तिची तपश्चर्या - भाग ३०
सरप्राईज काय असेल बरं देवदर्शनाहून परतलेल्या मानस आणि उमासाठी. पाहूया पुढे..
देवदर्शन खूप छान उमाच्या मनाप्रमाणे झालं त्यामुळे ती खूप खुश झाली. मानस बरोबरच्या आयुष्याची सुरुवात देवीच्या आशीर्वादाने झाली. देवीला नमस्कार करताना उमाने प्रार्थना केली की मानस मला खूप समजून घेतोय, मला योग्य तो आदर देतोय पण त्याच्या मनात माझ्याबद्दल कधी ना कधीतरी प्रेमभावना निर्माण होऊ दे. उमाला कसलीच घाई नव्हती. पण तिला आत्मविश्वास होताच. अर्थात त्याचं प्रेम मिळवण्यासाठी ती काही वेगळे मार्ग अवलंबणार नव्हती एवढं निश्चित. प्रेम ही एक हळुवार भावना आहे जी नैसर्गिक रित्या एखाद्याच्या मनात उत्पन्न व्हायला हवी तरच ते शाश्वत असतं.
आज मानसने तिला विचारलं होतं की फिरायला कुठे जायचं. त्याने खूप आग्रह केल्यामुळे तिने तिला काश्मीर बघायचे असं सांगितलं. अगदी लहानपणापासूनच काश्मीर बघायचं स्वप्न उमाने मनाशी बाळगलं होतं. तेव्हा ते कधी पूर्ण होईल अथवा नाही याची तिला खात्री नव्हती. स्वप्न पूर्ण होणार म्हणून आनंद तर आहेच शिवाय ते स्वप्न मानस बरोबर पूर्ण होणार हा दुहेरी आनंद उमाला जास्त प्रिय होता.
देवदर्शन होऊन परतल्यावर घरी येऊन शकुंतला ताईंनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या उशिरा येण्याचं कारण कळल्यावर त्यांना आपल्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल खूप आदर, कौतुक वाटलं. दोघेही जण अगदी माणुसकी जपणारे आहेत. नवीन जोडपं देवदर्शनला निघालं होतं तरीसुद्धा वाटेत अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्याचे कर्तव्य त्यांनी आधी बजावलं. शकुंतला ताई त्यांना म्हणाल्या,
"जेवण बाकी असेल ना तुमचं. दोघेही हातपाय धुवून आधी जेवून घ्या मग थोडा आराम करा. मानस आज तू पण खालीच कुठेतरी आराम कर. रूम मध्ये आता एकदम रात्री जा. आज उमा तू पण मानसच्याच खोलीत झोप. मी गणेशला तुझी बॅग त्या रूम मध्ये ठेवायला सांगितले." इतक्यात शामराव तिथे आले आणि मानसला म्हणाले,
"अरे त्या विश्वनाथचा मला फोन आला होता त्याने सांगितलं की तुम्ही त्यांना कशी मदत केली. सारखा आपले मानस साहेब देवच आहेत, देवच आहेत असं बोलत होता."
"बाबा त्यावेळी तो खूपच टेन्शनमध्ये होता. त्याला मुलगी झाली आणि बायकोची सुखरूप सुटका झाली तेव्हा त्याने निश्वास सोडला."
"तुमचं देवदर्शन व्यवस्थित झालं ना! उमा तुला काही त्रास झाला नाही ना!"
"नाही बाबा ते देऊळ खूपच छान आहे आणि तिथली व्यवस्था पण खूप सुंदर आहे."
"बरं आता तुम्ही आराम करा."
उमा विचार करत होती आज आईंनी मानसला खालीच आराम कर असं का सांगितलं. वरच्या रूम मध्ये काही काम चाललं असेल का. आता तिथे गेल्यावरच कळेल. मानस पण आजूबाजूला बघत होता त्याचे कोणीच भाऊ दिसत नव्हते. शीलाताई पण कुठे दिसत नव्हती. सगळीकडे अगदी सामसूम होती. त्याला वाटलं सगळे अगदी 'ढाराढूर पंढरपूर' झोपले असतील. तीन-चार दिवस सगळ्यांनाच दगदग झाली होती. मानस थोडावेळ तिथे खालीच सोफ्यावर आडवा झाला. उमाला शकुंतला ताईंनी त्यांच्याबरोबर एका गेस्ट रूममध्ये नेलं.
संध्याकाळी सगळ्यांच्या आवाजाने मानसला जाग आली. दुपारपासून कुठे दिसत नसलेले त्याचे मस्तीखोर भाऊ सगळे खाली आले होते. मानस जागा झाल्यावर त्यांची हळू आवाजात कुजबूज सुरू झाली. शीलाताई आणि त्याची दुसरी मावसबहीण राधिका पण त्यांच्यात सामील झाली. मानस विचार करत होता यांचं सगळ्यांचं चाललंय तरी काय. त्यांच्या आवाजाने उमा आणि शकुंतला ताई पण बाहेर आल्या. गीता ताई सगळ्यांसाठी चहा घेऊन आल्या. मानस त्यांना म्हणाला,
"गीता ताई अगदी योग्य वेळी चहा आणलात. चहाची खूप गरज होती."
"घ्या तुम्हीच पहिला कप घ्या." गीता ताईंनी सगळ्यांना चहा दिला. चहा प्यायलावर मानसने सर्व भावंडांना विचारलं,
"काय रे तुमची काय खलबतं चालली आहेत मला पण कळू दे की जरा."
"अरे दादा जरा धीर धर रात्रीची जेवणं होऊ दे मग आम्ही तुला सगळं सांगणार." सगळे मिश्किल हसायला लागले.
"आता उद्या सकाळी आम्ही सगळेजण आपापल्या घरी जाणार आहोत. हा थोडा वेळ आपण सगळेजण लॉनवर बसून एक खेळ खेळूया. तेवढीच जरा धमाल."
"चांगली आयडिया आहे चला. हो पण काय खेळ खेळायचा. धावाधाव नको आता पाय खूप दुखत आहेत."
"आपला नेहमीचाच 'पास द पार्सल' तो गेम खेळूया. म्युझिक थांबल्यावर ज्याच्याकडे ही छोटी उशी असेल त्याने गाणं म्हणायचं."
लगेच पटापट लाॅन मध्ये खुर्च्या लावल्या. म्युझिक सिस्टीम बाहेर आणली. खेळ सुरू झाला. ज्याने खेळाची आयडीया दिली त्याला मानसने सांगितलं,
"ओ भाऊ अजिबात लबाडी करायची नाही. मुद्दामहून माझ्याकडे किंवा उमाकडे उशी आल्यावर म्युझिक थांबवायचं नाही. कळलं ना"
"हो रे दादा तू कशाला काळजी करतोस!"
पहिल्यांदाच म्युझिक थांबलं तेव्हा उशी शकुंतला ताईकडे होती. त्या विचार करू लागल्या कोणतं गाणं म्हणायचं आणि त्यांना एकदम एक सुंदरसं गाणं आठवलं,
"घरात हसरे तारे असता
मी पाहू कशाला नभाकडे'
मी पाहू कशाला नभाकडे'
आईचा आवाज छान होता. गाण्याचा मुखडा गायला आणि सर्वांनी खूप टाळ्या वाजवल्या. त्यांची बहीण माला म्हणाली,
"शकू आताच्या घडीला अगदी समर्पक गीत गायलंस. आजच्या घडीला जगात तुझ्या एवढं समाधानी कोणीच नसेल. दृष्ट नको ग बाई लागायला."
म्युझिक पुन्हा सुरू झालं आणि एक एक करत चार-पाच जणांची पाळी झाल्यावर उमाकडे उशी असताना म्युझिक थांबलं. उमा एकदम बावरली,
"अरे बापरे आता मी कोणतं गाणं म्हणणार."
"वहिनी कोणतंही एक सुंदर गाणं म्हणा त्याशिवाय तुमची सुटका नाही." उमाने तिच्या सुरेल आवाजात एक सुंदर गीत गायलं,
"एकदाच यावे सखया तुझे गीत कानी
धुंद होऊनी मी जावे धुंद त्या सुरांनी "
धुंद होऊनी मी जावे धुंद त्या सुरांनी "
उमाचं गाणं संपलं आणि सगळ्यांनी 'वाह वा वाहवा' करायला सुरुवात केली. महेश तर म्हणाला,
"वहिनी तुम्ही एवढे सुरेल गाता माहीत नव्हतं आम्हाला. आता पुढल्या वेळेपासून फक्त तुमच्याच गाण्याचा कार्यक्रम होईल." लगेच मानस म्हणाला,
"चला बरं झालं आमची गाण्यापासून सुटका झाली."
"दादा मी म्हटलं पुढल्या वेळेपासून यावेळी तुला गावंच लागणार आहे."
पुन्हा म्युझिक सुरू झालं आणि नेमकी मानसच्या हातात उशी असताना म्युझिक थांबलं. सगळे त्याला चिडवायला लागले.
"बघितलं म्हणून टाळाटाळ करायची नाही" मानस कडे पण गाण्यांचा खूप मोठा खजाना होता. त्याने लगेच सुरू केलं,
"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे"
"वा मानस गाण्याची निवड खूप छान "
सगळ्यांची गाणी म्हणून झाल्यावर खेळ संपला तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. मानसचा भाऊ सुधीर म्हणाला,
"चला आज रात्रीची जेवणं आपण लवकरच उरकून घेऊया. म्हणजे नवरा नवरीला त्यांचा निवांत वेळ जास्त मिळेल." शकुंतला ताई त्याला म्हणाल्या,
"कसला चहाटळ आहेस रे तू. उमाकडे बघ कशी लाजेने चूर झाली आहे. हो पण सगळेच लवकर जेवूया एवढं मात्र खरं."
सगळ्यांची जेवणं उरकल्यावर मानसची भावंड त्याला चिडवायला लागली,
"मानस जेवणं लवकर झाली असली तरी जास्त जागरण करू नकोस. लवकर झोप. उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत. आम्हाला बाय करायला खाली येशील ना!"
"ए गप रे मी आता जातो मला खरंच खूप झोप येते."
"जा जा मी आता काय बोलत नाही."
थोड्यावेळाने मानस त्याच्या रूमवर गेला. बाकी सर्वजण पण झोपायला गेले.शकुंतला ताई उमाला म्हणाल्या,
"उमा तू पण जा आता मानसच्या रूम मध्ये झोप. जाताना दुधाचा ग्लास घेऊन जा. उद्या उठायची घाई करू नको जेव्हा जाग येईल तेव्हाच उठ."
आणखी संवाद वाढायला नको म्हणून उमा पटकन दुधाचा ग्लास घेऊन मानसच्या खोलीत वरती गेली.
वर गेल्यावर पाहते तर मानसची रूम खूपच आकर्षक रित्या सजवली होती. म्हणूनच ते सगळेजण एवढा वेळ वर होते असं वाटतं. मानसला पण त्यांनी वर येऊ दिलं नाही. खरोखर हे खूपच छान सरप्राईज आहे असं उमाच्या मनात आलं.
(मानस आणि उमा मध्ये काय संवाद होईल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे