Login

तिची तपश्चर्या - भाग २७

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग २७

आज मानसच्या घरी गृहप्रवेश करताना उमाच्या मनात काय भावना आहेत पाहूया पुढे..

वधू-वरांची आलिशान गाडी सोहनींच्या‌ बंगल्याच्या पोर्चमध्ये येऊन थांबली. आज खऱ्या अर्थाने उमा मानसच्या घरी गृहप्रवेश करणार होती. बंगल्याला खूप आकर्षक रोषणाई केलेली होती त्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा खूप प्रकाश जाणवत होता. उमा आणि मानस दोघे जोडीने पायऱ्यांशी आल्यावर त्यांना तिथे शीला आणि बाकी स्त्रियांनी अडवलं. ती उमाला म्हणाली,

"आज मानसची पत्नी या नात्याने तू सोहनींच्या घरात प्रवेश करत आहेस. नाव घेतल्याशिवाय तुला आम्ही काय आज सोडणार नाही." मानसच्या मनात आलं घास भरवताना नाव घेतलं आता परत अजून एक नाव घ्यावे लागणार वाटते. उमाने उखाण्याची तयारी केलीच होती. कोणाचाही जास्त खोळंबा न करता, आढेवेढे न घेता तिने उखाणा घेतला,

"माझ्या सासरच्या घराचं नाव आहे 'सुखशांती निवास'
प्रार्थना करते मला लाभो नित्य मानसरावांचा सहवास"

"वा क्या बात है उमा. एकदम समर्पक नाव घेतलंस. आता आमचे बंधुराज काय करतात ते पाहूया."

"अरे मी तर याच घरात लहानाचा मोठा झालो मी का बरं नाव घेऊ!"

"ते काही नाही हं मानस.आज तुला घ्यावाच लागेल उखाणा कारण तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होतेय ना आज." हो ना करताना मानसला नाव घ्यावंच लागलं,

"लग्न करून तू या घरात झालीस सोहनींची सून
वचन देतो मी, उमा तुला नेहमीच घेईन समजून"

"अरे ह्याने पण सगळी आधीच तयारी करून ठेवली होती आणि आपल्याला उगाचच नाटक करून दाखवतो.‌ दोन्ही उखाणे एकदम छान घेतले." इतक्यात शकुंतलाताई पुढे आल्या आणि म्हणाल्या,

"ए चला गं आता माझ्या लेकीला त्रास देऊ नका. उमा ये माप ओलांडून गृहप्रवेश कर. " हे ऐकून शकुंतला ताईंची बहीण माला म्हणाली,

"अगं शकू तू तिला माप पण‌ ओलांडायला सांगतेस आणि लेक सुद्धा म्हणतेस. तुझी नाती जोडण्याची कला अजबच आहे."

"माला ती जरी माझी सून असली तरी मी तिला लेकी प्रमाणेच वागवणार आहे. जशी मला शीला तशीच उमा. अगं या मुली आपलं घर सोडून येतात, त्यांना आपण तसंच प्रेम द्यायला हवं ना. जरी एखाद्या स्त्रीला कधी काळी सासुरवास झाला असेल तरी तिने घरात येणाऱ्या सुनेला लेकीप्रमाणे वागवावे म्हणजे ‌मग तिलाही तेच प्रेम परत मिळतं."

"खरं आहे तुझं. असं झालं तरच सासू-सुनेचं नातं आदर्श ठरतं."

उमाने माप ओलांडून गृहप्रवेश केल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मानसला वाटले चला गृहप्रवेश झाला आता लग्न सोहळा आटोपला असेल. म्हणून तो हॉलमध्येच सोफ्यावर जाऊन बसला. कोणीतरी त्याला आणि उमाला पाणी आणून दिलं आणि मजेत म्हटलं,

"नवरदेव अगदी हुश्श करत बसलेत सोफ्यावर. अहो आज तुमची इतक्या लवकर सुटका नाहीये. आता पारंपारिक खेळ खेळून त्यात संसारात कोणाचं वर्चस्व राहणार ते पाहायचं आहे आपल्याला." ‌ मानस म्हणाला,

"अरे अजून तुमचं काही ना काही तरी आहेच का!"

इतक्यात मानसच्या मामेबहिणीने सजवलेलं एक मोठं घंगाळं पाण्याने अर्ध भरलेलं घेऊन आली. त्यात कुंकू, फुलांच्या पाकळ्या आणि पाणी होतं. ती म्हणाली,

"मानस आणि उमा आता तुम्ही दोघं समोरासमोर पाटावर बसा आणि या घंगाळात मी एक अंगठी टाकणार आहे. जो कोणी ती आधी शोधेल त्याचं या संसारात वर्चस्व राहील. आता तुम्हाला तीन चान्स मिळतील बघूया." उमाला मनोमन वाटत होतं की मानसने अंगठी शोधावी. आपल्याला काही हरकत नाही संसारात त्याचं वर्चस्व राहिले तरी कारण तो वर्चस्व गाजवणारा माणूस नाहीच आहे. दोघांनी अंगठी शोधायचा प्रयत्न सुरू केला. पहिल्यावेळी उमाच्या हाताला अंगठी लागली परंतु तिने ती बाहेर काढली नाही आणि असंच पाण्यात हात घालून शोधण्याचा प्रयत्न करू लागली. या तिच्या त्यागात आणखीन एक सुख होतं ते म्हणजे अधून मधून मानसच्या हातांचा तिला स्पर्श होत होता. उलट तिला वाटत होतं हा खेळ संपूच नये. शेवटी मानसने अंगठी शोधून वर काढली. शीला उमाला म्हणाली,

"अगं काय उमा आपल्या स्त्रियांचे वर्चस्व रहायला पाहिजे संसारात. आता तूच शोधून काढ अंगठी."
दुसऱ्यांदा मानसने अगदी लवकरच अंगठी शोधून काढली. उमाने विचार केला आता तिसऱ्यांदा आपण अंगठी शोधायला हवी. त्याप्रमाणे तिसऱ्यांदा तिने अंगठी वर काढली. या खेळात तर मानस जिंकला होता. त्याच्या बाजूने त्याचे मावस भाऊ, मामेभाऊ, मित्र आनंदाने नाचू लागले. असेच एक दोन अजून खेळ झाले. त्यानंतर शकुंतला ताई सगळ्यांना म्हणाल्या,

"चला रात्र खूप झाली आहे. सगळ्यांनी आता झोपा. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे गुरुजी लवकरच येणार आहेत. हे दोघं पण खूप दमले असतील त्यांना पण विश्रांतीची गरज आहे. ‌ उमा पूजा, देवदर्शन होईपर्यंत तू माझ्याबरोबर माझ्याच खोलीत झोपायचं बरं का. तुझी बॅग मी सध्या माझ्याच रूममध्ये ठेवायला सांगितली आहे. चल मानस तू पण आता झोप. उगाच गप्पा मारत बसू नकोस. चला महेश, नितीन सर्वांनी झोपा."

मानसचे भाऊ त्याची मस्करी करायला लागले,

"मानस कमीत कमी दोन दिवस तरी तुला एकट्याला झोपायला लागणार आहे बरं का! सध्या स्वप्न बघण्यातच रममाण हो!"

"चल रे! तुमचं आपलं काहीतरीच असतं."

उमा शकुंतलाताईं बरोबर त्यांच्या रूम मध्ये आली. त्या तिला प्रेमाने म्हणाल्या,

"खूप दमली असशील ना. आता ही बघ मी तुझ्यासाठी एक मऊसुत साडी काढून ठेवली आहे. तोंड वगैरे धु. साडी बदलून घे आणि शांत झोप. हे बघ शीला आली आहे तुला दागिने आणि काढून ठेवायला मदत करेल. उमा उद्या खूप लवकर उठण्याची गरज नाही. जाग येईल तेव्हा उठ तुला कोणीही काहीही बोलणार नाही."

"आई कितीही उशिरा झोपले तरी मला लवकर उठायची सवय आहे. आता तुम्ही शांतपणे झोपा."

शीलाच्या मदतीने उमाने सारा साजशृंगार उतरवून ठेवला. कपडे बदलून ती शकुंतला ताईंच्या बाजूला झोपली. खरंतर दोन दिवस खूपच दमछाक झाल्यामुळे उमाला पटकन झोप लागायला हवी होती. एक तर तिला अशा मऊ गादीवर झोपायची सवय नव्हती त्यात तिच्या मनातले विचार. उमाच्या मनात आलं हे सर्वजण मला किती समजून घेतात. किती आपलेपणाने वागतात. मानसचे बाबा जास्त बोलत नाहीत पण त्यांनाही आपली काळजी वाटत असते. डोळ्यात वडिलांची माया असते.

मानस पण झोपायचा प्रयत्न करत होता परंतु त्याला सुद्धा झोप येत नव्हती. त्याच्या मनात येत होतं उमाचं आपल्याबद्दल काय मत झालं असेल. लग्न झाल्यानंतर नव्या नवरीच्या किती हळव्या भावना असतात. आपण तिला आपलं मत सांगितलं आहे तरी ती सर्वच विधींमध्ये किती उत्साहाने भाग घेत होती. तीला सांभाळून घेणं आपलं कर्तव्यच आहे. आईवर तीने खूप छान छाप पाडली आहे. उमाच्या माहेरची परिस्थिती बेताचीच आहे. तिने गावाबाहेरचं जग सुद्धा पाहिलं नाही. तिला सारी ऐहिक सुखं देण्याचा आपण प्रयत्न करायलाच हवा. त्यादिवशी आई विचारत होती उमाला घेऊन कुठे बाहेर फिरायला जाणार आहेस? उमाला कुठे जायचंय हे विचारूनच आपण ठरवायला हवं. उमाला सगळ्याची हौस आहे,फिरायची आवड आहे. अजून दोन दिवस तरी घरी सर्व पाहुणे असतील. लग्न सोहळा व्यवस्थित पार पडला तसंच सगळं व्हायला हवं. विचारांच्या आवर्तनात मानसला पण झोप लागली.

(पूजा विधि कसा पार पडतो. तुमच्या मनात काय तरंग उठतात पाहूया पुढील भागात)