तिची तपश्चर्या - भाग ४४
आज उमाचे बाबा ३८ वर्ष नोकरी करून निवृत्त होणार आहेत पाहूया पुढे..
बाबा निवृत्त होणार आहेत पण सकाळपासून उमाच्याच मनाला हुरहुर लागून राहिली होती. निवृत्तीचा दिवस प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. आपल्या जीवनातील इतका मोठा कालावधी आपण एखाद्या संस्थेत कार्यरत असतो आणि उद्यापासून आपण त्या ठिकाणासाठी परके होणार ही भावनाच खूप हळवी असते. रोज घड्याळाच्या काट्यावर ठराविक वेळेत आपण कार्यालयात जातो. आपल्या स्वतःला एक शिस्त अंगी बाणवूनन घेतो. आपले तिथले सहकारी एका कुटुंबाप्रमाणेच मिळून मिसळून वागत असतात. निवृत्ती मुळे एका व्यक्तीच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण होत असते. उद्यापासूनचा दिवस कसा घालवायचा हा विचारच खूप त्रासदायक असतो.
उमा सकाळी स्वतःचं आवरून खाली आल्यावर आईंनी तिला विचारलं,
"अरे आज आमच्या सुहास्यवदनेचा चेहरा असा उदास का दिसतोय? मानस काही बोलला का गं तुला?"
"नाही आई आज बाबा रिटायर होणार आहेत त्यामुळे मला खूप उदास वाटतं."
"अगं तू आणि मी बाबांच्या शाळेत जाणार आहोत ना त्यांच्या कार्यक्रमाला. आपण त्यांच्याबरोबर असलो की त्यांना जरा बरं वाटेल. मानस आणि त्याचे बाबा संध्याकाळी येणार आहेत तुझ्या माहेरी."
"हो आपण दुपारी आईला घेऊनच जाऊ या शाळेत. राधाताई तिच्या घरूनच येणार आहे."
आईंनी उमाच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला म्हटलं,
"अगं प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या आयुष्यात हा दिवस येत असतो. तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था खूपच तरल झालेली असते. आपण नोकरी करत नसलो तरीसुद्धा आपण कल्पना तर नक्कीच करू शकतो."
शकुंतला ताईंनी मानस आणि उमा वनभोजनासाठी गेले असतानाच तिच्या बाबांसाठी सुंदर शर्ट पॅन्टचं कापड घेतलं होता, सोन्याची अंगठी, शाल, श्रीफळ घेतलं होतं. रमाताईंसाठी एक सिल्कची साडी घेतली होती. मानस आणि बाबा ब्रेकफास्टसाठी खाली आले तेव्हा आईंनी त्यांना सांगितलं,
"मानस तू आणि बाबा संध्याकाळी उमाच्या घरी येणार आहात लक्षात आहे ना. फॅक्टरीत तुमचं घड्याळाकडे लक्ष नसतं तेव्हा जरा घड्याळात वेळ बघून तिकडे या."
"हो आई माझ्या लक्षात आहे. मी आणि बाबा आम्ही नक्की येऊ तिकडे."
आई देवपूजा करत असताना उमाने बाहेर झोपाळ्यावर जाऊन पुन्हा चित्राताईंचा नंबर फिरवला. आताही त्यांनी फोन घेतला नाही. उमाच्या मनात आलं की आता प्रत्यक्ष तिथे जाण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही. तिने मानसला तसं सांगायचं ठरवलं. उमा आणि शकुंतला ताई दुपारी जेवण झाल्यावर तिच्या बाबांच्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या. निघताना उमाने आईला फोन करून तयार राहायला सांगितलं. उमाचं मन फुलपाखरासारखं बागडत होतं. कारण आज खूप कालावधीनंतर ती तिच्याच शाळेची पायरी चढणार होती. आपण कितीही मोठे झालो तरी सुद्धा आपल्या शाळेबद्दल आपली एक वेगळीच आत्मीयता असते. तिथेच आपल्या शिक्षणाचा पाया घातला जातो. आपल्याला एक आत्मविश्वास मिळतो. उमाचं शिक्षण त्याच शाळेत झालं होतं पण बाबांनी कधीही तिला आपल्या वर्गात घेतलं नाही. विचारांच्या तंद्रीत उमाचं घर आलं. रमाताई गाडीत बसल्यावर तिघींच्या गप्पा सुरू झाल्या. रमाताई पण खूपच हळव्या झाल्या होत्या. त्यांच्या एका मनाला खूप आनंद वाटत होता की आता उद्यापासून उमाचे बाबा दिवसभर आपल्याबरोबर असणार. इतकी वर्ष त्यांनी खूप दगदग केली. प्रकृतीची तक्रार असताना शेवटपर्यंत नोकरी केली. त्या शाळेत पोहोचल्या तेव्हा शाळेच्या हॉलमध्ये निरोप समारंभाची खूप चांगली तयारी केली होती.
कार्यक्रम सुरू झाला आणि काही शिक्षक, विद्यार्थी हे बाबांबद्दल चार शब्द बोलले. प्रत्येकाने बाबांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती बद्दल खूप चांगलं सांगितलं. सर्वजण बाबांबद्दल भरभरून बोलत असताना उमाच्या डोळ्यात सारखे अश्रू येत होते. शाळेतर्फे बाबांचा सत्कार करण्यात आला. त्यांना शाल श्रीफळ दिलं आणि एक सुंदर भेटवस्तू सुद्धा दिली. बाबांच्या विद्यार्थ्यांनी स्वखुशीने वर्गणी काढून बाबांना एक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची फ्रेम दिली.
शेवटी उमाचे बाबा बोलायला उठले. त्यांना खूपच गहिवरून आलं होतं. त्यांनी त्यांच्या भाषणात शाळेमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य, मानसन्मान लाभला असं सांगितलं. त्यांची पत्नी रमा आणि दोन्ही मुलींचा खास उल्लेख केला. ते म्हणाले,
"आज ३८ वर्ष नोकरी करून या शाळेतून निवृत्त होताना मी शाळेबद्दल अतिशय कृतज्ञ आहे. माझ्याबरोबर माझे शिक्षक सहकारी आणि विद्यार्थ्यांचा पण मी ऋणी आहे. अशा गुणी विद्यार्थ्यांना शिकवताना मला आत्मिक समाधान लाभले. खरंतर प्रत्येक कुटुंबातील स्त्री ही त्या कुटुंबाचा एक कणा असतो. कणा खंबीर असेल तर ते कुटुंब कधीच ढासळत नाही. माझी पत्नी रमा हिने ते खऱ्या अर्थाने सिद्ध केलं आहे. घरातली कामं सांभाळून तिचा पापड आणि कुरड्यांचा लहानसा व्यवसाय खूप व्यवस्थित रित्या चालवला. त्यासाठी तिने अतोनात कष्ट घेतले. तिला माझ्या मुलींचे सहाय्य मिळालं. तिने आमच्या संसाराला हातभार लावला म्हणून माझ्या दोन्ही मुलींना व्यवस्थित शिक्षण देता आलं. आज माझ्या दोन्ही मुली आपापल्या घरी सुखाने नांदत आहेत. एका पुरुषाला आपल्या कुटुंबाचे सुख समाधान महत्त्वाचे असते. ते मला कायम लाभलं आहे."
साश्रू नयनाने बाबा खाली बसले. निरोप समारंभाची सांगता झाली. तेथून सर्वजण उमाच्या घरी आले. शकुंतला ताईंनी आणि शामरावांनी उमाच्या आई-बाबांना खुर्चीवर बसवून त्यांचा यथोचित आदर सत्कार केला. त्यांना आणलेल्या भेटी दिल्या. आईची ओटी शकुंतला ताईंनी भरली. नंतर उमाने सर्वांसाठी पोहे आणि चहा केला.
एकंदरीतच घरातले सर्वजण खूप हळव्या मनःस्थितीत होते. बाबाना तर उद्यापासून शाळेत जायचं नाही या विचारानेच खूप वाईट वाटत होतं. लवकर घरी परतायचं होतं म्हणून राधा सर्वांचा निरोप घेऊन निघाली. रमाताई म्हणाल्या,
"आजच्या दिवस राहिली असतीस तर बरं वाटलं असतं."
"आई मी नक्कीच राहिले असते पण सासूबाईंना दोन दिवसांसाठी बाहेर जायचं आहे त्यामुळे मला निघावं लागतंय."
त्यांचा संवाद ऐकून शकुंतला ताईंच्या मनात आलं की आज दोन बहिणींपैकी एकीने इथे राहण्याची गरज आहे. त्यांनी हळूच मानसला म्हटलं,
"आज श्रीकांतराव आणि रमाताईंजवळ कोणीतरी राहायला हवं असं मला वाटतं. उमाला दोन दिवस इथे राहू दे का. तसं पण लग्न झाल्यानंतर ती माहेरी राहिलीच नाहीये. तिला आणि तिच्या आई-बाबांना पण जरा बरं वाटेल."
"हो आई राहू दे ना. लग्न झालं म्हणजे मुलींनी माहेरी येऊच नये, माहेरची जबाबदारी घेऊच नये असं काही नाही. राहू दे तिला. तिला नक्कीच आनंद होईल."
चहा पोहे खाऊन सर्व जायला निघाले. उमा आई बाबांना भेटली. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. चप्पल घालणार इतक्यात शकुंतला ताई तिला म्हणाल्या,
"उमा तुला राहायचं असेल तर इथे तू दोन दिवस राहू शकतेस. आई-बाबांना पण जरा बरं वाटेल. बाबांसाठी उद्याचा दिवस खूप जड जाईल. तू असलीस तर जरा त्यांच्याशी गप्पा मारशील."
उमाने आईकडे कृतज्ञतेने पाहिलं,
"आई खरंच तुमच्या सारखी सासू सगळ्यांनाच मिळायला हवी. सुनेच्या भावना समजून घेणारी."
सर्वजण निघून गेले उमा आई-बाबांजवळ राहिली. उमा बाबांना म्हणाली,
"बाबा आता तुम्ही काहीच काळजी करायची नाही. तुमचा वेळ नक्कीच मजेत जाईल. रेडिओवर गाणी ऐकायची. तुम्हाला जमेल तेवढी आईला मदत करा. संध्याकाळच्या वेळी जरा कुठे फेरफटका मारून या. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की काहीही अडचण असली तरी येऊन मला नक्कीच विचारा. असे विद्यार्थी तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही सगळं समजावून सांगा."
"हो गं उमा सुरुवातीला काही दिवस खूप जाणवेल. घड्याळात शाळेची वेळ झाली की किती लगबगिने मी निघायचो. तुझी आई रुमाल घेतला का, पाकीट घेतलं का सगळं आवर्जून विचारायची. एकदा काही दिवस झाले की घरी राहायचा सराव होईल."
रात्री जेवण झाल्यावर तीघांनी थोड्या गप्पा मारल्या मग सर्व जण झोपायला गेले.
(लग्न झाल्यानंतर उमा आणि मानस प्रथमच एकमेकांपासून दूर राहिले होते काय असतील त्यांच्या भावना पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे