Login

तिची तपश्चर्या - भाग २१

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग २१

भेळ खाता खाता उमा इकडेतिकडे बघत स्वतःचे मनोरंजन करून घेत होती आता पुढे..

उमा कॉलेजमध्ये असताना मैत्रिणींबरोबर अशी ओली भेळ तिने खाल्ली होती. त्यानंतर विकतची वेळ कधी खाल्ली नव्हती. घरी कधी कधी ते भेळ करत असत पण त्याला अशी चमचमीत चव नसायची. कधी कधी घरात फक्त कुरमुरेच असायचे. अशावेळी कुरमुऱ्यांनाच फोडणी देऊन हे सर्वजण भेळ समजून खाण्यात आनंद मानायचे. आजी आजोबांकडे बघत उमा स्वतःशीच ‌बोलली,

"सहजीवनाची यांनी ४०च्या वर वर्ष नक्कीच काढली असतील. आपल्या आई-बाबांना तर आपण सतत एकत्र पाहिलेलं आहे. त्यांच्यातलं प्रेम, त्यांच्या जीवनातले चढ-उतार, लुटूपुटूची भांडणं सगळंच खूप खरं होतं."

इतक्यात उमाने पाहिलं तर आजीने पिशवीतून एक डबा काढला होता. त्यांनी बहुतेक घरूनच बागेत खाण्यासाठी काहीतरी आणलं होतं. आजी डबा उघडण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांच्याच्याने डबा काही उघडला गेला नाही. नंतर त्यांनी आजोबांकडे डबा दिला परंतु त्यांनाही उघडायला जमेना. उमा मानसला म्हणाली,

"चला ना आपण त्यांना डबा उघडून देऊया. त्या निमित्ताने आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल."

ते दोघही आजी आजोबांजवळ आले. मानस आजोबांना म्हणाला,

"द्या आजोबा मी तुम्हाला डबा उघडून देतो, पण एका अटीवर. डब्यात जो खाऊ आहे तो आम्हाला पण द्यायचा बरं का."

"अरे हो हो नक्कीच. आम्हाला तर असं इतरांना देऊन खाण्यातच आनंद वाटतो. काय सांगू हिची नेहमीचीच सवय डब्याचे झाकण लावायचं आणि त्यावरून जोरात थाप मारायची त्यामुळे डबा उघडता उघडत नाही."

मानस आजोबांकडून डबा घेऊन उघडून पाहतो तर काय! त्यात सुंदर थालीपीठं दिसतात. घरी केलेल्या थालीपीठांचा सुगंध तो श्वासात भरून घेतो. आजी आजोबांकडून डबा घेऊन दोघांना एक एक थालीपीठ देते,

"हे घे बाळा डबा उघडण्याचं तुझं बक्षीस. हे तुला घे. तुमचं दोघांचं लग्न ठरलंय वाटतं." असं म्हटल्यावर उमा लाजली.

"अगं लाजतेस काय. ‌ दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसतोय. आमची सून पण तुझ्याच एवढी असेल. आमचा मुलगा नोकरी निमित्ताने दुसऱ्या शहरात राहतो."

"अगं मालती पहिल्याच भेटीत मुलांना तू आपलं रडगाणं सांगणार आहेस का. मुलांनो असं काही नाही बरं का. आम्ही खूप दोघं आनंदात राहतो. आम्हाला दोघांनाही चांगलं पेन्शन येतं. आम्ही कधी कुठे फिरायला जातो. कधी नाटक सिनेमाला जातो. आमचं एक ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे. तिथे आम्ही जाऊन इतर सभासदांना भेटतो. तुम्ही दोघे पण एकमेकांची साथ कधीच सोडू नका बरं. कधी आहे तुमचं लग्न?" त्यांचं बोलणं ऐकून उमाला खूपच वाईट वाटलं. ती म्हणाली,

"आजोबा आमचं लग्न आता चार दिवसांवर आले आहे. आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे. तुम्ही इथे नेहमी येता का. आम्ही तुम्हाला येऊन नक्कीच भेटू." उमा त्यांना नमस्कार करायला वाकल्यावर मानस सुद्धा नमस्कार करू लागला तेव्हा आजी आजोबा दोघे एकदम बोलले,

"बाळा अखंड सौभाग्यवती भव! बाळांनो तुम्ही सदैव सुखी रहा. आई-बाबांची काळजी घ्या. त्यांना कधीच अंतर देऊ नका. मुली तुझं लग्न झालं तरी तू माहेरी तुझ्या आई बाबांची नीट काळजी घे. आणि तू पण तिला साथ दे बरं."

"येतो आता आम्ही. तुम्ही पण काळजी घ्या तुमची."

उमा आणि मानस दोघंही परतीच्या प्रवासाला लागले. गाडीत दोघेही गप्प गप्पच होते. थोड्या वेळाने उमा म्हणाली,

"मला आजी आजोबांचं खूप वाईट वाटलं. आजींना आपल्याला अजून काहीतरी सांगायचं होतं पण आजोबांनी सांभाळून घेतलं."

"हो ना खरं आहे. आजोबांना वाटलं असेल की आपण त्यांना पहिल्यांदाच भेटलो. आपल्यासमोर त्यांनी त्यांच्या घरातल्या गोष्टी बोलायला नको. पण माझं असं प्रामाणिक मत आहे की मुलांनी या वयात आपल्या आई-बाबांची काळजी घ्यायलाच हवी. मुलांना लहानाचं मोठं करताना आई-बाबा किती त्रास सहन करतात हे खरं तर मुलांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं तरीसुद्धा ते असं कसं वागू शकतात."

"खरं आहे तुमचं. आपल्याला आपल्या वैवाहिक आयुष्याच्या सुरुवातीलाच एक खूप मोठा धडा मिळाला आहे. अर्थात आपण असं कधी वागणार नाही याची मला खात्री आहे."

"अशी मुलं खूप व्यावहारिक असतात. त्यांना फक्त स्वतःची प्रगती करायची असते. अधिक सुखाच्या मागे लागतात आणि असे निर्णय घेतात."

"मला मनापासून वाटतंय की आपण अधून मधून येऊन त्यांना भेटायला हवं. तेवढीच त्यांच्या दुःखावर फुंकर मारली जाईल."

"आपण नक्की जाऊया. तू आता जास्त विचार करू नको. बरं आता आपण बाहेर जाऊन जेवूया ना की असंच घरी जायचंय." उमाचा खरं तर जेवणाचा मूड नव्हता परंतु असंच घरी गेलो आणि घरी जेवलो तर आई-बाबांच्या मनात नसत्या शंका येतील. म्हणून ती म्हणाली,

"आता जेवायची इच्छा नाहीये परंतु असंच घरी गेलं तर उगाच आई-बाबा काळजी करत बसतील." ‌

रस्त्यात एका हॉटेलमध्ये साधसंच जेवून ते घरी जायला निघाले. जसं उमाच घर जवळ आलं मानस तिला म्हणाला,

"उमा तुझा निर्णय पक्का झालाय ना."

"हो अगदीच पक्का झाला आहे. आता मधून मधून त्या आजी आजोबांना भेटायला जायचंच." उमा अगदी
भाबडेपणाने म्हणाली.

"अगं मी त्याबद्दल नाही बोलत. तुझा माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय पक्का झालाय ना. आता इतके दिवस आपण कधीतरीच भेटायचो. माझ्या आईला सुद्धा तू खरेदीसाठी भेटायचीस. लग्नानंतर तुला चोवीस तास आमच्या सर्वांबरोबरच घालवायचे आहेत. तेव्हा तुला सहजगत्या वावरायला जमलं पाहिजे. कोणी आलं गेलं तर ते काही बाही विचारतील त्यांना तोंड द्यायला जमलं पाहिजे. अर्थात तुझ्यात समजंसपणा आहेच. तू पुन्हा एकदा नीट सगळ्या गोष्टींचा विचार कर. अजून आपलं लग्न झालं नाही. तू कोणताही निर्णय घ्यायला मोकळी आहेस. लोक काय चार दिवस बोलतात नंतर गप्प होऊन जातात."

"तुम्ही काळजी करू नका मी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच निर्णय घेतला आहे. ‌ एकदा घेतलेला निर्णय मी शक्यतो बदलत नाही."

"माझी काही हरकत नाही. फक्त तुला वास्तवाची जाणीव करून दिली. आता तीन दिवसानंतर आपलं लग्न आहे. लग्नातच भेटूया आपण."

उमाचं घर आल्यावर मानसने गाडी थांबवली. उमा बाय करून घरात गेली. मानस मनाशी म्हणत होता ही मुलगी खूप वेगळीच आहे. मी हिला सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना दिली आहे पण तरी ती आपल्या निर्णयावर ठाम आहे.

(तीन दिवसांनी उमा आणि मानसचं लग्न होणार आहे. पुढे काय होतं पाहूया पुढील भागात)