Login

तिची तपश्चर्या - भाग ३४

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग ३४

उद्या उमाचं बर्फात फिरायला जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे ना! पाहूया पुढे..

रात्री झोपताना मानसने वेटर करवी एक्स्ट्रा ब्लँकेट्स मागवली. इथल्या थंडीत उमाला खाली झोपायला होईल की नाही याची शंका येऊन तो उमाला म्हणाला,

"इथे गारठा खूप जास्त असतो खाली तुला खूप थंडी वाजेल. इथे असेपर्यंत तरी तू वर झोप."

"छे छे येथील गाद्या‌ तर घरच्या गाद्यांपेक्षा सुद्धा जास्तच मऊ आहेत. ‌ मी आपली खालीच बरी."

"बरं मग उद्या आपण बर्फात जाऊया बरं का. ‌ शाल, स्वेटर सगळं घाल आणि तिथे बर्फात घालायचे कपडे मिळतात ते पण घेऊ भाड्याने."

रात्री झोपताना उमाला आपण बर्फात खेळतोय असं स्वप्न पडत होतं. आता उद्या कळेलच किती मजा येत असेल ते.
सकाळी उठून दोघं मस्त तयार झाले. आज उमाने पहिल्या प्रथमच जीन्स आणि टॉप घातला होता. मानससमोर यायला तिला अवघड वाटत होते. ते घालून ती बाहेर आली तेव्हा मानस तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात आलं उमाला सगळ्याच प्रकारचे कपडे खूप शोभून दिसतात. तिला लाज वाटली आणि ती म्हणाली,

"हे आईने मला घालायला दिले आहेत. काल मला त्या त्यांच्याबरोबर घेऊन गेल्या ना तेव्हा दिले.मी असे कपडे कधीच घातले नाहीत."

"नेहमी घालत जा छान दिसतात ते." मानसने आपली स्तुती केली हे उमाला खूपच आवडले. नंतर दोघे ब्रेकफास्ट ला गेले. ब्रेकफास्ट म्हणजे सुद्धा एक प्रकारचं जेवणच होतं. अनेक प्रकारचे पदार्थ तिकडे खाण्यासाठी ठेवले होते. मानसने स्पेशल गाडी केली होती काश्मीरमध्ये फिरायला. ती आल्यावर ते आधी
गुलमर्गला बर्फात फिरायला गेले. तिथे गेल्यावर उमाने खाली उतरून पाहिलं आणि ती पाहतच राहिली. पांढऱ्या शुभ्र सश्यासारखा बर्फ अगदी दूरवर पसरलेला होता. सशासारखा! उमाने कल्पना केली इवलासा ससा बर्फामध्ये किती गारठून जाईल. ए सशा, तू कधी येऊ नकोस रे बाबा इकडे. पांढरा शुभ्र बर्फ बघताना उमा भान हरपून गेली. मानसने आधीच भाड्याने ड्रेस घेतला होता. आधी उमा म्हणत होती ह्या ड्रेसची गरज नाही आपण असेच जाऊ बर्फात खूप मज्जा येईल. मानसने तिला बळजबरीने तो घालायला लावला. आणि दोघेही बर्फात गेले. मानस तिला म्हणाला,

"आता तुला वाटतंय त्या वेगळ्या ड्रेसची गरज नाही पण थोड्यावेळाने कशी हुडहुडी भरेल ते बघ."

बर्फात गेल्यावर उमा‌ला काय करू आणि काय नको असं झालं. सुरुवातीला तिने अगदी लहान मुलासारख्या उड्या मारल्या. नंतर तिला वाटत होतं की सिनेमात दाखवतात तसं आपण पण एकमेकांवर बर्फ उडवायला हवा. मानसला कसं सांगायचं म्हणून तिने स्वतःच बर्फाचे गोळे करून ती वर उडवून गोळे झेलू लागली. मानसला तिला असं मोकळेपणाने खेळत असलेलं पाहून आनंद झाला. आपण उमाला असे आनंदाचे क्षण तरी देऊ शकतो याने तो सुखावला. तो तिला म्हणाला,

"अगं उमा ते बर्फाचे गोळे माझ्या अंगावर टाक की असे झेलत काय बसलीस." . पडत्या फळाची आज्ञा घेऊन उमा त्याच्या अंगावर बर्फाचे गोळे टाकू लागले. खूपच मजा आली. मानसने पण तिच्यावर अंगावर हलकेच बर्फाचे गोळे फेकले. नंतर बर्फाचा उंचवटा होता ती मानसला म्हणाली आपण तिकडे जाऊया. वर जाऊन बर्फावरून घसरण्यात तिला खूपच थ्रील वाटत होतं. तिला वाटत होतं की मानसने घसरताना आपला हात धरावा. ते शक्य नाही म्हणून तिने असंच आपल्या डोळ्यांसमोर चित्र आणलं आणि त्यातच आनंद मानला. काहीजण बर्फात स्कीईंग करत होते. त्याच्यासाठी सराव जरुरीचा होता म्हणून त्याचा काही नाद तिने केला नाही. दोरी धरून ओढायच्या गाडीत मात्र ती बसली. तिच्या मनात आलं अशा शॉटचे‌ रिटेक होत असतील तेव्हा नायक नायिकेला खूप जास्त मजा येत असेल नाही का! तिला वाटत होतं या सगळ्याचे मानसने आपले फोटो काढावे. कधी आपल्याला पाहावेसे वाटले तर आपण पाहू शकू. ती मानस कडे लहान मुलं आशाळभूतपणे पाहतात तसे पाहू लागली. जणू काही ‌तिच्या मनातलं मानसला कळलं. मानसने तिचे सगळेच फोटो काढले. त्यातले काही कॅन्डीड होते. कॅन्डीड फोटोमध्ये उमा एखाद्या
हिमपरी प्रमाणेच वाटत होती. अर्थात खूप वेळ खेळून सुद्धा उमाचे समाधान काही होत नव्हतं. मानसने ठरवलं होतं उमा जेव्हा म्हणेल की इथून जाऊया तेव्हाच जायचं तोपर्यंत तिला मनसोक्त खेळू दे. पण खूप जास्त वेळ खेळल्यावर उमा गारठू लागली. ती ‌कुडकुडू‌ लागली. मानसने लगेच त्याचे जॅकेट काढून उमाच्या अंगावर घातलं. तो तिला म्हणाला,

"उमा चल आता आपण जाऊया. तिथे बाहेर गरम गरम सूप मिळतं, चहा मिळतो तो प्यायल्यावर तुला जरा बरं वाटेल. आपल्याला बर्फात सवय नसते ना म्हणून जास्त वेळ राहिल्यावर थंडी‌ भरते. " त्याही परिस्थितीत उमाच्या मनात आलं सियाचीन ग्लेशियर येथे आपले सैनिक उणे ४० च्या पुढे तापमानात कसे लढत असतील. सलाम त्यांच्या धैर्य, जिद्द आणि देशाभिमानाला!

उमा थंडीने कुडकुडत होती. तिच्या खांद्यावर हात ठेवून मानसने तिला हळूहळू बाहेर नेलं. तिथे गेल्यावर तिला एका ठिकाणी बसवलं आणि आधी गरम गरम चहा आणून दिला. चहा प्यायल्यावर तिला जरा तरतरी आली.

"आता थंडी थोडी ‌कमी झाली ना! बरं वाटते का. "

"मला वाटलं एवढे सगळे कपडे घातल्यावर बर्फात थंडी नाही वाजणार. काहीही असो थंडी वाजली तरी सुद्धा मला बर्फात खेळताना खूपच मजा आली."

भाड्याचे कपडे परत दिल्यावर सुद्धा उमाला थंडी वाजत होते. त्याचं जॅकेट त्याने तिला घालून ठेवायला सांगितलं. नंतर दोघे गाडीत बसून शालिमार ‌उद्यानात आले. तेथील नजारा डोळ्यात किती साठवू आणि किती नको असं उमाला झालं. शालिमार उद्यान खूपच सुंदर होतं. विविध रंगांचे गुलाब पाहून ती खूप खुश झाली. काही रंग तर असे होते की तीने फक्त चित्रातच पाहिले होते. नवीन लग्न झालेली अनेक जोडपी बागेत हातात हात घालून फिरताना दिसत होते. त्याचप्रमाणे काही पन्नाशीच्या आसपासची जोडपी ही बागेत दिसत होती. बहुदा ते पहिल्या हनिमून साठी इथेच येऊन गेलेले असावेत. त्या आठवणी ताज्या करण्यात ते दंग झाले होते. दोघ एकमेकांना ओळखीच्या खुणा सांगताना
हातवारे करून दाखवत होते. बघ तुझा तिथे असा फोटो काढला होता, आपण तिथे बसलो होतो वगैरे असं काहीतरी सांगत असावेत. इतक्यात तिच्या समोरून एक मुलगी आणि मुलगा गेले. मुलगी पुढे आणि मुलगा मागे चालत होता बहुतेक त्यांच्यात काहीतरी लुटूपुटीचे भांडण झालं असावं. तो तिला हाक मारत होता पण ती अजिबात मागे वळून बघत नव्हती. अशा रम्य ठिकाणी आल्यावर त्या क्षणांचा आनंद मनात जतन करून ठेवायचा तर का बरे असे रुसवे फुगवे करण्यात वेळ घालवायचा. कदाचित 'तुम रुठी रहो, मै मनाता रहू' यात सुद्धा प्रेमाची एक न्यारी लज्जत असेल नाही का!

काश्मीरमध्ये फिरण्यासारखी खूप ठिकाणं होती. एकेका पर्यटन स्थळाला भेट देऊ असं मानसने ठरवलं होतं. त्यानंतर ते हॉटेलवर आले. दोघांनी फ्रेश झाल्यावर रूममध्येच मस्त चहा आणि पकोडे ऑर्डर केले. चहा पिता पिता उमा म्हणाली,

"आज बर्फात खेळतानाचे क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहेत. आज तुमच्यामुळे मी काश्मीर पाहू शकते आहे. काश्मीरचे दैवी सौंदर्य अनुभवण्यासाठी खूप लांबून लांबून, अगदी परदेशातून पण लोक येतात खरंच खूप कौतुक आहे. अशा आपल्या काश्मीरला गालबोट लागले त्याचं खूप वाईट वाटतं. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या काश्मीर वरून तरी राजकारण व्हायला नको."

"अग हे आपल्या सामान्य लोकांना वाटतंय आणि पटते सुद्धा. या प्रश्नावर इथे चर्चा न केलेलीच बरी. आपल्यासारख्या पर्यटकांमुळे काश्मिरी लोकांचं जनजीवन व्यवस्थित चाललंय. मध्यंतरीच्या काही वर्षांत तर पर्यटकांअभावी इथल्या लोकांचे खूपच हाल झाले."

"मी अशीच प्रार्थना करेन की हे काश्मिरी सौंदर्य अबाधित राहू दे."

(शिकाऱ्यातील अनुभव उमाला कसा वाटतोय पाहूया पुढील भागात)

क्रमशः


©️®️ सीमा गंगाधरे