Login

तिची तपश्चर्या - भाग - २३

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग २३

तळ हातावरल्या मेंदीकडे पाहत उमा मनोमन खुश झाली. मेंदीला खूप सुंदर रंग आला होता आता पाहूया पुढे..

सकाळी उठल्या उठल्या राधाताईने उमाचे हात हातात घेतले,

"अगं उमे कसली भारी रंगली आहे तुझी मेंदी. जरा जास्तच भरली आहे तुझी प्रेमाची घागर असे दिसते. तू आहेसच गं तशी सर्वांनी प्रेम करण्यासारखी."

"ताई तुझं आपलं काहीतरीच. तुला तर माहितीये ना लहानपणापासूनच माझी मेंदी खूप छान रंगते."

"बरं चल आता आवरून घेऊया आज तुझी हळद आहे. आपल्या आईने बाजारची हळद विकत न आणता हळकुंड भिजत घातली आणि मग ती दोघी तिघींनी उखळीत छान मऊसूत कुटली आहेत. त्यामुळे हळदीचा सुवास घरभर दरवळतोय." उमाने ऐकलं होतं की हल्ली बऱ्याच मुली हळदीची ॲलर्जी होते, मेकअप नीट बसत नाही म्हणून खरी हळद शास्त्र पुरती लावून विको टरमेरीक वगैरे असं काहीतरी क्रीम लावतात. तिच्या मनात आलं ह्या ज्या आपल्या पारंपरिक रूढी, पद्धती आहेत यात खरा निखळ आनंद आहे. बाजारचं क्रीम लावून नवऱ्या मुलीला हळद लावण्याचे समाधान कसं काय मिळत असेल देव जाणे. ती राधाला म्हणाली,

"ताई आपल्याकडची हळद लावून झाली की नवऱ्याकडची पण उष्टी हळद येईल ना."

"अरे बापरे किती घाई झाली गं तुला. आधी आपली हळद तरी लावून होऊ दे. थांब जरा. अगं त्या शरदला मी आंब्याचे टाळं आणायला सांगितले होते. बघून येते त्याने आणले की नाही. दारासमोर मांडव घातलाय तिथे लावलंच आहे आणि घराच्या दाराला पण लावलं आहे पण आता हळदीसाठी लागेल ना."

कर्णिकांनी घरासमोरच मेंदी आणि हळदीसाठी एक छोटा मांडव घातला होता. तिथे खुर्च्यांची व्यवस्था केली होती. हळदीसाठी आलेले नातेवाईक, उमाच्या मैत्रिणी बाहेरच खुर्च्यांवर बसल्या होत्या. गुरुजींनी हळदीचा मुहूर्त काढला होता त्याप्रमाणे हळद लावायला सुरुवात झाली होती. घरी आलेल्या काही जणी जुन्या पिढीतील असल्यामुळे सगळं अगदी पारंपारिक पद्धतीने चाललं होतं. सभोवताली बरीच झाडं असल्यामुळे वातावरण खूपच छान वाटत होतं.

हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्याच लगबगीने घरात गेल्या. रांगोळी काढून पाट मांडला होता त्यावर उमा हळदी साठी घेतलेली साडी नेसून बसली होती. उमाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकत होतं. हळद कुंकू लावून सवाष्णींनींनी उमाला हळद लावायला सुरुवात केली. आंब्याच्या पानाने हळद चढवली जात होती. म्हणजे पायापासून सुरुवात करून हळद वरवर आणली जात होती. घरीच हळद कुटल्यामुळे एक प्रकारचा सुगंध येत होता. उमाला हळद लावता लावता इतर स्त्रिया एकमेकीना हळद लावू लागल्या. जी कोणी नको म्हणेल तिला उलट जास्तच हळद लावली जात होती. पारंपारिक हळदीची गाणी जमलेल्यांपैकी जुन्याजाणत्या स्त्रिया म्हणत होत्या. एक आगळंवेगळं लग्नघराचं वातावरण तयार झालं होतं.

राधाताई उमाला हळद लावायला आली तेव्हा तिचेही डोळे पाणवले होते. उमा असताना तिला खात्री होती की आई-बाबांना तिचा आधार आहे पण आता उमापण लग्न करून सासरी गेली की आई बाबा एकटेच राहतील. काय करणार! शेवटी जगराहाटीच आहे. म्हणूनच तर मुलीला परक्याचं धन म्हणतात ना. बाबांनी पण उमाला हळद लावली आणि त्यांना एकदम हुंदका झाला. उमा त्यांना म्हणाली,

"बाबा तुम्ही रडू नका तुम्हाला त्रास होईल. माझं सासर गावातच आहे. मी नेहमी येत जाईन. कधी तुम्ही आणि आई पण माझ्या सासरी येऊ शकता.‌ तुम्ही तुमची आणि आईची काळजी घ्यायची."

बाबांचं सांत्वन तर उमाने केलं पण तिच्या मनात आलं. याच घरात आपण लहानाचे मोठे झालो इथेच आपण खेळलो, उड्या मारल्या, पडलो. खेळताना भांडणं झाली. कट्टी बट्टी सगळ्याचा अनुभव आपण इकडेच घेतला. लहानपणचे जीवन किती निरागस होतं. आज हे 'आपलं घर' आहे. आपण हक्काने याला आपलं म्हणू शकतो. लग्न होऊन सासरी गेल्यावर हेच घर आपल्यासाठी 'माहेर' असेल. आपल्या माहेरी फक्त आई-बाबा असतील त्यामुळे आपल्याला इथे कोणाचेच कधी काहीही ऐकून घ्यावं लागणार नाही. पण ज्यांच्या माहेरी दादा वहिनी, काका काकू असतात तिथे जर ती नाती मनाने जोडली गेलेली नसतील तर माहेरी आलेल्या मुलीला कुचकट बोलणे, टोमणे ऐकावे लागतात. त्या मुलीला सासरी पण मोकळेपणाने जगता येत नाही आणि माहेरी सुद्धा 'आपलेच दात आणि आपलेच ओठ' असं होऊन जातं. अशातच त्या मुलीला जेव्हा जीवन असह्य होतं तेव्हा ती आत्महत्येचा मार्ग चोखाळते. आपण त्या बाबतीत खूप नशीबवान आहोत. आपलं सासर सुद्धा सर्वच बाबतीत खूप सरस आहे.

उद्या लग्न होऊन सासरी गेल्यावर सासर हेच आपलं घर असणार आहे. आपण खूप नशीबवान आहोत आपल्या सासरी सगळेच माणसं खूप स्वभावाने चांगले आहेत. ते सर्व आपल्याला नक्कीच सांभाळून घेतील. काही मुलींना माहेरी पण त्रास सहन करावा लागतो सासरी तर अगदी खऱ्या अर्थाने जाच होतो. अशा मुलींचं जीवन म्हणजे त्यांना नरकासमान वाटतं. उमाच्या मनात असे सर्व विचार चाललेले असतानाच कोणीतरी म्हणालं, ‌

'ए नवऱ्याकडची उष्टी हळद आली बरं का'

हे शब्द ऐकल्यावर उमा एकदम उत्साहीत झाली. आता मानसला लावलेली हळद आपल्या अंगाला लावली जाणार. या हळदीला मानसचा स्पर्श झाला आहे आणि तीच हळद आता आपल्याला लागेल. या विचाराने उमा रोमांचित झाली. इतक्यात माधवी म्हणाली,

"उमा आपल्या घरची हळद लावून झाली आहे आता मानसच्या घरची त्याची उष्टी हळद तुला लावायची आहे. मला माहितीये तुला त्या हळदीची गोडी जरा जास्तच असेल." जमलेल्या सगळ्याजणी खुदुखुदू हसायला लागल्या. उमाच्या डोळ्यासमोर मानसच तिला स्पर्श करतोय असे दृश्य दिसू लागले. उमाच्या मनात आलं मानसच्या घरी पण हे सर्व विधी चालू असतील. त्याला आता काय वाटत असेल. या सर्वाला तो कसा सामोरा जात असेल. त्याच्यासाठी पण हे एक दिव्यच असेल नाही का. आज आपल्या जागी नंदिनीशी मानसचं लग्न झालं असतं तर त्याने सुद्धा हे सर्व किती आनंदाने करून घेतलं असतं. त्याला तिची प्रकर्षाने आठवण येत असेल का! आपल्यासारखाच तो सुद्धा कोणाजवळ त्याच्या मनातल्या ह्या भावना सांगू शकत नाही. अशी तडजोडीने लग्न होतात तेव्हा ती कितपत यशस्वी होत असतील. देवच जाणे! पण समाजात असे कितीतरी संसार असतात जे त्यांच्या संसारात खुश नसतात. काही जोडप्यांमध्ये कालांतराने प्रेम निर्माण होऊ शकतं किंवा ते एकमेकांना समजून घेतात म्हणून त्यांचा संसार लौकिकार्थाने यशस्वी होतो. उमा मनोमन देवाला प्रार्थना करते आपल्या बाबतीत सारं व्यवस्थित होऊ दे.

(उमाच्या अंगाला हळद तर लागली आता लग्न व्यवस्थित पार पडेल ना! पाहूया पुढील भागात)

क्रमशः