तिची सल भाग १५

तिची सल कायम मनात राहील?
गेल्या भागात आपण पाहिले की सुमित्रा जुन्या आठवणीत रमते, कावेरी देखील फार मन लावून सारं ऐकत असते, दोघीजणी मॉलमध्ये जातात. आता पाहू पुढे.

सुमित्रा सहसा मॉलमध्ये जायची नाही; कारण की, तिथे गेल्यावर सगळ्यांचेच कपडे हे फार फॅशनेबल असायचे आणि ती त्याच्यात फारच साधी दिसायची. तिला फार असहस वाटायचं ; पण आज कावेरीने तिला जबरदस्ती आणलं होतं.

सुमित्रा म्हणाली, "कावेरी तुला नक्की काय घ्यायचं आहे, आपण आपल्या इथूनच एखाद्या दुकानातून खरेदी केली असती. हे मॉल वगैरे."

सुमित्राचं बोलणं पूर्ण होईपर्यंतच कावेरी म्हणाली, "आई, आहो कधीतरी मॉलला येत जा. मी नेहमी बघते तिथल्या तिथेच तुमची शॉपिंग असते. थोडासा बदल हा हवा."

एक्सीलेटर चढताना कावेरीने सुमित्राचा हात घट्ट पकडला, सुमित्रा जरा घाबरतच होती ;कारण तिला एक्सीलेटरवर चढायची सवयच नव्हती. खाली पडेल की, काय ही तिला भीती वाटत होती. कावेरीला लक्षात आलं त्यामुळे तिने डोळ्याने इशारा करत सुमित्राला धीर दिला.

आई तुम्ही पायऱ्यांवर अजिबात बघू नका, तुम्हाला अजून भीती वाटेल. तुम्ही पहा ना किती छान शॉप आहेत. किती छान वाटतंय कलरफुल.

कावेरीच्या बोलण्यामुळे सुमित्रा जरा स्थिर झाली. भीती वाटत होती ; पण शेवटी ती अलगद पाय ठेवून एक्सीलेटर वर चढली.


कावेरी काळजीपूर्वक सुमित्राला हँडल करत होती. तिच्या मनामध्ये असणारी भीती तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होती, त्यामुळे कावेरी तिला कम्फर्टेबल होईल अशा पद्धतीने तिच्याशी बोलत आणि वागत होती. सुमित्राला, कावेरीच्या अशा वागण्यामुळे खूप बरं वाटलं एक कॉन्फिडन्स आला.

तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य आलं.

आज कितीतरी दिवसाने तिचं मन बाहेरच्या जगात वावरत होतं. निमित्त होती कावेरी; पण आतूनच खूप छान वाटत होतं. वेगवेगळी माणसं. सार काही रोजच्यापेक्षा वेगळं; नाहीतर रोज उठून घरातली काम करा. सारं काही लक्ष देऊन करा. आजचा दिवस हा खरच वेगळा होता; तोचतोचपणा नव्हता.

कावेरी एका शॉपमध्ये घेऊन गेली, तिथे लेडीजच्या सर्व वस्तू मिळत होत्या, तिथे गेल्यावर तेथे काम करणाऱ्या मुलीला ती, सुमित्राकडे बोट दाखवत म्हणाली, "मला यांच्यासाठी एक्सरसाइकरता कपडे पाहिजे आहेत, टी-शर्ट पॅन्ट वैगेरे. हे ऐकताच सुमित्रा म्हणाली.

कावेरी "नाही नाही मी तसलं काही अजिबात घालणार नाही."

हे ऐकताच समोरची मुलगी हसू लागले

"आई, असं काय लहान मुलीसारखं करत आहात? आता तुम्ही काय एक्सरसाइज साडीवर करणार आहात का?."

"कावेरी, नको मी हे कधीच असलं काही घातलं नाही आणि माझ्याच्याने ते होणार देखील नाही. चल आपण जाऊयात."

नेहमीच साडी नेसणारी सुमित्रा हे सगळं काही तिला एक्सेप्ट करणं फार जड जात होतं.

