Login

तिची तपश्चर्या - भाग ३९

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग ३९

माहेरी जायचे म्हणून उमा आज खूप खुश आहे. मानसचं पण आज नेहमीचं रुटीन सुरू होईल. पाहूया पुढे..

सकाळी उमा उठली तेव्हा मानस शांत झोपला होता. ती हळूच आवाज न करता स्वतःचे सर्व आवरून खाली आली. गीता ताईंनी नेहमीप्रमाणे चहाचं आधण ठेवलं होतं.

"उमा वहिनी तुम्ही किती लवकर उठता. मस्त थंडी पडली आहे जरा जास्त वेळ झोपायचं ना."

"गीता ताई मला जास्त वेळ झोपायची सवय नाही. सकाळी लवकर उठलं की दिवसभर मला अगदी प्रसन्न वाटतं. मी आलेच मागे बागेत जाऊन."

बागेतली खूप सारी फुलं फुललेली होती. अशी ताजी टवटवीत फुलं बघून तिच्या मनाला खूपच प्रसन्न वाटलं. तिने पाहिलं तर एका रोपट्यावर दोन छोटे छोटे सुंदर पक्षी बसले होते. दिसायला ते खूपच आकर्षक होते. त्यांच्या मंजुळ आवाजात काहीतरी प्रेम गुंजन चाललं होतं. त्यांची हालचाल इतकी मनमोहक होती की उमा भान हरपून पाहतच राहिली. थोडा फेरफटका मारून ती आतमध्ये आली तेव्हा आई डायनिंग टेबलवर बसल्या होत्या.

"काय ग एक आठवडा तुझ्या आठवणींमध्ये झाडं सुद्धा सुकली होती का? तुला बघून त्यांना पण नक्कीच आनंद झाला असेल."

"आई तुम्ही पण माझी मस्करी करता ना. पण मला आवडतं झाडांशी बोलायला. आज आत्ता आपल्या बागेत खूप सुंदर दोन छोटेसे पक्षी आले होते. "

"नाही ग मस्करी नाही करत. ये चल चहा घेऊया. एक माणूस जास्तच खुश असेल आज माहेरी जायला मिळणार म्हणून." इतक्यात बाबा आणि मानस पण ब्रेकफास्टसाठी खाली आले. थालीपीठांचा मस्त खरपूस सुगंध येत होता. खरपूस सुगंध नाकात भरून घेत मानस लगेच बोलला,

"गीता ताई अशी मस्त खरपूस थालीपीठं खाल्ली की दिवसभर त्यांची चव रेंगाळत राहते. त्याच्याबरोबर आलं आणि गवती चहा घातलेला कडक चहा मग काय विचारायलाच नको."

"आज खूप दिवसांनी तुम्ही ब्रेकफास्ट करायला आहात म्हणून तुमच्या आवडीचा मेनू ताईंनी ठरवला."

"आणि हो उमा, आता शंकर आज इथेच असेल तू आईकडे जाताना गाडी घेऊन जा."

"नको मी जाईन रिक्षाने उगाच त्यांना इतका थांबून राहावे लागेल."

"अगं वेडाबई तो तुला सोडून येईल परत आणि संध्याकाळी सावकाश घ्यायला येईल."

"बरं माझी काही हरकत नाही."

मानस आणि बाबा गेल्यानंतर उमा माहेरी निघाली. आज तिला जणू पंख फुटले होते. कारने जात होती तरीसुद्धा तिला आपल्या माहेरची वाट खूप दूर असल्यासारखी वाटत होती. प्रत्येक मुलीची हीच भावना असते. आई-बाबांची परिस्थिती पण काही वेगळी नसणार. सकाळपासून कितीतरी वेळा त्यांनी आत बाहेर केलं असेल. प्रत्येक रिक्षाच्या, गाडीच्या आवाजाबरोबर दोघेही नक्कीच बाहेर आले असतील. उमाने शंकर दादांना सांगितलं की घरासमोर गाडी उभी करा आणि हाॅर्न अजिबात वाजवू नका. हॉर्न न वाजवताही गाडी घरासमोर उभी राहताच आई बाबा, राधाताई सगळे धावतच बाहेर आले. गाडीचे दार बंद करून उमा धावतच आईकडे गेली. शंकर दादांनी तिचे सर्व सामान घरात आणून ठेवलं होतं. आई , बाबा आणि राधा ताईला भेटताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या आनंदाच्या प्रसंगात पण तिने शंकरदादांना आतमध्ये बोलावले. ते बाहेरच्या बाहेर निघून जात होते पण तिने आग्रहाने त्यांना कोकम सरबत प्यायला लावलं. ते गेल्यावर रमाताई उमाला म्हणाल्या,

"आधी इथे बस बघू तुझी दृष्ट काढते. ‌ अगदी पार काश्मीरपर्यंत जाऊन आलीस. किती जणांची नजर लागली असेल कोण जाणे."

"आई तुझं काहीतरीच असतं हं. ‌ आता मी मोठी झाले आहे. माझे लग्न झालंय. मला कशाला कोणाची नजर लागेल. तुम्ही सर्वजण आधी इथे बसा बघू. मी तुमच्यासाठी काय काय आणले ते तरी बघा. अगं ताई तू श्रेयाला नाही आणलंस का?"

"आता तिची शाळेची वेळ आहे ना.‌ती शाळेत गेली. मी इथे येणार आहे तिला माहिती असतं तर लबाड शाळेतच गेली नसती."

"अगं काय गं! हा बघ तिच्यासाठी पण मी सुंदर स्वेटर आणलाय."

"अगं उमा आमच्यासाठी कशाला काय आणायला पाहिजे तुम्हाला. बरं तुम्हा दोघींसाठी कोकम सरबत केलं आहे ते प्या बघू आधी. नंतर सर्व खरेदी बघूया आपण."

"उमा आणि राधा आयुष्यात तुम्हाला मी कधी कुठे फिरायला नेऊ शकलो नाही. तुटपुंज्या पगारात संसाराची घडी बसवली हेच माझ्या आणि रमासाठी खूप मोठं आहे. यात मला रमाची खंबीर साथ मिळाली. तिने खूपच कष्ट घेतले."

"बाबा तुम्ही असं का म्हणता. तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला वाढवलं त्यामुळेच ना राधाताईला पण चांगलंच सासर मिळालं आणि मला सुद्धा मानस सारखा नवरा मिळाला. आम्हाला शिकवलंत, योग्य ते संस्कार दिले हेच तर खूप महत्त्वाचं असतं ना."

"बरं चला गप्पा नंतर होत राहतील आधी जेवून घेऊया. राधा तुझ्या आवडीचे गुलाबजाम केले आणि उमा तुझ्या आवडीच्या मस्त कुरकुरीत अळूवड्या केल्या आहेत."

"आई अळूच्या वड्या जास्त केल्या आहेत ना. जाताना मला थोड्या बरोबर दे बरं का. मानसला पण अळूवड्या खूप आवडतात."

"अग्गोबाई! बघितलंस आई ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे तरी तिला मानसची आठवण येते. आता तू तर आधी पोटभर खाऊन घे."राधा तिची मस्करी करत बोलली.

"हो ग मला माहितीये गेल्यावेळी तुम्ही जेवायला आला होतात तेव्हा मानसने अगदी आवडीने अळूवड्या खाल्ल्या आणि स्तुती पण भरपूर केली होती."

"बरं ते जाऊदे आई आता या महिन्यात बाबा निवृत्त होणार आहेत. आई आता तू पण तुझ्या कामाचा पसारा आवरता घे. एक तर आता तुझ्या मदतीला मी नसणार आणि तुला पण आरामाची आवश्यकता आहे. किती वर्ष सतत राबतेच आहेस."

"अगं त्या दिवशीच समोरच्या आशाची सून निमा आहे ना ती आली होती माझ्याकडे. मी आशाला बोलले होते की आता मी कामं कमी करणार आहे. ती मला म्हणाली की तुमची थोडं कामं मला द्याल का? तिची दोन लहान मुलं शाळेत शिकत आहेत म्हणजे तिचा थोडा संसाराला हातभार पण लागेल."

"अरे वा हे चांगलंच झालं ना. म्हणजे तुझ्या गिर्हाईकांची गैरसोय पण होणार नाही आणि तिला पण थोडी मदत होईल."

"तिला सांगितलं की मी माझ्या मोठ्या गिऱ्हाईकांची तुझ्याशी ओळख करून देईन म्हणजे ते थेटच तुला ऑर्डर देतील."

"चला मी आता जरा वेळ पडतो तुम्ही गप्पा मारत बसा."

"आई तू पण जरा वेळ आडवी हो मी आणि राधा ताई बाहेर गप्पा मारत असतो."

"ए हो चल आपल्या आवडीच्या जागेवर बसून
मनसोक्त गप्पा मारूया. तू फोटो काढले असतील ना दाखव ना मला."

"चल बाहेर दाखवते इथे आई-बाबांसमोर नको."

"एवढे रोमँटिक फोटो काढलेस की काय जे आई बाबांना दाखवू शकत नाही."

"चल ग चावट कुठली. ते आता झोपतायेत ना म्हणून म्हटलं." राधा स्लाईड करून एकेक फोटो पाहत होती. सगळे सिंगल फोटो होते. ते पाहून ती म्हणाली,

"हे काय दोघांचा एक पण एकत्र फोटो नाही. मला वाटलं काश्मीरला तुमचे मस्त रोमँटिक फोटो बघायला मिळतील. काय गं भांडली नाहीस ना मानसशी."

"ताई मी तुझ्याशी कधी भांडले नाही तर मानसशी कशी भांडेन! गप्पा मारताना वेळ कसा गेला कळलंच नाही. पाच वाजले मला आता निघावं लागेल. आईने केलेल्या आलं घातलेल्या चहाचा मस्त वास आलाय. चल जाऊ आत मध्ये."

आईने चहा बरोबर खायला मस्त कुरकुरीत कांद्याची भजी केली होती. बाहेर निघताना उमाचा पाय निघतच नव्हता. एकदाची ती तिथून बाहेर पडली. आईने निघताना तिच्याबरोबर अळूवड्या, चिवडा, पापड्या आणि कुरडया दिल्या.

(उमाचे नवीन आयुष्य खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरू होणार होतं. पाहूया पुढील भागात)