Login

तिची तपश्चर्या - भाग २९

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग २९

देवदर्शनाला निघालेले उमा आणि मानस कोणत्या प्रसंगाला सामोरे जातील पाहूया पुढे..

काल‌ रात्रीच शकुंतला ताईंनी उमा आणि मानसला लवकर उठायला सांगितले होते. त्यांची कुलस्वामिनी दोन गावं सोडून होती. प्रवासात बराच वेळ जाणार होता म्हणून लवकरच निघायला लागणार होतं. दोघेही सकाळी खूप छान तयार झाले होते. उमाने राणी कलरच्या सिल्कच्या साडीला नेव्ही ब्लू कलरचे काठ असलेली साडी नेसली होती. तिच्या गोऱ्या रंगाला ती खूपच उठून दिसत होती. मानसने नेव्ही ब्लू कलरचा शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट घातली होती. सकाळी फक्त चहाच पिऊन दोघं निघाले. वाटेतच काही खाऊ असं त्यांनी ठरवलं होतं. खरंतर देवदर्शनाला त्यांच्याबरोबर मानसचा भाऊ आणि वहिनी जाणार होते परंतु वहिनीला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून ते दोघेच निघाले.

मानस सफाईदारपणे गाडी चालवत होता. वातावरणात गारठा असल्यामुळे त्याने एसी बंद ठेवला होता आणि खिडकीची काच थोडी खाली केली होती. त्यामुळे उमाच्या केसांच्या खट्याळ बटा तिच्या गालाशी सलगी करत होत्या. मानस विचार करत होता की उमाला बाहेर फिरायला कुठे जायचं ते आत्ताच विचारलं तर तिला आवडेल की नाही. परंतु कुठे जायचं असेल तर लवकर बुकिंग करायला हवं म्हणून त्याने उमाला विचारलं,

"आई मागे लागली आहे की आपण दोघांनी कुठेतरी बाहेर फिरायला जावं. ‌ तू आत्तापर्यंत कधी कुठे बाहेर गेली आहेस का. तुला कुठे जायला आवडेल?"

"माझं असं काहीच नाही तुम्ही जिथे न्याल तिथे मी आनंदाने येईन. मी आपल्या गावाबाहेर कधी फिरायला गेलेच नाही. त्यामुळे कुठेही गेले तरी माझ्यासाठी सगळं नवीनच असणार आहे."

"हो तरी पण तुला असं मनात काहीतरी असेलच ना. कधी कुठे वर्णन वाचलेलं, कधी सिनेमात पाहिलेलं अशा एखाद्या ठिकाणी तुला वाटत असेल आपण जायला हवं तर तू सांग आपण तिथेच आधी जाऊ."

"खरं सांगू का मला लहानपणापासूनच काश्मीर बद्दल खूप आकर्षण आहे. शाळेपासून शिकलो ना काश्मीर भारताचं नंदनवन आहे. खूप सिनेमांमध्ये पण काश्मीरचं निसर्ग सौंदर्य पाहिलेले आहे त्यामुळे मला असं वाटतं की कधीतरी काश्मीरला जायला हवं."

"बरं झालं सांगितलंस. आता मी उद्याच काश्मीरचं बुकिंग करून टाकतो. आपण विमानाने जाऊया ते बरं पडेल."

"बापरे विमानाने! मी अजून कधीच विमानात बसले नाही. मला जमेल ना." उमा अगदी बालसुलभ भावनेने बोलली. मानस गालातल्या गालात हसला. इतक्यात त्याने पाहिलं की एक गरोदर स्त्री आणि तिच्या बरोबर एक बाई आणि पुरुष, बहुतेक त्या गरोदर बाईचा नवरा असावा गाडीला थांबवण्यासाठी हात करत होते. उमाने पण तेव्हाच ते दृश्य पाहिलं आणि तिला वाटत होतं की मानसने गाडी थांबवावी. त्यांच्या जवळ येताच मानसने गाडी थांबवली. लगेच उमा आणि मानस खाली उतरले. त्या पुरुषाला बघितल्यावर मानस उद्गारला,

"अरे विश्वनाथ तू काय झालं. वहिनींना बरं वाटत नाहीये का?" विश्वनाथ हा मानसच्याच फॅक्टरीत काम करणारा एक कामगार होता.

"हो साहेब हिचे दिवस भरत आले आहेत आणि आज सकाळी उठल्यावरच तिच्या पोटात दुखायला लागले. आम्ही कधीपासून एखादी गाडी येते का बघत होतो. दोन-तीन गाड्या गेल्या पण कोणीच गाडी थांबवली नाही."

"बरं चला तुम्ही लवकर गाडीत बसा आपण यांना घेऊन जाऊया हॉस्पिटलमध्ये."

"साहेब तुमचे खूप उपकार झाले. अगदी देवदूता सारखे धावून आलात."

"अरे उपकाराची भाषा नको. तुम्ही आधी लवकर बसा."

मानसने विश्वनाथला विचारलं,
" कोणत्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे यांना"

"खरं तर तिचं नाव तालुकाच्या हॉस्पिटलमध्ये घातले आहे पण ते इथून खूप लांब आहे. रस्त्यातच तसा काही प्रसंग आला तर. त्यामुळे काही कळतच नाही. इथल्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये हीचं नाव पण नोंदवलेले नाहीये."

"तू काळजी करू नकोस तिथल्या डॉक्टरांशी मी बोलतो. सगळं नीट व्यवस्थित पार पडेल."

"साहेब तुमचं नवीनच लग्न झालंय तुम्ही कुठेतरी निघाला आहात ना. आमच्यामुळे तुमचा खोळंबा होतोय."

"अरे आम्ही देवदर्शनाला निघालो आहोत. ‌ तिथे आम्ही जाऊच परंतु तुम्ही अडचणीत असताना आम्ही तुम्हाला असेच वाऱ्यावर ‌सोडून जाणार नाही."

उमाने पाहिलं विश्वनाच्या पत्नीला खूपच त्रास होत होता. तिला श्वास सुद्धा नीट घेता येत नव्हता. उमाने लगेच तिला तिच्या बाटलीतलं पाणी प्यायला दिले. थोडं पाणी प्यायल्यावर तिला हुशारी आली. दुसरी बाई बहुतेक विश्वनाथची आई असावी. ती तिच्या पाठीवरून सारखा हात फिरवत होती. पाठ हळुवारपणे दाबत होती. इतक्यात हॉस्पिटल आलं. मानस उमाला म्हणाला,

"उमा तू पटकन वॉर्डबाॅयला स्ट्रेचर आणायला सांग मी गाडी पार्क करून येतो लगेच. विश्वनाथ वहिनीला सावकाश उतरव. स्ट्रेचर येईलच आता."

उमा धावतच आत मध्ये गेली आणि वॉर्डबाॅयला स्ट्रेचर आणायला सांगितलं. मानस‌ गाडी पार्क करून आला आणि रिसेप्शनीस्टला इमर्जन्सी आहे‌ मला डॉक्टरांना भेटायचं आहे असं सांगितलं. तिने डॉक्टरांच्या केबिन कडे इशारा केला. मानस धावतच डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. त्याला पाहून डॉक्टर लगेच उभे राहिले,

"मानस साहेब तुम्ही इथे! काय काम आहे."

मानसने त्यांना सगळा प्रकार सांगितला. डॉक्टर स्वतःच बाहेर आले आणि सिस्टरला म्हणाले ह्यांना लगेच लेबर रूम मध्ये घेऊन जा मी तिथे येऊन त्यांना तपासतो. ते मानस ला म्हणाले,

"तुम्ही ऍडमिशनच्या फॉर्मलिटीज पूर्ण करा मी त्यांना चेक करून येतो." मानसने पाहिलं विश्वनाथ खूप टेन्शनमध्ये उभा होता. त्याने स्वतःच फॉर्म भरून ॲडमिशनच्या फॉर्म्युलीटीज पूर्ण केल्या पैसे सुद्धा भरले. विश्वनाथच्या पाठीवर हात ठेवून काळजी करू नको सगळं ठीक होईल सांगितलं. इतक्यात डॉक्टर आले आणि म्हणाले,

" आता थोड्याच वेळात त्यांची प्रसूती होईल. सर्व काही नॉर्मल आहे काळजी करू नका. तुम्ही अगदी योग्य वेळी त्यांना इथे आणलं आहे नाहीतर अनर्थ ओढवला असता." विश्वनाथ मानसला म्हणाला,

"साहेब आता तुम्ही दोघेजण जा मी आणि आई आहोत. आम्ही सांभाळून घेऊ."

"वेडा आहेस का आम्हाला थोडा उशीर होईल त्यात काही हरकत नाही." उमा मानसच्या आईबरोबर बसली होती. त्यांच्या हातावर हात ठेवून ती त्यांना धीर देत होती.

मानसच्या घरी सगळे त्याची आणि उमाची जेवणासाठी वाट पाहत होते. दोघांनाही फोन केला पण कोणीच उचलला नाही म्हणून सगळे टेन्शनमध्ये होते. शकुंतला ताईंच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. त्यांना वाटत होतं त्यांच्या बरोबर आपण कोणाला तरी पाठवायलाच पाहिजे होतं. मानसने फोन हातात घेऊन पाहिला तर त्याला पाच सहा मिस्ड कॉल दिसले. म्हणून त्यांनी घरी कळवलं की आम्हाला यायला उशीर होईल तुम्ही सर्व जेवून घ्या. त्याचा फोन आला तेव्हा सर्वांच्या जीवात जीव आला.

हॉस्पिटलमध्ये सगळे जिथे बसले होते तिथे सिस्टर आली आणि आनंदाने सांगू लागली मुलगी झाली आहे. विश्वनाथला खूप आनंद झाला. किती छान. त्याला खुश पाहून मानस म्हणाला,

"विश्वनाथ मुलगी झाल्यावर पण तू खुश झालास तुझं अभिनंदन आहे. हल्ली सर्वांना मुलगा पाहिजे असतो. 'पहिली बेटी धनाची पेटी' पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन." मानस विश्वनाथच्या आईजवळ जाऊन त्यांना नमस्कार करून म्हणाला,

" तुम्ही आजी झालात. मला पण खूप आनंद झाला
आहे. " नंतर विश्वनाथ आणि त्याच्या आईचा निरोप घेऊन उमा आणि मानस निघाले. निघताना मानसने विश्वनाथच्या हातात काही पैसे ठेवले तेव्हा त्याला गहिवरून आलं. मानस उमाला म्हणाला,

"नशीब आपण वेळेवर पोहोचलो त्यामुळे विश्वनाथ आणि त्याच्या पत्नीला मदत मिळाली. नाहीतर बिचाऱ्यांवर काय परिस्थिती ओढवली असती."

"हो ना. चांगल्या माणसांच्या मदतीला देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावून जातो याची आता खात्री पटली."

"ए बाई तो विश्वनाथ मला देवासारखा धावून आला म्हणाला आता तू पण मला देव नको म्हणूस. नाहीतर आपल्याला देवळात जायची गरज कशाला भासली असती इथेच देवदर्शन झालं असतं ना." उमा अगदी मनमोकळेपणाने हसली.

दोघे देवळात पोचले तेव्हा नुकतीच आरती झाली होती. गुरुजी सगळ्यांना प्रसाद वाटत होते. दोघांनी प्रसाद घेतला. मानस गुरुजींना म्हणाला,

"गुरुजी क्षमस्व आम्हाला उशीर झाला आहे पण आम्हाला ओटी भरायची आहे."

"हरकत नाही तुम्ही ओटी भरू शकता".

दोघांनी व्यवस्थित ओटी भरली गुरुजींचे आशीर्वाद घेतले आणि तिथून परतीच्या मार्गाला लागले.

(घरी आल्यावर मानस आणि उमाला कोणतं सरप्राईज असेल पाहूया पुढील भागात)

क्रमशः


©️®️ सीमा गंगाधरे