कावेरी म्हणाली, "आई, तुम्ही आजूबाजूला बघा. तुमच्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या बायका देखील किती छान फॅशनेबल राहतात. बघा आई तुम्ही साडीत खूप सुंदर दिसता; पण आता जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करणार तेव्हा तरी कमीत कमी अशी कपडे घालू शकता. सुमित्राने नजर फिरवली, पहाते तर खरंच अगदी साठीला आलेल्या बायका सुद्धा मस्त जीन्स, टॉप, स्कर्ट वगैरे घालून मॉलमध्ये फार आत्मविश्वासाने फिरत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. किती छान आणि किती सहजपणे त्या सर्व कॅरी करत होत्या.
सुमित्राला त्यांचं फार अप्रूप वाटलं.

कावेरीने छान छान रंग संगती असलेले कपडे सुमित्रा साठी निवडले आणि म्हणाली, "आई, तुम्ही हे ट्राय करून बघा."

सुमित्राने ते पाहिलं आणि म्हणाली, "कावेरी, खरंच मला हे जमणार नाही. कावेरी लाडाने दटावतच म्हणाली, "आई, काय हो.. इतक्या हौसेने मी इथे तुम्हाला आणलं आणि तुम्ही नाही नाही करत आहात. एकदा घालून तर बघा तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल आणि खूप छान दिसेल."
एकदा घालून बघता का ? प्लीज."


आता कावेरी असं बोलत होती , त्यामुळे सुमित्राने ते कपडे घालून बघायचा विचार केला. चेंजिंग रूममध्ये जेव्हा तिने ते ट्राय केलं आणि स्वतःला आरशात पाहिलं, तर विश्वासच बसत नव्हता की, इतकी छान त्या कपड्यांमध्ये दिसू शकते. तिने कावेरीला आतूनच आवाज दिला. कावेरी गेली, पाहते तर सुमित्रा खरच खूप गोड दिसत होती.

"आई, मी म्हणाले होते ना तुम्ही खूप छान दिसणार. बघा किती छान दिसताय तुम्ही. खरंच खूप सुंदर आणि तुम्हाला हे कपडे देखील सूट करत आहेत. आपण ह्याच साईजची अजून एक जोडी घेऊया."

सुमित्राने स्वतःचं हे रूप पहिल्यांदाच पाहिलं होतं, ती पुन्हा आरशात स्वतःला पाहत होती. 'मी अशी देखील दिसू शकते?' स्वतःलाच प्रश्न विचारत होती. हे असलं तिने कधीच ट्राय केलं नाही, खरंतर तो कधी विचारही मनात आला नव्हता. लग्न झाल्यापासून साडीची सवय लागली होती आणि लग्नाआधी परकर पोलका. हे असं पॅन्ट टी शर्ट स्वप्नातही कधी घालेल हा विचार केला नव्हता. सुमित्राला स्वतःकडे बघून फार छान वाटत होतं. डोळ्यात एक चमक होती. पुढून पाठून स्वतःला निरखून पाहत होती, लाजतही होती.

' सुमित्रा तू खूप छान दिसते'
हे तिचं मन तिला सांगत होतं. आधी नको नको म्हणणारी सुमित्रा आता मात्र जेव्हा कपडे ट्राय करून पाहिले, तेव्हा तिचं जरा मन बदललं. असही सगळं झाकून पाकून आहे. घ्यायला हरकत नाही. सुमित्रा पुन्हा साडी घालून बाहेर आली. असेही आता तिचे माप कळलं होतं, कावेरीने छान रंग सिलेक्ट केले होते.


" आई, बघा तुम्हाला आवडले का कलर? सुमित्रा हो म्हणाली. कावेरीला कळून चुकलं की, सुमित्राचं मन बदललं आणि तिला बरंही वाटलं. मिशन फत्ते झाले होते. ते झाल्यावर सुमित्राचा हेअर स्पा करायला ती पार्लरमध्ये घेऊन गेली. सुमित्रा पाहतच बसली.

"कावेरी, इथे कशाला आणलं तू मला? तुला काही करायचं आहे का?."

" आई मला काही करायचे नाही, इथे आपण तुमच्यासाठी आलो आहोत. आपण छान हेअर स्पा करूया. बघा तुम्हाला किती रिलॅक्स वाटेल"


तिचा पुन्हा नाचा पाढा सुरू झाला.

" नको कावेरी हे असे मी करत नाही. माझे केस छान आहेत."

कावेरी म्हणाली, "मला वाटलंच होत आई, तुम्ही असंच बोलणार ; पण एकदा ट्राय करायला हरकत काय आहे. बघा तुम्ही कपडे घालताना पण नाही नाही म्हणाला; पण घातल्यावर तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स आला आणि तुम्हाला स्वतः बद्दल किती छान वाटलं. एकदा करून तर पहा आई."

सुमित्राने हेअर स्पा करून घेतला. खरंच तिच्या केसावर वेगळीच चमक आली.

"बघा आई किती मस्त दिसत आहेत केस." कावेरी तिच्या केसावर अलगद हात फिरवत म्हणाली.

सुमित्राच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते.
तिला खूप छान वाटत होतं.


"आई, चला मस्त कॉफी पिऊया."

सुमित्रा आणि कावेरी दोघी कॉफी शॉपमध्ये गेल्या.

तितक्यात एक तरुणी आली आणि कावेरीचे डोळे झाकले. बहुतेक तिची मैत्रीण असावी.

"कावेरी, ओळख पाहू?"

कावेरीने अंदाज लावला.
"स्मिता?"

"नाही."

"मुग्धा?"

"नाही."

कावेरीने थोडा विचार केला.

"केतकी?"


त्या मुलीने डोळ्यावरील हात काढला.

ती केतकी होती, कावेरीची खास मैत्रीण.
तिला पाहून कावेरी खूप खुश झाली.

दोघींनी एकमेकींना मिठी मारली.

"कशी आहेस केतकी? किती वर्षानंतर पाहते आहे तुला."

"मी एकदम मस्त. तू बोल तू कशी आहेस?"

"मी पण छान गं."

कावेरी सुमित्राकडे ईशारा करत म्हणाली, "ह्या माझ्या सासूबाई."

केतकीने नमस्कार केला.

"आई , तुम्ही बसा आम्ही लगेच कॉफी घेऊन येते."


कावेरी आणि केतकी गेले.

केतकी म्हणाली, "काय सुनबाई चक्क सासूबाई सोबत मॉलमध्ये?"

कावेरी हसली.

"हो गं, त्यांना योगा क्लास लावला आहे. म्हणून कपडे घेण्यासाठी आले."

केतकी तिला म्हणाली, "कावेरी, तू आहे तशीच राहिली."

कावेरीला काही समजले नाही.

"म्हणजे?"

"म्हणजे, तू आजही तशीच आहे. सर्वांचा विचार करणारी. सर्वांना आपलंसं करणारी."

दोघी कॉफी घेऊन आल्या.

केतकी, सुमित्राशी बोलू लागली.

"काकू, तुम्हाला सांगते कावेरी माझी अगदी लहानपणापासूनची मैत्रीण. फार इमोशनल होती. दुसऱ्याचे दुःख, त्रास तिला कधीच बघवला नाही. एक किस्सा सांगते आमच्या एका मैत्रिणीने डबा नव्हता आणला , तर हिने स्वतःचा डबा तिला दिला. स्वतः उपाशी राहिली. अशी आहे ही. स्वतःचा विचार अजिबात न करणारी."

कावेरी, केतकीला म्हणाली. "पुरे गं केतकी. किती ते कौतूक."

"आहेसच तू कौतुक करण्यासारखी गोड." केतकी तिचा हात हातात घेत म्हणाली.

सुमित्रालाही पटत होतं. खरंच कावेरीने आज इतकं काही केलं होतं की, मन भरून आलं होतं.

"केतकी,बरोबर बोलते आहेस. कधी नव्हे ते वेस्टर्न कपडे घालायला लावले. ते स्पा का काय करतात ते जबरदस्ती करायला लावलं. आता मला काय शोभणार का हे सर्व पण तरीही बघ इतकं सगळं करत बसली."

कावेरी डोळे मोठे करत म्हणाली, "आई का नाही शोभत? सगळं छान दिसतं. ह्या वयात किती छान दिसतात."


"हो काकू, किती छान दिसता तुम्ही. बरोबर बोलते आहे कावेरी."

बऱ्याच गप्पा झाल्या.

सुमित्रा म्हणाली, "केतकी, घरी ये कधीतरी."

"हो काकू नक्की येईल. तुम्ही पण या कावेरीसोबत. असंही मी इथेच शिफ्ट झाले आहे. भेटीगाठी होतच राहतील."

केतकी निघून गेली.

कावेरी आणि सुमित्रा शॉपिंग बॅगसोबत घरी परतल्या.


सुबोध ते पाहून म्हणाला,
"कावेरी, आई काय जबरदस्त शॉपिंग झालेली दिसते आहे."

कावेरी बॅग ठेवत म्हणाली.

"ही तर काहीच नाही. ही तर सुरवात आहे."

सुबोधने भुवया उंचावल्या.

केशव देखील तिथेच होता. तो सर्वांचं बोलणं ऐकत होता.

सुमित्रा, आज नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. खूप दिवसाने तिला प्रसन्न पाहून त्यालाही बरं वाटलं.

नेहमीप्रमाणे सुमित्रा जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये जाणार तोच कावेरीने तिला रोखलं.

"काय आई, कुठे?"

"जेवणाच बघायला जाते."

"आई, विसरला का? ताईंना सगळं सांगून गेले होते. सगळं जेवण बनवून गेल्या आहेत."

"हो मी विसरलेच."

सुमित्रा पुन्हा सोफ्यावर बसली.

सुबोध म्हणाला,
"आई, छान दिसतेय आज. काय स्पेशल?"


कावेरी म्हणाली, "सुबोध, ओळख बरं काहीतरी बदल आहे आईमध्ये."

केशवने नीट निरखुन तिला पाहिले. पटकन म्हणाला, "केस सुंदर दिसत आहेत."

"वा! बाबा तुम्ही तर लगेच ओळखलं."

ती सुमित्राकडे पाहत म्हणाली,"आई, बाबांचं बरोबर लक्ष आहे बरं का?"

ह्यावर सुमित्रा काहीच बोलली नाही.

"मी फ्रेश होऊन येते." असं म्हणत ती बेडरूममध्ये गेली.

हात पाय धुतले. आरशात बघून चेहरा पुसला.

बेडवर बसली. दिवसभर काय काय केलं हे सारं आठवून ती आनंदीत झाली.

आजचा दिवस फार वेगळा होता. नेहमीपेक्षा फार वेगळा.

इथे सुबोध आणि कावेरी बेडरूममध्ये आले.

सुबोध कावेरीला म्हणाला, "थँक्स कावेरी."

"कशासाठी?"

"आज आईला बाहेर घेऊन गेली आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळं समाधान दिसलं ते तुझ्यामुळे."


"काय हे सुबोध. मी काय परकी आहे का? फॉर्मेलिटी नको आहे."


"लव्ह यु कावेरी."

असं म्हणत त्याने तिला स्वतःकडे ओढले.

"हे काय करतो आहेस?"

"तूच तर म्हणाली फॉर्मल नको होऊ. म्हणून आता.."

असं म्हणत त्याने तिला गलावर किस केला.

त्याची मिठी सोडवण्याचा ती प्रयत्न करू लागली तसं त्याने अजून मजबुतीने तिला पकडलं.

"सुबोध, मला भूक लागली आहे. सोड मला."
तिच्या केसावर अलगद हात फिरवत म्हणाला.
"मलाही भूक लागली आहे."

कावेरीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.

सुबोधला वाटलं कावेरीचा मूड बदलला.

पण ती त्याला चावली.

सुबोधने लगेच पकड सैल केली.
"कावेरी,किती जोरात चावली?"

कावेरी बेडरूममधून त्याला चिडवतच पटकन बाहेर पळाली.
सगळे जेवायला बसले.

ताईंनी जेवण छान बनवलं होतं.

"आई, त्या ताई छान बनवतात जेवण."

"हो खरंच चविष्ट बनवलं आहे."
जेवण झाल्यावर कावेरी म्हणाली.

"आई, तुम्ही झोपा मी किचन आवरते."

खूप दिवसाने सुमित्रा रिलॅक्स झाली होती. सारं श्रेय होतं ते कावेरीचे.

हे सगळं करून केशव आणि सुमित्राचे नाते पूर्ववत होईल? काही बदल घडेल?

क्रमशः

कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले