तिची सल भाग १३

काय झालं त्यादिवशी? प्लिज सांग मला
गेल्या भागात आपण पाहिले, की सुबोध कावेरीला सुमित्राचा भूतकाळ सांगत होता. कश्या प्रकारे आजीने त्रास दिला होता. हे सारं ऐकून कावेरी भावुक झाली होती. पुढे सुबोध म्हणाला. त्यादिवशीच.. तो बोलायचा थांबला. आता पाहू पुढे.

"सुबोध, मला प्लिज सांग काय झाले त्यादिवशी?" कावेरी त्याचा हात पकडत म्हणाली.
त्यादिवशी बाबा आईला म्हणाले, कावेरीची धावपळ होते. तेव्हा तिला प्रचंड राग आला. आई मला म्हणाली की,रात्रीचे जेवण मी बनवते,कारण कावेरी कामावरून दमून येते मग फक्त भांडी घासायला लागतात. इतकंही करू नये का तिने?
ती बाबांना काहीच बोलली नाही. असंही ती बाबांना कधीच काहीच बोलत नाही. मी तिला बाबांशी मनमोकळेपणाने बोलताना कधीच पाहिले नाही. ती माझ्याकडे व्यक्त झाली. व्यक्त झाली म्हणण्यापेक्षा जी गोष्ट तिला इतके वर्ष त्रास देते आहे. त्यामुळे जो भूतकाळात आहे तो बाबाच्या वाक्याने पुन्हा उफाळून आली. तिचा खूपच संताप झाला त्यादिवशी. रडायचीच बाकी राहिली होती. मलाही माहीत आहे तिला त्रास होत आहे, म्हणून मी तिला बोलू दिलं. तिचं मन मोकळं होऊ दिले. जितकं ती मनात साठवणार तितकाच तिला त्रास होणार.

कावेरी फार लक्ष देऊन ऐकत होती.

"कावेरी, तू गैरसमज करून घेऊ नको. ती म्हणाली देखील मला कावेरीचा त्रास नाही. तिला तुझा त्रास नाहीये. तिला इतकंच वाटत होतं, की तिला त्रास होत होता तेव्हा बाबांनी का नाही तिची बाजू घेतली. काळजी घेतली नाही. ते तिच्या मनाला त्रास देत आलं आणि देत आहे."

"नाही, मी गैरसमज नाही करणार. इतकं सारं ऐकल्यावर मला प्रकरण लक्षात आलं आहे. असेही त्या मला आधीच म्हणाल्या होत्या, घरच्या कामाचे टेंशन घेऊ नको. मला झेपेल तितकी मदत मी करत जाईन, खरंच त्या कामं करतात. त्यांचा प्रत्येक कामाला खूप हातभार लागतो. आमच्या दोघींचे नाते चांगले आहे सुबोध. "

"कावेरी, मला माहित आहे म्हणून मी फार मोकळेपणाने बोलतो आहे. आई बाबा फार कमी बोलतात. असं म्हण कामापुरतं. मला वाटतं आईने आता पाठीमागे जे घडलं आहे ते सारं विसरून नव्याने सुरवात करावी."

कावेरी किंचित हसली.

"हसायला काय झालं कावेरी?"

दिर्घश्वास घेत ती म्हणाली.
"सुबोध, इतकं सोप्प आहे का? हे जे तू सर्व मला सांगितलं तेव्हा मला ऐकून विचारही करवत नव्हता. कसं सहन केलं असेल. आधीच्या बायकांनी फार भोगलं आहे. इतकं सोप्प नाहीये सारं विसरून पुन्हा नव्याने सुरवात करणं. जेव्हा एखाद्या गोष्टीचा इतके वर्षे त्रास सहन केला जातो, तेव्हा ती गोष्ट अंतर्मनात खोलवर गेलेली असते. आईंच्या मनाचा तळ गाठणं फार मुश्किल आहे. तुला मी सांगते, एकही असा दिवस जात नसेल की, त्या विचार करत नसतील.
प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना त्यांच्यावर झालेले अत्याचार फार तीव्र होते, म्हणून इतका काळ लोटला तरी त्या बाहेर पडल्या नाही. त्या वाईट घटना आठवून त्यांना आजही त्रास होत आहे.
बायको, आपल्या नवऱ्यावर राग काढून पुन्हा पूर्ववत होते. इथे मात्र त्या बाबांवर इतक्या रागावल्या आहेत की, त्या त्यांच्याशी काहीच बोलत नाही. मला असं वाटतं त्यांच्या मनातून बाबा पूर्णपणे उतरले आहेत, हेच सत्य आहे. त्यामुळे त्या तश्या करतात. मनामधील राग, द्वेष आता त्या त्यांना दाखवत नाही, जेव्हा त्या आशेने त्यांना सांगत होत्या, तेव्हा आजीच्या भीतीपोटी त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. तिथेच खरी ठिणगी पडली आणि त्या ठिणगीने त्यांच्या मनाचा पेट घेतला आहे. नकारात्मक झाल्या आहेत. मुळात स्त्रीसाठी सर्वात जवळची व्यक्ती तिचा नवरा असतो, ती खूप प्रयत्न करते त्याच्याकडे मन मोकळं करायचा. स्वतःच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगण्याचा; पण जेव्हा तिचं ऐकून घेतलं जात नाही तेव्हा ती तुटून जाते. तिला फक्त ऐकून घेण्याची गरज असते. ती गरज जर पूर्ण झाली नाही तर ती नाराज होते. नंतर ती नवऱ्याकडून अपेक्षा करणं सोडून देते,कारण तिला कळलेलं असतं तो ऐकून घेणार नाही. जिथे एकमेकांच ऐकून घेतलं जात नाही ते नातं कोमेजू लागतं. त्यात पहिल्या सारखं काहीच राहत नाही. अपेक्षाविरहित जगलं की, माणूस सुखी होतो असं बोलतात; पण मग जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षा करायची नाही तर कोणाकडून? हेच आईचे झाले आहे. त्या मनाने दुरावल्या आहेत. त्या दुःखी झाल्या आहेत, खूप दुखी.
त्यांचे दुःख इतकं तीव्र आहे की, त्याचा त्रास त्यांना होत आहेच आणि बाबांनादेखील.

त्या तुझ्याकडे व्यक्त होतात. तू त्यांना जवळचा, हक्काचा वाटतो. सुबोध त्या मानसिक तणावातून जात आहे. आपल्याला त्याच्यावर कार्य करावे लागेल."

"कसं करणार?"

"ते तू माझ्यावर सोड." तिने मनाशीच ठरवलं आता सुमित्राला ह्या सर्व गोष्टीतून बाहेर काढायची गरज आहे.


दुसऱ्या दिवशी सकाळीच बाजूच्या घरात स्वयंपाक आणि धुणीभांडी करणारी कमल आली.

सगळे नाश्ता करत होते..

"कमल का आली?" सुमित्राच्या नजरेत हा प्रश्न दिसत होता.

"या कमल ताई." कावेरीने तिला बोलावलं.

सुमित्राकडे पाहत ती म्हणाली, "आई, मीच कमल ताईंना बोलावलं आहे."

"पण का?" सुमित्रा.

"आई, आजपासून जेवन कमल ताई करतील."

"कशाला? आपण आहोत दोघी." सुमित्रा.

"आई, मला माहित आहे आपण दोघी आहोत;पण सकाळ संध्याकाळ तुम्ही किचनमध्ये असता. तोच वेळ तुम्ही बाहेर फिरायला द्या असं मला वाटतं. आपल्या सोसायटीमध्ये योगा क्लास सुरू झाला आहे तिथे मी तुमचं ऍडमिशन घेतलं आहे."

"कावेरी, हे सर्व करण्याआधी मला एकदा विचारायचे तरी. मला नाही जमणार."

कावेरी काही बोलणार तोच सुबोध म्हणाला.

"काय आई, काय नाही जमणार? सगळं जमेल तुला. कावेरी बरोबर बोलते आहे. असंही तिने ऍडमिशन घेतलं आहे. अजिबात ना चा पाढा लावू नको."

सुमित्राला तर काही सुचेना. कावेरी आणि सुबोध दोघेही पाठीच लागले होते.

कावेरीने मंगल ताईंना सर्व कामं समजावून सांगितली.

थोड्या वेळाने कावेरी आली.

"आई, चला जरा बाहेर जायचे आहे."

"कुठे?"

"तुम्ही, चला माझ्यासोबत. कुठे जायचे ते गेल्यावर कळेलच तुम्हाला."

सुबोधसुद्धा सुमित्राला डोळ्यानेच इशारा करत म्हणाला.

मनात ईच्छा नसताना ती तयार झाली.

कावेरीने सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेतली होती.

काय करणार होती कावेरी? सुमित्राचे मन बदलेल?
पुढील भाग जरूर वाचा.

क्रमशः

कथा लेखन- अश्विनी कुणाल ओगले.



🎭 Series Post

View all