तिची सल भाग १४

आठवणी आयुष्यातून केव्हाच निसटून गेलेल्या असतात;पण मनाला विळखा घालून आजही असतात
गेल्या भागात आपण पाहिले की कावेरीने जेवण बनवण्यासाठी बाजूला काम करणाऱ्या ताईंना बोलवलं होतं. कावेरीने सुमित्राचे योगा क्लासला ऍडमिशन घेतलं होतं. आता पाहू पुढे.

"अगं कावेरी कुठे जायचे आहे?" सुमित्रा.

"आई, मी तुम्हाला चला म्हणते आहे. चला गाडीचा सीटबेल्ट व्यवस्थित लावा."

सुमित्राने सीटबेल्ट लावला.

'कावेरीला काय झाले आहे काय माहित? योगा क्लास वैगेरे हे काय अचानक? ही ऐकत पण नाही माझे.'

"आई, जास्त काही विचार करू नका. आपण आज मस्त शॉपिंग करणार आहोत."

"कसली शॉपिंग?" सुमित्रा.

"आई, कळेल हो तुम्हाला." कावेरीने गाडीत गाणी लावली.

जुनं गाणं लागलं.

"एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख , होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक."

ते गाणं ऐकून सुमित्रा फार भावनिक झाली.
डोळ्यावरील चष्मा काढला. कमरेला खोचलेल्या रुमालाने अलगद डोळे पसुले.

"आई, काय झालं?" कावेरीने गाडी बाजूला थांबवली. पाण्याच्या बॉटलचे झाकण खोलून तिला दिले.

सुमित्रा पाणी प्यायली.

"आई, तुम्ही ठीक आहात ना?" कावेरीने सुमित्राचा हात पकडत विचारले.

"कावेरी, ठीक आहे मी." सुमित्रा.

"नाही आई तुम्ही रडत आहात. सांगा मला काय झाले?" कावेरी काही शांत बसणार नव्हती.

"असंच काही आठवलं. कावेरी, खूप दिवसाने हे गाणं ऐकले. हे बाबांचे आवडते गाणं होतं. आमच्या गावी घरासमोर पटांगण होते. एक खाट होती. रोज सकाळी बाबा तिथेच बसायचे. बाबांचे दोन चार मित्र जमायचे. माझ्या हातचा चहा त्यांना आवडायचा. मी छान आलं घालून चहा करायचे. पक्ष्यांचा किलबिलाट. खुराड्यातून कोंबड्या सोडल्या की, दाणे वेचण्यासाठी पळत जाणं. मल्हार काका होते सकाळी गाईचं दूध घेऊन यायचे. शेणाने सारवलेल्या भिंती,शेळ्या मेंढ्याचा आवाज, रस्त्यावरून बैलगाडी जात असल्याचे दिसायचे. शेतकरी सकाळीच शेतावर कामाला जायचे. काही बायका खुरपायला. अनवाणी शाळेत जाणारी पोरं. मातीचा तो सुगंध. बायकांची कामाची गडबड. सारं काही आजही जसच्या तसं आठवतं"

सुमित्रा हे सारं तन्मयतेने बोलत होती.
तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
पाठचे सारे दिवस आज डोळ्यासमोर तरळले.

सुमित्राच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती.

कावेरी देखील प्रत्येक शब्द मन लावून ऐकत होती.

"आई, हे ऐकून सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिले. किती छान वाटतंय ऐकायला. तुम्ही फार नशीबवान आहात हे सारं तुम्ही अनुभवलं आहे. किती गोड आठवणी. एखादा चित्रपट पाहत असल्याचा भास होतो आहे."

सुमित्रा पुढे बोलू लागली.


"कावेरी, आमच्याकडे एक रेडिओ होता. बाबांना सवय होती सकाळची सुरवात छान गाणी ऐकून करायचे. हे गाणं बाबांचे आवडते गाणं होतं. हे गाणं लागलं की, बाबा रेडिओ अगदी कानाजवळ घेऊन ऐकत बसायचे. तल्लीन व्हायचे. मला म्हणायचे. सुमी ह्या गाण्यात वेगळीच आर्ततात आहे. अर्थपूर्ण गाणं आहे हे. मनाला मोहित करतं हे सुमधुर गीत. वेगळीच ताकद आहे. कधी कधी बाबांच्या डोळ्यात पाणी यायचे. माझे बाबा फार हळवे होते कावेरी. मी थोरली होते. माझ्यावर त्यांचा जास्तच जीव होता.
माझं कौतुक करायला थकायचे नाही.
बाबा मला म्हणायचे, राजहंसाला सगळेच चिडवायचे. सगळे बदक एक सारखे दिसायचे आणि तो एकटा वेगळा. सर्वांहून निराळे. नंतर त्याला कळतं की तो राजहंस आहे, त्याचे भय पळून जायचे. बाबा म्हणायचे सुमी आपल्या प्रत्येकात वेगळे गुण असतात, कोणी कितीही नावं ठेवली, चिडवलं तरीदेखील आपण आपली क्षमता ओळखायची आणि पुढे जायचे. "


बोलता बोलता सुमित्रा शांत बसली.

"आई, काय झाले? बोला ना.. पुढे."

"बाबा, म्हणायचे त्या प्रत्येक गोष्टीवर माझा विश्वास होता; पण कावेरी आपल्याला समजून घेणारच कोणी नसेल तर आपल्या क्षमता काय कामाच्या."

"आई,असं नाहीये तुमचे बाबा बरोबर बोलायचे. आपल्या क्षमता आपल्याला कळल्या बस झालं. आपण खूप काही करू शकतो. फक्त धीर धरून ठेवायचा."

सुमित्रा किंचित हसली.

"कावेरी, सारं आयुष्य त्यातच गेले. अजून किती धीर धरायचा?"

कावेरीला तिच्या बोलण्याचा ओघ समजत होता.

"असू दे. आठवणी अश्याच असतात. केव्हाच निसटून गेलेल्या असतात, तरी त्यांचा विळखा मनाला सोडवत नाही."

"आई, कोणत्या आठवणींना महत्व द्यायचे ते आपल्या हातात असतं." कावेरी बोलून गेली.

"म्हणजे?" सुमित्रा नजर रोखत म्हणाली.

"आई, तुम्ही रोज जेवण बनवता. बरोबर?"

"हो."

"आई, तुम्हाला हाताला चटका बसतो?"

"हो."

"आई, मग हाताला चटका बसला, म्हणून तुम्ही जेवण बनवायचे कधी सोडलं का?"

"नाही."

"मला हेच म्हणायचे आहे आई, भूतकाळात काही कटू गोष्टी कायम मनात घर करून राहिल्या, तर आपण जगूच शकणार नाही."

कावेरीला कळून चुकलं, सुमित्रा पुन्हा जुन्या नको असलेल्या आठवणीत रमली.

कावेरी खूप अर्थपूर्ण बोलून गेली होती.

'मी जगणं केव्हाच सोडलंय. बराच काळ लोटला आहे. केवळ श्वास चालू आहे. भूतकाळातील चटके मला पुढे जाऊ देतच नाहीये.'

सुमित्राच्या मनात खूप काही सुरू होतं.

कावेरीने मोठ्या मॉलमध्ये गाडी थांबवली.

"कावेरी, इथे कशासाठी?" सुमित्रा.

"आई तुम्ही चला." सुमित्राचा हात घट्ट पकडत ती तिला आत घेऊन गेली.

क्रमशः

काही गोष्टींची भीती आपल्याला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देत नाही ना? तुम्हाला काय वाटतं? जरूर सांगा.

कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.