Login

तिची तपश्चर्या - भाग - २५

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग २५

लग्नातले बरेचसे विधी झाले होते. आता वधूचे नाव बदलण्याचा विधी सुरू आहे पाहूया पुढे..

गुरुजींनी मानसला वधूचे नाव एका ताटात तांदूळ ठेवले होते त्यावर लिहायला सांगितले. उमा खूप बावरून गेली. तिला मनोमन वाटत होतं की मानसने आपलं नाव बदलू नये. आपलं नाव आपल्याला आवडतं. हाक मारायला सुटसुटीत म्हणून आपल्या आई-बाबांनी आपली दोघींची नावे दोन अक्षरी ठेवली. दोघींचीही उमा आणि राधा किती सोप्पी नावं आहेत. तसं पण मोठाली नावं ठेवून नंतर त्याचा अपभ्रंश होतोच. आता तिलोत्तमा किंवा हेमलता नाव असेल तर तीलू किंवा लता, हेमा असा उच्चार लोक करतात. उमाला आठवलं तिच्या वर्गातील एका मुलीचं नाव होतं 'भानुमती'. ते तिला अजिबात आवडत नव्हतं. तिला हाक मारताना कोणी भानू, भान्या अशी हाक मारायचे. जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा तिने तिच्या नवऱ्याला सरळ विचारलं तुम्ही माझं नाव बदलाल ना मला माझं नाव आवडत नाही. तिच्या नवऱ्याने तिचं नाव नेहा ठेवलं आणि ती खूप खुश झाली. आता हा मानस काय करेल! उमा श्वास रोखून पाहत होती मानस आता काय लिहितोय. गुरुजींनी मानसला सांगितलं असलं तरी जमलेल्या बायकांची बडबड सुरू होती.

"अरे मानस काहीतरी तुझ्या नावाला साजेसे नाव ठेव मानसी, मनाली." मानसची मामी म्हणाली.

"अरे हल्ली मधुमिता, मिताली ही नावं नवीन आहेत त्यापैकी एक काहीतरी ठेव." जमलेल्यांपैकी दुसरी एक स्त्री म्हणाली.

"अगं मानस एवढा चोखंदळ आहे म्हणजे तो काहीतरी छानच नाव ठेवेल. आपण पाहूया ना तो काय नाव ठेवतो." एक समजूतदार स्त्री म्हणाली.

इथे मानसच्या मनात चाललं होतं की उमाचं नाव तिच्या आई-बाबांनी त्यांच्या हौसेने, त्यांना आवडलं म्हणून ठेवलं आहे. लहानपणापासून उमा तेच नाव तिचं नाव म्हणून सर्वांना सांगत आहे. प्रत्येकाला आपलं नाव प्रिय असतं. उमालाही तिचं नाव प्रिय असणारच. आपल्याला कोणी अचानक आपलं नाव बदलायला सांगितलं तर आपण पण बदलणार नाहीच ना. आई-वडिलांनी ठेवलेले नाव बदलण्याचा मला काय अधिकार आहे. खरंतर मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलीच्या नावापुढे नवऱ्याचं नाव, त्याचं आडनाव लागतंच. मग हे मुलीचे नाव बदलण्याचं खूळ आलं कुठून असेल. आता एखाद्या मुलीला तिचं नाव आवडतच नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे. सगळ्यांची उत्सुकता वाढलेली असतानाच मानसने हळूच उमाकडे पाहिलं आणि त्याचवेळी उमाने त्याच्याकडे पाहिलं. त्याला तिचे डोळे काकुळतीने 'कृपया माझं नाव बदलू नका' असं सांगत होते असं वाटत होतं. एखाद्या मुलीचं लहानपणापासूनचं नाव ही तिची एक स्वतंत्र ओळख असते. तो तांदळामध्ये नाव लिहायला सुरुवात करतो तेव्हा सगळ्या बायका खूप उत्सुकतेने तो काय लिहितो याच्याकडे पाहत होत्या. तांदळात त्याने नाव लिहिलं 'उमा'. उमाने ते हळूच पाहिलं आणि तिला मनोमन खूप आनंद झाला.

जमलेल्या बायकांच्या तोंडातून,

"अरे काय मानस तू ते जूनंच नाव ठेवलं. तुझ्या नावाला शोभेल असं एखादं नाव ठेवायचं ना." मानस त्यांना उद्देशून म्हणाला,

"मला एक सांगा तुमच्यापैकी किती जणींची नावं बदलली आहेत आणि किती जणींची तीच आहेत आणि ज्यांची नावं बदलली आहेत त्यांच्या त्यावेळच्या काय भावना होत्या. ज्यांची नाव बदलली त्यांना त्यावेळी नक्कीच वाईट वाटलं असेल. होय ना!"

"हो मानस तुझं बरोबर आहे. इथं लग्न झाल्यावर मुलीसाठी सगळंच नवीन असतं. माहेरचं घर सोडून ती नवीन घरात प्रवेश करणार असते. अशावेळी तिची एक ओळखीची खूण म्हणून तरी तिचं नाव तेच असावं. खूप योग्य निर्णय घेतलास तू. उमा तुला समजून घेणारा नवरा मिळालाय म्हणजे तू खूपच नशीबवान आहेस."

मानस उमाला समजून घेणार आहे याची झलक या इतक्या कमी दिवसात उमाने अनुभवली होतीच. उमाने मनातल्या मनात स्वतःचं नवीन नाव उच्चारून पाहिलं,
'उमा मानस सोहनी'. कानाला ऐकायला छान वाटत होतं तिचं नाव. 'उमानस' तिला परत अननसाची आठवण झाली आणि ती गालातल्या गालात हसली.

शकुंतलाताई, रमाताई सर्वच तिथे उपस्थित होत्या. शकुंतला ताई मानसला म्हणाल्या,

"बरं झालं रे तू नाव बदललं नाहीस माझ्या तोंडात पण तिचं उमा हेच नाव अगदी घट्ट बसलं आहे."

इतर सर्व विधी झाल्यावर गुरुजींनी वधू-वरांना सांगितलं

"तुम्ही आता जाऊन आराम करा."

बराच वेळ बसून पाय आखडले गेले होते उठल्यावर जरा पाय मोकळे झाले. दोघांना खूप बरं वाटलं. जेवणाची सोय केलेल्या विभागात जेवणाच्या पंगती उठत होत्या. दोघेही जण आपापल्या रूममध्ये गेले. गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर उमाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उठाव आला होता. नववधू अगदी शोभून दिसत होती. लग्न लागल्यावर बदलण्यासाठी शकुंतला ताईंनी उमाला एक सुंदर मोरपीशी रंगाची बनारस सिल्क साडी घेतली होती. सुलभाच्या मदतीने तिने ती साडी नेसली आणि थोडी फ्रेश झाली. आता थोड्याच वेळात शेवटची पंगत वधू वर आणि त्यांचे जवळचे नातेवाईक अशी जेवायला बसणार होती. इथे उमाच्या मैत्रिणी तिची मस्करी करत होत्या. माधवी तिला म्हणाली,

"उमा पंगतीत घास भरवताना तू कोणता उखाणा घेणार आहेस. ठरवला आहेस की सांगू तुला?"

"नाही त्यावेळी जो सुचेल तोच उखाणा मी घेणार आहे." खरंतर उमाने आधीच सगळे उखाणे ठरवून ठेवले होते.

उमाच्या ज्या मैत्रिणी जेवून आल्या होत्या त्या जेवणाची खूपच प्रशंसा करत होत्या. सगळेच पदार्थ खूप छान आहे. चाट आयटम तर काही विचारू नका. आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट जेवण मी इकडेच जेवले आहे. चाटचं नाव काढल्यावर उषा उमाला म्हणाली,

"काय मग चाट आयटमचं नाव काढल्यावर तोंडाला पाणी सुटलं का. तुला खूपच आवडतात माहिती आहे मला."

"अगं एरवी तीच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असतं पण आज तिला भूकच नाहीये. मानसशी लग्न झाल्या मुळे तिचं पोट आणि मन दोन्ही भरलेलं आहे. उमा आता तू कायम पायघड्यांवरून चालणार‌ आहेस. तुझ्या आई बाबांना खूपच कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असेल. तू आमची मैत्रीण आहेस म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो." माधवी समाधानाने म्हणाली.

"अगं उमाचे 'अहो' खूप छान आहेत. दिसायला आणि वागायला सुद्धा. सासरची मंडळी पण स्वभावाने खूप चांगली आहेत. आता या दोघांसाठी आपण प्रार्थना करूया. अरे हो या लग्नात कोण उपवर चांगला मुलगा दिसला का. आपल्या काही मैत्रिणींची लग्न झाली असली तरी अजून दोन-चार तरी लग्नाच्या उमेदवार आहेत. आता या दृष्टीने तुमच्या नजरेचा कॅमेरा फिरवा जरा हॉलमधील लोकांवर." ज्योती अविवाहित मैत्रिणीची मस्करी करत म्हणाली आणि सगळ्याजणी हसायला लागल्या.

इतक्यात राधाताई तिथे आली आणि उमाला म्हणाली,

"चला उत्सव मूर्ती आता तुमची पंगत बसणार आहे. खास पंगत खूप छान सजवली आहे. तुम्हा दोघांच्या ताटाभोवती जी फुलांची रांगोळी काढली आहे तिला तोड नाही. प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांनीच बघ."

जेवणाची पंगत वरच्या मजल्यावर होती. इथल्या इथे जाण्यासाठी सुद्धा लिफ्टची सोय होती. आई-बाबा आणि राधा, उमाचे अगदी जवळचे एक-दोन नातेवाईक असे शेवटच्या पंगतीसाठी थांबले होते. ते तिथे वरती गेले. मानसकडची मंडळी आली होती. मानस पंगतीत उमाची वाट पाहत होता. उमा येताच दोघेही स्थानापन्न झाले. आता सर्वांना उत्सुकता होती उमा आणि मानस घास भरवताना काय उखाणा घेतात याकडे.

(कोणता उखाणा घेतला असेल दोघांनी पाहू या पुढील भागात)