Login

तिची तपश्चर्या - भाग २६

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग २६

मानसने उमाचं नाव बदललं नाही त्यामुळे उमा खुश झाली. आता पाहूया पुढे..

सुग्रास भोजनाच्या सुवासामुळे मानाच्या पंगतीत बसलेल्या उपस्थितांची भूक चाळवली गेली होती. आधी काय खावं हाच त्यांच्या मनात विचार चालला होता. इतक्यात शीला म्हणाली,

"मानस चला दोघांनी पटापट एकमेकांना घास भरवा आणि उखाणा घ्या सर्वांना खूप भूक लागली आहे. उमा तुझा उखाणा तयार असेलच तूच घे आधी." उमाला खरोखर कळत होतं की आता सर्वांनाच भूक लागली असेल लवकरच उखाणा घ्यावा. तिने सुरुवात केली,

"सुख समाधान असेल जिथे, तिथे लक्ष्मी सरस्वतीचा वास,
मानसरावांना भरवते मी त्यांच्या आवडीच्या जिलेबीचा घास"

उमाने उखाणा तर घेतला पण तिला माहीत नव्हतं की मानसला खरोखरच जिलेबी आवडते की नाही. उमाने जिलेबी भरवल्यावर पठ्ठ्याने पूर्ण जिलेबी खाऊन टाकली म्हणजे नक्कीच त्याला जिलेबी आवडत असावी.
सगळ्यांनी खूप जोरत टाळ्या वाजवल्या. शकुंतला ताई म्हणाल्या,

"वा उमा अगदी साजेसा उखाणा घेतलास. ‌ अप्रतिम आणि आगळावेगळा. चला मानस आता तू उमाला काय भरवतोस मी कोणतं नाव घेतोस ते पाहूया". मानसने सर्वांची मजा करायचं ठरवून तो म्हणाला,

"उमा"

"चल चहाटळ कुठला नीट व्यवस्थित नाव घे."

"बरं तर ऐका आता,

"गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा सुवास
उमाला भरवतो मोतीचूर लाडूचा घास"

उपस्थितांपैकी एक जण म्हणाला,

"अरे वा मानस तू पण उखाणे पाठ करून ठेवलेस की काय. नाहीतर नवरदेवाला कानात उखाणा सांगावा लागतो."

"वदनी कवळ" म्हणून सगळ्यांनी जेवायला प्रारंभ केला. उमाचं तर पोट भरलं होतं तरीसुद्धा तिने दोन घास खायला सुरुवात केली. मध्येच तिचं लक्ष आईकडे गेलं. आई-बाबा दोघेही तिच्याकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होते.

पंगती उठल्यावर उमा आणि मानस तयार व्हायला गेले. मानसला तयार व्हायला काय वेळ लागत नव्हता म्हणून तो त्याच्याच रूममध्ये मित्रांबरोबर गप्पा मारत बसला. मित्र त्याची मस्करी करत होते,

"अरे यार तू तर एकदम खूप नशीबवान आहेस. खूप सुंदर आणि सोज्वळ आहे आमची वहिनी."

"अर्थात तू पण तसाच प्रेमळ आहेस गुणी आहेस कर्तबगार आहेस. अगदी तुला शोभेशी आहे."

"लग्नातलं जेवण वगैरे सगळं ठीक आहे पण आम्हाला एक सेप्रेट पार्टी पाहिजे. आता तू सगळ्यात जरा जास्तच व्यस्त असशील. उशिरा दिली तरी हरकत नाही पण पाहिजेच."

"हो रे बाबा पार्टीला मी कधी नाही म्हटलं का. तुम्हीच ठिकाण आणि वेळ ठरवा आपण नक्की भेटूया. यावेळी सगळ्यांनी आपल्या जोडीदारा बरोबर यायचं बरं का! ज्यांचे नाहीत त्यांनी शोधा बरं पटापट!" सगळेच हसायला लागले.

इथे उमा मात्र नव्याने तयार व्हायला खूपच उत्सुक होती. तिला रिसेप्शन साठी घेतलेला शालू खूपच आवडला होता. जांभळ्या रंगावर सुंदर नाजूक सोनेरी नक्षी. पदरावरचा मोर तर खूपच भारी होता. लहानपणापासून म्हटलेलं गाणं‌ 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा' आता सत्यात उतरत होतं. उमा, तिच्या मैत्रिणी आणि राधाताई तिला तयार व्हायला मदत करण्यासाठी तिच्या रूममध्ये आल्या. सुलभाची मेकअप करण्याची पद्धत खूपच छान होती. ती कधीच भडक मेकअप करायची नाही. तसं पण उमाला मेकअपची खरंतर आवश्यकताच नव्हती. पण तिचा खास दिवस होता ना म्हणून सुलभाने तिला हलका मेकअप केला. शालू खूपच सुंदर रीतीने नेसवला. उमाच्या सरळ रेशमी लांब केसांची हेअर स्टाईल करायला सुलभाला भारी आवडायचं. ती तिची तयारी करत असताना इतर मैत्रिणी आवश्यक असे सल्ले देत होत्या. त्याप्रमाणे सुलभा त्यात फेरफार करत होती.

उमाची पूर्ण तयारी झाल्यावर सुलभाने तिच्या एकटीचा एक अप्रतिम फोटो काढला. त्या सर्वांना खरंतर तिच्याबरोबर सेल्फी काढायचा होता. परंतु राधाताई म्हणाली,

" उमाचे आधी मानस बरोबर फोटो निघू देत मग आपण काढायचे." तिचं म्हणणं सर्वांना पटलं. मानस तयार झाल्यावर शीलाताई उमा तयार झाली आहे का बघायला आली. तिने उमाला पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले. ती उत्कट पणे म्हणाली,

"उमा मानस रिसेप्शन साठी उभा राहील की फक्त तुझ्याच कडे बघत राहील. किती सुंदर दिसतेस. आमचीच नजर तुझ्यावरून हटत नाही तर मानसचं बिचाऱ्याचं काय होईल". उमा लाजली आणि बाकीच्या सर्व हसायला लागल्या.

