तिची तपश्चर्या - भाग ३६
काश्मीरमधील बहुतांशी पर्यटन स्थळं पाहून झाल्यानंतर आता मानस आणि उमा उद्या परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. पाहूया पुढे..
"उमा सर्व सामान आजच पॅक करून ठेव उद्या आपलं सकाळचे फ्लाईट आहे."
"हो मी सर्व जेव्हाचं तेव्हाच पॅक करून ठेवत होते त्यामुळे पॅकिंग तसं काही करायचं नाहीये."
"काश्मीरहून तुझा पाय निघेल ना का इथेच राहायचं मन होतंय अजून."
"अजून राहावंसं वाटलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या घरी जावंच लागेल. दोघांचेही आई-बाबा आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील."
"तुझी ना कमाल आहे कुठेही गेलं तरी तू आपल्या माणसांची आठवण काढत असतेस."
सकाळी लवकर उठून हॉटेलच्या फॉरमॅलिटीज पूर्ण करून उमा आणि मानस विमानतळाकडे निघाले. कारमध्ये उमा काश्मीरचं निसर्गसौंदर्य आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होती. विमानतळावर आल्यावर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर उमा आणि मानस दोघेजण एका बेंचवर बसण्यासाठी येत होते. इतक्यात मानसने दुरून एका नंदिनी सारख्या दिसणाऱ्या मुलीला येताना पाहिलं. मानसचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मनातून त्याला अतिशय आनंद झाला. नंदिनीच्या गाडीचा इतका मोठा अपघात झाला होता त्यातून ती कशी काय जिवंत राहू शकली असेल. शक्यता नाकारता येत नाही कारण अपघात झाला तेव्हा फक्त चारच मृतदेह सापडले. खरंच नंदिनी जिवंत असेल का? त्या कल्पनेनेच मानसच्या अंगात उत्साह संचारला. ती अजून थोडी जवळ आल्यावर त्याने पाहिलं तर ती नंदिनीच होती. ती जवळ आल्यावर तिचं लक्ष सुद्धा मानसकडे गेलं आणि क्षणभर त्याला तिचे डोळे चमकल्यासारखे वाटले. म्हणून तो लगेच पुढे होऊन तिच्याजवळ गेला आणि त्याने हाक मारली,
"नंदिनी" परंतु तिच्याकडून काही प्रत्युत्तर न येता तिने वळूनही पाहिले नाही. तो थोडा आणि पुढे गेला आणि म्हणाला,
"एक्सक्यूज मी, तू नंदिनीच आहेस ना?"
"सॉरी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी नंदिनी नाही." आणि ती एका बेंचच्या दिशेने चालू लागली. मानसने पहिलं की ते चालताना थोडी लंगडत होती. चालत चालत तिथे एक स्त्री बसली होती तिच्याजवळ गेली.तिच्याशी बोलायला लागली. ती स्त्री नंदिनी पेक्षा साधारण थोडी मोठी असावी. इथे उमापण उभी राहून मानस कुठे गेला ते पाहत होती. मानस उमाकडे परत येत होता तेव्हा त्याच्या मनात विचार येत होते अगदी नंदिनी सारखी दिसणारी हुबेहूब दुसरी कोणीतरी! असं कधी होऊ शकतं का! असं म्हणतात की जगात एक सारखे दिसणारे सात चेहरे असतात. पण ती नंदिनी असती तर तिने मला ओळख नक्कीच दाखवली असती. त्या दोघी सुद्धा आपल्याच विमानात असतील तर काहीतरी माहिती निश्चितच कळेल. मानस विचारात पडला होता. तो जवळ आल्यावर उमा म्हणाली,
"काय झालं तुम्ही असे अचानक उठून का गेलात? ती स्त्री कोण तुमच्या ओळखीची होती का?"
"अगं ती अगदी हुबेहूब नंदिनी सारखीच दिसते आहे. मी तिला हाक मारल्यावर तिने ओळख दाखवली नाही. मी तिला विचारल्यावर ती मी नंदिनी नाही असे स्पष्ट म्हणाली. कोण असेल ती? मला पाहिल्यावर तिच्या डोळ्यात क्षणभर एक प्रकारची ओळखीची चमक मला दिसली. तिने ओळख न दाखवण्याचं काही कारण असेल का? काहीच कळत नाही."
"अहो तुम्ही काळजी करू नका. काहीतरी मार्ग सापडेलच. कदाचित तिने ओळख न दाखवण्याचं खरोखर एखादं कारण असू शकेल."
"तिच्याबरोबर एक स्त्री आहे कदाचित ती तिची एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक असेल. त्या दोघी जर आपल्याबरोबर असतील तर आपण पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करूया."
मानसला काहीच कळत नव्हतं. नंदिनी जर खरोखर जिवंत असेल तर ती आपल्याला ओळख तर नक्कीच दाखवेल. आपलं प्रेम एवढं तकलादू नक्कीच नव्हतं. मला पाहिल्यावर नंदिनी नक्कीच अधीरतेने धावत आली असती. का ती खरंच तिने म्हटल्याप्रमाणे नंदिनी नाही. त्याला असं उदासपणे बसलेलं पाहून उमा त्याला धीर देत म्हणाली,
"हे बघा तुम्ही असे आत्तापासून उदास राहू नका. ती जर खरोखर नंदिनी असेल तर आपण शोधून काढू. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन." इतक्यात उमाने पाहिलं की ती नंदिनी सारखी दिसणारी मुलगी उठून पुन्हा कुठेतरी जात होती. बहुधा ती वॉशरूमला जात असावी. उमाने त्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवला. तिच्यात कुठून इतका धीटपणा आला कोणास ठाऊक पण ती लगबगीने त्या स्त्री जवळ गेली. नंदिनी गेली त्या दिशेकडे हात करत ती म्हणाली,
"माफ करा पण आता मी नंदिनीला हाक मारत होते तिचं लक्षच नव्हतं. ती माझी मैत्रीण आहे तुमच्या बरोबरच आहे ना ती."
"तुम्हाला खोटं बोलण्याची काहीच गरज नाही. ती नंदिनीच आहे. तू मानसची पत्नी आहेस का?" आता आश्चर्यचकित होण्याची पाळी उमावर होती. ती एकदम भांबावून गेली.
"तुम्हाला कसं कळलं? आणि मानसला तुम्ही ओळखता का?"
"खरंतर नंदिनीने मला तिच्या आणि मानस विषयी खूप आधीच सर्व सांगितलं आहे. आता त्याला पाहिल्याचं पण तिने मला सांगितलं. तिने मानसला ओळख दिली नाही याबद्दल तिला खूप वाईट वाटत होतं. ती मला म्हणाली की मानस बरोबर त्याची पत्नी आहे. आता मानसचं लग्न झालं आहे असं दिसतंय. त्यामुळे मला आता त्या दोघांमध्ये यायचं नाही. तिने तुला त्याच्या बरोबर पाहिलं आहे. नशिबाने दोघांची क्रूर थट्टा केली आहे."
"अच्छा. पण नंदिनीने मानसला ओळख दाखवली नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटतंय. तुम्ही आता कुठच्या फ्लाईटने चालला आहात आणि कुठे राहता? तुमचं आणि नंदिनीचं काय नातं आहे?"
"आम्ही साताऱ्याला राहतो आणि आता आधी मुंबईला जाऊन नंतर साताऱ्याला जाणार. माझ्यासाठी नंदिनी मैत्रीण, बहीण सर्व काही आहे. माझं नाव चित्रा आहे. गेल्या दोन-तीन वर्षात तिने खूप काही भोगले आहे."
"ठीक आहे. हा माझा फोन नंबर आहे. तुम्ही या नंबर वर कृपा करून मिस्ड कॉल द्या. मला तुम्ही तुमचा साताऱ्याचा पत्ता द्या. तुम्ही मला, नंदिनीला आणि मानसला एकत्र आणण्यासाठी मदत कराल का? मानसचं नंदिनीवर जीवापाड प्रेम आहे. आमचं जरी लग्न झालेलं असलं तरी मी त्यांची फक्त इतरांसाठी पत्नी आहे. बाकी आमच्यात पती-पत्नीचे नातं नाहीये. त्यांनी त्यांच्या आईला दिलेल्या वचनाखातर माझ्याशी लग्न केलं आहे. लग्नाआधी त्यांनी त्यांच्या आणि नंदिनीच्या प्रेमाची मला पूर्ण कल्पना दिली आहे. ते अजूनही नंदिनीशी एकनिष्ठ आहेत."
"काय म्हणता! तुमचं नाव काय आहे! तुम्ही एवढा त्याग करायला का तयार आहात? तुम्हाला खरं तर इतका चांगला नवरा मिळाला आहे. तुम्ही त्याचं मन तुमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा सोडून दोघांना एकत्र आणायला कसं काय तयार झाला आहात?"
"माझं नाव उमा आहे. तुम्ही मला उमाच म्हणा. ते सर्व सविस्तर मी तुम्हाला नंतर सांगेनच. त्यासाठी आपल्याला भेटावं लागेल. तोपर्यंत तुम्ही मला तुमचा पत्ता देऊन ठेवा. तरीपण मला वाटतं की नंदिनीने मानसला ओळख दाखवायला हवी होती."
"नंदिनीने आधीच ठरवलं होतं की भविष्यात मानस कधीही भेटला तरी त्याला ओळख दाखवणार नाही कारण अपघातामुळे तिच्या पायात व्यंग निर्माण झालं आहे. तिला थोडं लंगडत चालावं लागतं. अजून पण एक महत्त्वाचं कारण आहे ते मी तुला नंतर सांगेनच."
उमाने येऊन मानसला सर्व सांगितलं. त्याचा खूप भ्रमनिरास झाला. मानसला राहून राहून वाटत होतं की नंदिनीने मला ओळख दाखवायला हवी होती. मला तिच्याशी खूप बोलायचं आहे. उमाने नंदिनीला पाहिलं नव्हतं त्यामुळे आधी ती कशी दिसते हे तिला काहीच माहित नव्हतं. पण आता थोडं दुरून पाहिल्यावर सुद्धा नंदिनी किती सुंदर आहे हे तिला कळत होतं. उमाला मनापासून वाटत होतं की आपल्याला समजून घेणाऱ्या मानसने कायम सुखी राहावं. त्याचं हरवलेलं प्रेम त्याला पुन्हा मिळावं. मी तर त्याच्या आयुष्यात नंतर आले आहे. काहीही झालं तरी आपल्याला मानसला मदत करायलाच हवी. तिचं एक मन तिला सांगत होतं देवा ब्राह्मणांच्या साक्षीनेच तीची आणि मानसची गाठ बांधली गेली होती. कदाचित हेच विधीलिखित असेल. आपण पण मानसवर मनापासून प्रेम करायला लागलो आहोत. आता
त्यागमूर्ती होण्याची गरजच काय. तिने तिच्या मनाला आवर घातला आणि मानसचा उदास चेहरा पाहून त्याला म्हणाली,
त्यागमूर्ती होण्याची गरजच काय. तिने तिच्या मनाला आवर घातला आणि मानसचा उदास चेहरा पाहून त्याला म्हणाली,
"तुम्ही असे उदास राहू नका मी तुम्हाला वचन देते की तुम्हाला आणि नंदिनीला एकत्र आणण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करेन. तुमचं प्रेम तुम्हाला मी नक्कीच परत मिळवून देईन."
"समजा माझं प्रेम मला परत मिळालं तर तुझं काय!"
अशावेळी सुद्धा मानसच्या मनात आपला विचार येतोय ही भावनाच उमासाठी खूप सुखावह होती. ती त्याला म्हणाली,
"माझं आयुष्य कसं घालवायचं ते मी नंतर बघेन. पण मी तुम्हाला कायम सुखी आणि आनंदी बघू इच्छिते.'
(नंदिनी जीवित आहे हे पाहून मानसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांना एकत्र आणण्यात उमा यशस्वी होईल का? पुढील सर्व भाग वाचत रहा.)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे