Login

तिची तपश्चर्या - भाग १७

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग १७

शकुंतला ताई उमाला खरेदीसाठी बोलवणार आहेत. पाहूया पुढे..

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शकुंतला ताईंचा उमाला फोन आला.

"उमा तुला उद्या जमेल ना खरेदीला यायला."

"हो आई मी येईन उद्या. किती वाजता जायचंय आपल्याला?"

"तू अकरा वाजता तयार रहा मी गाडी घेऊनच येते तुला घ्यायला. घरी जेवू नकोस आपण बाहेरच जेऊया."

"बरं"

शकुंतला ताई आणि शीला आल्यावर उमा त्यांच्याबरोबर गेली. आपल्या मुलीचं वैभव बघून रमाताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या श्रीकांत रावांना म्हणाल्या,

"एवढं श्रीमंत खानदानी घर आपल्याला पुढे झेपेल ना सर्व. वर्षभर लेकीचे सर्व सण माहेरी साजरे करायचे असतात. प्रत्येक सणाला लेकीला फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यायला लागेल. आपल्या दोन्ही लेकी थोर नशीब घेऊन जन्माला आल्या आहेत. सोहनी कुटुंबाला आपल्याकडून कशाचीच अपेक्षा नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे."

"रमा तू आत्तापासून काळजी करू नकोस. 'तो' आहे ना आपल्याला सांभाळून घ्यायला. आपण आपल्याला जमेल तसं सर्व करायचं. मला खात्री आहे सोहोनी कुटुंब कसलाही रागलोभ धरून ठेवणार नाहीत."

शकुंतला ताईनी एका मोठ्या साडीच्या शोरूम समोर गाडी पार्क करायला सांगितली आणि त्या तिघी आत मध्ये गेल्या. ही शोरूम तर साखरपुड्याच्या खरेदीला गेलो होतो त्यापेक्षा भव्य दिव्य होती. एकूण तीन मजले होते. सेल्समन ने त्यांना कशा प्रकारची साडी हवी आहे ते विचारून त्यांना वरच्या मजल्यावर जायला सांगितले. त्याने त्यांना लिफ्ट पर्यंत सोडलं. तिकडच्या साड्या बघून तर उमाला खूपच भारी वाटलं. सिनेमामध्ये नायिका जश्या साड्या नेसतात त्या प्रकारच्या सगळ्या भारी भारी साड्या तिकडे होत्या. उमा एकदम बावरून गेली. तिला बघून शकुंतला ताई म्हणाल्या,

"अगं उमा तू काळजी करू नकोस आम्ही आहोत ना. तुला साड्या सिलेक्ट करायला आम्ही मदतच करू. तुला आवडतील त्या दहा-पंधरा साड्या बाजूला काढ. त्याच्यातल्या आपण ८-१० घेऊया." आकडा ऐकूनच उमाचे डोळे विस्फारले गेले.

"अहो आई एवढ्या साड्या काय करायच्या आहेत. त्याच साड्या मी आलटून पालटून नेसत जाईन ना. राधा ताईच्या लग्नाच्या आधी ती आणि मी आमचे कॉमन ड्रेस होते. मी तेव्हा तिच्या एवढी उंच झाले होते.‌ शिवाय आम्ही काय आयडिया करायचो माहितीये का एका सलवारवर दोन टॉप शिवून घ्यायचो. त्यामुळे बघणाऱ्याला ते दोन ड्रेस आहेत असं वाटायचं. सगळ्यांचं लक्ष आहे कुर्त्याकडेच असतं सलवार कडे कोणीच बघत नाही. इतकंच काय आम्ही कानातले, चप्पल, बांगड्या हे सुद्धा एकमेकांचे वापरायचो." शकुंतला ताईंना उमाच्या भोळेपणाचं कौतुकच वाटत होतं. त्या हसत हसत तिला म्हणाल्या,

"अगं वेडाबाई आता तुला मी सांगेन तसं कर बाकी मी बघेन. आम्ही आमच्यासाठी पण साड्या घेणार आहोत. तुला कुठच्या आवडतात त्या तू बघ."

सगळ्याच साड्या इतक्या सुंदर होत्या की उमाला वाटलं आपण डोळे बंद करूनच साड्यांची निवड करावी. एक क्षणभर तिने डोळे बंद पण केले. तिला असं वाटलं कुठेतरी लपून मानस तिला खुणवतोय ही साडी घे ती साडी घे. तिने डोळे उघडून पाहिलं तर कोणीच नव्हतं तिथे. तिच्या मनात आलं घरी आपल्याकडे किती ठराविक आणि सर्वसाधारण साड्या आहेत. ड्रेस पण असेच साधेसुधे आहेत. एवढ्या महागाच्या साड्या आपल्याला मिरवायला जमलं पण पाहिजे. खरंतर उमाला सगळ्या नावीन्यपूर्ण गोष्टींची आवड होती परंतु तिने त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी तडजोड केली होती. कधीही हट्टीपणा केला नाही. सगळ्यांच्या पसंतीच्या साड्या घेतल्यावर त्या सोनाराच्या दुकानात गेल्या.

तिकडे त्यांनी उमासाठी एक आधुनिक पद्धतीचं मोठं मंगळसूत्र घेतलं आणि नेहमी घालण्यासाठी एक छोटं मंगळसूत्र घेतलं. पसंती उमाचीच होती. त्यानंतर त्या पाटल्या बांगड्या या सेक्शन कडे गेल्या. उमासाठी त्यांनी आधी चार बांगड्या घेतल्या. कंगन दाखवायला सांगितले. उमाला कळेचना आपण काय म्हणावं. ती म्हणाली,

"आई मला एवढे दागिने घालायची सवय नाहीये. चार बांगड्या खूप झाल्या." उमाताई तिला हसून म्हणाल्या,

"अगदी वेडाबाई आहेस तू. अगं तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती तर जेवढं मिळतंय तेवढं घेत बसली असती. उलट जास्तीत जास्त महागाच्या वस्तू कशा घ्याव्या ह्याचा तिने विचार केला असता.‌ खरंच तू इतकी साधी सरळ आहेस ना म्हणूनच मला खूप आवडतेस. कोणते कंगन आवडतात ते बघ मग आपल्याला तुझ्यासाठी पाटल्या पण घ्यायच्या आहेत."

उमाची खरेदी झाल्यावर शकुंतला ताईंनी श्रीकांत रावांसाठी सुद्धा एक सोन्याची चेन घेतली. राधा आणि तिच्या मिस्टरांसाठी अंगठी घेतली. रमाताईंच्या हातात त्यांनी फक्त दोनच बांगड्या पाहिल्या होत्या त्याचवेळी त्यांनी ठरवलं होतं की लग्नाच्या वेळी ह्यांना आपण पाटल्या द्यायच्या. त्याप्रमाणे त्यांच्यासाठी त्यांनी पाटल्या घेतल्या. त्यांच्याकडे जशी पैशांची श्रीमंती होती तशी मनाची श्रीमंती पण होती. खरेदी झाल्यावर हॉटेलमध्ये नाश्ता झाल्यावर त्यांनी उमाला घरी सोडायचं ठरवलं. उमा गाडीतून उतरल्यावर त्या तिला म्हणाल्या,

"आता लग्न खूपच जवळ आलं आहे पुन्हा एकदा मानस बरोबर कुठेतरी फिरायला जाऊन ये म्हणजे त्याची तुझ्याशी अजून जास्त ओळख होईल. मी मानसला सांगते तसं."

"आई तुम्ही म्हणाल तसं. आणि हो माझ्या आईने सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या घरी लोणचं, पापड, कुरडया काहीही करू नका माझी आई सर्व तुम्हाला देणार आहे. त्यानिमित्ताने माझ्या आईच्या हातच्या पदार्थांची चव तुम्हाला आणि इतर पाहुण्यांना चाखायला मिळेल."

"आईला कशाला उगाच त्रास इथे बाजारात सर्व मिळतं.'

"बाजारातलं आणि घरातलं यात फरक आहे ना आई. माझ्या आईला खूप आवड आहे असं सर्वांना द्यायची. तिला पण थोडं समाधान मिळेल ना. चला ना तुम्ही घरात. मी थोडं लिंबाचे सरबत करते पटकन."

"नको आता उशीर होईल आम्ही निघतो आता."

घरात शिरताना उमाच्या मनात येत होतं सर्व खरेदी तर आपल्याला खूपच आवडली आहे. याही पेक्षा तिला जास्त आवडलं ते शकुंतला ताईंचं निघतानाच वाक्य. मानसबरोवर पुन्हा एकदा फिरायला जायला मिळणार या कल्पनेनेच ती खुश झाली. तिला मानसच्या जास्तीत जास्त सहवासात राहायचं होतं, त्याला जाणून घ्यायचं होतं.

(मानस आणि उमाची पुन्हा भेट होईल तेव्हा काय घडेल पाहूया पुढील भागात)