Login

तिची तपश्चर्या - भाग १६

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग १६

मानस उमाची साखरपुड्यानंतरची पहिली भेट तर छान पार पडली. आता पाहूया पुढे..

रिसॉर्ट मधून उमा आणि मानस दोघेही जेवण करून निघाले. काळोख झाला होता. येताना मानसने परत
एफएम ऑन केलं केला तेव्हा एक मराठी गाणं लागलं होतं,

"पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडी ही या दोन लोचनांची"

गाणं ऐकून उमा गालातल्या गालात हसली. जणू हे गाणं तिच्यासाठीच लागलं होतं. मानसच्या मनात काहीही नसलं असलं तरी उमासाठी याच भावना होत्या. मानस चॅनेल चेंज करायचा प्रयत्न करत होता परंतु उमा म्हणाली हेच गाणं ऐकूया ना. उमासाठी मानसला तेच गाणे ऐकावं लागलं. उमाच्या घराजवळ येताच त्याने गाडी थांबवली. गाडीचा आवाज ऐकूनआई बाबा दोघेही बाहेर आले आणि ते मानसला म्हणाले,

"या ना आत मध्ये थोडी कॉफी तरी घेऊन जा."

"आत्ता जेवण झालंय येईन ना पुन्हा कधीतरी."

मानस उमाला बाय करून निघून गेला. मग घरात आल्यावर आई-बाबांना म्हणाली,

"तुमचं जेवण झालं ना. झोपला नाहीत अजून."

"आता जेवलो आम्ही जरा गप्पा मारत होतो. आता तुझ्या लग्नाची खरेदी करावी लागेल. त्याचाच विचार विनिमय चालला होता. तू नीट जेवलीस ना की मानस बरोबर असल्यामुळे लाजून जेवणच नाही गेलं."

"आई काहीतरीच हं‌ तुझं. मी व्यवस्थित जेवले. आता कपडे बदलून झोपते मी. तुम्ही पण दोघं झोपा. बाबा तुम्ही गोळ्या घेतल्या ना."

"हो उमा गोळ्या घेतल्या मी. अजून माझ्या निवृत्तीला सहा महिने आहेत त्यामुळे तब्येत ठणठणीत ठेवायलाच हवी नाही का!"

"बाबा आता तुम्ही हळूहळू ट्युशन्स वगैरे कमी करा. आई तू पण तुझी दगदग कमी कर कारण आता माझं लग्न झाल्यावर तुझ्या मदतीला कोणीच नसणार."

"अगं तुझं लग्न तर होऊ दे मग सर्व आपण ठरवू काय कसं करायचं ते. चल जा तू आवर आता."

उमाने कपडे बदलले आणि ती झोपायला गेली पण झोप काही तिच्यावर मेहेरबान होत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर मानस भेटला तेव्हापासूनच्या घटना तरळत होत्या. तिच्या मनात आलं आपल्याला मानसने सांगितलं असलं की तो तिला पत्नीचा दर्जा देईल पण त्याचं प्रेम आपल्याला मिळणार नाही. तरी पण तो खडूस नाहीये. आपल्याशी वागताना तो खूपच चांगला वागतो. ज्या गोष्टीं आपण कधी अनुभवल्या नाही त्या आपल्याला तो नीट समजावून सांगतो. उमाला आधी वाटलं होतं की पहिल्या भेटीतच मानसने असं सांगितल्यामुळे तिला तो खूप रुक्षपणे वागवेल की काय.

दुसऱ्या दिवशी उठल्यावर रमाताई उमाला म्हणाल्या,

"उमा तू राधाला विचारून घे तिला कधी वेळ आहे. मी वसूला पण विचारते त्याप्रमाणे आपण खरेदीला जाऊया. कोणाला काय घ्यायचे त्याची मी यादी केली आहे. सोहनींच्या घरातल्यांना पण आपल्या ऐपतीप्रमाणे काही ना काहीतरी घ्यावंच लागेल."

"मी राधाताईला आत्ताच फोन करून तिला कधी वेळ आहे ते विचारून घेते. नंतर परत मला त्यांच्याबरोबर पण शॉपिंगला जावं लागेल ना."

"हो बाई आता तुला तिकडची शॉपिंग जास्त आवडीची. ते तुला खूप महागमहाग साड्या आणि दागिने घेतात नाही का!" रमाताई तिला चिडवत म्हणाल्या.

"आई असं काहीच नाही. मला तर तुझं आणि बाबांचं प्रेमच सगळ्या खरेदीपेक्षा खूप भारी वाटतं. आणि हो तुम्ही जास्त खर्च करू नका. आता जो पैसा आहे तो नीट पुरवून वापरायला हवा."

"अगं मी आणि बाबांनी रोजच्या खर्चातून थोडे थोडे पैसे बाजूला ठेवले आहेत. आम्ही जे पण काय करू सगळं व्यवस्थित करू. तू काळजी करू नको."

"अगं राधाताई म्हणाली तिला उद्या अकरा वाजता आपल्याबरोबर यायला जमेल. उद्या आपण तिघी जाऊया जेवण झाल्यावर. वसु मावशी तिच्या घरूनच येईल ना."

दुसऱ्या दिवशी राधा आल्यावर जेवण झाल्यावर त्या तिघी शॉपिंगला गेल्या. उमाने जाणूनबुजून महागड्या शोरूम मध्ये जाण्याचे टाळलं. तेव्हा रमाताईंच्या मनात आलं किती समजूतदार मुलगी आहे. सोहनींच्या घरात अगदी सुखाने नांदेल. त्यांची खरेदी अटपून त्या दुकानाच्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांना शकुंतला ताई आणि शीला भेटल्या. शकुंतला ताई म्हणाल्या,

"अरे तुम्ही पण आजच खरेदीला बाहेर पडलात का! झाली का खरेदी? रमाताई तुम्हाला सांगते एक रीत म्हणून तुम्ही मला आणि शीलाला साधीशी साडी घ्या. उगाच महाग साडी घेण्याच्या फंदात पडू नका. मानस आणि ह्यांना सुद्धा फक्त शर्ट पॅन्ट चा कपडा घ्या. बाकी खरेदी आम्ही करणारच आहोत. माझ्या बोलण्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका."

"छे हो! आता मला तुमचा स्वभाव चांगला कळला आहे. तुम्ही मला कधीच दुखावणार नाहीत हे मला माहिती आहे. तुमची खरेदी आटोपली का?"

"हो आम्ही पण आता घरीच निघालो आहोत. उमा मी तुला एक दोन दिवसात फोन करेन मग आपण खरेदीला जाऊया"

"हो चालेल ना."

त्या तिथून निघून गेल्यावर रमाताईंच्या ओळखीच्या एक बाई आणि त्यांची मुलगी वाटेत भेटल्या.

"अगं बाई रमा कशी आहेस. आज अगदी तिघी एकत्र खरेदीला निघाल्या आहेत."

"अगं आमच्या उमाचं लग्न ठरलं आहे ना म्हणून थोडी खरेदी करतोय."

"हो मला कळलं मुलगा खूप श्रीमंत आणि घरंदाज आहे."

"देवाची कृपा"

त्या बाई आपल्या मुलीकडे वळून तिला उद्देशून म्हणाल्या,

"बघ असं देखणं रूप असलं ना की चांगली श्रीमंतांची स्थळं मिळतात." त्यांचं बोलणं ऐकून राधाला खूप चीड आली. एक तर तिला त्या बाईंची मुलगी किती आगाऊ आणि फटकळपणे बोलणारी आहे ते माहिती होतं ती लगेच म्हणाली,

"मावशी नुसतं सौंदर्य असून चालत नाही तर त्याच्यासाठी वागणं बोलणं, संस्कार हेही तितकेच महत्त्वाचे असतात. लग्न ठरताना हे सगळंच बघितलं जातं नुसतं रूप नाही." त्या बाईला खूप राग आला आणि ती मुलीला म्हणाली,

"चल गं आपण निघूया आता उशीर होतोय."

रमाताई राधाला म्हणाल्या,

"कशाला तिला असं बोललीस ज्याचं त्याचं नशीब. काय असतं ना अशा लोकांची नजर लागते."

"आई नजर बीजर काही लागत नाही अशा लोकांना तिथल्या तिथे फटकारले पाहिजे. पुढल्या वेळी बोलताना त्या नक्कीच काळजी घेतील."


(उमाच्या घरची खरेदी तर झाली आता सोहनीकडची खरेदी कशी होते, तिथे मानस येतो का ते पाहूया पुढील भागात)