तिची तपश्चर्या - भाग २८
आज सोहनींकडे लग्नाची पूजा घातली आहे पाहूया पुढे..
रात्री उशिरा झोपून सुद्धा उमाला लवकरच जाग आली. तिने शेजारी पाहिलं तर आई अजून झोपल्या होत्या. ती हळूच आवाज न करता उठली आणि पडदा सारून बाहेर गॅलरीमध्ये आली. मंद वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून गेली आणि तिला खूप ताजंतवानं वाटलं. अजून उजाडलं नव्हतं. कंपाउंड मधील लाईटच्या प्रकाशात जे दिसेल ते ती डोळ्यात साठवून घेत होती. नंतर तिने आत मध्ये येऊन स्वतःचे सर्व आवरून घेतलं. तिच्या मनात आलं येथील बाथरूम सुद्धा किती प्रशस्त आणि सर्व
सुखसोयींनी सज्ज असं आहे. आपलं घरच तीन खोल्यांचं आहे आणि एक छोटी अडगळीची खोली. मागेपुढे थोडीफार जागा आहे नाही असं नाही. तिचं आवरून ती बाहेर आली तोपर्यंत शकुंतला ताई उठल्या होत्या. त्या तिला म्हणाल्या,
सुखसोयींनी सज्ज असं आहे. आपलं घरच तीन खोल्यांचं आहे आणि एक छोटी अडगळीची खोली. मागेपुढे थोडीफार जागा आहे नाही असं नाही. तिचं आवरून ती बाहेर आली तोपर्यंत शकुंतला ताई उठल्या होत्या. त्या तिला म्हणाल्या,
"अगं झोपायचं ना जास्त वेळ. इथे तुला काहीही काम नाही. फक्त आराम करायचा."
"रोजच्या सवयीमुळे पाच वाजताच मला जाग आली. म्हणून मी माझं आवरून घेतलं. या गॅलरीतून निसर्ग खूप सुंदर दिसत असावा असं वाटतंय."
"हो खरच खूप सुंदर दिसतं इथून. सूर्योदय पाहायला कोणत्याही हिल स्टेशनला जायची गरज नाही. इथून खूप नयनरम्य सूर्योदय दिसतो. म्हणूनच ही रूम मी आमच्यासाठी राखून ठेवली."
"बरं मी आता मी खाली जाऊन सगळ्यांसाठी चहा ठेवू का?"
"अगं नाही गीताने चहाचं आधण ठेवलंच असेल. तुला खाली जाऊन बंगल्याच्या आवारात फेरफटका मारायचा असेल तर तू मार. मी येतेच माझं आवरून."
"हो मी खाली जाते. पूजेची पण काही तयारी करायची असेल ना."
उमा सोहनींच्या घरी, म्हणजे आता हे तिचंच घर, एकदाच आली होती. तेव्हा तिने घर नीटसं पाहिलं नव्हतं. एकंदरीतच बंगला खूपच प्रशस्त होता. अतिशय कलात्मक पद्धतीने सजावट केलेली होती. खाली आल्यावर हॉलमधून स्वयंपाक घरात जाताना उमाच्या लक्षात आलं स्वयंपाक घरात जाण्यासाठी बरीच पावले चालावी लागतात. एका अर्थी चांगलेच आहे. तेवढाच व्यायाम. स्वयंपाक घर पण खूपच मोठं होतं. सर्व आधुनिक उपकरणांनी सज्ज. इतक्या मोठ्या स्वयंपाक घरात कुठे काय ठेवलंय हे लक्षात ठेवणे म्हणजे सुद्धा एक कसरतच आहे. हळूहळू आपल्याला सवय होईल. इथे स्वयंपाकाला गीता ताई आहेत. तरीपण सणावारी आणि एरवी पण कोणाच्या आवडीचं वगैरे काहीतरी आई करत असतीलच ना. आपल्याला पण काही करण्याची संधी नक्कीच मिळेल. नुसतंच आयतं बसून खायचं आपल्याला झेपण्यासारखं नाही. या विचारात ती स्वयंपाक घरात आली तेव्हा गीता ताईने एका मोठ्या पातेल्यात चहाचं आधण ठेवलं होतं. त्यात आलं, वेलची कुटून घातली होती त्याचा सुगंध सर्वत्र पसरला होता. उमाची चाहूल लागताच गीता म्हणाली,
"वहिनीसाहेब इतक्या लवकर उठलात तुम्ही. बसा तुम्हाला मी चहा देते."
"गीता ताई सर्वात आधी तुम्ही मला फक्त वहिनी म्हणा. वहिनीसाहेब नाही म्हणायचं. मी तुम्हाला काही मदत करू का."
"छे छे वहिनीसाहेब तुम्ही नवी नवरी आहात. घरात पाहुणे मंडळी आहेत त्यामुळे मला मदत करायला अजून दोघीजणी सुधा आणि मंदा आहेत. तुमची तर अजून मेंदी सुद्धा उतरलेली नाही. तुम्ही फक्त काय हवं ते मला सांगायचं."
"ताई मला अशी सवय नाही हो. ठीक आहे मी इथेच बसते तुमच्याशी गप्पा मारत."
इतक्यात आई खाली आल्या. त्या गीताला म्हणाला,
"आम्हाला दोघींना इथे चहा दे. उमा चहा घेऊन तू जरा सभोवताली फेरफटका मारून ये. सकाळच्या वेळी खूप छान वाटतं. तोपर्यंत सगळ्यांचं आवरून झालं की नाश्ता होईल. गुरुजी येणार आहेत सकाळी दहा वाजता."
चहा घेताना दोघी गप्पा मारत होत्या. शकुंतला ताई उमाला म्हणाल्या,
"उमा कसं वाटतंय तुला इकडे. तुला कधीही आई-बाबांची आठवण आली की आई बाबांना फोन करत जा. त्यांच्याशी बोलत जा तुला बरं वाटेल. आता फेरफटका मारशील तेव्हा त्यांच्याशी बोल फोनवर."
"आपलं घर आवडले मला. खूपच मोठं आहे. मला जरा सगळं समजून घ्यायला वेळ लागेल."
चहा पिऊन उमा मागे बागेत गेली. लहानपणापासूनच ती झाडांमध्ये रमायची. तिने आधी आई-बाबांना फोन केला आणि तिची खुशाली कळवली. आई म्हणाली,
"तुझा आवाज ऐकून खूप बरं वाटलं ग. रोज सकाळी उठले की तुझा चेहरा दिसायचा." रमाताईंचा आवाज थोडा रडवेला झाला.
"थांब मी व्हिडिओ कॉल करते म्हणजे तू माझा चेहरा बघू शकशील आणि मी पण तुमचा चेहरा बघू शकते. आई आता आनंदी राहायचं. तू आणि बाबा आनंदी असलात तर मला सुद्धा इथे तुमची काळजी वाटणार नाही."
व्हिडिओ कॉल करून ती आई-बाबांशी बोलली नंतर एका अर्धोन्मिलीत गुलाबाच्या कळीला हळूच स्पर्श करत ती म्हणाली,
"जशी मी या घरात नवीन आहे तशीच तू सुद्धा आता या जगात यायला नवीन आणि उत्सुक आहेस. तुझ्या आणि माझ्या भावना खूपच सारख्या आहेत. आता तू थोड्या वेळाने पूर्ण उमलून सगळ्यांना मंद मधुर सुवास देशील. तुझ्याकडे बघून सर्वांना खूप आनंद होईल. तुझ्या जीवना सारखंच माझंही आयुष्य असू दे. माझ्याकडून नेहमी सर्वांना आनंद मिळू दे."
उमा सगळ्या झाडांशी, रोपांशी बोलण्यात रमली असतानाच शकुंतला ताईंनी तिला हाक मारली,
"अगं उमा झाडांशी बोलून झाले असेल तर ये आता तयार हो. गुरुजी यायची वेळ झाली आहे."
"हो हो आले आले."
ती घरात आली तेव्हा मानस आणि बाबा दोघेही चहा घेत होते. इतर सगळे रात्री उशिरा झोपल्यामुळे अजून उठले नव्हते. मानसला पण उमा झाडांशी बोलत होती हे ऐकून मजा वाटली. त्या दोघांना उद्देशून शकुंतला ताई म्हणाल्या,
"आता तुम्ही दोघं जा आणि वेळेवर तयार होऊन खाली या."
दोघेही तयार व्हायला गेले. उमा आईच्या खोलीत गेली आणि तिने गॅलरीतून पाहिलं तर सूर्योदय झाला होता. निसर्गाचे ते रूप तिला डोळ्यात साठवावंसं वाटलं. तिने पाहिलं उगवतीचे लाल गुलाबी रंग अस्मानात विखुरले होते. तिच्या लक्षात आलं अरे आपण तयारी करायला आलो होतो. ती भरभर तयार झाली. आज तिने गर्द हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. त्याला पिवळ्या रंगाचे काठ उठून दिसत होते.एक सैलसर वेणी घालून त्यावर मोगऱ्याचा गजरा घातला होता. कपाळावर चंद्रकोर रेखली होती. तिने ड्रेसिंग टेबल मध्ये पाहिलं तर खूप सौंदर्य प्रसाधनं उपलब्ध होती. तिने
हलकासा मेकअप केला. तेथील पूर्णाकृती आरशामध्ये तिने तिचं रूप पाहिलं. स्वतःच्याच प्रतिमेवर खुश होऊन ती खाली यायला निघाली.
हलकासा मेकअप केला. तेथील पूर्णाकृती आरशामध्ये तिने तिचं रूप पाहिलं. स्वतःच्याच प्रतिमेवर खुश होऊन ती खाली यायला निघाली.
खाली पूजा सांगायला गुरुजी आलेच होते. मानस पण तयार झाला होता. त्यांना मोठ्यांना नमस्कार करून पूजेसाठी बसायला सांगितले. पूजा विधी करताना उमाला मानसच्या हाताला हात लावायचा होता. तिच्या मनात येत होतं हा हात कायम असाच हातात राहिला पाहिजे. पूजा चालू असताना शकुंतला ताई मधून मधून स्वयंपाक घरात जाऊन सगळं व्यवस्थित चाललंय ना याची देखरेख करत होत्या. पूजा विधी यथासांग पार पडल्यावर दोघेही तिथून उठले.
स्वयंपाक घरात आपली काही मदत हवी आहे का हे पाहायला उमा किचनमध्ये गेली. तिने पाहिलं तर गीता ताईंना काम करता करता भोवळ आल्यासारखं झाले. ती धावतच पुढे गेली आणि त्यांना हाताला धरून खुर्चीवर बसवलं. तिने विचारलं काय होतंय. लगेच त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि सुधाताईंना त्यांच्याजवळ थांबायला सांगून पटकन फ्रिज मधून लिंबू काढून सरबत केलं. सरबत पिताच गीताताईंना हुशारी वाटली. सकाळपासून सारखी गीताताईंची कामाची लगबग चालली होती म्हणून अति श्रमाने त्यांना भोवळ आली. उमा काळजीने त्यांना म्हणाली,
"आता तुम्ही थोडा वेळ आराम करा. काय करायचे ते मला सांगा मी करते. आराम केल्यावर तुम्हाला बरं वाटेल. माझ्या मदतीला या दोघी पण आहेत."
इतक्यात आवाजाने शकुंतलाताई आतमध्ये आल्या. त्यांना उमाचं खूप कौतुक वाटलं. नवी नवरी असून सुद्धा इतरांची किती काळजी घेते. त्या पुढे आल्या आणि उमाला म्हणाल्या,
"उमा तू बाहेर हॉलमध्ये जा नवी नवरी आहेस काही करायचं नाही. मी माला आणि शीलाला बोलावून काय राहिले ते आम्ही तिघी सुधा आणि मंदाच्या मदतीने करून घेऊ."
शकुंतलाताई बाहेर आल्या आणि सर्वांसमोर उमाचं कौतुक करू लागल्या,
"बघा कोण म्हणेल की माझी सून नवीन नवरी आहे. तिने अगदी प्रसंगावधान राखत गीता ताईंना पडताना धरलं. त्यांना सरबत करून दिले. दुसरी एखादी असती तर आरडा ओरडा करून सगळ्यांना जमा केलं असतं. पण हिने शांतपणे परिस्थिती हाताळली. बरं चला माला आणि शीला जरा तुम्ही स्वयंपाक घरात या माझ्याबरोबर. काय राहिले ते आपण बघू."
सगळेजण उमाकडे खूप कौतुकाने बघत होते उमाला खूपच लाजल्यासारखं झालं. ती म्हणाली,
"आई मी एवढं काही विशेष केलं नाही. माझ्या जागी कोणीही असतं तरी माणुसकीच्या नात्याने हेच केलं असतं."
स्वयंपाक घरात बसलेल्या गीताला पण उमा बद्दल ह्याच भावना होत्या. पूजेसाठी उमाचे आई-बाबा, राधाताई पण आले होते त्यांना सुद्धा आपल्या उमाचं कौतुक ऐकून अभिमानाच वाटला.
(उद्या देवदर्शन आहे. देवीसमोर उमा आणि मानस कसे सामोरे जातील पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे