तिची सल भाग ९

तिच्या आई वडिलांनी आम्हाला फसवलं. हे सगळं माहीत असतांना देखील का लग्न लावलं?
तिची सल भाग ९

पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की,
कांता पंधरा दिवसात माहेरवरून निघून येते. तिच्या नवऱ्याला आणि सासूला शंका येते. आता पाहू पुढे.

एक दिवस कांताची सासू जत्रेला जाते. त्या जत्रेत कांताची काकी देखील आली होती.

कांताच्या सासूला पाहून ती लगबगीने तिच्याकडे आली.

काकीला पाहून तिचे मन नाराज झाले.
काकीच्या डोळ्यात दिसत होते,की तिला महत्वाचे बोलायचे आहे.

काकीनेच तिला आवाज दिला.
ती थांबली.

कांताच्या सासूची इच्छा नव्हती, कांताच्या अश्या वागण्याने ती फार दुखावली होती.

त्यामुळे तिची माणसं देखील नकोशी झाली होती.

कांताच्या अश्या वागण्यामुळे तिच्या माणसाशी असं वागणं तिला योग्य वाटत नव्हतं. ती फार चांगली व्यक्ती होती,समजूतदार होती; म्हणून की काय कांता फायदा घेत होती.

ईच्छा नसतांना देखील ती थांबली.

काकीने विषय सुरू केला.

"एक विचारू का?"

"हो विचारा." सासू.

"कांता नीट नांदते का सासरी?" काकी.

ती कशी राहत होती हे चांगलं माहीत होतं, फारच विचित्रपणे वागत होती; पण तरीही ती म्हणाली,
"हो ठीक वागते."

काकीने आजूबाजूला पाहिले, कोणी ओळखीचे दिसत नाही ह्याची खात्री केली. हळू आवाजात ती बोलू लागली,
"तुम्ही कोणाला सांगणार नसाल तर बोलते."

"हो सांगा."

सासू कान टवकारून ऐकू लागली.
"कांताने इथे माहेरी सर्वांना बेजार केले होते.
आई - वडील, भाऊ बहीण कोणाशी ती नीट वागत नव्हती. तिचा स्वभाव भांडकुदळा आहे.
स्वतःच भांडण काढायची, वस्तू आदळा आपट करणं हे कायमचे ठरलेले असायचे. तिने नाकी नऊ आणले होते. तिला काय चार शब्द सांगायची सोय नाही. मी म्हणेल ती पूर्वदिशा."

हे सर्व ऐकून कांताच्या सासूला फार राग आला.
"हे असं वागणं होतं तर का आमच्यापासून लपवलं?"

काकी पुढे बोलू लागली.
"आम्हाला वाटलं लग्न झाले की, जरा शहाणी होईल, सुधरेल म्हणून तिचं लग्न लावलं. मूल झालं तरी तिचं वागणं काही सुधरले नाही.
त्यादिवशी तिचे आईसोबत भांडण झाले.

आई तिला इतकंच म्हणाली, "बाळाकडे लक्ष दे. त्याला वेळेवर दूध पाज तर तिने तमाशा केला. तिच्या अंगात आळस पहिल्यापासून आहे; पण बाळाला तर दूध पाजावे लागणार हे साधं कळू नये. तिला सहज बोललं तरी देखील सहन होत नाही. त्या दिवशी त्या क्षुल्लक कारणासाठी आईशी ती खूप भांडली आणि निघून गेली.

जाता जाता ती आईला म्हणाली, "तुमचे आणि माझे कायमचे संबंध संपले."


हे सारं ऐकून सासूला काय बोलावे सुचेना.
ही अशी विचित्र बाई आपल्या मुलाच्या नशिबात आली, तिला विश्वास बसेना.

एक मन म्हणत होतं, तिला सोडून द्यावे आणि दुसरं मन म्हणत होतं बाळाचे काय? जर तिला सोडलं तर बाळाची फरफट होईल. कात्रीत अडकल्यासारखे झाले होते. इथे आड आणि तिथे विहीर. डोकं चालायचे जणू बंद झाले.

काय करावं काही मार्ग नव्हता.

"कांताच्या घरच्यांना तिचा स्वभाव माहीत होता तर माझ्या मुलाचे आयुष्य का उध्वस्त केले? का लग्न केलं?"

"आम्हाला वाटलं तिच्या खांद्यावर जबाबदारी पडली की ती सुधरेल." काकी तोंड बारीक करून म्हणाली.

"तिच्या आई वडिलांनी माझ्या मुलाच्या आयुष्य बरबाद केलं. मी सांगू शकत नाही ती किती विचित्र वागते. असंही तुम्हाला कल्पना आहेच.

कांता आल्यापासून आमच्या घरातली शांती भंग झाली आहे. सतत भांडत राहते. तिला काही बोललं नाही तरी ती भांडण उकरून काढते. आदळा आपट करते, स्वतःच्या तोंडात झोडून घेते. हे कसलं विचित्र वागते. आम्ही हे का म्हणून सहन करायचे?"

ह्यावर काकी निशब्द झाली. ती निघून गेली.

हे सारं ऐकून सासू दुःखी झाली.
स्वतःच्या मुलासाठी वाईट वाटले. एका अश्या मुलीसोबत लग्न झालं आहे तिला स्वतःच्या आई वडिलांवर देखील प्रेम नाही.

मुलगी कितीही वाईट असली तरी तिला माहेरच्या माणसांवर प्रेम असतं.
कांता तर अशी होती जिला आई वडीलांचे देखील प्रेम नव्हतं.

आयुष्यभर संघर्ष केला होता. मुलाला वाढवलं होतं ह्या आशेने की, आपण नाही सुखाचा संसार करू शकलो, कमीत कमी मुलाचा तरी संसार पाहून खुश होऊ. तसं न होता सारं विपरीत घडलं होतं. जे सुख, समाधान होतं ते कांताने जणू हिरावून घेतलं होतं.

आपली फसगत झाली आहे तिला जाणवलं होतं.

काहीतरी पाऊल उचलावे लागणार.
नाहीतर मुलाचे आयुष्य बरबाद होईल ह्या विचाराने घरी गेली.

घडलेला प्रकार तिने मुलाला सांगितला.
हे ऐकून तो देखील नाराज झाला.

तोच त्याला केशवचा रडण्याचा आवाज आला.

"कांता, बाळ रडतं आहे." ती झोपेतच होती. तो तिला हलवून म्हणाला.

"वैताग आणला आहे ह्याने." असं म्हणत त्रासिक चेहऱ्याने तिने बाळाला दूध पाजलं.

तिला दूर करायचा विचार जरी केला तरी बाळाचा चेहरा पाहून त्याच्यावर दया येत होती.

तो जबाबदारीतून पळ काढणारा नव्हता. तशी त्याच्या आईची शिकवण होती. जे संस्कार रुजले होते ते ओलांडता येत नव्हते.

त्याचा जीव केशवमध्ये गुंतला होता. कांताला सोडताही येत नव्हतं आणि तिच्यासोबत धड संसार करता येत नव्हता.
त्याची अवस्था पाहून आईचे मन नाराज होते.

एक दिवस केशवच्या बाबांनी विचार केला हे सगळं इतकं अती होत आहे. खरंच वेगळं झालो तर कमीत कमी एकटा मी सुखाने राहिल तरी.

बाळाची जबाबदारी दुरून राहून घेईल.
असा विचार यायला आणि त्याच्या बालपणीच्या मित्राची ईश्वरची भेट व्हायला.


ईश्वराचा चेहरा फार उतरला होता. नेहमी खुश असणारा ईश्वर खूप उदास दिसत होता. त्याला पहावलं नाही.

"ईश्वर, काय झाले? इतका उदास का? काही प्रॉब्लेम का?" त्याने त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारले.

ईश्वर ढसाढसा रडू लागला.

त्याला काही बोलवेना.

ह्याला कळून चुकलं नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट आहे;म्हणून हा रडतो आहे.

"ईश्वर, तुला मन मोकळं करायचे असेल तर तू करू शकतो. तू माझा मित्र आहे. तुला मी लहानपणासून ओळखतो. तुला असं कधीच पाहिले नाही. तू तर नेहमी आनंदी असायचा. तुझ्या आजूबाजूच्या लोकांना देखील खुश ठेवायचा, आता मात्र तूच नाराज दिसतो आहे."

ईश्वरने रुमाल काढला डोळे पुसले. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळतच होते. त्याला खूप काही बोलायचे होते. कंठ दाटून आला होता.

तो मानसिक त्रासातून जात होता हे स्पष्ट दिसत होते. कुठेतरी हरवला होता. ईश्वर काय बोलतो ह्याची तो आतुरतेने वाट पाहत होता.

क्रमशः

वाचकहो ही कथा लिहिण्या मागचा उद्देश हाच की, अनेक घरात ह्या अश्या गोष्टी घडतात. कितीतरी बायका, पुरुष मानसिक त्रासातून जात असतात; पण त्यांना कुठेही व्यक्त होता येत नाही, कारण समजात इज्जत जाईल, चर्चेचा विषय होईल. हे चित्र समाजात दिसतं ते मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न कथेतून करते आहे.
कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
काय होईल पुढे. जाणून घेण्यासाठी वाचत राहा तीची सल.
कथेचा वापर यूट्यूब किंवा कुठेही आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.