तिची सल भाग १०

तिला सासुचा प्रचंड राग आला;कारण
तिची सल भाग १०.
पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की, कांताच्या सासूला कांताची काकी येऊन कांताच्या स्वभावाबद्दल सांगते. कांता आधीपासूनच अशी वागत होती; त्यासाठीच तिच्या आई बाबांनी लग्न लावलं. जबाबदारी अंगावर पडली की, ती सुधरेल हा उद्देश होता. कांताचा नवरा ह्याच विचारात होता वेगळं राहून सुखी तरी राहता येईल आणि केशवची जबाबदारी घेता येईल. त्याला त्याचा जुना मित्र ईश्वर भेटतो. तो उदास दिसत होता.आता पाहू पुढे.

ईश्वरने बोलायला सुरुवात केली.
"काय सांगू मित्रा? सगळं व्यवस्थित चाललं असतांना माझ्या आयुष्यात सगळं विचित्र घडलं. माझी वहिनी घरी आली तशी तिने सगळ्यांचे जगणं मुश्किल केलं होतं.

कोणाशी नीट बोलणं नाही की, वागणं नाही.
तिच्या वागण्याला कंटाळून मी माझ्या बायकोसोबत वेगळा झालो.

माझ्या भावाशी रोज भांडायची. तो फार वैतागला होता. आई बाबा देखील माझ्याकडेच राहायला होते. तरी तिला कसला त्रास होता माहीत नाही. दोन वर्षाचा मुलगा होता. घरात कसली कमी नव्हती; पण एक दिवस तिला काय झाले माहीत नाही तिने मुलासोबत जाऊन स्वतःचा जीव दिला.

तिचा जीव गेला, म्हणून पोलिस माझ्या भावाला पकडून घेऊन गेले.

मला चांगलं माहीत आहे ती कशी होती. अगदी शेजाऱ्याना देखील तिचं वागणं माहीत होतं.
माझ्या भावाचा काही एक दोष नसतांना तो आता जेलमध्ये आहे.

काय करावं? काही समजेना बघ.

हे सारं ऐकून तो चक्रावला.

"होईल, सगळं ठीक. भावाने काही केलं नाही तर तो सुखरूप बाहेर येईल." असं म्हणत त्याने ईश्वरला धीर दिला.

ईश्वर म्हणाला, "भाऊ येईल बाहेर;पण त्या भावाच्या मुलाचा काय गुन्हा होता? त्याचा जीव येईल का पुन्हा? ती बाई रागाच्या भरात हे करून बसली. आई अशी असते का? स्वतःच्या मुलाची देखील तिला दया आली नाही. जीव द्यायचा होता तर एकटच जायचे. त्या मुलाला का घेऊन गेली. त्या मुलाची काय चूक?"

ईश्वर जे बोलत होता ते बरोबर होते.

ईश्वरचे सारे बोलणे ऐकून त्यालाही फार वाईट वाटले.

त्याला स्वतःच्या मुलाचा चेहरा दिसला.
'ह्या बाईने असं काही केलं तर?' हा विचार मनात आला. वैरी ना चिंती ते मन चिंती हे खरं आहे. तो विचार करून त्याच्या अंगावर काटा आला.

'नाही, मी असं काही करणार नाही. माझ्या मुलासाठी मी सगळं सहन करीन.'

कांतापासून वेगळं होण्याच्या विचारांवर टिंब लागला तो कायमचा.

आई कांता कमी आणि केशवची आजी जास्त काळजी घेत होती.

बघता बघता वर्ष सरले. कांताचा स्वभाव काही केल्या बदलला नाही. तिला कधीच बदलू शकत नाही हे केशवचे बाबा आणि आजी जाणत होते.

कांताच्या विचित्र स्वभावामुळे त्यांच्या घरात पाहुणे यायचे बंद झाले.

कारण ती येणाऱ्या पाहुण्यांचा देखील अपमान करत असे.

तिचे कोणाशीही संबंध चांगले नव्हते.
अगदी माहेरी जायची देखील ती बंद झाली होती.

दगडाला देखील पाझर फुटेल ; पण तिला नाही.
केशवकडेही ती लक्ष देत नव्हती. तो रडायला लागला तरी तिला आवडायचे नाही, सरळ ती त्याला सासुकडे द्यायची.

केशवची आजीच त्याचा सांभाळ करायची.

केशवचे वडील तिच्या मनाप्रमाणे वागत, भांडण नको होतं त्यांना. कितीही कसेही वागा ती चिडचिड करायची.

कधी तिला बरं वाटलं तर शांत राहायची, नाहीतर तोंड वेडंवाकडं करून बसायची.

अश्यातच कांताला पुन्हा दिवस गेले.

जेव्हा तिला समजलं तेव्हा ते मूल नको होतं.

सासूने विचार केला, केशवला मोठेपणी रक्ताचे कोणीतरी असावे.

"मी करते होणाऱ्या बाळांचा सांभाळ." असे म्हणाली.

सासूच्या मनात होते की, केशवला त्याच्या आईचे नाही कमीत कमी भाऊ किंवा बहीण होईल ते तरी प्रेम करेल.

नवरा देखील म्हणाला, "हे मूल मला पाहिजे."

ह्यावेळेस देव पावला. ती तयार झाली.

केशवला स्वतःच्या हक्काचा भाऊ किंवा बहीण मिळेल हीच आशा होती.

कांता आता घरात काहीच काम करत नव्हती.
सासूची मजा बघायला तिला आवडायची. केशवचा सांभाळ, घरातली कामं ती एकटी करत होती. ती हे सर्व स्वखुशीने करत होती, अशीही तिने जबाबदारी स्वीकारली होती.

दुसरा मुलगाच झाला. कैलास नाव ठेवले.

कैलासच्या जन्माच्या वेळेस कंताला खूप त्रास झाला. तिला नवऱ्यावर आणि सासुवर राग आला. त्यांच्या म्हणण्यानुसार बाळ ठेवलं आणि असं झालं.

कांताला तर मनोमन असंच वाटत होतं, सासूने मुद्दाम त्रास व्हावा म्हणून बाळ ठेवायला सांगितले. तिच्या मनात आधीच राग होता सासुविषयी, त्यात कैलासच्या येण्याने अजून भर पडली.

सासू तर आता सगळं करून करून थकली होती.

बघता बघता कैलास आणि केशव मोठे झाले. शाळेत जाऊ लागले.

सासूला काम पाहिल्यासारखे जमेना.

आता सासूचा त्रास होऊ लागला.

तिने भांडण काढले.

मुलाला त्रास नको म्हणून ती आई दुसऱ्या दिवशी कोणालाही न कळवता घर सोडून निघू लागली.

तिचा तोल गेला, डोक्याला जबर मार लागला आणि ती जागच्या जागी गेली. पडण्याचे निमित्त झाले.

सकाळी केशव आजीशी बोलायला आला होता, काल जे भांडण झाले होते, ते पाहून तो समजून गेला आजीला वाईट वाटलं असणार. तिच्याशी बोललं की, तिला बरं वाटेल म्हणून तो आला होता.

तो आला आणि पाहतो तर काय आजी जमिनीवर पडली होती. डोक्याला मार लागला होता.

त्याने वडिलांना आवाज दिला.

ते देखील धावत आले,पाहतात तर ती देवाघरी गेली होती.

कांतानेही येऊन पाहिले.
तिच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता.
'बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला.'
सगळे रडत होते, मात्र कांताच्या डोळ्यात पाणी देखील नव्हते.

केशव आजी जाण्याने फार दुखावला होता.
आजीने खूप प्रेम दिले होते. खूप जीव लावायची. जसं आजीने जवळ केलं होतं तसं कांताने कधीच जवळ केलं नव्हतं.

आजीच्या आठवणीने मन भरून यायचे.
केशवचे वडील त्या दिवसापासून बोलायचे बंद झाले, आईच्या जाण्याने ते हादरून गेले होते.

आईच तर होती एकमेव व्यक्ती ती त्यांच्या पाठीशी उभी होती. सारं काही आठवत आणि ते हुंदके देऊन रडत, कांताला त्याचाही राग यायचा. इतकं काय रडायचे? असं ती त्याला म्हणायची.

तिला काय कळणार आई जाण्याचे दुःख, जी स्वतःच्या आई बाबांशी नातं तोडून बसली होती.

************************************

रात्र झाली होती. सुमित्रा केव्हाच झोपून गेली होती. आज केशव जुन्या आठवणीने व्याकुळ झाला होता.

आजी कशी मायेने जवळ घ्यायची. गालावर मुका द्यायची. आवडीचं जेवण बनवून स्वतःच्या हाताने खाऊ घालायची, झोपतांना गोष्टी सांगायची. चांगल्या वाईट गोष्टी सांगायची. आजीच्या जाण्याने जी पोकळी झाली होती ती आजही तशीच होती. ती भरून निघणार नव्हती.


तो पुरुष ना, स्वतःचे अश्रू तो सहजासहजी दाखवत नव्हता. त्यालाही त्रास होत होता, वेदना होत होत्या मात्र व्यक्त होता येत नव्हते.

सुमित्राचा तो गुन्हेगार होता तो; पण त्याचे खूप प्रेम होतं सुमित्रावर.

सारं काही सहन करून आजही ती त्याच्यासोबत होती.
तिला त्रास होत होता; पण संसार करायचा तिने सोडला नाही. आई बाबांचे संस्कार काही केल्या विसरली नव्हती. बाबा म्हणायचे तेच तुझं घर. तीच तुझी माणसं.

केशवने पाहिले होते मुलगा सुबोध आणि मुलगी स्वरा ह्यांचा सांभाळ तिने किती छान पद्धतीने केला होता. त्यांच्यावर चांगले संस्कार केले होते. दोघेही हुशार होतेच आणि स्वभाव देखील खूप छान होता ते केवळ सुमित्रामुळे.

त्यामुळेच केशवच्या मनात सुमित्राविषयी प्रचंड आदर होता; पण सुमित्राच्या मनात केशवविषयी तिरस्कार. ती सल कायम मनात राहिली.

ती सल कायम मनात राहील? तुम्हाला काय वाटतं?

कथा आता वेगळ्या वळणार येणार आहे.
क्रमशः
कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
काय होईल पुढे. जाणून घेण्यासाठी वाचत राहा तीची सल.
कथेचा वापर यूट्यूब किंवा कुठेही आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.