तिची तपश्चर्या - भाग १८
दोन्ही घरची लग्नाची जय्यत खरेदी झाली आहे. मानस पुन्हा उमाला भेटायला तयार होईल का पाहूया पुढे..
खरेदी झाल्यावर उमाच्या मनात येत होतं बापरे फक्त आपल्या एकटीच्या साड्या आणि दागिन्यांवर कितीतरी लाखांच्यावर खर्च झाला आहे. सगळी खरेदी खूपच छान झाली होती. कुठेतरी उमाला वाटत होतं की मानस पण खरेदीला आला असता तर साड्या खरेदी करताना आपण हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला साडी कशी आहे हे विचारलं असतं. आपल्या खरेदीवर त्याचं शिक्कामोर्तब झालं असतं तर खूप बरं झालं असतं. खरं तर एरवी लग्नाची खरेदी करताना नवरा नवरी एकत्र जातात खरेदीला. पुरुषांना वाटत असतं की आपल्या पसंतीची साडी किंवा दागिने आपल्या बायकोने घ्यावे. पण इथे तर सगळा मामलाच वेगळा होता. ठीक आहे बच्चू एक दिवस असा येईलच की तू स्वतःहूनच माझ्याबरोबर खरेदीला येशील. त्या दिवसाची मी वाट नक्कीच पाहीन.
इथे रात्री फॅक्टरीतून आल्यावर मानस शकुंतला ताईंना म्हणाला,
"आई आज दमलेली दिसतेस. सुनबाईंनी तुझ्याकडून बरीच खरेदी वसूल केली की काय."
"छे रे ती तर बिचारी काय घ्यायलाच तयार नाही. तीला हे घे ते घे सारखा आग्रह करायला लागत होता. उमा एवढी नक्षत्रासारखी आहे की ती साध्या कपड्यात सुद्धा खूप सुंदर दिसते."
"सुनबाईवर तू जास्तच भाळलेली दिसतेस आई "
"तू नजर लावू नकोस मला आणि सुनबाईला. ऐक मानस आता लग्नाला अगदीच कमी दिवस राहिले आहेत. एक दिवस वेळ काढून पुन्हा उमा बरोबर कुठेतरी फिरून ये. हेच तर दिवस असतात रे एकमेकांना जाणून घेण्याचे. लग्न झाल्यावर कोण कोणाला सांगायला येणार नाही तू फिरायला जा ते तुमचं तुम्ही ठरवा नंतर काय करायचं ते."
"आई सध्या फॅक्टरीत खूप कामं आहेत गं. मला असा सारखा सारखा वेळ काढता येणार नाही."
"हे बघ मानस कामं तुझ्या पाचवीलाच पुजली आहेत तरी पण तुला उमासाठी थोडा वेळ काढावाच लागेल. कामं तर ३६५ दिवस करायचीच आहेत. लग्न एकदाच होणार आहे."
"अगं लग्नानंतर आम्ही सुट्टीच्या दिवशी जात जाऊ फिरायला बाहेर. तू कशाला काळजी करते."
"ते काही नाही मानस. अरे मुलींना वाटत असतं आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर थोडा वेळ मिळावा. स्पष्ट काही बोलू शकत नाहीत त्या पण त्यांच्या मनात असतं.मला माहिती आहे रे.
"बरं बाई मी काढतो वेळ आणि उमाला तसं कळवतो. आता जेवायला किती वेळ आहे नाहीतर मी रूम मध्ये जाऊन काहीतरी वाचत बसतो."
"तुझ्या बाबांनी आत्ताच खाल्ले आहे तर अर्ध्या तासाने जेवूया चालेल ना तुला."
"हो ठीक आहे मग मी आहे रूममध्ये."
मानस वरती जाऊन पुस्तक उघडतो पण त्याचं वाचनात काही लक्ष लागत नाही. आता उमाला पुन्हा भेटायचं आहे परत एकदा. तिच्याशी आपण सारखं सारखं काय बोलायचं. ती पण स्वतःहून काहीच बोलत नाही. एकंदरीत उमा खूप समंजस आहे. तिच्या आपल्याकडून फार काही अपेक्षा नाहीत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पण ती अगदी हरखून जाते. तशी अल्लडच आहे ती अजून. बघूया भेटू तेव्हा काय सुचेल ते बोलायचं.
दोन दिवसांनी मानस उमाला फोन करतो,
"हॅलो उमा उद्या संध्याकाळी चार वाजता तयार राहशील का. आपण कुठेतरी फिरायला जाऊन येऊ. तुझी काही हरकत नाही ना!" उमा मनात म्हणाली 'नेकी और पूछ पूछ' पण त्याच्याशी बोलताना ती म्हणाली,
"हो माझी काही हरकत नाही मी राहते तयार. उद्या पण तुम्ही आधी घरीच या. चहा घ्या आणि मग आपण जाऊ."
दुसऱ्या दिवशी चार वाजता मानस उमाच्या घरी आला. उमा तयारच होती. आज तीने लेमन कलरच्या कुर्त्यावर मेंदी कलरची नाजूक फुलं असलेला टॉप घातला होता आणि मेंदी कलरची सलवार घातली होती. ती खूपच गोड दिसत होती. दार वाजल्यावर उमाने दार उघडताच पाहिलं तर मानस आला होता. आज त्याने कॉफी ब्राऊन पॅन्ट आणि त्यावर लेमन कलरचं फुल स्लीव्ह्ज टी-शर्ट घातलं होतं. मानस एकदम हिरोच दिसत होता. तो घरात शिरताच उमा काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. मानसने विचारले,
"येऊ ना घरात अशी काय बघत राहिलीस"
"हो हो या ना. मला वाटलं तुमच्या मागे आणि कोणी आले आहे का ते पाहत होते." उमाने स्वतःला सावरून घेतलं.
"अजून कोणी येणार आहे का."
"नाही मला असं वाटलं. आई-बाबांशी बोलत बसा ना. मी चहा आणते."
चहा पिऊन ते दोघं निघाले. उमा म्हणाली,
"आज आपण कुठे चाललो आहोत. अर्थात तुम्ही जिथे नेता ती सर्वच ठिकाणं खूप सुंदर असतात."
"हो ना! आज आपण इथून थोड्या अंतरावर एक गार्डन आहे तिकडे जाऊया. तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, शोभेची झाडं आहेत."
"अच्छा. आज गाणी नाही का लावणार!"
"आज गाणी नको आज तू स्वतःहून माझ्याशी बोल. अरे मी विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं तू देत असतेस."
"बापरे आता आली का पंचाईत"
"काही बोललीस का?"
"नाही म्हणजे एसी थोडा कमी कराल का खूप जास्त गार वाटतंय. बाहेर गारठा आहे ना!"
"ओके करतो."
"तुम्ही लहानपणापासूनच असे अबोल आहात का? आता माझी भावंडं मी बघितलीत ना इतकी मस्ती करत असतात. सारखे काहीतरी विनोद, गप्पागोष्टी चाललेल्या असतात."
"नाही नाही मी काही अबोल नाही. माझी सुद्धा मित्रांमध्ये अशीच मस्ती मजाक चाललेली असते. आपली अजून नीट ओळख झाली नाही ना म्हणून.'
"ओळख होण्यासाठीच तर बोलावं लागतं ना पण."
"अगदी बरोबर शब्दात पकडतेस मला." इतक्यात गाडी चालवताना मानसचं बाहेर लक्ष गेलं. दोन तरुण मुलं आणि मुली एकत्र गप्पा मारत आहेत असंच पाहणाऱ्याला वाटलं असतं. गाडी त्यांच्या अगदी जवळून पास झाली तेव्हा मानसच्या काहीतरी लक्षात आलं. पुढे त्याने गाडी स्लो करून पाहिलं. त्याच्या मनात काय आलं कोणास ठाऊक! त्याने एक सफाईदार यु टर्न घेतला. उमा त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला त्याने यु टर्न का घेतला काहीच समजेना.
(भांबावलेली उमा मानस कडे पाहतच होती. त्याने यु टर्न का घेतला पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे