तिची तपश्चर्या - भाग १९
मानसने यूटर्न का घेतला उमाला कळतच नव्हतं. पाहूया पुढे..
मानसने गाडीला यु टर्न घेऊन ते दोन तरुण आणि तरुणी उभ्या होत्या तिथे येऊन गाडी थांबवली. तो गाडीतून खाली उतरला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ते दोन तरुण त्या दोन तरुणींची छेड काढत होते. त्यातला एकजण एका तरुणीचा हात धरू पाहत होता तेवढ्यात मानस पुढे गेला आणि त्याने त्याची कॉलर धरली. त्याने त्या दोघींना विचारलं,
" तुम्ही यांना ओळखता का? तुम्ही सर्व एकत्र आलात का?"
"नाही आम्ही यांना ओळखत नाही आणि हे आम्हाला दोघींनाच पाहून आमची छेड काढत आहेत."
मानसने ज्याची कॉलर पकडली होती त्याला एक सणसणीत लगावून दिली. इतक्यात दुसरा पुढे आला आणि तो मानसला मागून मारणार इतक्यात मानसने त्याला एक लाथ हाणली. इतक्यात उमा पण खाली उतरली आणि ती भीतीने पाहत राहिली. ते दोघं मिळून मानसला मारायचा प्रयत्न करत होते परंतु मानस एकटाच त्यांना भारी पडत होता. शेवटी मानसने एकाचं बखोटं आणि एकाचा दंड पकडला. दोघेही गयावया करू लागले,
"चूक झाली साहेब आम्हाला सोडा. पुन्हा असं करणार नाही."
"तुम्हाला मुली काय रस्त्यावर पडल्या असं वाटतं का! दिसल्या मुली की छेड काढा. तुमचे आई-वडील तुम्हाला यासाठी मोठे करतात का. जरा आजूबाजूला बघा. समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करा. मुलींची छेड काढायला मर्दानगी लागत नाही आणि माफी माझी नका मागू या दोघींची माफी मागा. खाली वाकून माफी मागा."
दोघे घाबरून एकदमच खाली वाकले आणि म्हणाले,
"ताई आम्हाला माफ करा पुन्हा असं कधीच होणार नाही."
"पुन्हा असं कधीच होणार नाही म्हणजे कोणत्याही मुलीची पुन्हा छेड काढली तर याद राखा. चला पळा इकडना." त्या दोघी मानसला उद्देशून म्हणाल्या,
"दादा आज तुम्ही होतात म्हणून आम्ही वाचलो नाही तर या दोघांनी आमच्याबरोबर काय केलं असतं माहित नाही."
"तुम्ही दोघी होतात ना मग दोघींनी प्रतिकार करायला हवा. हे मुलींची छेड काढणाऱ्या मुलांमध्ये काही दम नसतो. भेकड असतात ते. त्यांना त्यातच त्यांचा पुरुषार्थ वाटतो. तुम्ही मुली घाबरून राहताना म्हणून हे अशा मवाली मुलांचं फावतं. यापुढे प्रतिकार करायला शिका."
"दादा मी खूप घाबरून गेले होते, मला काय करायचं सुचतच नव्हतं."
"एक तर तुम्ही मुलींनी काहीतरी कराटे, जुडो असं शिकायला हवं आणि दुसरं म्हणजे कायम तुमच्याजवळ मिरची पूड ठेवायची. आपला प्रतिकार आपणच करायला हवा. प्रत्येक वेळी कोणी धावून येणार नाही. हल्ली राजरोसपणे हे असं सगळीकडे चाललेलं असतं आणि प्रत्येक जण आपलं काम बरं आणि आपण बरं या वृत्तीचा असतो. रस्त्यावर कुठेही काहीही चाललेलं असलं तरी कोणी वाचवायला येत नाही लक्षात ठेवा."
"दादा खरं आहे तुमचं म्हणणं." त्यातली एक उमाकडे वळून म्हणाली,
"ताई तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला असा जोडीदार मिळाला. आता आम्ही निघतो आणि नमस्कार करून त्या जायला निघाल्या." मानस त्यांना म्हणाला,
" तुम्ही या बाजूला जात होता ना. चला बसा गाडीत मी सोडतो तुम्हाला."
"नको दादा आम्हाला इथे जवळच जायचे आहे आम्ही जाऊ चालत."
"दादा म्हणताय ना मग बसा गाडीत मी सोडतो तुम्हाला. ही उमा पण बरोबर आहे. माझ्याबरोबर तुम्ही सुरक्षित असाल." दोघी गाडीत बसल्या. अजूनही त्या घाबरलेल्या होत्या. थोडे पुढे गेल्यावर त्या मानसला म्हणाल्या,
"दादा इथेच थांबवा गाडी आमचं घर इथून जवळच आहे आम्ही उतरतो." मानसला आणि उमाला नमस्कार करून दोघीही निघून गेल्या. आजच्या प्रसंगावरून उमाला वाचल्याचं आठवलं की मुंबईसारख्या शहरात सुद्धा हल्ली असं काय घडलं तर लोक मोबाईलवर व्हिडिओ करतात पण मदतीला कोणी धावून येत नाही. इतकंच काय तर अपघात झाल्यावर सुद्धा अपघातग्रस्ताला मदत करायला कोणी पुढे सरसावत नाही कारण कोणालाच पोलिसांचा ससेमीरा नको असतो. मानससारखी एखाद दुसरीच व्यक्ती असते. मानसचा राग अजून शांत झाला नव्हता. तो त्रासिक स्वरात उमाला म्हणाला,
"हल्लीच्या मुलांवर सिनेमाचं झापड आहे. सिनेमात जसं दाखवतात तसंच हे अंधानुकरण करत असतात. सिनेमातल्या चांगल्या गोष्टी मात्र कृतीत उतरवत नाहीत."
उमा मानसचे हे रूप पाहून थोडी धास्तावली होती. पण तिच्या मनातला मानस बद्दलचा आदर दुणावलेला होता. स्त्रियांच्या बाबतीत मानस खूपच जागरूक आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. ती त्याला म्हणाली,
"तुमचं हे नवीन रूप पाहून मी खूप भारावून गेले आहे. स्त्रियांबद्दल अशी मतं असलेले पुरुष खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारखे असतात. पण मला त्यावेळी खूप भीती वाटली. ते दोघेजण होते आणि तुम्ही एकटेच होतात. समजा त्यांनी तुम्हाला काय केलं असतं तर!"
"अगं अशावेळी मी हा विचार करत बसत नाही. आणि मुलींसमोर मर्दानगी दाखवणारे हे भेकड असतात. थोडासा मार खाऊन लगेच गर्भगळीत होऊन जातात. हे असे प्रकार पाहून माझ्या मनात एक विचार पक्का झाला आहे. पुढे मागे मी स्त्रियांसाठी जुडो, कराटे ह्याचं प्रशिक्षण देणारं एखादं केंद्र उभं करणार आहे. खरंतर मी मोफत पण सुरू करू शकेन परंतु हल्ली कोणतीही गोष्ट फुकट मिळत असेल तर त्याची काहीच किंमत उरत नाही. लोकं टाईमपास साठी तिकडे येतात."
"हा खूपच चांगला विचार आहे. यात सुद्धा माझी तुम्हाला साथच असेल."
"तुझी नुसती साथ नको आहे तर हे केंद्र तुलाच चालवायचं आहे. याचा सर्व कार्यभार तुलाच सांभाळायचा आहे. प्रशिक्षण देण्यासाठी आपण चांगले प्रशिक्षक नेमायचे बाकी सगळं तू बघायचं."
"हो माझी तयारी आहे. मला पण काहीतरी वेगळं केल्याचं समाधान मिळेल. बरं आपल्याला जिथे जायचं होतं ते ठिकाण आलं का?"
"हो हे काय पाच मिनिटात येईल आता." मानसच्या डोक्यातून मगासचा प्रकार जातच नव्हता. तो उमाला म्हणाला,
"मुली जात्याच भित्र्या असतात आणि असं कोण एकदम समोर आलं ना तर त्या बिचार्या खूपच घाबरून जातात. म्हणूनच त्यांच्यात थोडी हिंमत जागवण्याची गरज आहे. आपण नक्कीच करू काहीतरी."
"हो माझी राधाताई खूप धीट आहे पण मी जरा भित्रीच आहे. माझ्या शेजारून जाताना कोणी काही शेरा मारला तरी मी खूप घाबरते. एकदा असंच मी आणि राधाताई जात होतो आणि एक मुलगा मला काहीतरी बोलला राधाताईने त्याला तिथल्या तिथे थोबाडीत दिली. क्षणभरही न थांबता धूम ठोकली त्याने."
"हल्लीच्या जमान्यात धीट असायलाच पाहिजे. चल हे बघ आलं गार्डन जाऊया आत मध्ये."
(उमा आणि मानस गार्डन मध्ये जातात. काय होतं ते पाहू पुढील भागात )
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा