तिची तपश्चर्या - भाग ४०
आईबाबा आणि राधाताईला भेटल्यामुळे उमाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. आता पाहूया पुढे..
संध्याकाळी उमा घरी गेली तेव्हा शकुंतला ताई बाहेर झोपाळ्यावर बसून एक पुस्तक वाचत होत्या. उमा आलेली बघताच त्या म्हणाल्या,
"किती तो चेहरा खुलला आहे. कडकडून भेटलीस ना सगळ्यांना. आता रात्री तुला जेवायचं नसेल पोट भरलं आहे ना!"
"हो आई खरंच माझं पोट खूप भरलं आहे. आईने आग्रह कर करून जेवायला लावलं शिवाय निघताना चहाबरोबर पण कांदा भजी केली होती. तुमच्यासाठी पण अळूवड्या आणि बाकीचं काय काय दिलं आहे."
"अळूवड्या सासुबाईनी खास जावयासाठी दिल्या असणार. गेल्यावेळी किती आवडीने खाल्ल्या होत्या त्याने."
उमा रुममध्ये जाऊन तिचे सर्व आवरून आली तोपर्यंत मानस आणि बाबा पण फॅक्टरीतून आले. रात्री जेवताना मानसच्या ताटात जेव्हा कुरकुरीत अळूवड्या आणि टम्म फुगलेल्या कुरड्या आल्या तेव्हा तो अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आलं उमाचे आई बाबा आपल्यावर किती प्रेम करतात. एकदम उत्साहित स्वरात तो म्हणाला,
"अरे वा आईच्या हातच्या अळूवड्या म्हणजे सोने पे सुहागा. आई तू पण खूप छान करतेस. प्रत्येकाच्या हाताची वेगळीच चव असते ना."
"अरे तू त्यांचं कौतुक केलं म्हणून मला वाईट वाटत नाही. खरंच त्या खूप छान करतात."
जेवल्यावर सगळेजण आपापल्या खोलीत झोपायला गेले.
मानस म्हणाला,
मानस म्हणाला,
"उमा सर्वांना भेटवस्तू आवडल्या ना. आज खूप दिवसांनी सगळ्यांना भेटल्यावर तुला खूप बरं वाटलं असेल."
"हो सगळ्यांना भेटवस्तू आवडल्या. मला पण खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटल्यावर."
"बरं उद्यापासून तुझा दिनक्रम काय असेल. एकतर तू सकाळी लवकरच उठून बसतेस. तुझा वेळ सत्कारणी लागायला हवा. मी तुझ्या गाण्याच्या क्लासची चौकशी केली आहे. आपल्या घरापासून थोडा दूर आहे. आठवड्यातून फक्त दोन वेळाच असेल. सकाळी अकरा ते साडेबारा अशी वेळ असेल. मंगळवार आणि गुरुवार असे दोन वार असतील. जाशील ना तू."
"तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की मी गाण्याच्या क्लासला जावं तर मी नक्कीच जाईन. मला ते खूपच आवडेल. पण तिथे सगळ्याच लहान मुली नसतील ना."
"अगं नाही तिथे वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया असतील तू काहीच काळजी करू नको. पुरुषांचा पण आहे क्लास पण त्यांचे वार वेगळे आहेत."
"हो मी नक्कीच आनंदाने जाईन."
"मी तुझ्यासाठी एक हार्मोनियम पण बघितली आहे. येत्या रविवारी तू माझ्याबरोबर चल. तुझ्यासाठी ती योग्य आहे का एकदा तू पण बघून घे. रियाज करायला खूप चांगलं आहे. "
"बापरे तुम्ही माझं गाणं इतकं मनावर घेतलं आहे हे पाहून मला खूपच छान वाटतं."
"फावल्या वेळेत तू आपल्या रूम मध्ये कोणतेही पुस्तक वाचू शकतेस. माझी चित्रं पाहू शकतेस. माझी प्रत्येक वस्तू आता तुझी आहे. तेव्हा कोणत्याही वस्तूला हात लावण्यासाठी तुला परवानगीची गरज नाही."
झोपताना उमा विचार करत होती मानस आपलं मन इथे रमावं म्हणून किती प्रयत्न करतो आहे. त्याच्या हृदयातल्या एका कोपऱ्यात तरी आपलं निश्चितच स्थान आहे. असं नसतं तर त्याने आपली एवढी काळजी घेतलीच नसती. नक्कीच असं असेल की त्याच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती असेल किंवा स्वतःबद्दलच अपराधीपणाची भावना असेल. नक्की काय असेल त्याच्या मनात. काही का असेना पण त्याच्या वागण्यामुळे आपल्या मनाला आनंद निश्चितच मिळतो. आपण नेहमी समोरच्याच्या कृतीकडे चांगल्या हेतूनेच पाहतो. आता तर समोर आपला नवरा आहे. दुसरा अर्थ न काढलेलाच बरा. आता आपल्यासाठी हार्मोनियम घेऊ असं म्हणाला. गाणं म्हणताना हार्मोनियम वाजवणे यासारखा परमानंद नक्कीच नाही. तसं पण शाळेत असताना आपण मूलभूत स्वरालंकार वाजवायला शिकलो आहोत. त्याचा आता सराव करायला हवा.
मानसच्या मनात येत होतं माहेरी उमा दिवसभर काही ना काही कामात तरी व्यस्त राहायची. इथे तिला काहीच काम नाही. आई आणि ती दोघी बोलून बोलून तरी किती बोलणार. उमाला घरात कंटाळा येणार नाही याच्याकडे तरी आपण लक्ष द्यायलाच हवं. आईचं आणि उमाचं नातं आता खूपच चांगलं बहरून आलं आहे. आई तिला तिच्या बरोबर महिला मंडळ, कधी बाजारात, देवळात कुठे कुठे घेऊन जाईल.
दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळी मानस शकुंतला ताईंना म्हणाला,
"आई आता मी आणि बाबा दिवसभर आम्ही दोघेही घरात नसणार. लाडक्या सुनेची काळजी तुलाच घ्यायची आहे. तिला आपल्या घरी कंटाळा येऊ नये याकडे जातीने लक्ष दे नाहीतर ती सारखी सारखी माहेरी पळेल." हे ऐकल्यावर सर्वजण हसायला लागले.
"अहो काही काय बोलता. मी आणि आई आम्ही एकमेकींशी दिवसभर गप्पा मारल्या तरी कंटाळणार नाही. अधूनमधून मी आणि आई पत्ते खेळू, कधी ल्युडो खेळू. आमचा वेळ अगदी मजेत जाईल. गीता ताई पण आहेत आमच्या टीम मध्ये."
"तुझं लक्ष फॅक्टरीतच असू दे. उमा काय करते हे तू बघत बसू नकोस. नाहीतर बिचाऱ्या बाबांवरच कामाचा जास्त ताण पडेल. आणि उमाला कंटाळा आला नाही ना हे बघायला तू सारखा घरी येशील."
"आई मी आपलं तुझी मजा करायला गेलो आणि तू मलाच टार्गेट केलंस."
"बच्चमजी मी तुझीच आई आहे."
"आई आणि अधूनमधून तुम्ही मला स्वयंपाक घरात पण थोडा प्रवेश द्या. मला नवीन नवीन पदार्थ करून तुम्हाला सर्वांना खायला घालायला नक्कीच आवडेल."
"हे बघ तुला इकडे कसलंही बंधन असणार नाही. तुला मनाला वाटेल ते तू करत जा. आता मी नक्की खात्रीने सांगू शकेन की तु जे काही करशील ते आम्हाला आवडेलच. कधी कधी तुझ्या मैत्रिणींना आपल्या घरी बोलवत जा, आई-बाबांना इकडे यायला सांग. तू पण जात जा. कधी मैत्रिणींमध्ये जा. मैत्रिणी भेटणं म्हणजे आपल्यासारख्या स्त्रियांसाठी एक टॉनिक असतं. त्या भेटल्या म्हणजे आनंदाला उधाणच येतं. आम्ही मैत्रिणी पण अधून मधून भेटत असतो."
उमाला अजून एक महत्त्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे चित्राताईंना फोन करणं. कधी तिच्या मनात येत होतं की अज्ञानात सुख आहे. आपण नंदिनी बद्दल जाणून घेऊन काय करणार आहोत. त्यापेक्षा आपलं नशीब आपल्या आयुष्याला जी दिशा दाखवेल त्या मार्गावरूनच आपण चालणं हेच आपल्यासाठी हितावह आहे. हा स्वार्थी विचार होईल नाही का. शुभस्य शीघ्रम. आपण आत्ताच फोन करूया का.इतक्यात आई म्हणाल्या,
"उमा मी देवाची पूजा करते तोपर्यंत तुला काही वाचन करायचं असेल तर वर जाऊन वाचत बस."
पडत्या फळाची आज्ञा घेऊन उमा वरती गेली आणि ती चित्राताईंचा नंबर फिरवू लागली.
(चित्राताई उमाचा फोन उचलतील का. त्या तीला काय सांगतील पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे