तिची तपश्चर्या - भाग ३२
काश्मिर ट्रीप साठी उत्सुक असलेली उमा काश्मीरची तयारी कशी करते पाहूया पुढे..
उमाला नेहमीसारखीच पाच वाजता जाग आली. तिला वाटत होतं तिच्या आवाजाने मानसची झोपमोड होऊ नये म्हणून ती अशीच पाच दहा मिनिटं अंथरुणातच राहिली. पण असं लोळत राहणं काही तिच्या स्वभावात नव्हतं म्हणून ती आवाज न करता उठली. अंथरुण पांघरूणाची घडी घातली आणि कपाटाच्या बाजूला ठेवली तिने विचार केला मानस उठल्यानंतर कपाटात ठेवावे म्हणजे आवाज होणार नाही. त्यानंतर ती हळूच बाल्कनीमध्ये आली. मानसच्या रूममधून काय काय निसर्गसौंदर्य दिसतं ते तिला पाहायचं होतं. पण अजून अंधारच होता त्यामुळे जास्त काही ती पाहू शकत नव्हती. तिच्या अंदाजाप्रमाणे इथून उंच उंच डोंगर दिसत असावेत असं तिला वाटत होतं. नंतर ती बाथरूम मध्ये आली. ह्याचं बाथरूम तर जास्तच हाय फाय होतं. तिने पाहिलं तर तिथे सारी पुरुषी सौंदर्यप्रसाधनं होती. नंतर तिच्या लक्षात आलं की एका बाजूला सगळी स्त्रियांची न वापरलेली नवीनच सौंदर्यप्रसाधनं ठेवली होती. म्हणजेच आईंनी तिची योग्य ती काळजी घेतली होती. तिला खूप कौतुक वाटलं. इथे तिला कोणतीही गोष्ट मागावी लागत नव्हती सगळंच न मागता मिळत होतं. रूम मधून बाहेर जायच्या आधी कपाटाचा आवाज न करता तिने हळूच अंथरूण पांघरूण कपाटात ठेवलं. खाली आई आणि बाबा चहा घेत होते. तिला बघून आई म्हणाल्या,
"अगं उमा कशाला लवकर उठलीस आरामात उठायचं. एक लक्षात ठेव तू इथे सासरी नाहीस हे सुद्धा तुझंच घर आहे. आज मऊ गादीवर झोप लागली ना तुला!" उमा पटकन बोलणार होती 'नाही मी खालीच झोपले' एवढ्यात तिच्या लक्षात आलं आणि ती म्हणाली हो आता आज लागली झोप. मनात म्हणाली आता आपल्याला खूपच सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आईनी गीताला सांगितलं,
"गीता उमाला पण इथेच चहा दे ती आमच्या बरोबर चहा घेईल."
उमा तिथेच बसली. उमाला जाणवत होतं की आई तिला न्याहाळत आहेत. म्हणून उमा सतत खाली पाहत होती
तर त्यांना वाटत होतं प्रथमच मानसच्या खोलीत झोपली म्हणून ती लाजते आहे त्या तिला म्हणाल्या,
तर त्यांना वाटत होतं प्रथमच मानसच्या खोलीत झोपली म्हणून ती लाजते आहे त्या तिला म्हणाल्या,
"अग उमा एवढी लाजतेस का! बघ की जरा आजूबाजूला. मी तुला काही विचारणार नाहीये." उमा लाजून म्हणाली,
" नाही तसं काही नाही आई." नंतर मानस पण त्याचं आवरून खाली आला. ब्रेकफास्टची वेळ झाली होती. चौघेजण ब्रेकफास्ट करायला बसले. खाता खाता मानस म्हणाला,
"आई-बाबा उद्याच्या फ्लाईटने मी आणि उमा आम्ही दोघं काश्मीरला जात आहोत."
"अरे वा खूप छान. चांगले दहा-पंधरा दिवस राहून या अजिबात इथली काळजी करायची नाही. मनसोक्त काश्मीर फिरून घ्या. मानस तसा आधी जाऊन आला आहे पण आता हे उमाबरोबरचं फिरणं वेगळं असेल नाही का रे मानस!"
"आई तुझं आपलं काहीतरीच. उमा बरोबर गेलो म्हणून काश्मीर बदलणार नाही तेच राहणार आहे. हो आणि आम्ही काही दहा पंधरा दिवसांसाठी जाणार नाही आठ दिवसात आम्ही परत येणार. आधीच लग्नासाठी रजा झाली. फॅक्टरीत खूप कामं आहेत." बाबा त्याला म्हणाले,
"फॅक्टरीतल्या कामांचा तू अजिबात विचार करू नकोस जोशी काका आणि मी आम्ही दोघेही आहोत आम्ही सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पडू. आणि हो यावेळी तू उमा बरोबर जाणार आहेस म्हणजे काश्मीर नक्कीच तुला बदललेलं वाटेलच."
"हो मानस यायची अजिबात घाई करायची नाही. उमा तू पहिल्यांदाच काश्मीरला जातेस ना."
"अहो आई काश्मीरला काय मी या गावाबाहेर कधी फिरायला गेले नाही. त्यामुळे सगळंच पहिलंवहिलं आहे माझ्यासाठी."
"हो ना मग तर दहा-पंधरा दिवस राहायलाच हवं तुम्हाला. उमा आणि ब्रेकफास्ट झाला की माझ्या रूममध्ये ये जरा वेळ. तुला एक गंमत दाखवायची आहे."
"गंमत कसली गंमत"
"ते तुला तिथे आल्यावरच मी दाखवेन."
"बाबांचा आणि यांचा ब्रेकफास्ट झाल्यावर मी येते आई."
"अगं तू जा आमचं आता होतंच आलंय."
उमा आईंबरोबर त्यांच्या खोलीत गेली. तेव्हा त्यांनी कपाट उघडून एक बॅग तिच्या हातात दिली आणि तिला म्हणाल्या,
"हे बघ आता तू काश्मीरला फिरायला जाणार आहेस तर एखाद दुसरी साडी घेऊन जा बाकी सगळे पंजाबी ड्रेसेस घालायचेत आणि मी तुझ्यासाठी जीन्स आणि त्याच्यावर घालायला टॉप्स आणलेत. काश्मीरला तू तिथे हे घाल बर्फात जाताना वगैरे."
"आई पण मी असे कपडे कधीच घातले नाहीत आजपर्यंत. माझ्या कॉलेजमध्ये मुली घालायच्या तेव्हा मला कधीतरी वाटायचं की आपण पण अशी जीन्स घातली पाहिजे पण बाबांना आवडणार नाही म्हणून मी कधी तसा विचारच केला नाही."
"हो ना मग आता नक्कीच घाल. आणि मी काय तुला इथे घालायला सांगत नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा फिरायला बाहेर जाल तेव्हा असे कपडे घालायला काहीच हरकत नाही. तुला ते खूपच शोभून दिसतील."
"पण आई तुम्ही एवढी तयारी केली कधी आणि माझा साईज वगैरे तुम्हाला कसा कळला."
"ह्यासाठी मी तुझ्या राधाताईला हाताशी धरलं. तिला सर्व विचारून घेतलं तुझे आवडते रंग, सगळं तिने मला बरोबर सांगितलं त्याप्रमाणे मी ही तुमच्या हनिमून साठी तयारी केली आहे."
"आई पण मी हे असे कपडे घातलेले यांना आवडेल का!"
"आता ते तू घातल्याशिवाय कसं कळणार. तू घाल आणि मानस काय बोलतोय ते बघ मग तुला कळेल त्याला आवडलेत की नाही! अगदी वेडाबाई आहेस गं"
"आई मी आधी हे इथे घालून बघू का मग तुम्ही मला सांगा कसे दिसतात. चांगले दिसले तरच मी घालेन. मला अशा कपड्यांमध्ये वावरायला जमलं पण पाहिजे ना."
"अग त्यात काय अवघड नसतं एकदा तू घालून सवय केलीस की तुला बघ हे आवडायला लागतील. तू इथे घालून बघ म्हणजे मग तुझ्या लक्षात येईल." उमा जीन्स आणि टॉप घालून आली आणि आई तिच्याकडे बघतच राहिल्या.
"अगं किती शोभून दिसतात तुला असे कपडे. तू उगाचच घाबरत होतीस. बघ हं तिकडे एखादं शूटिंग वगैरे चालू असेल तर तुलाच हीरोइनच्या जागी घेतील. मानसला तुझा हात धरून ठेवायला सांगते म्हणजे असं काही व्हायचं नाही."
"आई तुम्ही पण काय मला चिडवता." उमाला खरं तर सगळ्याचीच खूप हौस होती. तिने सगळेच कपडे ट्राय करून बघितले आणि प्रत्येक वेळी पूर्णाकृती आरशात तिची छबी पाहून ती स्वतःवरच खूप खुश झाली. कॉलेजमध्ये असताना निकिता अशी जीन्स आणि टॉप नेहमी घालायची. तिला एकदा आपण म्हटलं होतं की मला पण असे कपडे घालायला आवडतात. ती लगेचच म्हणाली होती अगं तू घालून बघ ना मी देईन तुला घालायला. पण आपण आपल्या मनाला आवर घातला होता बाबांना आवडणार नाही म्हणून आणि दुसऱ्यांचे कपडे असे घेतलेले तर बाबांना कधीच रुचणार नाही. उमाला आता कधी एकदा काश्मीरला जातोय असं झालं. एकतर तिला आवडीप्रमाणे तिचे कपडे घालायला मिळणार होते त्याशिवाय लहानपणाचे स्वप्न पूर्ण करायला मिळणार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठ-दहा दिवस सलग मानसचा सहवास मिळणार होता.
(उमा चा पहिलाच विमान प्रवास कसा होतो पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे