तिची तपश्र्चर्या -भाग २४
आज उमाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस! पाहूया काय होतं पुढे..
काल उमाची हळद व्यवस्थित पार पडली. रात्री जेवल्यावर जमलेले सर्व नातेवाईक गप्पा मारत बसले होते. सर्वजण उमाला इतकं छान सासर मिळाले म्हणून आनंदी होते. त्याबद्दल सगळे बोलत होते. बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यावर रमाताई उमाला म्हणाल्या,
"चल उमा आता सर्वांनी झोपा आता. उद्या तुला दिवसभर उभं राहायचं आहे. चेहरा थकलेला नको दिसायला."
"हो चला पुरुष मंडळींना बाहेर मांडवातच गाद्या घातल्या आहेत आणि आम्ही बायका सगळ्या आत मध्ये झोपतो."
दिवसभराच्या श्रमाने इतर सर्व तर झोपी गेले पण उमाला झोप काही लागत नव्हती. उद्यापासून आपल्या नवीन जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. एखाद्या मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात आणि इथे तिचे आई-बाबा मात्र व्यथित होतात. हे सर्व कोणी सुरू केलं असेल. मुली सासरी जातात म्हणूनच पूर्वीपासून लोकांना मुलगा हवा असतो का! मुलगा असला की सुनेच्या रूपात एक नवीन माणूस घरात येतं आणि लग्न झालेल्या मुलीची कमतरता भरून येते. पण हल्ली मुलांचा तरी काय भरोसा की ती आई-बाबांजवळ राहतीलच. विचार करता करता उमाला झोप लागली.
उमाच्या घरच्यांकडे पद्धत होती की माहेरचं मंगळसूत्र हे फक्त काळ्या मण्यांचा सर असतो. तो सुद्धा नवऱ्याच्या उंची एवढा. मध्यभागी मुहूर्त मणी ओवलेला असतो. मानसची उंची पावणे सहा फूट असल्यामुळे तेवढ्या लांबीचं मंगळसूत्र ओवता ओवता ते ओवणाऱ्या बायकांची दमछाक झाली होती. तो मुहूर्त मणी नंतर सोन्याच्या मंगळसूत्रात ओवला तरी चालतो. पण तो कायम गळ्यात असायला पाहिजे अशी पद्धत होती. त्या सगळ्या मंगळसूत्र ओवणाऱ्या बायका खोट्या त्राग्याने म्हणत होत्या,
"सगळ्या मुलींना उंच नवरा हवा असतो पण हे असे बारीक मणी ओवताना किती त्रास होतो हे त्यांना काय माहित. परंतु हरकत नाही आपल्या घरच्या मुलीसाठी आपण एवढं करायलाच हवे. हा त्रास पण सुखावह असतो."
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकरच उठले होते. सगळ्यांची जोरात तयारी सुरू होती. लगीनघर कसं असतं त्याची झलक आज बघायला मिळत होती. घरातील काही पाहुणे समोरच्या घरी आंघोळीसाठी गेले होते. सगळे अगदी वेळेवर तयार झाले. वधूवेशात उमा अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. सोहनींनी उमासाठी रात्रीच सजवलेली गाडी पाठवली होती. त्याचप्रमाणे अजून एक गाडी आणि दोन-तीन रिक्षांची सोय इतर सर्वांसाठी केली होती. हे सर्व पाहून जमलेले नातेवाईक भारावून गेले होते. काहीना तर त्यांच्या तीरसट व्याह्यांची आठवण होत होती. घरातून निघताना उमा देवाच्या पाया पडली. आई-बाबांच्या पाया पडताना तिला तिचे अश्रू आवरत नव्हते. आई-बाबांची अवस्था काही वेगळी नव्हती. आज आपली उमा सासरी जाणार या भावनेने त्यांना अश्रू आवरत नव्हते. राधाताईला मिठी मारून ती म्हणाली,
" राधाताई आई-बाबांची काळजी आपण दोघी घेऊया. आता तू सुध्दा वरचेवर इकडे येत जा."
"उमा आता तू अश्रू आवर. तुझा रडका चेहरा का तू मानसला दाखवणार आहेस."
घरा बाहेर पडताना उमाचे पाय साखळदंडाला बांधल्यासारखे जड झाले होते. शेवटी मन घट्ट करून ती घराबाहेर पडली. गाडीत बसताना ती वळून वळून आपल्या घराकडे पाहत होती. हा क्षण जेव्हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो तेव्हा तिच्या मनाची अवस्था एक विवाहित स्त्रीच जाणू शकते कारण ती सुद्धा या प्रसंगातून गेलेली असते. उमाच्या एका बाजूला आई आणि एका बाजूला राधाताई बसली आणि पुढे बाबा बसले. उमाच्या मनात आलं गाडी इतकी सुंदर सजवली आहे तर हॉलमध्ये किती थाट असेल. खरोखर उमा जेव्हा गाडीतून उतरली तेव्हा ती समोर पाहतच राहिली. प्रवेशद्वार फुलांच्या अप्रतिम सजावटीने खूपच आकर्षित दिसत होतं. प्रवेशद्वारातून आत शिरताना फुलांचा सुंदर दरवळ जाणवत होता.
ते सर्व हॉलमध्ये आले तेव्हा बरीच पाहुणे मंडळी आलेली होती. त्यातले उमाचे अगदी जवळचे नातेवाईक जे बाहेरगावी राहत होते ते लगेचच उमाला भेटायला आले. उमाला बघून ते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते. वधूपक्षाच्या रूममध्ये जाऊन उमा बसली. तिथली व्यवस्था खूपच छान होती. रूमला चौफेर आरसे लावलेले होते. त्यामुळे कोणत्याही कोनातून आपण स्वतःला पाहू शकत होतो. आपल्या रूपावर उमा मनोमन खुश झाली होती. इतक्यात मानसकडचे लोक सुद्धा हॉलमध्ये प्रवेश करते झाले. शकुंतला ताई, शीलाने उमाचे आई-बाबा आणि इतर सर्वांची जातीने चौकशी केली. वरमाय असून सुद्धा कसलाही अभिमान न बाळगता त्या उमाच्या खोलीत तिलाही भेटायला आल्या. उमाच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर दिला आणि तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणून डोळ्यातील काजळाचं तीट तिच्या काना मागे लावलं. त्या भेटायला आल्यामुळे उमाला खूपच भरून आलं.
मुहूर्ताची वेळ जवळ आली होती. सुलभाने उमाच्या चेहऱ्यावर मेकअपचा एक हात फिरवला आणि तिला सांगितलं आता अजिबात डोळ्यात अश्रू आणायचे नाहीत. उमाच्या मनात आलं असं कोणी सांगून अश्रू रोखता आले असते तर किती छान झालं असतं. अजून माणसांच्या भावना यंत्र काबुत आणू शकत नाही. मंगलाष्टकं सुरू झाली आणि उमाच्या हृदयाची धडधड वाढू लागली. थोड्याच वेळात गुरुजींनी पुकारा केला 'नवऱ्या मुलीला घेऊन या' आणि उमाचा मामा उमाच्या हाताला धरून स्टेज कडे घेऊन जाऊ लागला. उमाच्या मनात नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून खूप उत्सुकता आणि त्याचवेळी एक अनामिक दडपण मनावर जाणवत होतं. उमाला अंतरपाटाच्या या बाजूला उभं करण्यात आलं. तिच्या बाजूला तिची लाडकी राधाताई उभी राहिली.
अंतरपाटाच्या पलीकडे मानस उभा आहे या भावनेने उमाला एक मजबूत आधार जाणवत होता. त्याचवेळी आपल्या जीवनाची एक नवीन कसोटी सुरू होणार हे तिला जाणवत होतं. 'शुभमंगल सावधाsssन' गुरुजींनी म्हणताच अंतरपाट दूर झाला. क्षणभरच उमाची आणि मानसची नजरा नजर झाली. उमाने नजरेनेच मानसला सांगितलं मी माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. मानसने मंदस्मित करत मान हलवली. वधू वराने एकमेकांना हार घातल्यावर शकुंतला ताईंनी त्यांच्या तोंडात पेढा भरवला. औक्षण केलं. दोघांचं डोकं एकमेकांच्या डोक्यावर हलकेच आपटलं. रमाताईंनी पण औक्षण केलं.
लग्नानंतरच्या सगळ्या विधींमध्ये उमा रमलेली होती. ती त्या सर्व विधींमध्ये खूप उत्स्फूर्तपणे भाग घेत होती. विधींमध्ये मानसचा तीला नकळत स्पर्श होत होता आणि ती त्या स्पर्शानेही मोहरून जात होती. मानसने तिला मंगळसूत्र घातलं. इतर सर्व विधी झाले. सप्तपदी विधीच्या वेळी सप्तपदी चालत असताना उमाच्या मनात आलं ही सर्व वचनं सगळ्याच संसारात पाळली जात असतील का. दोन्ही बाजूंनी राजी असलेले वधू आणि वर यांच्यामध्ये पण काही काळानंतर तितकेसे चांगले संबंध राखले जात नाहीत. त्यावेळी ही वचनं केवळ वचनंच राहत असतील नाही का! उमाच्या मनात आलं लग्नविधींची सुरुवात तरी कोणी केली असेल. खरंतर त्यांनी तजवीज ठेवायला हवी होती की सहा महिने पत्नीने पतीच्या घरी राहायचं आणि सहा महिने पतीने पत्नीच्या घरी राहायचं. ह्या विचाराने उमाला खुदकन हसू आलं. आपण किती बालिश विचार करतो. आता पुढचा विधी होता वराने वधूचं नाव बदलण्याचा.
(मानस उमाचं काय नाव ठेवतो पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे