Login

तिची तपश्चर्या - भाग ३१

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग ३१

एक आगळवेगळं नातं असलेल्या उमा आणि मानसच्या आयुष्यातील पहिली रात्र कशी असेल पाहू पुढे...

मानस सर्वांना बाय करून वर आला आणि त्याच्या रूमचं पालटलेलं रूप पाहून त्याचे डोळे विस्फारले गेले. रूम सजवण्यासाठी त्याच्या भावंडांनी त्यांचं सारं ‌कसब पणाला लावलं होतं. त्यांना माहित सुद्धा नसेल की अशा सजवलेल्या रूमचं आपल्याला काही अप्रूप वाटणार नाही. सजलेली रूम काय आणि नेहमीची रूम काय आपल्यासाठी सगळं सारखंच आहे. मधल्या मध्ये उमाच्या भावनांचा मात्र कोंडमारा होतो. आपल्यापेक्षा हे सर्व निभावणे उमासाठी निश्चितच अवघड आहे. असे सर्व पाहून त्याला नंदिनीची खूप आठवण येत होती. आज नंदिनी असती तर आपण किती उत्साहाने या सगळ्यात भाग घेतला असता. ध्यानीमनी नसताना नंदिनी अचानकच आपल्याला सोडून गेली. असं असलं तरी उमाचं मन आपल्याला सांभाळायला हवं. उमा किती निरागस आहे तरीसुद्धा वयाच्या मनाने ती खूप समंजस आहे.

मानसच्या मनात असे विचार चाललेले असतानाच उमा दुधाचा ग्लास घेऊन रूममध्ये आली. रूममध्ये प्रवेश करताच तिथली सजावट पाहून ती हरखून गेली. आईने दुपारी मानसला खालीच आराम करायला का सांगितलं त्याचं कारण तिला आत्ता कळलं. फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. तिने पाहिलं तर मानस बेडवर उशीला टेकून एक पुस्तक हातात धरून वाचायचा प्रयत्न करत होता. त्याच्या चेहऱ्यावरून लक्षात येत होतं की त्याचं वाचण्यात काहीच लक्ष नाही. ती आल्यावर मानस म्हणाला,

"ये उमा बस. आज दिवसभर खूप वणवण झाली
दमली असशील. या सर्वांनी रूमचं रुपडंच पालटून टाकलंय."

"हो ना खूपच सुंदर सजवली आहे रूम आणि मी काही दमले नाही पण खाली सगळे बोलत बसले होते ना म्हणून जरा वेळ झाला." उमाने दुधाचा ग्लास बाजूच्या टेबलवर ठेवला आणि मानसला विचारलं,

"कोणतं पुस्तक हातात घेऊन वाचायचा प्रयत्न करत आहात? मला माहिती आहे तुमचं पुस्तकात अजिबात लक्ष नाही. तुम्हाला नंदिनी ताईंची आठवण येते ना! तुम्हाला तिच्याबद्दल माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. मी तुमचं मन नक्कीच समजू शकते."

"उमा मला खरंच खूप आश्चर्य वाटतं तू खूप वेगळीच मुलगी आहेस. समोरच्याला समजून घेणं सगळ्यांना शक्य होत नाही गं. बरं तुझं आज नीट जेवण झालं नाही ते दूध तूच पिऊन टाक आणि तू इथे वरती झोप मी खाली झोपेन."

"अहो नाही मला खाली झोपायची सवय आहे. घरी मी आणि आई खाली झोपायचो आणि बाबा फक्त बेडवर झोपायचे. तसं पण दोन दिवस मी आईंच्या बाजूला झोपले होते मला मऊ गादीवर झोपच येत नव्हती. कसं असतं ना श्रीमंतीची पण सवय असावी लागते."

"असं काही नाही उमा. तू मनाने खूपच श्रीमंत आहेस. पैशाची श्रीमंती आज असते उद्या नसते पण मनाची श्रीमंती आयुष्यभर आपण तशीच राखू शकतो. माझ्या अशा वागण्यामुळे तुला खूपच त्रास होत असेल. पण तू मला नक्कीच समजून घेशील याची मला खात्री आहे."

"तुम्ही सारखं सारखं असं बोलू नका. मला वाईट वाटतं. नंदिनीताईंबद्दलच्या तुमच्या भावना मी समजू शकते आणि त्याचा आदर पण करते. हल्लीच्या जगात इतकं निस्सीम प्रेम करणारी व्यक्ती असू शकते यावर आधी माझा फक्त विश्वास होता. पण तुम्हाला बघितल्यावर तो दृढ झाला. नाहीतर आपण आजूबाजूला पाहतो तर किती वेळा मुला मुलींचं ब्रेकअप होतं आणि किती वेळा नवीन प्रेम होतं. 'तू नही तो और सही' हीच वृत्ती दिसते."

"तरीपण माझ्या मनात एक अपराधीपणाची भावना आहे. अच्छा आणि मी ते ऑफिस मधील मयूरला आपल्या काश्मीर बुकिंगचं सांगितलं आहे. बहुतेक परवाच आपल्याला निघावं लागेल. तू उद्या तुझी बॅग भरून ठेव. तुझ्याकडे मध्यम आकाराची बॅग नसेल ना नाहीतर मी तुझ्यासाठी उद्या बॅग काढून ठेवतो त्यात तुझे कपडे भर. तू नक्की खाली झोपशील ना. खाली झोपलीस तरी अंथरूण पांघरूण आवरून परत कपाटात ठेवायचं लक्षात ठेव. रूम साफ करायला मावशी वर येतात. त्यांना काही वावगं दिसायला नको."

"हो हो मी खाली झोपेन आणि मी आवश्यक ती काळजी घेईन. घरात कोणालाच काही कळणार नाही याची हमी मी तुम्हाला देते. तुम्ही ते दूध पिऊन निवांत झोपा. काश्मीरला आपण किती दिवसांसाठी जाणार आहोत म्हणजे त्याप्रमाणे मला माझे कपडे भरायला."

"तुला काय वाटतं भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये तुला किती दिवस राहायचे आहे. तुला जितके दिवस राहायचं असेल तितके दिवस आपण राहू. तू मनसोक्त काश्मीर फिरून घे."

"नाही असं कसं मला माहिती आहे तुमची कामं आहेत. मी अशा हेतूने विचारलं की त्याप्रमाणे मला बॅगमध्ये कपडे भरायला."

"उमा मला माहितीये तू खूप समंजस आहे. मला एक आठवड्याच्या वर तिथे नाही राहता येणार. इथे खूप जबाबदारीची कामं आहेत. लग्नात पण सुट्टी झाली आहे. त्यामुळे मी आठ दिवसानंतर परतीचं तिकीट बुक करतो."

"हो माझी काही हरकत नाही. मला काश्मीर बघायचं माझं स्वप्न पूर्ण होणार ह्यातच खूप आनंद आहे. काश्मीर मधील बर्फ, शिकाऱ्यातलं वास्तव्य हे सर्व मला अनुभवायचं आहे."

"कसं आहे ना समजा तिकडे आठ दिवसात तुला असं वाटलं की अजून राहायला हवं‌‌ होतं तर आपण पुन्हा एकदा काश्मीरला जाऊ शकतो. तुला हवं तेवढं तू फिर. कधी मला वेळ नसेल तेव्हा तू,‌ माझे आई बाबा, तुझे आई बाबा असे तुम्ही एकत्र जाऊ शकता. बरं तू झोप आता खूप उशीर झाला आहे."

उमाने तिच्यासाठी खाली अंथरूण घातलं, उशी घेतली. ती झोपायचा प्रयत्न करत होती. रात्री झोपताना रोजच तिच्या मनात वेगवेगळे विचार येत असायचे. त्या दिवशी आई पण आपल्याला म्हणाल्या की आता तुझे बाबा निवृत्त झाले की आम्ही दोघं आणि तुझे आई बाबा असे आम्ही कुठे कुठे फिरायला जात जाऊ. तुझ्या बाबांच्या नोकरीमुळे आणि आईच्या छोट्या उद्योगामुळे त्यांनी कधी निवांत क्षण अनुभवलेच नसतील. आम्ही दोघं अधून मधून जातच असतो तेव्हा त्यांनाही घेऊन जायचं. आज मानस पण तेच म्हणाला. मानसला मनापासून वाटते की आपण हे जग बघावं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जावं. फक्त आपल्याबद्दलच नाही तर आपल्या आई बाबांबद्दल पण त्याला असं वाटतं. जे रक्ताचे नातेवाईक असतात ते सुद्धा कधी एवढा विचार करत नाहीत. पण कधीकधी जोडलेली नाती सुद्धा अनमोल ठरतात.

खरं तर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती असेल कोणी सांगू शकत नाही. तरी पण अशी कितीतरी माणसं असतात जे इतरांचा दुस्वास करत बसतात. कोणाचं काही चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही. पण असं वागून कधी कोणाला समाधान मिळतं का? कधीच नाही. आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हाच आपल्याला शांत झोप लागते. इतरांशी वागताना आपण कायम त्या समोरच्या व्यक्तीच्या जागी आहोत असा विचार करूनच वागलो तर किती छान होईल. आपल्या आई-बाबांनी आपल्याला खूप चांगले संस्कार दिले आहेत. बाबा नेहमी म्हणतात आपण आपल्या जवळ नेहमी सुई दोरा ठेवावा म्हणजेच माणसे जोडणे आणि कातर कधीच जवळ बाळगायची नाही. कातर म्हणजे तोडणे किंवा कापणं. नाती जोडायची कला अवगत असायला पाहिजे.

आज नेहमीसारखी उमा खाली झोपली होती त्यामुळे तिला एकदम घरी असल्यासारखंच वाटत होतं. दोन दिवस म्हणून गादीवर तिला झोपच लागली नाही. आज विचार करता करताच उमा शांत झोपून गेली.

(उमा आणि मानस आता काश्मीरला जाणार आहेत काय होईल आता पाहूया पुढील भागात )