तिची तपश्चर्या - भाग ४३
उमाच्या मैत्रिणींचा वनभोजनासाठी येण्याचं आमंत्रण देण्यासाठी मानसला फोन येणार आहे. पाहूया पुढे
मानसने उमाला त्याच्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नाही परंतु त्याने ठरवलं आहे उमा आणि तिच्या मैत्रिणींच्या मिस्टरांबरोबर वनभोजनासाठी जायचंच. उमा विचारात पडलेली पाहून मानस म्हणाला,
"काय ग कसला विचार करतेस? तुला तुझ्या मैत्रिणींबरोबर वनभोजनासाठी जायचं आहे का? जायचं असेल तर तू त्यांच्याबरोबर जाऊ शकतेस."
"मला जावसं वाटतंय पण तुम्ही नसताना मी कशी जाऊ. कारण त्या दोघींबरोबर त्यांचे मिस्टर पण असणार आहेत. मी त्यांच्यामध्ये 'ऑड मॅन आउट' होईन ना."
मानसने विचार केला उमाला आता उद्या रविवारीच गोड सरप्राईज देऊया. उमाने फोन करू नका सांगितल्यानंतर सुद्धा माधवीने मानसला फोन केला होता. तिने त्याला येण्याचा आग्रह केला. मानसने तिला आश्वासन दिलं की आम्ही दोघं येऊ. त्याने मुद्दाम उमाला सांगितलं नाही. आईला त्याने आधीच सर्व सांगून ठेवलं आणि आम्ही निघू तेव्हा कुठे निघाला असं विचारू नकोस असं सांगितलं. उमा तशी शांतच होती पण जसा रविवार जवळ आला तिला मानसला अगदी विचारावंसं वाटत होतं की माधवी किंवा उषाचा काही फोन आला का. परंतु तिला असं वाटलं असं विचारल्यावर मानसला वाटेल की हिला जायचं आहे पण आपण नाही म्हणतो म्हणून ती काही बोलत नाही.
शनिवारी रात्री झोपताना मानस उमाला म्हणाला,
"उद्या सकाळी आठ वाजता तयार हो आपल्याला बाहेर जायचं आहे. दिवसभरासाठी बाहेर जाणार आहोत तेव्हा सगळंच बाहेरचं खायला नको त्यामुळे थोडसं घरचं काहीतरी खायला घे."
"आपण कुठे जाणार आहोत मला सांगाल का?"
"जिथे जाणार आहोत ती जागा तुला माहिती नाहीये. तुला एका नवीन ठिकाणी फिरायला घेऊन जाणार आहे मी."
उमाला वाटत होतं की तो सांगेल तुझ्या मैत्रिणींबरोबर आपण जायचंय. तिचा जरा हिरमोड झाला. मानसने सगळी जय्यत तयारी केली होती. त्यांच्या इथे बनणाऱ्या मिठाईचे बॉक्सेस त्या सर्वांना भेट देण्यासाठी उमा यायच्या आधीच डिकी मध्ये ठेवले होते. उमा गाडीत बसल्यावर मानसने गाडी सुरू केली. उमाला आश्चर्य वाटत होतं आज ते दोघं निघाले तेव्हा आई सुद्धा काहीच बोलल्या नाहीत. नाहीतर त्यांच्या एक दोन सूचना तरी असतातच. आपण कुठे निघालो ते कदाचित त्यांना माहिती असावं.
"काय गं एरवी आपण कुठे जाणार असलो की तू खूप उत्साहात असतेस. बाहेरचा निसर्ग डोळ्यात साठवून घेत असतेस. गाणं गुणगुणतेस. आज अशी गप्प का आहेस."
"नाही काही नाही मी विचार करते आज तुम्ही मला कुठे नेत असाल!"
"कळेलच तुला लवकर."
मानसने एका झाडाजवळ गाडी थांबवली आणि उमाला उतरायला सांगितलं. उमाने समोर पाहिलं तर देवळाच्या बाहेर तिच्या दोन्ही मैत्रिणी उषा आणि माधवी आणि त्यांचे मिस्टर उभे होते. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. ती धावतच त्यांच्याकडे गेली. इतक्यात मानस पण तिकडे आला आणि म्हणाला,
"काय उमा कसं वाटलं सरप्राईज. बरं का मंडळी माझी ओळख मीच करून देतो मी मानस. आमच्या मॅडमना वाटत होतं की मी तुमचा फोन आल्यावर येणार नाही असं सांगेन. बघा ना तिने मला अजून ओळखलंच नाही. तिला वाटत होतं की मला असं तुमच्याबरोबर यायला आवडणार नाही."
"नाही हो भाऊजी आमच्या उमाने तुम्हाला अगदी खूप छान ओळखलं आहे. तिचा स्वभाव जरा वेगळा आहे ना. तिला वाटत होतं की एक रविवार मिळतो तर तुम्ही आराम करावा म्हणून ती असं बोलली."
"तू माधवी ना. लगेच मैत्रिणीची बाजू घेतलीस. उमाने केलेल्या वर्णनावरून मी तुला ओळखलं. लग्नात अनेक लोक भेटतात त्यामुळे चेहरा लक्षात राहत नाही ." माधवी स्मितहास्य करत मानसला म्हणाली,
"हे माझे मिस्टर रवी आणि हे उषाचे मिस्टर सुशील." एकमेकांना हस्तांदोलन केल्यानंतर सगळे आधी देवीच्या देवळात गेले. सर्वांनी जोडी जोडीने देवीला नमस्कार केला. उमाला खूपच आनंद झाला होता. तिच्या मनात आलं मानस आपला किती विचार करतो. आपली इच्छा मैत्रिणींबरोबर जायची त्याने अगदी लगेच ओळखली. तिने देवीला मनापासून नमस्कार केला आणि विनवले हा माझ्या आयुष्यात कायम राहावा. आमचं जे नातं आज आहे ते तसंच राहिलं तरीही काही हरकत नाही परंतु मला त्याचा सहवास नित्य मिळत राहो. अर्थात हे सर्व सत्यात उतरण्यासाठी नंदिनीने तिचं भावविश्व निर्माण केलेलं असला पाहिजे. नंदिनी इतर कोणामध्ये भावनिक रित्या गुंतलेली असेल तर आणि तरच मानस माझ्याबद्दल विचार करू शकेल. त्यासाठी मी माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत वाट पाहायला तयार आहे. तिने असं बोलून डोळे उघडलं इतक्यात देवीच्या उजव्या बाजूचं गुलाबाचे फुल खाली पडलं. उमाला वाटलं देवीने आपल्याला हा कौल दिला आहे. तिने ते फुल घेऊन मस्तकाला लावून आपल्या पर्समध्ये ठेवलं. बाहेर आल्यावर सुशील म्हणाला,
"मानस तुमची गाडी इकडेच राहू दे. आपल्याला खायचे पदार्थ, पाणी आणि खाली अंथरण्यासाठी चटई, सतरंजी जे काय असेल ते घेऊन चालतच जावं लागेल."
"हो आता वनात जायचं म्हणजे मला गाडी इथेच ठेवायला लागेल. आणि हो तुम्ही कोणीही मला अहो जाहो करू नका. फक्त मानस म्हणा. मी गाडीतून सगळं सामान काढून घेतो."
त्याने गाडीतून सगळ्यांना मिठाईचे बॉक्स आणले ते काढले इतर खाद्यपदार्थ, पाणी, चटई काढली. सर्वांना ते बॉक्स देऊन झाल्यावर त्यांनी म्हटलं सध्या हे आपण या गाडीतच ठेवूया जाताना आठवणीने घेऊन जा. प्रत्येकाने थोडं थोडं सामान घेतलं आणि आमराईत चालायला सुरुवात केली. चालताना आपोआप दोन गट पडले. उमा, उषा, माधवी एकत्र हसत खिदळत चालल्या होत्या आणि मानस, रवी आणि सुशील एकत्र चालले होते.
"मानसने मला एक खूप गोड सरप्राईज दिलं ग मला वाटलंच नव्हतं की आज आपण भेटू शकू. आज आता पूर्ण दिवसभर मस्त गप्पाटप्पा छान होतील." इतक्यात सुशील म्हणाला,
"ए बायांनो तुम्ही तिघीच पिकनिकला आला नाहीयेत आम्ही पण तुमच्याबरोबर आहात. तेव्हा उगाच पुढे पुढे चालू नका आमच्याबरोबरच रहा."
नंतर एक चांगलीशी जागा बघून सतरंजी, चटई अंथरली आणि सगळे त्यावर बसले. सुशीलचा स्वभाव खूपच विनोदी होता. त्याने एकेक विनोद सांगायला सुरुवात केली आणि सगळीकडे हास्याची कारंजी उडायला लागली. उषा पण त्याला शोभेशीच होती. ती पण मध्ये मध्ये त्याला साथ देत होती. मानस म्हणाला,
"ह्या इतक्या दिवसात इतका मनमोकळा मी आजच हसलो आहे. खरंच आपण अधून मधून सगळ्यांनी भेटायला हवं. "
"ए रवी तू एखादा छान गाणं म्हण रे. ह्याचा आवाज एकदम किशोर कुमार सारखा. किशोर कुमारची सगळी गाणी हा खूप सुंदर गातो."
"अरे वा मग होऊन जाऊ दे की एक." त्याने आढेवेढे न घेता 'ओ मेरे दील के चैन' हे सुंदर गाणं गायलं. सुशीलने माऊथ ऑर्गन बरोबर आणला होता. त्याने त्याच्यावर 'हम है राही प्यार के हमसे कुछ ना कोई बोलिये' हे गाणं वाजवून दाखवले. नंतर सर्वांची अंगत पंगत बसली. मानसने 'युज अँड थ्रो' डीशेस आणि ग्लासेस आणले होते. उषा आणि माधवीने घरूनच अळूवड्या, पुरी भाजी, पुलाव, इडली चटणी असं सगळं आणलं होतं. उमाच्या लक्षात आलं की आपण फक्त सुका खाऊच आणला आहे. मानसने आपल्याला आधी कल्पना दिली असती तर आपण पण काहीतरी घरून करून आणलं असतं. ते सर्व पदार्थ पाहून ती बोलली,
"बघाना ह्या तुमच्या भाऊजींनी मला सरप्राईज द्यायचं ठरवलं त्यामुळे मला असं काही तयार करून आणता आलेच नाही. आता फक्त तुम्ही केलेलं आयतं खायचं." त्यावर लगेच माधवी म्हणाली,
"येडाबाई आमचं तुमचं काय करत बसलीस. आता यावेळी आम्ही आणलेल्या पदार्थांवर ताव मार. पुढल्यावेळी तुला करून आणायला लावतो की नाही बघ." मानस म्हणाला,
"उमा मला एक सांग या सरप्राईजमुळे तुला किती आनंद मिळाला. जेवणाचं काय एवढं. आणि मी मस्त सगळ्यांसाठी फ्रूट श्रीखंड आणलं आहेच. इतकंच काय तर या आईस पॅक च्या डब्यात सर्वांसाठी कुल्फी आणली आहे. कुल्फीचं नाव ऐकून उषा म्हणाली,
"मानस तू नुसती कुल्फी आणलीस ना प्रत्येक वेळी तरी चालेल. बाकीचे सर्व आम्ही आणू."
माधवी आणि उषाने जमवून आणल्यामुळे सगळ्यांची अंगातपंगत खूप छान तऱ्हेने पार पडली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. संध्याकाळचे पाच वाजले आणि सगळ्यांनी निघायचं ठरवलं. आता निघायचं म्हटल्यावर तिघीनांही खूपच वाईट वाटलं. निघताना त्यांनी ठरवलं की आता आपण नेहमी पिकनिक करायची म्हणजे खूपच मजा करता येईल.
(आज उमाचा दिवस अतिशय आनंद केला. उद्या उमाचे बाबा निवृत्त होणार आहेत. काय घडतंय पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे