Login

तिची तपश्चर्या - भाग ४१

एका सामान्य मुलीच्या असामान्य जिद्दीची कहाणी

तिची तपश्चर्या - भाग ४१

मोबाईल वर उमाने चित्राताईंचा नंबर शोधला आणि त्यांना फोन लावला. पाहूया पुढे..

चित्राताईंच्या फोनची नुसतीच रिंग वाजत होती. त्यांनी काही फोन उचलला नाही. उमाने परत एक दोन वेळा ट्राय केला पण परत तेच झालं. उमाचं विचारचक्र सुरू झालं. ह्या माझा फोन मुद्दाम उचलत नसतील की त्यांचा फोन कुठेतरी आजूबाजूला असेल आणि त्यांना रिंगच ऐकू आली नसेल. काहीही असू शकतं. काही हरकत नाही आपण संध्याकाळी पुन्हा फोन ट्राय करूया. कदाचित त्या सुद्धा देवपूजा करत असतील. कदाचित आपलं नाव बघून त्या फोन उचलत नसतील. त्यांनी आपला नंबर सेव्ह केला असेल ना. प्रत्यक्ष बोलल्याशिवाय काहीच कळणार नाही. तिला आठवलं त्या बोलताना म्हणाल्या होत्या की नंदिनीने ओळख न दाखवण्याचं आणि एक महत्त्वाचं कारण आहे. आता ते महत्त्वाचे कारण काय असेल बरं. तिचं लग्न झालं असेल की तिच्या आयुष्यातील मानसची जागा दुसऱ्या कोणी घेतली असेल. एकदाचा काहीतरी सोक्षमोक्ष लागायलाच हवा. असं अधांतरी जीवन जगणं म्हणजे टांगती तलवारच आहे . संध्याकाळपर्यंत त्यांचा फोन नाही आला तर आपण पुन्हा करूया असा विचार करून ती मानसची पुस्तके पाहू लागली.

मानसचा पुस्तक संग्रह खूप उच्च दर्जाचा होता. ऐतिहासिक, सामाजिक सर्वच प्रकारचे साहित्य त्याच्या संग्रही होते. तिने सामाजिक पुस्तकांचा कप्पा उघडला. बहुतांश तिच्या आवडीचेच लेखक होते. तिला आश्चर्य वाटलं. वाचनाच्या बाबतीतील आपली आवड एकच आहे. त्यातली काही पुस्तके तिने वाचली होती तर काही तिच्यासाठी नवीन होती. आपला वेळ वाचनात खूप छान जाईल. तिच्यासाठी नवीन असलेले 'जीवनाची कसोटी' पुस्तक तिने उघडून पाहिले. अशीच पानं उलटताना तिला एक फुलस्केप पेपर दिसला. उघडल्यावर तिच्या लक्षात आलं की मानसने नंदिनीला लिहिलेलं ते पत्र होतं. दुसऱ्याची पत्रं वाचायची नाही असं म्हणून लगेच तिने ते बंद करून तसंच ठेवलं. मानस आणि नंदिनी नियमित भेटत होते तर त्याला तिला पत्र लिहायची गरज का भासली असेल. किंवा हे पत्र त्याने त्याचे प्रेम व्यक्त करण्याआधीच लिहिलेलं असावं. मानस आणि नंदिनी दोघेही एकाच ग्रुप मध्ये होते. त्यांची सर्वांचीच खूप चांगली मैत्री होते. त्यांना ग्रुप मध्ये असताना एकमेकांशी स्वतंत्रपणे बोलायला वेळ आणि संधी मिळत नव्हती. म्हणूनच कदाचित मानसने नंदिनीला पत्र लिहिलं असावं इतक्यात आईंनी तिला हाक मारली आणि ती खाली गेली.

"घे उमा प्रसाद घे. रोज पूजेसाठी फुलं आणण्याचं काम गीता करायची. आज तू अगदी विविध प्रकारची आणि विविध रंगांची फुले आणली होती. आज देवांना हार सुद्धा घालायला मिळाले. मी अधून मधून करते हार रोजच शक्य होत नाही.त्यामुळे देवांना पण खूपच प्रसन्न वाटलं असेल. तुमच्या घरी पूजा कोण करतं."

"माझी आई सकाळी लवकर उठली की आधी पूजा करते. आईची जर गडबड असेल तर ती मला किंवा राधाताईला सांगायची. शाळेच्या सुट्टीच्या दिवशी बाबा स्वतःहूनच पूजा करतात. बाबा पूजा करताना मला खूप गंमत वाटायची. प्रत्येक देवाशी ते बोलायचे. त्यांची काही काही वाक्यं अशी असायची,

"बाप्पा तू तर अंतर्यामी आहेस. राधा आणि उमाचं सगळं अगदी व्यवस्थित होऊ दे. आज उमाचा गणिताचा पेपर आहे. पेपर चांगला येऊ दे आणि चांगला जाऊ दे."

"बाळकृष्णा आज रमाने तुझ्या आवडीचं लोणी काढलं आहे. येणार आहेस का तू लोणी चोरायला. तू चोरी करतोस म्हणून आम्हाला पण चोरी करून असं खायला आवडतं."

माझ्या बाबांचा आवाज पण खूप गोड आहे. पूजा करताना ते अगदी तल्लीन होऊन भक्तीगीत गात असतात. म्हणून बाबा जेव्हा पूजा करायचे तेव्हा आम्हाला त्यांचं देवाशी बोलणं ऐकून खूपच मजा यायची."

"बरं तुला भूक लागली की सांग आपण जेवायला बसूया. तोपर्यंत बाहेर झोपाळ्यावर बसून गप्पा मारूया."

गप्पा मारताना शकुंतलाताईंनी त्यांचं वीणकाम हातात घेतलं होतं. विणकाम करता करता त्या गप्पा मारत होता. इतक्यात समोरच्या बंगल्यातील सविता आली आणि म्हणाली,

"अगं हे काय शकू इतक्यातच विणकाम करायला घेतलंस. नातवाचं तोंड बघायची खूपच घाई झालेली दिसते तुला."

सविता मावशींचं बोलणं ऐकून उमाला अवघडल्यासारखं झालं. आता हा काय विषय निघाला. आई सविताला म्हणाल्या,

"काय हे सविता. काय तुझं बोलणं. जिभेला काय हाड आहे की नाही तुझ्या. त्यांच्या लग्नाला अजून महिना सुद्धा झाला नाही. काय वेड लागलं का तुला आणि मी काय विणतेय ते तरी बघ. क्रोशाचा टेबलक्लोथ विणतेय मी."

"अग तू इतकं मनाला लावून घेऊ नकोस. मी मस्करी केली."

"दुसरं म्हणजे मला इतर सासवां सारखी मला माझा मुलगा आणि सुनेकडून कसलीही घाई नाही. त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे. एकतर दोघेही वयाने तसे लहान आहेत आणि त्यांना मोकळेपणाने जरा फिरून घेऊ दे. उमाला फिरण्याची खूप हौस आहे. त्यामुळे हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. तू पण तसं आजूबाजूला सांगून ठेव म्हणजे मला कोणी विचारायला येणार नाही. आलं तरी मी उत्तर द्यायला खंबीर आहे."

"अगं राहू दे ग. तू आणि उमा बाहेर दिसलात म्हणून मी आपली आले गप्पा मारायला. म्हटलं उमाची जरा ओळख होईल."

"हो उमा ही आहे सविता माझी मैत्रीण समोरच राहते. ही आमची उमा. खूप लाघवी आहे. कसं आहे ना सविता आपल्याकडे एकदा नवीन लग्न झालं की आडून आडून हे असे सूचक प्रश्न विचारायला सुरुवात होते. आपल्या समाजात स्त्री म्हणजे चूल आणि मूल या पलीकडे काही विचारच करत नाहीत. पूर्वीच्या काळी ठीक होतं तेव्हा स्त्री ही घरातच राहायची. तिला पण लवकरच आई व्हायची इच्छा असायची. पण आता काळ बदलला आहे. मुली शिकल्या सवरलेल्या असतात. त्यांना पण हौस मौज असते. काहीजणी इथे नोकरी व्यवसाय करतात. आताच्या मुली मोठ्या हिमतीने सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत आहेत."

उमा विचार करू लागली आता तरी आईंनी वेळ मारून नेली आहे. पण भविष्यात आपल्याला या प्रश्नाला सामोरे जावंच लागेल. तेव्हा काय करायचं. काही काही बायका तर खोचकपणे असे प्रश्न विचारतात. लग्न झालं आणि मूल झालं की लग्नाचे सार्थक झाल्यासारखंच काही जणींना वाटतं. खरंतर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. काहींना वैद्यकीय समस्या असू शकते. सर्वांच्या समोर असा प्रश्न विचारतात तेव्हा त्या मुलीला किती कानकोंडं झाल्यासारखं वाटतं याचा कोणी विचारच करत नाही. थोड्यावेळाने त्या सवितामावशी निघून गेल्या.

"उमा तू सविताच्या बोलण्याचा जास्त विचार करू नकोस. चल भूक लागली असेल आपण आता जेवूया."

(समाजात बाहेर फिरायचं म्हणजे हे असे प्रश्न आज ना उद्या समोर येणारच याची उमाला जाणीव झाली. आता काय होईल पाहूया पुढील भागात)