तिची सुट्टी

तिलाही गरज आहे सुट्टीची
तिची सुट्टी..


"पियु, नील उठा ना.. वाजलेत बघा किती?" चित्रा मुलांना उठवत म्हणाली.

"आई, प्लिज यार.. एक दिवस तर मिळतो सुट्टीचा. त्या दिवशी तरी झोपू देत ना." दोघेही कुस बदलत म्हणाले.

"अरे पण, सकाळचे दहा वाजले आहेत." चित्राने परत एकदा बोलायचा प्रयत्न केला.

"आज कितीही वाजले तरी मी उठणार नाही. रोज तर उठायचे असतेच." नील वैतागला होता.

"मावशी येतील ना घर स्वच्छ करायला."

"एक दिवस आमची खोली नाही स्वच्छ केली तरी चालेल. आम्ही चालवून घेऊ. जाताना फक्त दरवाजा ओढून घेत." डोक्यावरून पांघरूण घेत पियु म्हणाली. अजून काही बोलल्यास तिसरं महायुद्ध सुरू होईल हे माहीत असल्याने काही न बोलता चित्रा तिथून बाहेर पडली. हॉलमध्ये जयेश चहा पित बसला होता.

"नाही ना उठली मुलं? सांगितलं होतं नको जाऊस उठवायला. पण तुला ऐकायला जमलं तर ना. स्वतःही उठून बसायचं आणि दुसऱ्यांनाही उठवायचं." जयेश नाराजीने बोलत होता. यावर चित्रा काही बोलणार तोच सासूबाईंनी आवाज दिला,

"आज नाश्ता मिळणार आहे का? माझ्या गोळ्यांची वेळ झाली आहे. रिकाम्या पोटी औषध घ्यायचं नसतं माहित आहे ना? तसंही आठवड्यातून एकच दिवस तर नाश्ता करायचा असतो. इतर दिवशी असेल ते खातेच ना मी. ते ही सांगावे लागते का?"

"नाश्ता झाला आहे. देते आणून." जयेशकडे दुखऱ्या नजरेने बघत चित्रा स्वयंपाकघरात गेली. त्याने तिच्याकडे बघायचेही कष्ट घेतले नाहीत. तो आपल्या मोबाईलमध्ये मग्न होता. चित्राने उपम्याच्या बश्या आणून सासूबाई आणि जयेशच्या हातात दिल्या.

"हे काय उपमा?" जयेशने तोंड वेंगाडले.

"मग काय करायला हवे होते?"

"कधीतरी इडली, डोसा, पराठे असं काहीतरी करत जा ना. रविवार सकाळ म्हणजे पोहे किंवा उपमा बस.."

"मिळतंय ते नशीब समज. हो की नाही चित्रा?" सासूबाई हे टोमण्यात बोलल्या की तिच्या बाजूने हे ठरवण्यातच चित्राला काही क्षण लागले. पण आत्तापर्यंतचा अनुभव बघता टोमण्यात असण्याचे चान्सेस जास्त होते.

"आता दुपारी जेवायला मस्त काहीतरी चमचमीत बनव. रोज तो गार डबा खायला जीवावर येते." समोरचा नाश्ता संपवत जयेश म्हणाला.

"मला बाई साधंच कर. ते तुमचं चमचमीत खाल्लं की मला जळजळतं." सासूबाई म्हणाल्या.

"परत एक कप चहा मिळेल का? चहा पिऊन मी जरा खाली जाऊन येतो. किती दिवसांत मित्र भेटलेले नाहीत."

"चाललाच आहेस तर भाजी घेऊन ये उद्यासाठी." चित्रा म्हणाली.

"याचा राग येतो मला. एक दिवस सुट्टी आहे म्हणून मनासारखं करायला जावं तर लगेच कामाला लावायचं. तुला जी भाजी हवी ती तू आण आणि कर. पण मला सांगू नको." जयेश चहा न पिताच तावातावाने खाली निघून गेला. ते बघून सासूबाई चिडल्या.

"एक दिवस तो घरी असतो. तरीही सुखाने राहू देऊ नकोस त्याला. कश्याला भाजी आणायला सांगितलीस त्याला? तुला काल ऑफिसमधून येताना घेऊन येता नाही का आली? दमतो ना तो काम करून. ही सुट्टी ना आजकाल नकोच वाटते मला. नुसती चिडचिड. त्यापेक्षा बाहेर असता तेच बरं. डोकं तरी शांत राहतं." सासूबाई त्यांच्या खोलीत निघून गेल्या. चित्रा मात्र समोरचा गार झालेला उपमा घश्याखाली ढकलू लागली.


सुट्टीच्या दिवशीचा हा त्रास होईल का कमी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all