Login

तिची तपश्चर्या - भाग २०

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग २०

(गार्डन मध्ये आल्यावर स्वप्नाळू उमाला कसा अनुभव येतो पाहू पुढे..)

उमाने आणि मानसने गार्डनमध्ये प्रवेश केला. संध्याकाळची वेळ असल्यामुळे तिथे खूप लहान मुलं, प्रेमी युगुलं, वृद्ध जोडपी असे दिसत होते. उमाने खूपच दिवसांनी एवढी माणसं एका ठिकाणी पाहिली. तेथील वातावरण खूपच विलोभनीय होते. आनंदाने परिपूर्ण वाटत होते. प्रत्येक जण आपापल्या माणसांमध्ये हरवून गेला होता. लहान मुलांचे आई-बाबा त्यांच्या मागे धावत होते. त्यांना तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको, पडशील थांब सारख्या सूचना देत होते. थोडी मोकळी जागा बघून मानस उमाला म्हणाला,

"ये आपण तिथे त्या बेंचवर बसुया. इथून आपल्याला पूर्ण गार्डनचा नजारा दिसेल." उमाला गार्डन मध्ये आल्यावर बेंचवर बसण्यापेक्षा हिरवळीवर बसावं असं मनोमन वाटत होतं. ती मानसला म्हणाली,

"तुम्हाला इथे हिरवळीवर खाली बसायला जमेल का? गार्डन मध्ये आल्यावर इतकी सुंदर हिरवळ असताना आपण बेंचवर बसायला नको." ‌

"हो हो का नाही जमणार! मी अजून म्हातारा झालो नाही खाली न बसता येण्या इतका.' मानस हसला.

"मला असं म्हणायचं नव्हतं हो. ते कपडे खराब व्हायला नको म्हणून मी म्हटलं."

"मी कपड्यांपेक्षा माणसांच्या मनाला जपतो." ‌ ओहो! मानसच्या या वाक्याने उमा एकदम प्रभावीत झाली.

"खूप छान वाक्य आहे वहीमध्ये लिहून ठेवायला हवं" आणि ती पण मिश्किलसं हसली.

बसल्यावर उमा सभोवताली बघू लागली. तिच्यापासून जवळच दोन तीन वर्षाची जुळी भावंड खेळत होती. त्यांच्यात भांडण होऊ नये म्हणून आई-बाबांनी त्यांना सर्वच खेळणी दोन-दोन दिलेली दिसत होती. तरीसुद्धा त्यातलं एक मूल दुसऱ्याच्या हातातला चेंडू घ्यायला त्याच्या मागे धावत होतं. उमाच्या मनात आलं लहान मूल असो अथवा मोठा माणूस, प्रत्येकाला मालकी हक्क लहानपणापासूनच कळतो. त्यांची ती धावपळ खूपच मजेशीर दिसत होती. तिने पाहिलं धावता धावता त्यातलं एक मूल पडलं आणि रडू लागलं इतक्यात दुसरं मुल मागे आलं आणि त्याने पडलेल्या भावंडाला हात दिला. इतक्या लहान वयात भावंडांचं प्रेम पाहून उमा हरखून गेली. तिला ती आणि राधाताई लहान असताना आई-बाबांबरोबर गेल्यावर बागेतला प्रसंग आठवला. त्यावेळी राधा उमा पेक्षा थोडी मोठी होती त्यामुळे ती उमाला खूप सांभाळून घेत होती. सगळीकडे ती तिला हाताला धरून घेऊन जायची. कोणी तिला काय खाऊ दिला तर ती तिच्यातला थोडा खाऊ उमासाठी राखून ठेवायची. त्या दोघींचं कौतुक आई-बाबांच्या नजरेतून ओसंडून वाहायचं. ती कुठेतरी हरवून गेलेली पाहताच मानस तिला म्हणाला,

"अगं उमा कुठे तंद्री लागलीय. बोल माझ्याशी काहीतरी."

"नाही मी त्या दोन लहान मुलांच्या मस्ती कडे बघत होते."

"हो ना लहान मुलं खूपच निरागस असतात. मोठी झाल्यावर त्यांच्यातली ती निरागसता मात्र हरवून जाते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपापसात हेवेदावे, भांडणं, अबोला सुरू होतो. सख्खी भावंडं संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठतात तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं"

"तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. खूप जास्त गरिबी किंवा खूप जास्त श्रीमंती दोन व्यक्तींमध्ये कलह निर्माण करतो."

"माझ्या बाबांच्या बाबतीत असंच झालं होतं. माझ्या आजोबांची आमच्या गावी बरीच एकर जमीन होती. आजोबांचे भाऊ, त्यांची मुलं सर्व मिळून ते पाहत होते. परंतु आजोबा गेल्यानंतर आमच्या चुलत काकांची, त्यांच्या मुलांची नियत फिरली आणि वादविवाद सुरू झाले. माझ्या बाबांनी त्यावर चक्क पाणी सोडलं आणि त्यांना म्हणाले ही सगळी जमीन तुमचीच आहे. ते धोरण माझ्या बाबांनी स्वीकारल्यामुळे आज संबंध जास्त विकोपाला गेले नाहीत. एकमेकांकडे जाणं येणं सुरू आहे."

मानस गप्पा मारत असताना उमाची नजर सभोवताली काय चाललंय सगळं पाहत होती. तिने पाहिलं दूर अंतरावर एक प्रेमी युगुल बसलं होतं. बहुदा त्यातली प्रेयसी थोडी रुसली असं दिसत होतं. प्रियकर तिची मनधरणी करत होता. ती मात्र काय ऐकायलाच तयार नव्हती. प्रियकराने त्याच्या खिशातून एक गुलाब काढून तिच्यासमोर धरल्यावर मात्र तिचा राग कुठल्या कुठे गेला आणि ती खुदकन हसली. उमाच्या मनात आलं काही मुली किती अल्पसंतुष्ट असतात. त्यांना आपल्यावर प्रेम करणाऱ्या कडून मोठमोठ्या भेटींची आवश्यकता नसते. असं एखादं नुसतं सुंदर फुल सुद्धा त्यांच्या मनावर आनंदाचा शिडकावा निर्माण करू शकतं. तिने ते दृश्य मानसला दाखवलं. मानस गालातल्या गालात हसला.

तिने आजूबाजूला पाहिलं तर बरेच लोक गोल करून बसले होते आणि काहीतरी खात होते. त्यांच्यात हास्यविनोद चालला होता. उमाला वाटत होतं की आपण पण इथे बसून काहीतरी खावं. ती मानसला म्हणाली,

"आपण पण भेळ खाऊया का. बागेत येऊन भेळ खात गप्पा मारायला किती मजा येत असेल ना."

"उमा बागेत भेळ खायला खूप छान वाटतं. ‌ पण हे सर्व लोक बागेत भेळ खातात आणि कचरा इथेच टाकून जातात. तिथे ठिकठिकाणी कचऱ्याचे डबे आहेत पण कोणालाही वाटत नाही की आपण भेळीचे कागद आणि इतर कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकावेत. ही बाग प्रशासनाने इतकी सुंदर ठेवली आहे परंतु कोणाला त्याची किंमतच नाही. हे सगळं बघून मला बागेत कधीच काही खावसं वाटत नाही."

"अहो पण आपण खाऊन झाल्यावर आपला कचरा कचराकुंडीत टाकूया. कदाचित आपलं असं कृत्य पाहून इतरांनाही तसं करावसं वाटेल. मी घेऊन येऊ का भेळ."

"तू बस मीच घेऊन येतो. तुला सुकी भेळ आवडते की ओली भेळ आवडते. तिखट की कमी तिखट."

"मला ओली भेळ आणि तिखट आवडते."

"तू बस मी आलोच."

इतक्यात उमाने पाहिलं की सत्तरीच्या आसपासचं एक वृद्ध जोडपं बागेत आलं. त्यांना खाली बसता येणे शक्य नव्हतं म्हणून ते उमाच्या समोरच्याच बेंचवर बसले. आधी आजोबा बसले नंतर त्यांनी आजीला बसताना हात दिला. हे पाहून उमाला वाटलं त्यांच्या सहजीवनाला इतकी वर्ष झाली परंतु त्यांच्यातील प्रेम दिवसागणिक लोणचं मुरावं असं वाढतच गेलं असेल. तरुणपणी कणा ताठ असताना छोटी छोटी भांडणंही झाली असतील, नाही असं नाही, परंतु ती संसारातली गोडी वाढवणारी ठरली असावीत. उमा त्यांच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होती. इतक्यात मानस तिथे आला आणि म्हणाला,

"अगं एवढी टक लावून कुठे पाहत आहेस? तू अगदी कोणत्याही गोष्टीत रमून जातेस."

"ते समोर आजी आणि आजोबा बसले आहेत त्यांना मी बघते आहे. दोघांमध्ये खूपच प्रेम आहे आणि एकमेकांची काळजी घेत आहेत."

"या वयामध्ये इतका समजूतदारपणा येतोच. एक तर दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं शिवाय त्यांना आपल्या सहचाऱ्याची काळजी वाटत असते म्हणून ते एकमेकांना सांभाळून घेतात. हल्ली बऱ्याच वेळा या वयामधील जोडप्यांची मुलं परदेशात किंवा इथेच असली तरी स्वतंत्र राहतात."

"होय खरं आहे. या वयात मुलांनी आपल्या आई-बाबांजवळ रहावं असं माझं प्रामाणिक मत आहे कारण आत्ताच त्यांना प्रेमाची आणि आधाराची खूप गरज असते."

"खरं आहे तुझं. चल ही घे भेळ. भेळ खाऊन झाली की आपण निघूया. वाटेत कुठेतरी जेवूया आणि मग घरी जाऊया."

(उमा आणि मानस भेळ खात आहेत पाहूया पुढे काय होतं ते पुढील भागात)

क्रमशः