तिची तपश्चर्या - भाग ३५
शिकाऱ्यातील अनुभवाची खूपच उत्सुकता उमाला लागून राहिली आहे. पाहूया पुढे..
कालच मानस उमाला म्हणाला होता की उद्या आपण सकाळीच ब्रेकफास्ट करून शिकाऱ्यावर जाऊया म्हणजे आपल्याला पूर्ण दिवस तिथे मिळेल. दुपारचं जेवण पण तिथेच करूया. उमा रोजच सकाळी लवकर उठायची. तिची एक सवय होती सकाळी उठल्यावर ती आधी गॅलरीत जाऊन बाहेरच्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्याची. इथे सुद्धा उठून ती आधी बाल्कनीत आली आणि समोरची हिमशिखरे पाहण्यात गुंग झाली. ती विचार करत होती इतक्या बर्फाच्छादित पर्वतावर आपल्या ऋषीमुनींनी कशी काय तपस्या केली असेल. हे महाकर्मकठीण आहे म्हणूनच त्यांना त्यांच्या तपस्येचं फळ मिळालं असेल. इतक्यात मानसने तिला हाक मारली.
"चला मॅडम जायचं ना शिकाऱ्यावर कधीपासून तू वाट बघत होतीस. चल लवकर तयार हो खाली ब्रेकफास्ट करून तसेच आपण डायरेक्ट जाऊया."
उमा मस्त तयार झाली. आज तिने आकाशी रंगाचा हलकी नेव्ही ब्लू कलरची फुलं असलेला पंजाबी ड्रेस घातला होता. तिला बघून ती अगदी अस्मानीची परीच वाटत होती. योगायोगाने आज मानसने पण स्काय ब्लू कलरचा टी-शर्ट घातला होता आणि ब्लू कलरची जीन्स घातली होती. बघणाऱ्याला असंच वाटलं असतं की दोघांनी ठरवून मॅचिंग केलं आहे. खाली येऊन दोघांनी मस्त आवडीचा ब्रेकफास्ट केला आणि कारमधून ते काश्मीर मधील प्रसिद्ध 'दल' सरोवराजवळ आले. दल सरोवराला 'काश्मीरच्या मुकुटातील रत्न' असेही म्हणतात. काश्मीरला येणारे पर्यटक शिकाऱ्यांमधील पर्यटनाचा आनंद घेतातच. ते पुढे आल्यावर लगेच तीन-चार शिकारेवाले त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी आपल्या शिकाऱ्यात बसावं म्हणून आग्रह करू लागले. प्रत्येक जण आपल्याकडे काय काय सोय आहे ते सांगण्याची स्पर्धा करू लागले. मानसने उमालाच विचारलं,
"तूच सांग आता आपण कोणत्या शिकाऱ्यात बसायचं."
थोड्याफार फरकाने सगळ्या शिकाऱ्यांमध्ये सोयी सारख्याच होत्या. तिने सर्व शिकाऱ्यांची नावं वाचायला सुरुवात केली. तिला 'सपनों के देवता' हे नाव असलेला शिकारा खूप आवडला. दोघं त्या शिकाऱ्यात बसायला गेले. बाकीचे थोडे नाराज झाले. मानस त्यांची समजूत घालत म्हणाला,
"फिर कभी आपके साथ बैठेंगे"
पाण्याच्या तरंगांवर शिकारा हळुवार हेलकावे घेत होता म्हणून मानस आधी आत मध्ये गेला आणि त्याने उमाला हात देऊन आत मध्ये घेतलं. त्याची ही कृती उमाला खूपच भावली. शिकाऱ्यातील श्रीमंती थाटमाट काही औरच होता.काश्मिरी गालिचे सगळीकडे अंथरले होते. आसनावर पण छान हलक्या डिझाईनचे गालीचे घातले होते. आसनाच्या दोन्ही बाजूला हंस पक्ष्यांच्या प्रतिकृती दिमाखात विराजमान झाल्या होत्या. दोघेजण तिथे बसताच शिकारा पाण्यावर लहरू लागला. संथ गतीने शिकारा पुढे पुढे जात होता. दल सरोवराबद्दल उमाने फक्त पुस्तकातच वाचलं होतं. आज प्रत्यक्ष 'याची देही याची डोळा' सरोवर पाहत होती. तिथे बरेच शिकारे होते. उमा हळूच तोल सावरत उठली आणि तिने खाली वाकून पाण्यामध्ये हात घातला. थंडगार पाण्याच्या स्पर्शाने ती मोहरली. ती मानसच्या अंगावर पाणी उडवणार होती परंतु त्याला आवडेल की नाही माहित नाही म्हणून गप्प बसली. दोन्ही हात पसरून ती उभी राहिली. वाऱ्यावर तिच्या चुकार बटा उडत होत्या. मानसने फोटो काढायला सुरुवात केली. वेगवेगळ्या पोजेस मध्ये फोटो काढल्यावर उमा परत येऊन बसली. तिला या धुंद वातावरणात एखादं सुंदर गीत गावं असं वाटत होतं. परंतु स्वतःहूनच गाणं म्हणायचं म्हणजे जरा विचित्रच वाटत होतं. म्हणून ती फक्त गुणगुणायला लागली.
