. देवाघरी गेलेल्या नवऱ्याचा फोटो उराशी कवटाळला.

"तुम्ही आज असता तर ही वेळ आली नसती. तुमची साथ असती तर इतकं लाचारीने जगावं लागलं नसतं. का सोडून गेलात तुम्ही?"

थरथरत्या हाताने डोळे पुसले.

सारं काही आठवत होतं आज.

माहेरी गरिबी, लवकर लग्न झाले. सासूच्या हाताखाली कष्टाचे दिवस काढले. सासू सासऱ्यांच्या पश्चात विचार केला तर नवरा देखील अर्ध्यावर साथ सोडून गेला. फार कष्टाने मुलाला वाढवलं. एकटी स्त्री म्हणजे, समाजातील काही नीच पुरुषांसाठी केवळ मादी. तिचं शरीर कसं ओरबडता येईल हे तिला त्यांच्या नजरेत जाणवायचे. तिला रडू यायचं.

खूप काही सहन केलं होतं. कसंबसं पोराचे शिक्षण केले, मुलगा शिकला आणि चांगला कामाला लागला. विचार केला सारे भोग संपले. तसं नव्हतं कांताच्या रूपाने पुन्हा भोगाला सुरवात झाली होती.

तिने विचार केला, आपल्या सासूने आपल्यावर खूप अत्याचार केले;पण आपण तसं वागायचे नाही. सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून स्वीकारले; पण कांता ती मात्र सून काय साधं तिच्याशी माणुसकीने देखील वागली नाही.

देव जाणे चांगल्या लोकांनाच अशी विचित्र माणसं भेटतात.

महाविचित्र बाई होती कांता.
मुळातच तिचा स्वभाव विचित्र होता.

तिचं तर स्वतःच्या भावांशी आणि बहिणीशी देखील पटत नव्हतं.

अगदी स्वतःच्या आई वडिलांशी भांडत राहायची.

तिच्या लग्नात, पाठवणीच्या वेळेस तिच्या माहेरचे देखील रडले नाही. तिची आई देखील रडली नाही.

तेव्हाच कांताच्या सासूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तरीही आता आपल्या घरी कांता सून आली म्हणून ती कोडकौतुक करू लागली, तिच्याशी गोड बोलून राहण्याचा प्रयत्न करू लागली.

कांता तिरसट स्वभावाची होती. सतत टोमणे मारून बोलणे, नकारात्मक बोलणे, भांडण काढणे,रुसून बसणे, आदळा आपट करणे, हा तिच्या सवयीचा भाग झाला होता.
कांता सारखी व्यक्ती घरात म्हणजे श्रापच.

एक दिवस सुखाचा जात नव्हता.
तरीही ती नवीन आहे , लहान वय आहे असा विचार करून सासू गप्प बसायची. थोडा काळ लोटला. एक मूल झालं की, समजदार होईल ही आशा होती.

केशव पोटात राहिला, तेव्हा सासूला वाटलं आता आई झाली की, तिच्यात आपसूकच प्रेम,माया येईल.

सासूने तिचे सारे डोहाळे पुरवले;पण कसलं काय? तिला काहीच कौतुक नाही.

"कांता, जरा जपून चाल, बाळ आहे पोटात." असं एक दिवस म्हणाली, तर तिला प्रचंड राग आला. तिने सासुशी बोलणंच सोडलं.

तरीही आपल्या मुलाचा अंश म्हणून ती कांताकडे जराही दुर्लक्ष होऊ देत नव्हती.

एक दिवस तर तिने कहरच केला.

क्रमशः
कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करण्यास परवानगी नाही. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.


🎭 Series Post

View all