तिची सल भाग ११

आईच्या भीतीने कधी कुठे घेऊन गेले नाही आणि आता पाठदुखी लागली आहे तर
पूर्वार्ध गेल्या भागात आपण पाहिले की, केशव स्वतः लहानपणापासून आई कांता हिचा स्वभाव पाहत आला होता. त्याचे वडील देखील अघटित नको घडायला म्हणून तिच्यासोबत मुलांसाठी राहत होते. केशवला सुमित्राविषयी आदर होता. आता पाहु पुढे.

सुमित्रा आणि केशव खूप दुरावले होते. ज्यावेळेस सुमित्राला त्याची गरज होती, तेव्हाही तो शांतच बसला होता. आता काय उरलं होतं?

एक दिवस कावेरीचे आई वडील तिला भेटायला आले होते.

चहापाणी झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले होते.
कावेरीचे वडील तिच्या आईची अधूनमधून मस्करी देखील करत होते. दोघांचे नाते मैत्रीपूर्ण होते. ते पाहून सुमित्राला फार कौतुक वाटलं.

खरंच जोडीदार असावे तर कावेरीच्या आई बाबासारखे. किती नितळ नातं होतं.

दोघेही नवरा बायको कमी आणि मित्र मैत्रिणी वाटत होते. ते देखील सुमित्रा आणि केशवच्या वयाचेच होते. तरीदेखील किती छान बोलत होते एकमेकांशी.

सुमित्राच्या मनात विचार आला. 'माझ्या सासूने कधी दोन शब्द बोलू दिले नाही, काही बोलायचे तरी हळू आवाजात,कामा पुरतं. अगदी वेगळाच दरारा होता. जे नातं खुलायचे होते ते राहूनच गेले.'

कावेरीची आई म्हणाली, "आम्ही पुढच्या महिन्यात मनालीला जणार आहोत. आमचा एक ग्रुप आहे. फार मज्जा येते सर्वांसोबत. तुम्हीही चला आमच्यासोबत. तितकंच फिरून होईल."

केशव सुमित्राकडे पाहू लागला. सुमित्राने नकार दर्शवला. नेमकं ते कावेरीने पाहिले.

कावेरी आईला म्हणाली, "आई- बाबा विचार करून सांगतील."

निघत असतांना कावेरीच्या आईचा तोल गेला. लगेच तिच्या बाबांनी तिला सावरलं.

"बायको, काय हे जपून जरा. लागेल तुला. एकुलती एक बायको आहे माझी. "


कावेरीचे बाबा म्हणाले.

हे ऐकून सगळेच हसू लागले

केशवही विचार करू लागला, 'सारं आयुष्य गेलं आणि मी मात्र सुमित्राशी कधी दिलखुलासपणे बोलू देखील शकलो नाही.'

ते दोघेही निघून गेले.

कावेरी म्हणाली, "आई, काय हे ? फिरून या ना. तुम्हाला बरं वाटेल."

"नको." सुमित्रा नाराजीच्या सुरात म्हणाली.

खरंतर तिला केशवसोबत जाण्याची ईच्छा नव्हती.

कावेरीने मोर्चा केशवकडे वळवला.

"बाबा, तुम्ही तरी बोला ना आईंना."

"बघू." केशव.

कावेरी समजून गेली दोघांना काहीच उत्साह नाही. थोडं वाईट वाटलं.

सुबोध घरी आला की, त्याच्याशी बोलेन असा विचार केला.

इथे कावेरीचे आई बाबा गेले तरी सुमित्रा अजूनही त्याच विचारात होती.

'माझं नशीब असं कसं? फक्त हाल अपेष्टासाठी जन्म झाला होता का? का नाही मी जगू शकले माझ्या मर्जीप्रमाणे. काय असं मी पाप केलं की, माझा भूतकाळ आजही मला जगू देत नाही. कावेरीची आई किती नशीबवान आहे. कावेरीचे बाबा तिला किती जपतात. किती छान संवाद साधतात.'

केशव असं आपल्यासोबत कधी स्वप्नातही राहणार नाही. ह्याच विचारात असतांना तिला तिच्या बहिणीचा सुमेधाचा फोन आला.

"ताई, कशी आहेस." सुमेधा.

"मी बरी आहे तू कशी आहेस?" सुमित्रा.

"मी देखील मस्त. ताई मी ह्यासाठी फोन केला. आपल्या गावी जत्रा आहे. खूप वर्ष झाले गावी गेलो नाही. यंदा जाऊन येवुया का." सुमेधा.

"सुमेधा, नाही गं ईच्छा. काय राहिले आहे गावी? आई बाबा केव्हाच देवाघरी गेले. सुशील इथे मुंबईत असतो. आई बाबा नाही तर ते घर खायला उठते. नकोच." सुमित्रा तोंड पाडत म्हणाली.

तिच्या सर्वच ईच्छा, आकांक्षा जणू मेल्याच होत्या. तिला कशातच रस नव्हता.

सुबोध आणि स्वरा बस हे दोघेच होते, त्या दोघांना पाहून समाधानी होत होती.

"ताई, अगं किती दिवस असं राहणार तू. झालं गेलं सारं विसरून पुढे कधी जाणार तू? अश्याने रोज त्रास होत राहील. बघ विचार कर. ठीक आहे मी फोन ठेवते, थोडं काम आहे." सुमेधाने फोन ठेवून दिला.


सुमेधा बहीण म्हणून सुमित्राचे मन जाणत होती. ती फार दुखावली होती. केशव आणि तिचे नाते जणूकाही समाजासमोरच काय ते नवरा बायकोचे होते. त्या नात्यात जी ओढ पाहिजे ती दिसत नव्हती. काय होतं त्या नात्यात ते काही कळण्यास मार्ग नव्हता.

सुबोध आणि स्वरा हे दोघेच काय ते होते, त्या दोघांना पाहुन ती जगत होती.

केशवने विचार केला.
प्रत्येकवेळी सुमित्राच्या खांद्यावर घरची जबाबदारी होती, म्हणून तिला कधीच कुठे जाता आलं नाही. आधी आईच्या भीतीनेसुद्धा कुठे नेलं नाही. आता तरी तिला त्या बहाण्याने फिरवून आणेल.

"सुमित्रा, आपण जाऊन येऊया? तितकंच तुलाही बरं वाटेल." केशव.

सुमित्राची ईच्छा नव्हती.

ती फक्त नाही म्हणाली.
ती केशवशी बोलायचे टाळायची. केशवने कितीही प्रयत्न केले तरी काही उपयोग नव्हता.

'जेव्हा माझी ईच्छा होती, तेव्हा कुठेही घेऊन गेले नाही. फक्त धुणी भांडी, स्वयंपाक करत राहिले. आईच्या भीतीपोटी चार चौघात जाऊ दिलं नाही, कोणाशी बोलू दिलं नाही. आता पाठदुखी पाठी लागली तर आता फिरवायला घेऊन जात आहेत. काही गरज नाही. मला कुठेच जायचे नाही.' मनात सारं काही बोलत होती.

ती तिच्या मतावर ठाम होती.

केशवला वाईट वाटत होते.
तो प्रयत्न करत होता;पण सुमित्रा त्याला बिलकुल प्रतिसाद देत नव्हती.

भूतकाळातील वादळाने सुमित्रा आणि केशवच्या नात्याला जणू उध्वस्त केलं होतं.

क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.




🎭 Series Post

View all