"फक्त गाणं गुणगुणतेस काय पूर्ण नीट म्हण तरी. तुझा आवाज खूप छान आहे. अशा सुंदर वातावरणात तर तो अधिक मंजूळ वाटेल. कोणतं गाणं म्हणशील. त्यादिवशी गायली होतीस तेच नको गाऊ. नवीन
काहीतरी म्हण."
काहीतरी म्हण."
उमाला थोडी गाणी आठवली. तिला एखादं हटके गाणं म्हणायचं होतं. तिने सुंदर अर्थपूर्ण गीत गायला सुरुवात केली,
'हृदयी जागा तू अनुरागा,
प्रीतीला या देशील का?'
प्रीतीला या देशील का?'
या वातावरणाला साजेसं भावपूर्ण तरल गीत खूप समरस होऊन तिने गायलं. मानसला ते गाणं खूपच आवडलं.
"तू गाणं शिकली आहेस का?"
"नाही असंच रेडिओवर ऐकून काम करता करता गाणी म्हणायची मला लहानपणापासूनच सवय आहे."
"असं असेल तर तू खूपच तालासुरात गाणं म्हणतेस. आता घरी गेल्यावर तू नियमित रियाज करत जा. हवं असेल तर गावात गाण्याचा क्लास असेल तर तो लाव. म्हणजे त्यातील आणखीन बारकावे तुला छान पैकी समजतील."
"नाही हो आता या वयात कुठे गाणं शिकायचं."
"अगं कोणत्याही शिक्षणासाठी वयाची अट नसते. त्यातून संगीत हा असा विषय आहे की कितीही शिकलं तरी त्यात कायम अपूर्णता असते." उमाचं एक गाणं ऐकून शिकारा वल्हवणाऱ्याला पण वाटलं की आपण पण काहीतरी गावं. त्याने त्याच्या भाषेत गायला सुरुवात केली. गाण्याचे बोल आणि अर्थ काही कळत नसला तरी ते ऐकायला खूपच गोड वाटत होतं. त्याने शिकारा वल्हवतानाच मानसला विचारलं,
"हमारा गीत कैसे लगा?"
"बहोत मीठा."
"अभी हम यहाॅ 'चार चीनार' के पास थोडी देर रुकेंगे. आप इधर घुमलो, फोटो निकालो फिर बादमें हम लोग वापस जायेंगे".
'चार चिनार' चा परिसर खूपच रम्य होता. दोघंजण मनसोक्त तिथे फिरले, फोटो काढले. मानसने उमाला विचारलं,
"मी तुझे एवढे फोटो काढले. मोबाईल घेतला तेव्हा मी तुला फोटो काढायला शिकवले आहे ना. तू त्याची प्रॅक्टिस केलीस की नाही. माझे फोटो काढ बरं तुला जमतंय का बघ."
"मला जमेल ना! तुमचे फोटो चांगले नाही आले तर."
"अगं मोबाईल मध्ये तर आहेत नाही आवडले तर डिलीट करायचे." मानसने पुन्हा एकदा उमाला फोटो कसा काढायचा ते दाखवलं. उमाने मानसचे फोटो काढले. त्याने पाहिले आणि म्हणाला,
"अगं छान काढलेस की फोटो. सगळंच तू अगदी लवकर शिकतेस." नंतर दोघं परत शिकाऱ्यात येऊन बसले.
खूप वेळ जलविहार झाला. उमाने मनसोक्त आनंद घेतला आणि मग ते किनाऱ्यावर आले. खाली उतरल्यावर लगेच तिकडे असणारे विक्रेते त्यांच्या जवळ आले आणि त्यांना खरेदीचा आग्रह करू लागले. तुम्ही इथेच खरेदी करा मार्केटमध्ये खूप महाग असतं असं विनवू लागले. मानस आणि उमा त्यांच्यामागे गेले. सुरुवातीला त्यांनी साड्या दाखवल्या. काश्मिरी सिल्कच्या साड्या एक से एक बढीया होत्या. रंगसंगती, डिझाईन्स खूपच नेहमीपेक्षा वेगळ्या होत्या. मानसने उमाला, त्याच्या आईला आणि उमाच्या आईला साडी सिलेक्ट करण्यासाठी सांगितलं. लगेच उमा म्हणाली,
खूप वेळ जलविहार झाला. उमाने मनसोक्त आनंद घेतला आणि मग ते किनाऱ्यावर आले. खाली उतरल्यावर लगेच तिकडे असणारे विक्रेते त्यांच्या जवळ आले आणि त्यांना खरेदीचा आग्रह करू लागले. तुम्ही इथेच खरेदी करा मार्केटमध्ये खूप महाग असतं असं विनवू लागले. मानस आणि उमा त्यांच्यामागे गेले. सुरुवातीला त्यांनी साड्या दाखवल्या. काश्मिरी सिल्कच्या साड्या एक से एक बढीया होत्या. रंगसंगती, डिझाईन्स खूपच नेहमीपेक्षा वेगळ्या होत्या. मानसने उमाला, त्याच्या आईला आणि उमाच्या आईला साडी सिलेक्ट करण्यासाठी सांगितलं. लगेच उमा म्हणाली,
"आता लग्नात खूप साड्या घेऊन झाल्यात मला नको साडी. आईंना आणि माझ्या आईसाठी मी घेते."
"ते काही नाही तुला पण घे. तीन शाली पण सिलेक्ट कर चांगल्या."
"त्यापेक्षा शीलाताई आणि राधाताईला मी काहीतरी घेते ना."
"अगं आपल्याला सगळ्यांसाठी घ्यायचे आहे. त्यांना पण घे, दोन्ही बाबांना पण घे. हो आणि एक साडी गीता ताई साठी पण घे बरं का."
सगळ्यांना लग्नात सगळं काही घेतलं होतं तरी मानसने आवर्जून सगळ्यांसाठी खरेदी करायला लावली. नंतर ते लोक केशर दाखवायला लागले. केशर मध्ये ते फसवणूक करतात असं मानसने ऐकलं होतं. त्या विक्रेत्यांनी त्याला ग्वाही दिली की आम्ही पैसे जरी जास्त घेत असलो तरी फसवणूक करणार नाही. थोडंफार केशर घेतलं आणि इतर थोडीफार खरेदी केली. त्यांच्यापैकी एकाने मानसला सांगितलं,
"शाबजी इतनी देर इधर है तो अभी खाना भी इधर खाईये. हमारा कश्मीरी खाना खाओगे तो बार बार खाने के लिए आओगे." मानसने उमाकडे पाहिलं.
"आपण इथे जेवूया का. हॉटेलमध्ये आता रोजच खातो आहोत. बघूया तरी कसं वाटतंय."
"हो चालेल इथे आपल्याला स्थानिक पदार्थांचे सेवन करायला मिळेल. त्यांची चव अगदी घरगुती असेल." मानसने त्यांना ऑर्डर दिली आणि दोघंही तिथेच जेवले.
"काय मॅडम आता अजून फिरायचं की हॉटेलवर जायचं आहे."
"आपला आता तर दल लेक, चार चिनार सगळे बघून झाले आता आपण हॉटेलवरच जाऊया."
(मनसोक्त जलविहार झाल्यावर उमा आणि मानस दोघेही हॉटेलवर परतले. आता कथेमध्ये ट्विस्ट येणार आहे. सर्व भाग वाचत रहा.काय होतंय पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे