तिची तपश्चर्या - भाग ४२
दिवसा मागून दिवस जात होते. चित्राताई फोन उचलत नव्हत्या. पाहूया पुढे..
उमाचं चाकोरीबद्ध जीवन सुरू झालं होतं. ती त्यात सुद्धा खुश होती कारण एकंदरीतच तक्रार करण्याचा तिचा स्वभाव नव्हता. चित्राताईंना उमाने बऱ्याच वेळा फोन करून झाला परंतु त्यांनी काही फोन उचलला नाही. तिने मानसला याबद्दल सांगितले. तो म्हणाला,
"सध्या आता तू काही त्यांचा फोन ट्राय करू नकोस. कदाचित फोनचा काही प्रॉब्लेम असेल बघूया त्यांचा फोन येतो का."
अधून मधून उमा आईंच्याबरोबर बाजारात जात होती, कधी शॉपिंगला जात होती. असंच एक दिवस सकाळच्या वेळी उमा आणि आई बाजारात जाणार होत्या. त्या दिवशी त्यांना जरा कंटाळा आला होता. त्या उमाला म्हणाल्या,
"आज तू एकटीच जाऊन ये बाजारात. रिक्षाने जा. मी आराम करते."
"आई आपण उद्या जाऊया. सामानाची काही घाई नाहीये." खरंतर सामान घरातील कोणीही नोकर आणू शकत होता परंतु ह्या दोघींना थोडा विरंगळा म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली होती. ती पण जाणार नाही म्हणून आई म्हणाल्या,
"अगं तू जाऊन ये. बाहेर मोकळ्या हवेत फिरून ये आणि तुला स्वतःसाठी काय घ्यायचं असेल तर घे बरं का. हल्ली बाजारात नवीन लेटेस्ट डिझाईनच्या वस्तू येत असतात. तेवढाच त्या बघण्यात तुला जरा मजा येईल. मी जरा विणकाम करत बसते."
मग ती एकटीच बाजारात गेली. एका दुकानातून सामान घेऊन बाहेर पडत असताना अचानक तिला तिच्या शाळेतल्या दोन मैत्रिणी उषा आणि माधवी भेटल्या. उमाला बघून दोघी आनंदाने ओरडल्या,
"कशी आहेस. लग्नानंतर आज पहिल्यांदाच भेटतेस. लग्नाचा एकदम निखार आलाय बरं का तुझ्या चेहऱ्यावर. भाऊजींचं खूपच जास्त प्रेम दिसतंय तुझ्यावर. तसं तर काय तू जातीची सुंदर आहेस 'जासुं'."
"चल गं माधवी तू आपलं काहीही बोलत असते. तुमचं कसं चाललंय. तुम्ही अगदी जोडीने फिरत असता ना दोघी."
"हो ग एकीला दुसरी बरोबर असली की बरं वाटतं आणि आम्ही राहतो पण जवळजवळ. दोघींचे नवरे कामावर गेले की आम्ही निघतो फिरतीवर." समोर उसाच्या रसाचं गुऱ्हाळ होतं ते पाहून लगेच उषा म्हणाली,
"चला आपण तिथे बसून गप्पा मारूया. उमा तुला आठवतं का आपण कॉलेजमध्ये असताना कधी उसाचा रस प्यायला गेलो तर आधी हाफ ग्लास प्यायचो आणि नंतर पुन्हा अजून एक हाफ ग्लास रस घ्यायचो. आपल्याला तेव्हा वाटायचं दोन हाफ घेतल्यावर एक फुल पेक्षा जास्त रस मिळतो."
"तेव्हा काय मला तर आता सुद्धा असेच वाटते की दोन हाफ रस घेतल्यावर एक फुल पेक्षा जास्त रस मिळतो. त्यामुळे आपल्याला तिथे त्या बाकड्यावर बसायला जास्त वेळ पण मिळायचा. आज पण आपण तसंच करू."
उषा रसवाल्या दादाला म्हणाली,
"दादा तीन हाफ रस द्या मस्त लिंबू आणि मसाला टाका बरं का." इतक्यात माधवी उत्साहाने म्हणाली,
"ए उमा ऐक ना आम्ही दोघी आणि आमचे अहो येत्या रविवारी गावाच्या बाहेर एक देवीचे देऊळ आहे आणि तिथून जवळच एक आमराई आहे तिथे वनभोजनासाठी जाणार आहोत. तू आणि भाऊजी पण आमच्या बरोबर या ना. तेवढीच जरा जास्त ओळख होईल. गप्पा गोष्टी होतील."
उमाने विचार केला की मानस काही या गोष्टीसाठी तयार होणार नाही. या दोघींना सुरुवातीलाच नाही सांगायला हवं. लगेच ती म्हणाली,
"अगं नाही मानसना फॅक्टरीत खूप काम असतं आणि एकच रविवार मिळतो त्यांना. त्यामुळे ते शक्यतो कुठे जात नाहीत. तुम्ही जा मस्त मजा करा."
"अगं घाबरतेस की काय आम्ही तुझ्या नवऱ्याला छळणार नाही. आज आता तू अनायसे भेटली आहेस तर तुम्ही दोघं नक्की याच. तू एक काम कर भाऊजींचा नंबर दे आमच्याकडे आम्ही भाऊजींशी बोलतो."
"अगं मी सांगते ना ते नाही येणार. उगाच फोन करण्याच्या भानगडीत पडू नका."
"तु आम्हाला त्यांचा नंबर दे नाहीतर आम्ही घरी येऊन त्यांना आमंत्रण देऊ. बघ आता तूच काय ते ठरव फोन नंबर द्यायचा की आम्ही घरी यायचं."
दोघींनी जबरदस्तीने उमा कडून मानसचा नंबर घेतला. आम्ही करू फोन. तू काय काळजी करू नकोस. उसाचा रस पिता पिता बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या.
"उमा तुला ते राणे सर आणि परब मॅडम आठवतात का ग?"
"हो म्हणजे काय दोघेही एकदम तरुण होते आणि शिकवायचे पण खूप छान."
"हे बघ तुला काय फक्त त्यांचं शिकवणंच आठवतं का! अगं त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवायचे ना कॉलेजमध्ये."
"ते वात्रट मुलांचे उद्योग होते. त्या दोघांचं तसं काही नव्हतं. अगं ती ललिता भेटत नाही का तुम्हाला. लग्नाला पण आली नाही."
"तिचं लग्न झालं आणि तीचं सासर दोन गावं सोडून आहे ना. तिची सासू म्हणजे एकदम हिटलर आहे. तिला जरा पण मोकळीक देत नाही. कधी आपण फोन केला तरीही तिला कोणाचा फोन आहे, किती वेळ बोलतेस असं सारखं टोकत असते."
खूप साऱ्या गप्पा मारून त्यांनी एकमेकांचा निरोप घेऊन निघाल्या. उमा घरी आली तर आई तिची वाटच बघत होत्या.
"अगं तुला खूप वेळ झाला फोन तरी करायचास ना माझा जीव घाबराघुबरा झाला होता."
"आई माझ्या दोन मैत्रिणी भेटल्या त्यामुळे आम्ही गप्पा मारत बसलो आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं फोन करायचं."
"काहीच प्रॉब्लेम नाही फक्त मला कळवत जा. मी तुझा फोन ट्राय करत होते परंतु नुसतीच रिंग जात होती. त्यामुळे मला जास्त काळजी वाटत होती ना."
"मी आता लक्षात ठेवेन. अहो आई माझा फोन पर्स मध्ये होता गप्पांच्या गडबडीत रिंग ऐकूच नाही आली."
रात्री जेवण झाल्यानंतर झोपायला गेल्यावर उमा मानसला म्हणाली,
"आज मी बाजारात गेले असताना मला माझ्या दोन मैत्रिणी उषा आणि माधवी भेटल्या. त्या दोघी आणि त्यांचे मिस्टर अधून मधून बाहेर फिरायला जात असतात. या रविवारी ते सर्व गावा बाहेरच्या देवीच्या देवळात आणि तिथून जवळच असलेल्या आमराई मध्ये वनभोजनासाठी जाणार आहेत. आपल्याला पण त्यांनी चलण्याचा आग्रह केला आहे. मी त्यांना स्पष्ट नाही सांगितलं पण त्यांनी माझ्याकडून तुमचा नंबर घेतला आहे. तुम्हाला फोन आला तर तुम्ही नाही म्हणून सांगा. म्हणून मी तुम्हाला आधीच कल्पना दिली."
"अरे बापरे तुझ्या मैत्रिणींनी आपल्याला बोलावलं आणि तू एवढं मोठं एक्सप्लेनेशन देतेस."
"फोन आल्यावर तुम्ही तुमचा निर्णय त्यांना कळवा बरं का."
"तुला त्यांच्या बरोबर जाण्यात रस नाहीये का. माझ्या माहितीप्रमाणे तुला तर तुझ्या मैत्रिणींमध्ये गप्पागोष्टी करायला, मिक्स व्हायला खूप आवडतं."
"मला आवडतं पण आता त्यांनी तुम्हाला पण बोलावलं. तुम्हाला असं सगळं जमणार नाही. दोघी चेष्टा मस्करी करणाऱ्या आहेत. तुम्हाला त्यांचं वागणं आवडेल की नाही माहित नाही. म्हणूनच तुम्ही सरळ नाही सांगा."
"बरं त्यांचा फोन येईल तेव्हा काय सांगायचं ते मी सांगेन तू काळजी करू नकोस."
खरं तर उमाला मैत्रिणीं बरोबर जावं असं खूप वाटत होतं. त्यानिमित्ताने मानस आणि आपल्या मैत्रीणींची, त्यांच्या मिस्टरांची ओळख झाली असती. वनभोजनाचा मस्त आस्वाद घेतला असता. परंतु मानसला असलं काही रुचणार नाही म्हणून बहुतेक ते नाहीच म्हणतील.
(मानसला उमाच्या मनातलं कळतं. तिला तिच्या मैत्रिणीबरोबर जायचं आहे. तो काय निर्णय घेतो पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा