तिची सल भाग ८

माझ्या नवऱ्याचे कान भरताना लाज वाटत नाही
तिची सल भाग ८

पूर्वार्ध.

गेल्या भागात आपण पाहिले की, केशवला जुने दिवस आठवतात. त्याची आई आजीशी कशी वागली होती हे सारं आठवतं. ती फार विचित्र बाई होती. आता पाहू पुढे.

एक दिवस कांताने कहर केला.
आजीला कांताच्या अश्या वागण्याची काळजी वाटत होती आणि मनस्ताप देखील होत होता.
पोटात केशव होता. ती जर तसेच करत राहिली तर कसं होईन. बाळाला काही त्रास व्ह्यायला नको. चार पावसाळे जास्त पाहिले होते.

ती वाट्टेल तसे बोलायची आणि वागायची.
तिच्या भल्याच्या गोष्टी तिला सांगायला गेलं की, विनाकारण भांडण उकरून काढत होती.

आजीला काळजी वाटत होती, एक दिवस ती बाजारात गेल्यावर केशवचे बाबा घरी होते.

आजीने विचार केला की, मुलाला सांगावे. ते ही कांताच्या भल्यासाठी. आपलं नाही कमीत कमी मुलाचे तरी ऐकेल ह्या आशेने ती सांगू लागली.

"आई, तुला काही बोलायचे आहे का?" केशवचे बाबा म्हणाले.

"बाळा, खूप दिवस झाले विचार करत होते सांगावं. मला काही राहवत नाही सांगतेच बघ. कांताच्या पोटात बाळ आहे. पाहिल्यांदाच ती आई होणार आहे. तिला समजत नाहीये की, सुरवातीचे महिने किती नाजूक असतात. फार काळजी घ्यावी लागते. खूप जपावं लागतं. उगाच कमी जास्त नको व्हायला. जरा जपून राहा, हळूवार पाऊलं टाकत जा , उठताना बसताना काळजी घे म्हंटलं तर ती काही ऐकत नाही. तिला राग येतोय. तुला तर माहीत आहे ती कशी बोलते. माझं तर ऐकत नाही; पण तुझं ऐकलं तर बघ. पोटात बाळ असतांना आईने जपावं लागतं. तसं ती काहीच करत नाही. बाळाच्या वाढीसाठी आहारात ज्या गोष्टी घ्यायच्या असतात त्या घे म्हंटलं तरी न ऐकल्यासारखी करते. फार काळजी वाटते."

"आई, मी देखील तिला सांगतो;पण ती काही ऐकत नाही माझं. तिला काही बोलायला गेलो तर तिला राग येतो. तिला सगळं समजतं असंच वागत राहते. काही सांगायला गेलं तर चिडून बोलते. खेकसत राहते. असाच आरडा ओरड करत राहते. आदळा आपट करते. काही कमी जास्त होऊ नये म्हणून मी बोलायचे टाळतो. मला काही कळेना आई मी काय करू? कसं तिला समजावू?."

हे बोलायला आणि कांता यायला.

कांताने त्या दोघांचे बोलणे ऐकले. ती तणतण करत रुममध्ये गेली. आई - लेक आपल्यापाठी, आपल्याबद्दल बोलतात हे ऐकल्यावर तिचा राग उफाळून आला. काय बोलतात हे तिला घेणं देणं नव्हतं तर बोलतातच कसे? हाच राग अनावर झाला. अंगाचा तिळपापड झाला. काय करू आणि काय नाही असे झाले.

ती जोरजोरात ओरडू लागली. स्वतःच्या थोबाडीत मारू लागली.
तिचे डोळे लालेलाल झाले होते.

"माझ्यापाठी माझ्या नवऱ्याचे कान भरता. तुम्हाला लाज वाटत नाही. आमच्यामध्ये भांडण लावता. थांबा आता बघा मी काय करते."

तिने पोटावर बुक्क्या मारायला सुरुवात केली.
नवऱ्याने लगेच तिचे दोन्ही हात घट्ट धरले.


"मी नालायक बाई आहे. मला काही काळजी नाही माझ्या बाळाची. तुम्हीच आई झाला आहात. मला कुठे काय कळतं? मी बावळट बाई आहे. सगळा शहाणपणा तुम्हालाच कळतो." फार तावातावाने ती बोलत होती.

ती असं काही करेल वाटलं देखील नव्हतं.
हे सगळं करून तिने रडारड सुरू केली.

आजीला तर काय सुचेना. तिचा अवतार पाहून दोघेही घाबरले, ही बाई खरंच डोक्याने कमी आहे ही खात्री त्यादिवशी पटली. सनकी आहे.

केशवचे वडील देखील समजून गेले जिच्याशी लग्न झाले आहे ती बाई काय आहे?

तिच्यासमोर बोलायची सोय नव्हती. असा कालवा केला की, सगळे तोंड बंद करतात हे तिला कळून चुकले होते.

आजीने आता काही बोलायचे नाही विचार केला.

चांगलं बोललं तरी, ती बाई फक्त आणि फक्त तमाशा करायची.

केशवचे वडील तर डोक्याला हात लावून बसले.
सोडचिट्ठी घ्यावी असं वाटत होते.

तो एक दिवस आईला म्हणाला, "आई, मला नाही राहायचे हिच्यासोबत. फार विचित्र बाई आहे."

तिलाही मुलाची अवस्था कळत होती.
ती एक आई होती.

"बाळा, संसार म्हंटलं की, भांड्याला भांड लागतं. असं लगेच टोकाचा निर्णय घेऊ नको."

"आई, थोडं फार ठीक आहे; पण तू पाहिलं ना काय केलं तिने? तिला पोटातील बाळाची देखील काळजी नाही. कशी वागते आहे? आई तू म्हणायची की, एक बाळ झालं की, तिला प्रेम , माया येईल; पण तिचं असं वागणं पाहून मला नाही वाटत की, तिचं मन बदलेल. मला समजत नाही आई? सगळं काही तिच्या मनासारखं करून ती तशीच वागते. सतत किचकीच, भांडण मला वैताग आला आहे. असा संसार करण्यापेक्षा न केलेला बरा आई."

हे सारं ऐकून आईला फार वाईट वाटले.
मुलाचे सांत्वन कसं करावं कळेना.

"बाळा, थोडा काळ लोटला की सारं व्यवस्थित होईल. लहान वय आहे तिचं, हळुहळु तिला समजेन."

मुलाला हे ती सांगत होती; पण तिला हे माहीत होतं की, ती अशीच वागणार. तिची वृत्ती कधीच बदलणार नाही.

"आई, खरंच तुला वाटतं ती बदलेल?"

"पोरा, मला इतकं माहीत आहे, एकट्या स्त्रीने आयुष्य काढणं सोप्प नाही. मी तुला कसं लहानाचे मोठं केलं ते माझी मला माहित. किती खस्ता काढल्या आहेत ते मी नाही सांगू शकत.

जे दुःख माझ्या वाट्याला आले. ते कोणाच्याही वाट्याला नको. साथीदार कसाही असला तरी सोबत आधार देते. आपलं कोणीही नाही ही भावना फार छळते. तुलाही माझ्यानंतर कोण आहे? आई म्ह्णून मला तुझी काळजी वाटते. ती कशीही असली तरी तुझी बायको आहे. एकमेकांना शेवटपर्यंत साथ द्या. आता तर ती आई होणार आहे. ते बाळ तुझंही आहेच. तुम्ही जर वेगळे झाला तर त्या बाळाचे काय? त्याला कोण प्रेम देणार? लग्न म्हणजे खेळ नसतोच. असं पुन्हा मनात आणू नको."

तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडला. आई त्याच्या डोक्यावर हात फिरवत होती.

पुढे काय होणार? कसं होणार? कांता सुधरेल का? हे सारे प्रश्न त्याच्या मनात घोळत होते.

पहिल्या बाळंतपणाला ती माहेरी गेली.
केशवचे वडील अधूनमधून तिला भेटायला जायचे.

बघता बघता नऊ महिने सरले आणि केशवचा जन्म झाला.

केशवची आजी, बाबा फार खुश झाले होते.
कांता मात्र स्वतःला त्रास झाला म्हणून स्वतःच्या दुःखात होती.

एकदाही तिने केशवला पाहिले नाही.
प्रत्येक आईला तर कधी बाळाला पाहते असे होते.
नऊ महिन्याचा त्रास ती बाळाला पाहून एका क्षणात विसरन जाते.

सर्वांना वाटत होतं की, कांता बाळाचा चेहरा पाहीन; पण तसं काहीच झाले नाही.

केशवची आजी नातवाला पाहून खुश झाली. आज तिला तिच्या नवऱ्याची खूप आठवण आली. आज नवरा असता तर किती खुश झाला असता ह्या विचाराने डोळे पाणावले.

केशवच्या वडिलांचा देखील आनंद गगनात मावत नव्हता. किती दिवसाने मुलाच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आई सुखावली होती.

होताच तो आनंदाचा क्षण.


कांताचे आई वडील देखील खुश झाले होते.
कांता केशवला घेऊन महिनाभर माहेरी राहणार होती;पण ती पंधरा दिवसातच निघून आली.

असं अचानक आलेली पाहून नवरा सासू विचारात पडले; कारण दोघांनाही काही घाई नव्हती.

कांताचा नवरा म्हणाला होता की, जितके दिवस राहायचे आहे राहा. ऐकेल ती कांता कसली.

"माहेरी सगळं ठीक आहे ना?" नवऱ्याने काळजीपोटी विचारले.

"त्यांना काय धाड भरली आहे?" असं तिरसटपणे म्हणाली.

नवरा, सासू दोघेही विचारात होते. अशी का बोलते आहे. पहिलं बाळांतपण होतं म्हणून तिथे राहायला पाठवलं तर पंधरा दिवसात आली.

नक्कीच काहीतरी झालं असावं? हे नवऱ्याला आणि सासूला देखील वाटत होतं.

तिला विचारले तर ती काही सांगणार नाही ह्याची खात्री होती.

शेवटी एक दिवस समजलं, ती अशी का निघून आली.

क्रमशः

काय होईल पुढे. जाणून घेण्यासाठी वाचत राहा तीची सल.
क्रमश:
कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर यूट्यूब किंवा कुठेही आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.



🎭 Series Post

View all