Login

तिची तपश्चर्या - भाग २२

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग २२

ठरल्याप्रमाणे उमाचा मेंदीचा कार्यक्रम कसा पार पडतो पाहूया पुढे..

मानसला बाय करून उमा घरात शिरताना विचार करत होती हा वाटतो तेवढा रुक्ष नाही सर्वांचीच किती काळजी घेतो. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून तो मला सारखं जागृत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता माझा निर्णय ठाम आहे. ती घरात आली तेव्हा आई पापडाचे पीठ मळत होती.

"अग आई आता लग्न दोन-तीन दिवसावर आले आणि आता तू अजून पापड करत बसणार आहेस का?"

"अगं हा एक नवीन प्रकार आहे तुझ्या रुखवतात ठेवायला मी करते आहे. याच्यात मी तीन रंग वापरले आहेत. हे लाटून झाले की तीन रंगांचे दिसतील. तळल्यावर तर खूपच आकर्षक दिसतात."

"बरं आता हे सर्व करून तू जास्त दमू नकोस. नाहीतर नेमकी लग्नाच्या वेळेस दमलेली भागलेली दिसशील."

"आता मला तूच दमलेली दिसते आहेस. हात पाय धुवून झोप आता."

"दोघीही थकल्या आहात. चला आता सगळ्यांनी झोपा." श्रीकांत राव काळजीने म्हणाले.

उमा झोपायला गेली. झोप येईपर्यंत तिच्या मनात
अनेक विचार येत होते. आता उद्या आपली मेंदी आहे. सुलभा खूप छान मेंदी काढते. ती सकाळी अकरा वाजता येणार आहे तोपर्यंत आपल्याला सर्व आवरून घ्यायला हवं. उद्यापासून घरात लगबग असेल. मावशी, मामा, राधाताई, आपल्या मैत्रिणी सगळेच घरात असतील. आपल्या चेहऱ्यावर सगळ्यांना तसेच आनंदाचे भाव दिसले पाहिजेत.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून उमा आणि रमाताईंची लगबग सुरू होती. मेंदीचे कोन उमाने आदल्या दिवशीच आणून ठेवले होते. राधाताई आणि भाऊजी सुद्धा आले होते. हळूहळू सगळे यायला सुरुवात होईल. या दोघींना सगळं आवरून घ्यायला हवं होतं. इतक्यात श्रीकांत रावांनी उमाला हाक मारली,

"अगं उमा थोडा चहा टाकतेस का. तुझ्या हातचा आलं घातलेला वाफाळता चहा प्यायला की मनाला अगदी प्रसन्न वाटतं. अरे बापरे! बघितलंस रमा नेहमीप्रमाणे मी उमालाच सांगितलं. आज उमाची मेंदी आहे ना, लक्षातच आलं नाही माझ्या. तूच टाक बरं जरा."

"हो हो करते चहा. मला पण चहाची आवश्यकता आहेच. थोडी तरतरी येईल."

उमाचे बाबा श्रीकांतराव आणि आई रमाताई खूपच भावविवश झाले होते. दोन दिवसांवर उमाचं लग्न येऊन ठेपलं होतं आणि आणि उमा लग्न होऊन सासरी गेल्यानंतर ते दोघेच या घरात राहणार होते या विचाराने त्यांच्या मनात खूपच कालवाकालव होत होती. त्यांच्या एका डोळ्यात आपल्या मुलीला सुखवस्तु सासर मिळालं म्हणून खूप आनंद तर लेक सासरी जाणार म्हणून खूपच वाईट वाटत होतं. थोड्या वेळातच मेंदीसाठी सगळ्याजणींची गर्दी जमली. जमलेल्या उमाच्या मैत्रिणी, बहिणी यांचे हास्यविनोद चालले होते. एकमेकींची मस्करी करत करत मेंदी लावणं सुरू होतं. सर्वजणी उमाला खूप छेडत होत्या. त्यातली माधवी म्हणाली,

"उमा मेंदी खूप रंगली ना तर म्हणतात नवऱ्याचं बायकोवर खूप प्रेम असतं. बघूया आता तुझी मेंदी किती रंगते."

"ए उमाचा नवरा खूपच हँडसम आहे बरं. उमा सारख्या नाजूक साजूक मुग्ध रातराणीच्या कलीके समान असणाऱ्या उमावर त्याचं मनापासून खूप प्रेम असणारच. बघ ना आताच मेंदीचा रंग किती चढायला लागला आहे."

"अगं तुम्हाला माहिती आहे का आता आपली उमा
चारचाकी मधून फिरणार. ए आम्हाला बघून गाडी थांबवशील ना."

"उमाच्या होणाऱ्या नवऱ्याला मी पाहिलं आहे बरं‌‌ का. खूपच देखणे आहेत ते. आमच्या घराच्या जवळच राहतात ते. म्हणजेच आता उमा सुद्धा मला वरचेवर भेटत जाईल."

"ए उमा तू पण काहीतरी बोल ना. आम्ही आपल्या नुसत्याच सगळ्याजणी बडबड करतोय. तू नुसतीच लाजते आहेस."

सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. सगळेजण चेष्टा मस्करी करत होते, हसत होते. उमा फक्त लाजण्याचा अविर्भाव करत होती. खरंतर तिच्या मनात विचारांचे काहूर उठले होते,जे ती कोणालाच सांगू शकत नव्हती. तिच्या मनातलं भावनांचं वादळ शमता शमत नव्हतं आणि तरी तिला ती लाजत असल्याची, आनंदी असल्याची एक्टिंग करावी लागत होती. काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली,

"अगं मेंदी रंगण्याचं एवढं काय मोठं. हल्ली मेंदी सुद्धा किती आधुनिक झाली पाहिलं ना तुम्ही. कोणी साखर पाणी लावतं, कोण निलगिरी तेल लावतं. मेंदीचा कोन बनवताना पण किती रसायनं मिसळून मेंदी बनवतात. तुम्हाला आठवतं का आपण लहान असताना तर कुंपणावरच्या मेंदीच्या झुडपांची पाने आणून पाटावरवंट्यावर बारीक वाटायचो किंवा दगडाने लादीवर वाटायचो. तेव्हा आपल्या सगळ्यांचा समज होता मेंदीचा छान रंग येण्यासाठी कात किंवा चिमणीचा शी घालायचा. आपण कुठे कुठे जाऊन चिमणीचा शी शोधून घेऊन यायचो." सगळ्या हसायला लागल्या.

"हो हो मग त्यात सुद्धा किती मजा यायची ना." माधवीलाही बालपण आठवलं.

"आणि ती बारीक वाटलेली मेंदी पूर्ण हातभर लावून, बहुधा आपण रात्रीच लावायचो. मूठ बंद करून जुन्या कपड्याने बांधून ठेवायचो आणि सकाळी उठल्यावर मेंदी किती रंगली आहे ते पाहायचं. मेंदीला खूप छान लाल रंग चढलेला असायचा आणि हाताची मूठ आवळल्यामुळे हातावरच्या रेषांच्या भाग पांढरा फाटक असायचा." उषा पण त्यात रंगून गेली. त्या दोघींना दुजारा देत विभा म्हणाली,

"त्यानंतर काही वर्षांनी मेंदीची पावडर आली. ती आपण पाण्यात भिजवून आगपेटीच्या काडीने किंवा खराट्याच्या काडीने नक्षी काढायला लागलो आणि आता हे सर्वात लेटेस्ट कोनची मेंदी आली."

मैत्रिणींमध्ये रंगलेली उमा म्हणाली,

"अगं आणि जिच्या अंगात उष्णता जास्त असते तिच्या हातावरची मेंदी जास्त रंगते. पण आपण मेंदीच्या रंगण्याचा आणि नवऱ्याच्या प्रेमाचा संबंध जोडतो. तसंच जिच्या केसातील गजरा सकाळी घातलेला संध्याकाळपर्यंत तसाच राहतो तिच्यावर म्हणे सासूचं जास्त प्रेम असतं. आणि तो लवकर कोमेजला तर प्रेम कमी असतं. सगळे आपल्या मनाच्या समाधानासाठी असलेले खेळ दुसरं काय. ‌ ए तुम्ही सर्वांनी पण तुमच्या हातावर छान मेंदी काढा."

"उमा थांब तुझ्या हातावर मानसरावांचे नाव कोरते त्यांना शोधायला सांगायचं बरं का."

"अग आता तिच्या हृदयावर त्यांचंच नाव कोरले आहे म्हणजे हातावरचं नाव ते नक्कीच शोधतील." ऐकून सगळ्यां जणी हसायलाच लागल्या. इतक्यात सर्वांसाठी सरबत घेऊन रमाताई आल्या. त्या म्हणाल्या,

"अगं पोरींनो आता सरबत घ्या. दोन दिवस हुशारी वाटायला हवी तुम्हाला."

"काकू आता तुम्ही बसा तुमच्या हातावर मी मेंदी काढते."

"नाही अगं आता माझ्या हातावर मेंदी काढून घरातली कामं कोण करणार! मी आपली रात्रीच लावेन शास्त्रापुरती."

सर्वजणी मेंदी काढून झाल्यावर हसत खेळत जेवण
आटोपून आपापल्या घरी गेल्या उद्या सकाळी लवकर येण्याचा वादा करून.


(उमाची मेंदी किती रंगते पाहूया पुढील भागात)