तिची सुट्टी.. भाग २

तिलाही सुट्टीची गरज आहे
तिची सुट्टी.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की रविवारी सगळ्यांना आपल्या मनासारखं वागायचं आहे. बघू आता चित्रा काय करते ते.

"वहिनी, पटापट कामं द्या.. आणि मी उद्या काय कामावर येणार नाही." मंजूबाईने येताच चित्राला सांगितले. चित्राचे लक्ष नाही म्हटल्यावर मंजूबाईने तिला हलवले.

"वहिनी, लक्ष कुठेय? काय करू आधी? भांडी की पोछा?"

"तुम्ही आलात कधी?" चित्राने आश्चर्याने विचारले.

"काकूंनी दार उघडले. काही झालंय काय? आज ताशा जरा जोरात वाजला. तरी तुम्हाला समजलं नाही." मंजूबाई परत बडबडली.

"काही नाही.. नेहमीचंच.. तुम्ही उपमा खाऊन घ्या. मग भांडीच घ्या." डोळ्यातलं पाणी पुसत चित्रा म्हणाली.

"आज भांडी एवढीच? अजून कामं झाली नाहीत का? वहिनी मगाशीच सांगितलं आहे, मी उद्या येत नाही म्हणून." मंजूबाईने परत खात्री करून घेतली.

"मावशी, किती वेळा सांगायचे.. सोमवारी सुट्टी घेत जाऊ नका हो.. शनिवार, रविवार चालून जातं. सोमवार म्हणजे." चित्रा वैतागली होती.

"तुमचं बरोबर आहे. पण बाकीच्या बायकांना नाही चालत रविवारी सुट्टी घेतलेली. त्यांचं म्हणणं असतं की एक दिवस तरी आराम मिळू द्या. प्रत्येकाला आपापल्या आरामाची पडलेली असते. आम्हाला नको का आराम?" मंजूबाई तणतणली.

"सगळ्यांना आराम हवा आहे.. करा.." घरातला राग मंजूबाईवर काढत चित्रा ओरडली. कधी न चिडणारी चित्रा असं बोलल्यावर मंजूबाई गप्पपणे कामाला लागली. ते बघून चित्रालाच कसंतरी वाटलं. तिने चहा गरम केला आणि उपमा त्यांच्यासमोर ठेवला.

"मावशी, चहा घ्या. नाहीतर थंड होईल."

"घेते.. पण आधी का चिडलात ते सांगा."

"काय सांगू? बघाना, घरात प्रत्येकाला सुट्टी मनासारखी घालवायची असते. माझाच विचार कोणी करत नाही. मुलांना सुट्टीच्या दिवशी हवं तेवढं झोपायचं असतं, नवर्‍याला मित्रांसोबत गप्पा मारायच्या असतात, चमचमीत खायला हवं असतं, सासूबाईंना सुनेनं सतत हाताशी असावं असं वाटत असतं. आणि मी? रोज पहाटे उठायचं, यांना डबे करून द्यायचे म्हणून. सगळं आवरून मी ऑफिसला जायचं, तिथे कामात हयगय झाली की तिथे ऐकायचं, घरी आल्यावर परत घरचं बघायचं. नशीबाने तुम्ही मदतीला आहात म्हणून. भांडी, लादी करावी लागत नाहीत. पण मी ही थकते ना? तो रोजचा प्रवास, रोजची दगदग." चित्रा बोलत होती.

"ते तुम्ही डोक्यावर चढवून ठेवलंय म्हणून. मी बघा.. कसं सुतासारखं सरळ करते ते. आता उद्या बघा.. नवरा घरी आहे. मुलाला पण सांगितलं आहे घरी रहायचं. सगळं घर स्वच्छ करायचं. आणि एक दिवस जेवण बाहेरून मागवायचं. मी करणार नाही म्हणून साफ सांगितलंय." मंजूबाई सांगत होती.

"पण मावशी.."

"पण नाय आणि बिण नाय.. तुमचं कसं झालंय, ये बाब्या दूदू पी रे.. ए सोने एक घास चिऊचा खा गं.. काय पण तुम्ही? ते दादा, चहा पिऊन तसाच कप ठेवतात. आणि काकू? त्यातर चॉकलेटचं खाल्लेलं कव्हर पण तसंच टाकतात. तुम्हीच जरा बोलायला शिका."

"मी?" चित्रा थोडी घाबरली.

"नाही.. मी बोलते. काय पण वहिनी तुम्ही? बाहेर एवढी मोठी मोठी कामं करता आणि एवढंबी होईना तुमच्याकडून. श्या.." मंजूबाईने पीन मारली. चित्रा विचार करू लागली. तिने खरंच सगळ्यांना डोक्यावर बसवून ठेवलं आहे?

मंजूबाई तिचं काम करून निघून गेली. आता चित्रा काय करणार? मिळवू शकेल का ती हक्काचा आराम? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all