"चल आता मानस तयार झालाय. दोघांची एन्ट्री सर्वांसाठी सरप्राईज आहे."

शीलाताई बरोबर उमा गेली. खरोखर उमा आणि मानसच्या लग्न सोहळ्याचा थाट काही औरच होता. अतिशय दिमाखदार अशी दोघांची एंट्री झाली. दोघं येत असताना अगदी एखाद्या राजकुमार आणि राजकन्या प्रवेश करते आहे असंच वाटत होतं. एखाद्या नायक नायिकेचे फोटो काढावेत तसे सगळ्यांनी आपले मोबाईल सरसावून त्या दोघांचे सुंदर असे फोटो मोबाईल मध्ये टिपून घेतले. स्टेजवर गेल्यावर मानसने फोटोग्राफर्सना सांगितले की तुम्हाला काय फोटो काढायचे ते कृपा करून लवकर आटपा. इथे लोकं जास्त वेळ खोळंबली तर मला आवडणार नाही. हल्ली बऱ्याच ठिकाणी नवरा नवरीचे फ्रेश असतानाच वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटो काढले जातात त्यासाठी लोकांचा निष्कारण खोळंबा होतो. ते टाळण्यासाठी मानस असं म्हणाला. त्याप्रमाणे फोटोग्राफरने त्यांच्या मोजक्याच आकर्षक पोजेस मध्ये फोटो काढले.

नंतर भेटायला येणाऱ्या लोकांची लाईन लागली. 'कृपया आहेर आणू नये' असं लिहिल्यामुळे मोजकेच दोन शब्द आणि फोटो काढून उपस्थित मंडळी पुढे सरकत होती. मानसचे मित्र त्याची मस्करी करत रेंगाळत हळूहळू पुढे जात होते. त्यातला एखाद दुसरा मानसच्या कानात काहीतरी कुजबुजत होता. त्याचप्रमाणे उमाच्या मैत्रिणी सुद्धा तिला कानात काय काय सांगत होत्या. मानस आणि उमा दोघेही वृद्ध व्यक्तींच्या खाली वाकून पाया पडत होते. खूप फोटो काढले गेले. आप्त, मित्रमंडळी शेवटी दोन्ही कुटुंबाबरोबर फोटो काढले गेले.

लग्न सोहळा आटोपल्यानंतर सर्वात करूण प्रसंग म्हणजे वधूला तिच्या आई-बाबांनी आणि नातेवाईकांनी मुलीची पाठवणी करणे. आज पर्यंत उमा कोणत्याही लग्नाला गेली आणि तिथे जर ह्या प्रसंगाला ती उपस्थित असली तर तिच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहिले नाही. आणि आज तिलाच निरोप दिला जाणार होता. सर्वजण खूप भावुक झाले होते खास करून महिलावर्ग. कोणाला त्यांचं स्वतःचं लग्न आठवत होतं. आई-बाबांची भेट घेताना उमा हुंदके देऊन रडत होती. बाबा स्वतःच्या अश्रूंना लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत तिच्या पाठीवरून हात फिरवत होते. आईला तर उमाचा खूपच आधार होता. आता आपला आधारस्तंभ हरवतोय ही भावना आणि मुलीचा विरह यांनी त्या खूपच भावविवश झाल्या होत्या. राधाताईला भेटताना उमा,

"तू आई-बाबा जवळ जरा जास्त राहण्याचा प्रयत्न कर. तरच त्यांना माझा विरह थोडाफार सुसह्य होईल."

"उमा तू काळजी करू नकोस मी आहे ना." सर्वांना भाऊक झालेलं पाहून शकुंतला ताई आणि शामराव म्हणाले,

"रमाताई आणि श्रीकांतराव तुम्ही उमाची अजिबात काळजी करू नका. ती आमच्या घरी लेकी सारखीच राहील. तिला लेकीचंच प्रेम मिळेल. आणि तिला कधी तुमच्याकडे यावसं वाटलं तर आमची कोणाचीच काही हरकत नसेल. तुम्ही कधीही कोणत्याही वेळी आमच्या घरी येऊ शकता."

उमा आणि मानस आई-बाबांना नमस्कार करायला वाकले तेव्हा मानस म्हणाला,

"बाबा उमाला तुम्ही जसं जपलं तसंच आम्ही पण जपू."

"जावईबापू माझी पोर खूप हळवी आहे हो."

"मला त्याची कल्पना आहे. तिला वाईट वाटेल, तिच्या मनाला लागेल असं आम्ही काहीही बोलणार नाही. आमच्याकडून तसे कोणतेही कृत्य होणार नाही. आता निघू आम्ही. तुम्ही पण तुमच्यासाठी दिलेल्या गाडीतूनच जा. दोन-तीन फेऱ्या कराव्या लागल्या तरी हरकत नाही."

उमा वळून आई-बाबांना हात करत होती. गाडीत बसताना शकुंतला ताई, मध्ये उमा आणि मानस असे बसले. गाडी हल्ल्यावर उमाने अश्रू पुसायचा व्यर्थ प्रयत्न केला. शकुंतला ताईंनी तिच्या खांद्यावर थोपटत तिला धीर दिला.

(लग्न सोहळा व्यवस्थित पार पडला आता पुढे काय होईल पाहूया पुढील भागात)